जाणत्यांचा बेगडी चेहरा

विवेक मराठी    14-May-2021   
Total Views |

शरद पवार हे जेव्हा एखाद्या विषयाला हात घालतात, तेव्हा त्यांनी दुसऱ्याच कोणत्यातरी विषयावर निशाणा साधलेला असतो, हा महाराष्ट्राचा अनुभव आहे. असे असेल, तर बारमालक, हॉटेलमालक यांना पुढे करून शरद पवारांनी कोणावर निशाणा साधला आहे? वर वर पाहता दुभत्या गाईची पाठराखण शरद पवार करत आहेत असे दिसत असले, तरी त्यांनी या विषयातून कोणता संदेश दिला आहे? महाराष्ट्रात सध्याची परिस्थिती लक्षात घेता असे म्हणता येईल की, एक ना धड भाराभर चिंध्या. केवळ आभासी संवाद आणि घोषणाबाजी यापलीकडे मुख्यमंत्री काही करत नाहीत. जी काही आरोग्य सेवा तग धरून आहे, ती प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी बंधूमुळे.

pawar_1  H x W:

कोरोनाची दुसरी लाट आली. तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची भाकिते मांडायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे. रुग्णवाढ आणि मृत्यू यांचा विचार करता महाराष्ट्र राज्याचा देशात पहिल्या क्रमांक लागतो. ही गोष्ट भूषणावह नव्हे
, तर ढिसाळ नियोजन आणि संवेदनाहीन प्रशासन यांच्या नाकर्तेपणाची पोचपावती आहे. राज्यातील कोणत्याही प्रश्नावर केंद्राला साकडे घालणारे मुख्यमंत्री आणि केंद्र राज्यावर कसा अन्याय करते आहे यांचे रडगाणे गाणारे मुख्यमंत्र्यांचे सहकारी पाहता महाराष्ट्राच्या नशिबी निष्क्रियांची टोळी आली आहे, हे लक्षात येते. या टोळीचा मुख्य सरदार मात्र कोरोनामुळे झालेल्या वाताहतीबाबत चकार शब्द बोलायला तयार नाही. राज्य सरकारचे नियोजन फसले आहे. शासनाने अन्नधान्य वाटपाची केलेली घोषणा प्रत्यक्षात आली नाही. रिक्षाचालकांसाठी व घर कामगारांसाठी घोषित केलेले अनुदान अजून मिळाले नाही. उद्योगधंदे बंद पडले आहेत, कामगारांची बिकट अवस्था झाली आहे. मराठा आरक्षण विषयावर सरकारला अपयश आले आहे. अशा विविध विषयांवर राज्य सरकारचे शिल्पकार, अनेकांचे प्रेरणाकेंद्र शरदचंद्र पवार मूग गिळून बसले आहेत असे चित्र समाजासमोर आले असले, तरी अनेकांना त्यांच्या तब्येतीची काळजी असते. तब्येत ठीक नसल्याने साहेब अशा शुल्लक गोष्टीमध्ये लक्ष घालत नाहीत, असे काही पाठीराखे भाट सांगतीलही, पण आम्ही त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. कारण रुग्णालयात उपचारासाठी जाऊन आलेले शरद पवार कोरोना आपत्तीमुळे निर्माण झालेल्या समस्येवर बोलत नाहीत, काही उपाय सुचवत नाहीत; मात्र बारमालकांची, हॉटेलमालकांची तरफदारी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात. शरद पवार यांचे हे पत्र समाजमाध्यमातून फिरत असून अनेक प्रश्नांचे मोहोळ या पत्राने जागे केले आहे.

शरद पवारांना जाणते नेतृत्व म्हणून गौरवण्यात येते. त्यांचे जाणतेपण कोणत्या निकषांवर मोजावे? आपत्तिकाळात समोर येणारे प्रश्न असे हाताळले, मार्ग शोधले, दिशादर्शन केले म्हणून की काही मंडळींचे हितसंबंध जपण्यासाठी विशेष मेहरनजर व्हावी म्हणून केलेल्या पत्रलेखनासाठी? बारमालक आणि हॉटेल व्यवसायिक यांच्याबाबत शरद पवार यांना विशेष कळवळा का वाटतो? शेती आणि सहकार क्षेत्रातील निर्विवाद नेतृत्व म्हणून ज्यांच्या आरत्या केल्या जातात, त्या शरद पवारांना शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मग तरीही ज्या गोष्टीमुळे गुणगौरव होतो, त्याच गोष्टीकडे शरद पवार पाठ फिरवून बारमालक, हॉटेलमालक यांची तरफदारी का करतात? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र करण्यात ज्यांचे मोलाचे योगदान आहे, अशांच्या यादीत शरद पवार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. सहकार चळवळ, त्यातही साखर कारखाने म्हणजे शेतकऱ्यांना लुबाडून दारू गाळण्याचे अड्डे निर्माण करणारे जे कुणी आहेत, ते शरद पवारांनी निर्माण केलेल्या स्वहितवादी व्यवस्थेचे पाईक आहेत. साखर कारखाने दारू गाळण्यासाठीच चालवले जातात, हे वास्तव शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात साकार झाले होते. या वास्तवातील एक बिंदू म्हणजे बारमालक, पंचतारांकित दारू विकणारे गुत्तेदार. या गुत्तेदारांचा विशेष कळवळा शरद पवार यांना का यावा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. मागच्या महिन्यात शरद पवारांच्या एका सरदाराला बार व हॉटेलमालकांकडून पैसे वसूल करण्याच्या प्रकरणात पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता या प्रकरणात त्याच्यावर आरोपपत्रही दाखल झाले आहे. महिन्याला शंभर कोटीची वसुली ज्या बार- व हॉटेलमालकांकडून केली जात होती, त्याच्या दुःख-वेदनांनी विरघळून शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे का? आणि मग असे असेल, तर शरद पवारांना बार- व हॉटेलमालकांचीच वेदना का दिसली? शेतकरी, शेतमजूर आणि टाळेबंदीमुळे ज्यांच्या अस्तित्वासमोरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, त्यांना शरद पवारांचे भाट या समूहाचे तारणहार म्हणत असतात. या समूहाच्या दुःख-वेदना शरद पवार यांना कळत नाहीत काय?

शरद पवार हे जेव्हा एखाद्या विषयाला हात घालतात, तेव्हा त्यांनी दुसऱ्याच कोणत्यातरी विषयावर निशाणा साधलेला असतो, हा महाराष्ट्राचा अनुभव आहे. असे असेल, तर बारमालक, हॉटेलमालक यांना पुढे करून शरद पवारांनी कोणावर निशाणा साधला आहे? वर वर पाहता दुभत्या गाईची पाठराखण शरद पवार करत आहेत असे दिसत असले, तरी त्यांनी या विषयातून कोणता संदेश दिला आहे? महाराष्ट्रात सध्याची परिस्थिती लक्षात घेता असे म्हणता येईल की, एक ना धड भाराभर चिंध्या. केवळ आभासी संवाद आणि घोषणाबाजी यापलीकडे मुख्यमंत्री काही करत नाहीत. जी काही आरोग्य सेवा तग धरून आहे, ती प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी बंधूमुळे. कोणत्याही प्रकारचे नियोजित आणि व्यवस्थात्मक निर्णय घेण्यात अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारचे मार्गदर्शक असणारे शरद पवार बाकीच्या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य न करता एकदम बारमालकांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहितात? बहुधा वर्षांनुवर्षे जपलेले मद्यमय हितसंबंध अडचणीत आले आहेत, हे शरद पवारांनी ओळखले असावे. ज्या इंधनावर गाडी चालते, त्या इंधनाची काळजी घेतली जाते. शरद पवारही तेच करत असून त्यांच्या जाणत्या नेतृत्वाचा बेगडी चेहरा या प्रकरणामुळे उतरला गेला आहे.