वासुदेवराव कुंटे - संघ जगलेले रुबाबदार व्यक्तिमत्त्व

विवेक मराठी    10-May-2021
Total Views |

@राजन वडके

बालवयापासून संघसंस्कारात घडलेल्या वासुदेव कुंटे यांनी भिवंडी, कल्याण, ठाणे, पिंपरी, चिंचवड येथे आणि पुण्यात आपल्या संघकार्याचा ठसा उमटविला. नोकरीतून निवृत्तीनंतरसाप्ताहिक विवेकच्या कामाला वाहून घेतले. रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेले वासुदेवराव जेथे जातील तेथे सर्वांचे लक्ष वेधून घेत. कुंटे कुटुंबीय वाकडेवाडीत राहायला आल्यावर बालपणापासून गेली सुमारे 45 वर्षे माझा त्यांच्याशी स्नेह जमला. वासुदेवराव हेअविरत श्रमणे संघ जिणेया ओळी जगल्याचे दिसून आले. अशा वासुदेवरावांचा हा स्फूर्तिदायक जीवनपट.


kunte_1  H x W:


तेव्हा
देश पारतंत्र्यात होता. हिंदुत्ववादी असलेले भिवंडीचे गोविंदराव लक्ष्मण कुंटे हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भक्त होते. अशा या राष्ट्रीय विचारांच्या कुंटे घराण्यात 22 मार्च 1930 या दिवशी वासुदेव कुंटे यांचा जन्म झाला. वासुदेवचे अकरावीपर्यंतचे शालेय शिक्षण पी.आर. विद्या भवन या शाळेत झाले. वासुदेव नववीत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक नानाराव ढोबळे भिवंडीत दाखल झाले. त्या वेळी नानारावांचा गोविंदराव कुंटे यांच्याशी संपर्क आला, वाढला. नानांनी वासुदेवांना आणि त्याच्या बंधूंना शाखेत नेले. तेव्हापासून वासुदेव नियमितपणे भिवंडीतील संघशाखेत जाऊ लागला. संघकार्य सुरू झाल्यावर कुमारवयातच त्याच्यावर कल्याण येथील संघशाखेची जबाबदारी सोपविण्यात आली. वासुदेव सायकलवरून रोज 12 किलोमीटर प्रवास करून कल्याणच्या शाखेत जात असे.

बालपणापासूनच व्यायामाची आवड असल्याने शाळेचा अभ्यास आणि नियमित संघशाखेबरोबरच बलवान शरीरयष्टीसाठी वासुदेवने व्यायामावरही लक्ष केंद्रित केले होते.

 

अश्वारूढ ध्वजधारित वासुदेवराव

एक दिवस संघाचे स्वयंसेवक आणि हिंदू तरुण मंडळाचे अध्यक्ष पूरणसिंग काची एस.पी. कॉलेजचे क्रीडा प्रशिक्षक रजपूत यांच्याशी गप्पा मारत होते. त्या वेळी त्यांनी मैदानावर तरणाबांड वासुदेवला व्यायाम करताना पाहिले. हा तरुण संघाच्या संचलनात ध्वज घेऊन अश्वावर शोभून दिसेल, असे त्यांना वाटले. पूरणसिंग यांनी वासुदेवला जवळ बोलावून चौकशी केली आणि घोड्यावर बसता येते का, म्हणून विचारले. तेव्हा, मी भोसला मिलिटरी स्कूलचा घोडेस्वारीचे सुवर्णपदक मिळविल्याचे सांगितले. ते ऐकून पूरणसिंग थक्क झाले. त्यांनी तातडीने संघाचे पुणे महानगराचे कार्यवाह बाळासाहेब वझे यांना वासुदेवची माहिती सांगितली. बाळासाहेबांनीही वासुदेवला पाहिल्यावर विजयादशमीच्या पथसंचलनात वासुदेवच अश्वावर बसणार, हे ठरवून टाकले. त्यानंतर त्यांनी एका स्वयंसेवकाबरोबर, “वासू, पथसंचलनात ध्वज घेऊन घोड्यावर तू बसायचे आहेसअशी एका ओळीची चिठ्ठी पाठविली.

विजयादशमीच्या पथसंचलनात वासुदेवला ती संधी दिली. त्यानंतर 1956-57पासून सलग सुमारे 40-45 वर्षे संघाचे पथसंचलन आणि अश्वारूढ ध्वजधारी वासुदेवराव हे समीकरण होऊन गेले होते. या 45-47 वर्षांच्या कालावधीत त्यांच्या पाठीला घोड्याने दोन वेळा चावा घेतला. एकदा जखमी असतानाही त्यांनी त्या स्थितीत त्यांनी संचलन पूर्ण केले होते.

 


वासुदेव
आणि त्याचे अन्य तिघे चुलत बहीण-भाऊ हे 1947-48मध्ये अकरावीत असताना भिवंडीत परीक्षेचे केंद्र नसल्याने त्यांच्या काकांकडे ठाण्यात गेले होते. तेथे चौघांनी अकरावीची परीक्षा दिली. परीक्षेच्या निकालादरम्यान 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या झाली. त्या वेळी संघावर पहिल्यांदा बंदी आली. या बंदीला विरोध करण्याचा निर्णय संघाने घेतला. संघशाखा नियमित लावून बंदीच्या निषेधार्थ शहरांतून पद्य म्हणत संचलन काढण्यात येत होते.

वासुदेवचे वडील गोविंदराव हे त्या वेळी भिवंडीचे शहर संघचालक होते. संघबंदीमुळे गोविंदराव आणि वासुदेव या दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांना ठाण्याच्या तुरुंगात स्थानबद्ध केले. वासुदेवला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली. बंदी उठल्यानंतर संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय माधवराव गोळवलकर उपाख्य गोळवलकर गुरुजी हे त्यांच्या झंझावाती भारत प्रवासात ठाणे जिल्ह्यात आले असताना भिवंडीत कुंटे कुटुंबीयांच्या घरी दोन दिवस वास्तव्यास होते. वासुदेवावर त्याचा एक वेगळाच प्रभाव पडला होता.

त्याच दरम्यान अकरावीच्या परीक्षेचा निकाल लागला. त्यात वासुदेवचे तिन्ही बहीण-भाऊ पास झाले आणि तो नापास झाला. संघशाखा, व्यायाम, खेळ यामुळे अभ्यास झाल्याने तो नापास झाल्याचे घरच्यांना वाटले. परंतु, तुरुंगवास भोगून बाहेर आलेल्या वासुदेवाने, आपण नापास होणे शक्य नसल्याचे गोविंदरावांना सांगितले. त्यामुळे त्यांनी पुण्यात येऊन एसएससी बोर्डाकडे रिव्हॅल्युएशनचा अर्ज केला. त्यानंतर दीड महिन्यांनी अकरावीच्या परीक्षेत तो पास असल्याची तार वासुदेवाला आली. पुण्यात आत्या आणि इतरही नातेवाईक असल्याने हे चौघेही महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. वासुदेवने फर्ग्युसन महाविद्यालयातपीडीला प्रवेश घेतला होता. त्या वेळी तो आणि त्याचा मित्र दिनकर दामले हे सदाशिव पेठेत समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांच्या बंगल्यातील आउट हाउसमध्ये राहत होते. साहजिकच वासुदेव आणि नानासाहेब यांचा चांगला परिचय झाला. वासुदेव संघस्वयंसेवक आणि नानासाहेब समाजवादी विचाराचे, त्यामुळे दोघांमध्ये अनेकदा तात्त्विक चर्चा, वाद-विवाद घडत असत. असे असूनही वासुदेव आणि गोरे यांचा घरोबा होता. फर्ग्युसनमधून पीडी झाल्यानंतर त्याने एस.पी. कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला.

वासुदेव फर्ग्युसमध्ये असताना चारुदत्त सरपोतदारशी त्याची भेट झाली. तेव्हापासून त्या दोघांची आयुष्यभर मैत्री होती. शाळेत असताना वासुदेवने भोसला मिलिटरी स्कूलमधील दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्या वेळी त्याला नेमबाजीचे आणि घोडेस्वारीचे सुवर्णपदक मिळाले होते.



RSS_2  H x W: 0

गाजलेला विवाह

वासुदेवरावांचा विवाह हीदेखील एका अर्थाने गाजलेली घटना म्हणावी लागेल. वासुदेवराव एच.. कंपनीत नोकरी करत असताना त्याच कंपनीत उत्पादन विभागात कॅथरीन भोसले ही तरुणी काम करत होती. कंपनीच्या बसमधून ये-जा करताना त्यांचा परिचय झाला होता. त्या वेळी होणार्या औद्योगिक क्रीडा स्पर्धेमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत हे दोघे एकत्रितपणे खेळले होते. त्यानंतर दोघांचा परिचय वाढला आणि दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. वासुदेवराव संघाचे कार्यकर्ते आणि कॅथरीन ख्रिस्ती. त्यातच एच.. कंपनीत रुजू होण्यापूर्वी ख्रिस्ती धर्मप्रसारक होण्यासाठी तिने संगमनेरच्या ख्रिस्ती महाविद्यालयातून शिक्षण घेतले होते. ‘ननम्हणून सिन्नर तालुक्यात तिची नियुक्ती झाल्यावर दोन वर्षे तिने तेथे सेवाही केली होती. परंतु कौटुंबिक समस्येमुळे ती सिन्नर सोडून पुन्हा पुण्यात आली होती आणि घर सावरण्यासाठी नोकरी करत होती. अशी पार्श्वभूमी असलेल्या तरुणीशी वासुदेवराव विवाह करणार असल्याचे समजल्यावर घरातून त्यांना विरोध झाला. कॅथरीन हिच्या घरातूनही विरोध झाला. हा विरोध पत्करून दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. वासुदेवरावांनी संघाच्या अधिकार्यांनाही या निर्णयाची माहिती दिली. त्यावर उलटसुलट चर्चाही झाली. त्या वेळचे संघाचे अधिकारी अप्पा पेंडसे यांनी या विवाहासाठी पुढाकार घेतला. धार्मिक संस्कारानंतर कॅथरीनने ख्रिस्ती धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारला आणि कॅथरीनची सुनीती झाली. तिच्या या धाडसाचे लोकांनी कौतुक केले. त्यानंतर 13 एप्रिल 1959 या दिवशी पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात दोघांचा विवाह झाला. अप्पा पेंडसे यांनीच सुनीतीचे कन्यादान केले. गाजलेल्या अशा या विवाहास तत्कालीन महापौर गणपतराव नलावडे, .वा. बेहेरे, नानासाहेब गोरे, अरविंद लेले, चारुदत्त सरपोतदार, तसेच संघाचे अधिकारी, सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. नंतर अनेक दिवस पुणे शहरात या विवाहाची चर्चा सुरू होती. विवाह झाल्यापासून अखेरपर्यंत सुनीती कुंटे एकदाही माहेरी गेल्या नाहीत. अरविंद लेले आणि चारुदत्त सरपोतदार यांनी त्यांना बहीण मानले होते.


 

पुण्यात आल्यावरही वासुदेवचे संघकार्य सुरू होते. सुरुवातीच्या काळात तो सरस्वती मंदिर येथील संघशाखेत जाऊ लागला. त्याचा कामाचा आवाका हेरून संघाच्या रचनेतून त्याला शुक्रवार पेठेतील एका मैदानावर (आताच्या टेलिफोन एक्स्चेंजच्या ठिकाणी) संघशाखा सुरू करण्यास सांगितले. वासुदेवने तेथेध्रुवशाखा सुरू केली. त्या परिसरात त्याने संपर्क वाढविला. ध्रुव शाखा बाल-अरुण-तरुणांनी बहरू लागली. या बाल-अरुण स्वयंसेवकांमधील अरविंद लेले, गोविंद मालशे, वसंत प्रसादे, नारायण गोडबोले अशा अनेक स्वयंसेवकांनी पुढे संघकार्याबरोबरच अन्य क्षेत्रांत जबाबदारी स्वीकारून आपल्या कामाचा ठसा उमटविला.

पुण्यात वासुदेवने संघाच्या तिन्ही संघशिक्षा वर्गाचे शिक्षण पूर्ण केले होते. सहा-साडेसहा फूट उंची, पिळदार देहयष्टी आणि देखण्या रूपामुळे रूबाबदार वासुदेव नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेत असे. पुणे शहराचा शिशु विभाग प्रमुख, नंतर बाल विभाग तरुण विभाग प्रमुख म्हणून त्याने केलेल्या कामामुळे पुण्यातील संघविस्ताराला बळ मिळाले. वासुदेवला सर्व जण वासुदेवराव म्हणू लागले.


एस.पी. कॉलेजमधून बी.. झाल्यानंतर वासुदेवराव हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एच..) कंपनीत ज्युनिअर क्लार्क म्हणून नोकरीला लागले. 1959मध्ये कंपनीतीलच एका तरुणीशी त्यांचा विवाह झाला आणि एच.. कॉलनीत नवदांपत्याचा संसार सुरू झाला. येथे आल्यावरही तत्कालीन चिंचवड मंडलामध्ये त्यांनी काम सुरू ठेवले. नंतर त्यांनी पिंपरी चिंचवड परिसरात जनसंघाचे काम सुरू केले. दरम्यान, 1960मध्ये त्यांच्या घरात पाळणा हलला. विश्वास याचा जन्म झाला. त्यानंतर काही वर्षांत विवेक, वीरेंद्र, विजय आणि निवेदिता ही भावंडे जन्माला आली.

 
 

RSS_1  H x W: 0
 
विवेकचे वर्गणीदार वाढविण्याचा ध्यास

साप्ताहिक विवेकचे अधिकारी पुण्यात आले होते. एखाद्या प्रचारकासारखेसाप्ताहिक विवेकचे काम कोण करू शकेल याचा ते शोध घेत होते. त्या वेळीविवेकचे पुणे शहराचे वर्गणीदार वाढविण्याची संपूर्ण जबाबदारी वासुदेवरावांनी स्वीकारावी, असे सांगण्यात आले. वासुदेवरावांनीही ही आव्हानात्मक जबाबदारी आनंदाने स्वीकारली. त्यानंतर त्यांनीविवेकचे वर्गणीदार वाढविण्याचा जणू ध्यास घेतला. स्कूटरला किक मारायची आणि नवीन वर्गणीदार करण्यासाठी शहरात फिरायचे. इमारतींचे जिने चढायचे-उतरायचे. झालेल्या वर्गणीदारांची वर्गणी नियमित वसूल करायची, कोणी चहा विचारल्यास चहा प्यायचा, गप्पा मारायच्या किंवा पाणी पिऊन पुढच्या वर्गणीदाराकडे निघायचे.

विवेकसाठी वर्गणीदार मिळविण्यासाठी, तसेच विशेषांकाला जाहिराती मिळविण्यासाठी आणि तो खपविण्यासाठी केवळ पुणे शहरातच नव्हे, तर हडपसर, उरुळी कांचन, पिंपरी-चिंचवड, तळेगाव या ठिकाणीही ते स्कूटरवरून जात असत. रोज किमान 30 ते 40 घरांशी संपर्क साधण्याचा त्यांचा प्रयत्न असे.

अगदी वयाच्या 80 वर्षानंतरही त्यांचा हा दिनक्रम अव्याहत सुरू होता. एक दिवस स्कूटरवरून जात असताना त्यांना झालेल्या अपघातामुळे दोन्ही गुडघ्यांना मार बसल्याने आणि वयोमानानुसार त्यांना प्रवास करणे अशक्य होऊ लागले. त्यामुळे त्यांनीविवेकची त्यांची जबाबदारी टप्प्याटप्प्याने बलराम शाखेचे ज्येष्ठ स्वयंसेवक रमेश उर्फ मामा देवी यांच्याकडे सोपविली. ही जबाबदारी सोपविताना, “आपण हे काम केवळ कमिशन मिळावे म्हणून स्वीकारले नव्हते, तर थेट संपर्कातून माणसे जोडण्यासाठी स्वीकारले होते. ‘ऑनलाइनकाम करणे मला जमत नाही. त्यामुळे प्रत्येक वर्गणीदाराकडे जसे जमेल तसे प्रत्यक्ष जात होतोअसे आवर्जून स्पष्ट केले होते.

वासुदेवरावांच्या अथक प्रयत्नांमुळे पुणे शहर परिसरात साप्ताहिकविवेकचे जवळपास तीन हजारांहून अधिक वर्गणीदार झाले. त्यांच्या कामगिरीची दखल घेतविवेकच्या वतीने, मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना एकदा आणि नंतर पंतप्रधान झाल्यानंतर असा दोन वेळा वासुदेवरावांचा सत्कार करण्यात आला होता. रोमारोमात संघ भिनलेल्या वासुदेवरावांनी साप्ताहिक विवेकच्या कामालाही वाहून घेतले होते.

प्रसिद्धी माध्यमांच्या बदलत्या स्वरूपाबरोबरच सध्याच्या पत्रकारितेबाबत मतप्रदर्शन करतानाविवेकमधून प्रसिद्ध होत असलेल्या राष्ट्रीय विचारांनी प्रेरित लेखांबाबत, मजकुराबाबत समाधान व्यक्त केले. समाजमनात राष्ट्रीय विचार रुजविण्याचेविवेकचे सुरू असलेले कार्य अभिमानास्पद असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

 

काही वर्षांनंतर 1974-75च्या सुमारास वासुदेवराव पुण्यात शिवाजीनगर येथे शामकृपा सोसायटीमध्ये घेतलेल्या फ्लॅटमध्ये कुटुंबासह राहायला आले. त्या वेळी राहुल चित्रपटगृहाजवळ त्यांनी बलराम प्रभात शाखा सुरू केली. त्याच दरम्यान इंदिरा गांधी सरकारने आणीबाणी जाहीर केली आणि संघावर दुसर्यांदा बंदी घालण्यात आली. संघबंदीच्या विरोधात देशभर सत्याग्रह सुरू झाले. संघाच्या अधिकार्यांचे आणि स्वयंसेवकांचे अटकसत्र सुरू झाले. त्या वेळी सरकारी यंत्रणेमार्फत संघाशी संबंधित प्रत्येकावर नजर ठेवण्यात येत होती. सरकारी नोकरीतील कर्मचार्यांची चौकशी केली जात होती. वासुदेवराव सरकारी नोकरीत असल्याने त्यांच्यावरही करडी नजर ठेवण्यात येत होती. त्याही परिस्थितीत वासुदेवरावांच्या घरी तात्या बापट, दामुअण्णा दाते आदींच्या रात्र-रात्र गुप्त बैठका होत असत. प्रचारक दत्तोपंत म्हसकर हे बंडोपंत म्हणून त्यांच्या घरात वास्तव्यास होते.

सरकारच्या आदेशानुसार एच.. कंपनीचे तत्कालीन अधिकारी श्रीनिवास पाटील यांनी सुमारे अडीच वर्षे वासुदेवरावांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. मात्र, वासुदेवरावांनी कोणालाही कशाचाही थांगपत्ता लागू दिला नाही. पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाला वासुदेवरावांच्या घरी संघाच्या अधिकार्यांची ये-जा सुरू असल्याची कुणकुण लागली होती. शेजारच्या आराधना सोसायटीतील एका परिचिताने वासुदेवरावांना याची माहिती दिली. चारच दिवसांनंतर पोलिसांचे पथक वासुदेवरावांच्या घरावर धडकले आणि सलग चार ते पाच दिवस चौकशी केली. घराची झडतीही घेतली. परंतु, पोलिसांना त्यांच्या घरातून कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट मिळू शकली नाही. आणीबाणी उठल्यानंतर वासुदेवरावांचे संघकार्य अधिक जोमाने सुरू झाले. पुढे 14 ते 16 जानेवारी 1983 या दिवशी पुण्यातील तळजाई टेकडीवर संघाचे महाराष्ट्र प्रांताचे ऐतिहासिक शिबिर झाले. या शिबिरात उपस्थित असलेल्या 35 हजार स्वयंसेवकांसाठीच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी उभारलेल्या भटारखान्याची व्यवस्था वासुदेवरावांवर होती. संघाने सोपविलेली कोणतीही जबाबदारी समर्थपणे पेलून काम यशस्वी करून दाखवायचे, असा त्यांचा खाक्या होता. त्याप्रमाणे हे कामही त्यांनी यशस्वी केले. शिबिर संपल्यानंतरही 15 दिवस शिबिरस्थानी तंबू ठोकून भटारखान्यातील साहित्याची व्यवस्था लावली. हे साहित्य, शुल्क, निधी आदी सगळ्याचा हिशोब लावूनच ते तळजाईची टेकडी उतरले.

वासुदेवराव असिस्टंट पर्सनल मॅनेजर या पदावर असताना 1986मध्ये एच.. कंपनीतून निवृत्त झाले. ते शिवाजीनगरहून कोथरूडला राहायला गेले. तेथे संघाचे काम करताना त्यांच्यावर कोथरूडचे नगर कार्यवाह म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या कामाचा धडाका येथेही सुरू होता. याच काळात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पुणे दौर्यावर आले असताना वासुदेवरावांच्या घरी भेट दिली होती.

अखेरच्या श्वासापर्यंत संघ जगलेल्या वासुदेवरावांनी वयाच्या 92व्या वर्षी 22 एप्रिल 2021 या दिवशी जगाचा निरोप घेतला.

- प्रचार प्रमुख, विद्या भारती, पश्चिम महाराष्ट्र प्रांत