आनंदाचे चांदणे शिंपीत जीवन जगणारे आबासाहेब

विवेक मराठी    19-May-2021
Total Views |

@अमोल पेडणेकर

 आबासाहेबांनी ज्या वेळेस साप्ताहिक विवेकचे काम सुरू केले, तो कालखंड म्हणजे आणीबाणीनंतरचा कठीण कालखंड होता. साप्ताहिक विवेक अनेक समस्यांनी ग्रासलेले होते. त्या काळात साप्ताहिक विवेकच्या हितचिंतकांनी विवेकला सावरले असे म्हटले जाते आणि ते खरेही आहे. पण हे सावरणे केव्हा सुरू झाले? जेव्हा आबासाहेबांनी साप्ताहिक विवेकच्या हितचिंतकांशी प्रत्यक्ष प्रवास करून संवाद सुरू केला, आबासाहेबांनी सतत दोन वर्षे विवेकसाठी महाराष्ट्रभर प्रवास केला, त्याआधारे विवेकवरील संकटावर सहजतेने मार्ग निघू शकला. काट्यांनी भरलेल्या मार्गातून मार्गक्रमण करत आज विवेक साप्ताहिक विशाल वृक्षापर्यंत येऊन पोहोचलेला आहे.

dombivali_3  H

आबासाहेब पटवारी वारल्याची बातमी माझ्या कानावर आली. आबासाहेब पटवारी गेले काही दिवस आजारी होते. त्यांचे वयही झाले होते. खरे म्हणजे माणसाच्या आयुष्याची अखेर कशी होते? हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आबासाहेब पटवारी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आनंदाने जगले. आबासाहेबांचे हे आनंदाने जगणे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही त्यांच्या सहवासात असणार्या सगळ्या मंडळींना जाणवत होते. वयोमानामुळे विवेकच्या कामातून मुक्त झालेले आबासाहेब विवेकच्या संवेदनेतून, विवेकच्या जाणिवेतून शेवटपर्यंत मुक्त झालेले नव्हते. रमेश पतंगेंसहित माझ्यासारख्या मंडळींना आम्ही केलेल्या कामासंदर्भातचांगले काम केलेस, शाब्बास!” असे म्हणून आमचा उत्साह वाढवणारे आबासाहेब मी त्यांच्या मृत्यूच्या 15 दिवस अगोदरपर्यंत अनुभवले आहेत. आम्ही हिंदी विवेक मासिका पत्रिकेकरिता स्वतःच्या मालकीची जागा घेत आहोत, हे त्यांना कळल्यानंतर आबासाहेबांचा फोन आला तोच असाचशाब्बासम्हणून अभिनंदन करणारा. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा अनुभव असाच आहे. आबासाहेब आपले संपूर्ण जीवन अत्यंत आनंदाने जगले. ज्यांचे संपूर्ण जीवन आनंदी असते, अशीच माणसे आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही दुसर्याला आनंद देत असतात. आबासाहेब यापैकी एक होते.. आनंदाचे चांदणे शिंपीत जगणारे.

आबासाहेबांचा लाभलेला सहवास, त्यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यातून आपल्या मनावर झालेले संस्कार यांनी आपल्या मनामध्ये घर केलेले आहे. असे आबासाहेब पटवारी आज आपल्यामध्ये शरीररूपाने नाही आहेत. पण त्यांच्या सहवासात लाभलेल्या सुंदर स्मृती आपल्या मनामध्ये आहेत. आबासाहेब पटवारी एका अर्थाने फार मोठे व्यक्तिमत्त्व होते. सहकार, राजकारण, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र अशा भिन्न क्षेत्रांमध्ये त्यांचा सहजतेने वावर होता. त्या क्षेत्रातील अनेक संस्थांच्या विकासामध्ये आबासाहेबांचे भरीव योगदान होते. आबासाहेब मोठे होते, पण त्यांनी अनेकांना आपले जीवन सर्वार्थाने समृद्ध करण्याचा मार्ग दाखवलेला आहे. त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे.

आबासाहेब गेल्याची बातमी कळल्यानंतर त्यांच्यासह अनुभवलेले कितीतरी प्रसंग, त्यांच्यासोबत केलेले असंख्य प्रवास आणि त्यांच्यासह अनुभवले अनोखे जग माझ्या नजरेसमोर तरळू लागले. मी विवेकमध्ये रुजू झालो, तेव्हा मला जाहिरात मिळवण्याचा किंवा पत्रकारितेचाही कोणताही अनुभव नव्हता. माझी ही स्थिती पाहून बाबासाहेबांनी पहिल्या भेटीतच मला सांगितले, “मडकं रिकामं आहे, आपल्याला योग्य प्रकारे भरता येईल. तू माझ्यासोबत प्रवास कर. सर्व ठीक होईल.” पहिल्याच भेटीमध्ये एवढे विश्वासाने सांगणारे आबासाहेब त्याक्षणी मलाभिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेअसे सांगणार्या परमेश्वराप्रमाणे भासले. आबासाहेबांसोबत वेगवेगळे जिल्हा विशेषांक, सहकारी बँकांचे विशेषांक, आध्यात्मिक संस्थांचे विशेषांक, राजकीय नेत्यांचे, पक्षांचे विशेषांक अशा स्वरूपाचे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्य करण्याचा योग आला. त्यांच्यासह काम करत असताना नकळतपणे कसा घडत गेलो, हे माझे मलाच कळले नाही. मला संस्कारक्षम वयात आबासाहेबांचे मार्गदर्शन लाभले, हे मी माझे भाग्य समजतो. एक मार्गदर्शक म्हणून माझ्या जीवनाच्या जडणघडणीत आबासाहेबांचे फार मोठे स्थान आहे. योग्य वेळी योग्य व्यक्ती संपर्कात येणे ही नशिबाची गोष्ट असते.

एखाद्या वेळेस जाहिराती करता संपर्क करत असताना जाहिरातदारांनी दिलेल्या अवघड वागणुकीमुळे मनाला नैराश्य येत असे. अशा वेळी मी आबासाहेबांकडे आपली नाराजी व्यक्त केली, तर आबासाहेब म्हणायचे, “अपयश आले म्हणून निराश व्हायचे कारण नाही. तू निराश होऊ नकोस. तुझे वाईट अनुभव सगळे विवेकला अर्पण कर. स्वत:जवळ काय ठेवू नकोस. म्हणजे तुला दु: होणार नाही. तुला असे कधी अवघड प्रश्न आले तर माझ्याशी बोल, मी तुला मार्ग सांगेन.” माझ्या मनातील सर्व प्रकारची आंदोलने व्यक्त करण्याकरता आबासाहेब पटवारी मला एक मार्गदर्शक व्यासपीठ म्हणून उपलब्ध झाले होते. मला माझ्या कामाची पद्धत सुधारण्यात आणि मनाची मशागत करण्यामध्ये आबासाहेबांच्या सहवासाचा आणि संस्काराचा फार उपयोग झाला. त्याच्यासह काम करत असताना समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आबासाहेबांबद्दल आदराची भावना असल्याचे प्रकर्षाने मला जाणवत होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या बारीकसारीक रंगछटा मी अनुभवत होतो.

आबासाहेबांसह काम करताना त्यांच्याकडून दोन वाक्य नेहमी ऐकू यायची - ‘स्वयंसेवक असणे ही फार मोठी जबाबदारी आहेआणि दुसरे वाक्य होते - “मी शाखेचा अग्रेसर स्वयंसेवक होतो.’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून आबासाहेबांचा जो विचार होता, तो विचारच त्यांच्या संपूर्ण जीवनाला स्पर्श करताना जाणवत होता. आबासाहेबांनी विविध क्षेत्रांमध्ये कार्य करत असताना अग्रेसर राहून भव्य असे कार्य केले आहे. त्यांनी केलेल्या सर्वच कार्याला मोठी उंची दिलेली आहे. एका अग्रेसर आणि जबाबदार स्वयंसेवकाची जवाबदारी काय असते, याचे स्मरण आबासाहेबांच्या जीवनाकडे पाहिले की त्यांनी केलेल्या कार्यातून आपल्याला होते.

dombivali_1  H  

व्हॅलेंटाइन डे, फ्रेंडशिप डे अशा अनेकडेमध्ये गुंतलेल्या हिंदू समाजाला योग्य पर्याय दिल्यास तो आपल्या भारतीय परंपरेच्या सांस्कृतिक कार्यामध्ये कशा पद्धतीने सहभागी होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण त्यांनी नववर्ष स्वागत यात्रेच्या मध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला दिले आहे. नववर्ष स्वागत यात्रा, जी आज संपूर्ण महाराष्ट्रासह सर्व देशामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी साजरी केली जाते, ती आबासाहेबांची कल्पना. व्हॅलेंटाइन डे, फ्रेंडशिप डे, थर्टी फस्टला तरुणांना प्रतिकार करण्यापेक्षा तरुणांना समर्थ पर्याय देऊन संस्कृती समजावली पाहिजे, हे आबासाहेबांचे वाक्य माझ्या मनात गुंजत राहते. एका अस्वस्थ करणार्या सामाजिक संस्काराला आबासाहेबांनी आपल्या कल्पनेतून एका सकारात्मक दिशेकडे कशा स्वरूपामध्ये वळवले, याचे गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रा हे उत्तम उदाहरण आहे. डोंबिवलीच्या गणेश मंदिरातून प्रारंभ झालेली नववर्ष स्वागत यात्रा आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये आपला सांस्कृतिक वारसा म्हणून साजरी करण्याची परंपरा निर्माण झालेली आहे. आज सांस्कृतिक परंपरा म्हणून ज्या नववर्ष स्वागत यात्रेकडे पाहिले जाते, ती स्वागत यात्रा आबासाहेब पटवारी यांच्या कल्पक आणि भव्य काहीतरी करण्याच्या दृष्टीकोनातून निर्माण झालेली आहे. या स्वागत यात्रेची रचना कशी असेल? ती कशाकरता आपण केली पाहिजे? तिचा उद्देश काय आहे? या सगळ्या विचारांनी भारावलेले आबासाहेब पटवारी मी ही यात्रा होण्यापूर्वी आबासाहेब पटवारींसोबत प्रवास करत असताना अनुभवले आहेत आणि त्यानंतर यशस्वी झालेली ही यात्रा फक्त डोंबिवलीची राहता ती संपूर्ण देशाची झाली पाहिजे, याकरिता भारावलेपणाने काम करणारे आबासाहेब पटवारीही मी पाहिले आहेत. माझ्यासारखा अनेकांचा हा अनुभव असेल. आज आबासाहेब पटवारी शरीराने आपल्यामध्ये नाही आहेत. पण या नववर्ष स्वागत यात्रेच्या माध्यमातून ते आपल्यामध्ये सदैव राहू शकतात. या यात्रेमध्ये भविष्यात कोणताही खंड पडता ती अविरत चालत राहावी, याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. याचबरोबर महाराष्ट्रात आणि देशातील विविध भागांमध्ये संपन्न होणार्या या यात्रेमध्ये आबासाहेब पटवारी यांच्या नावाचे स्मरण होणे अत्यंत गरजेचे आहे, असे मला वाटते.

आबासाहेब किती मोठे होते हे मी सांगू शकत नाही, पण त्यांच्या कार्याची उंची किती होती, हे अनुभवण्याची संधी मला पुण्यामध्ये एका कार्यक्रमात आली होती. पुण्यामध्ये अपंग कल्याणकारी संस्थेच्या कार्यक्रमाकरिता राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम उपस्थित होते. आबासाहेब पटवारी यांच्या प्रयत्नातून विवेक साप्ताहिकाच्या वतीने एपीजे अब्दुल कलाम यांच्या मूळ कवितांचे पुस्तक मराठी आणि हिंदी भाषेमध्ये यापूर्वी प्रकाशित करण्यात आले होते. पुण्यामध्ये अपंग कल्याणकारी संस्थेचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला त्या संस्थेने आम्हाला निमंत्रित केले होते. ज्या वेळी एपीजे अब्दुल कलाम आले, तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या हजारो लोकांची प्रचंड गर्दी होती. महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, सगळ्या मंत्र्यांचा गोतावळा ही सर्व मंडळी अब्दुल कलाम यांच्यासोबत होते. आबासाहेब पटवारी त्या गर्दीमध्ये एका बाजूला उभे होते. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्या गर्दीतसुद्धा आबासाहेब पटवारी यांना पाहिले. त्याच क्षणाला एपीजे अब्दुल कलाम आपला मार्ग बदलून आबासाहेब पटवारी यांना भेटायला आले. आपल्या चेहर्यावर आश्चर्यभाव व्यक्त करीत बाबासाहेबांना म्हणाले, “पटवारीजी तुम्ही येथे कसे?” तेव्हा आबासाहेब म्हणाले, “माननीय राष्ट्रपतीजी, तुम्ही येणार आहात हे कळले आणि मी हजर झालो.” नंतर अक्षरशः दोन मित्र एकमेकांना भेटलेले आहेत अशा वातावरणात दोघे पाच मिनिटे एकमेकांशी गप्पा मारत होते. आजूबाजूची संपूर्ण गर्दी आणि उपस्थित सगळे मंत्री या गोष्टीकडे आश्चर्याने पाहत होते.

आबासाहेबांच्या मृत्यूनंतर विवेक परिवार महणून आमची फार मोठी हानी झाली आहे असे मी म्हणणार नाही. विवेकमध्ये आबासाहेबांनी आपल्या संस्कारातून आजची पिढी निर्माण केली आहे. त्यांनी संस्कारातून, अनुभवाच्या आधारातून तयार केलेली पिढी आज विवेक समूहाच्या वृद्धीकरिता आपले योगदान देत आहे. मी स्वत: आहे, रविराज बावडेकर आणि अनेक जण आहेत. आबासाहेब पटवारी हे दोन पिढ्यांना जोडणारा दुवा होते. स्वत:च्या काळातील विवेक आणि त्यानंतरचा विवेक यातील मार्ग सुखकर करण्याचा प्रयत्न आबासाहेबांनी केलेला आहे. आपल्या स्वत:च्या जीवनकाळातही विवेकला समर्थपणे उभे करण्याकरिता अत्यंत भरीव योगदान दिलेले आहे. याचबरोबर आपल्यानंतरच्या काळातही विवेक भक्कमपणे उभा राहील या दिशेने विवेकची बांधणी करण्यात आबासाहेबांनी आपले मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे आबासाहेब गेल्याचे दुःख आहे ते तेवढ्याच गोष्टीचे, शाब्बास म्हणून पाठ थोपटणारे पितृछत्राचे हात किंवाशाब्बास! छान केलेसअसे म्हणणारे आबासाहेबांचे शब्द कानावर पडणार नाहीत. त्यांच्या सहवासात आल्यानंतर स्वत:च्याही नकळत त्यांनी माझ्या मनावर जे संस्कार केलेले आहेत, त्या संस्कारांमुळे आबासाहेब पटवारी अदृश्य रूपाने माझ्या स्मृतीमध्ये सदैव राहतील.

आबासाहेबांनी ज्या वेळेस साप्ताहिक विवेकचे काम सुरू केले, तो कालखंड म्हणजे आणीबाणीनंतरचा कठीण कालखंड होता. साप्ताहिक विवेक अनेक समस्यांनी ग्रासलेले होते. त्या काळात साप्ताहिक विवेकच्या हितचिंतकांनी विवेकला सावरले असे म्हटले जाते आणि ते खरेही आहे. पण हे सावरणे केव्हा सुरू झाले? जेव्हा आबासाहेबांनी साप्ताहिक विवेकच्या हितचिंतकांशी प्रत्यक्ष प्रवास करून संवाद सुरू केला, आबासाहेबांनी सतत दोन वर्षे विवेकसाठी महाराष्ट्रभर प्रवास केला, त्याआधारे विवेकवरील संकटावर सहजतेने मार्ग निघू शकला. काट्यांनी भरलेल्या मार्गातून मार्गक्रमण करत आज विवेक साप्ताहिक विशाल वृक्षापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. साप्ताहिक विवेकचे रूपांतर विवेक समूहात झालेले आहे. या संपूर्ण प्रवासात आणि परिवर्तनात विवेकच्या प्रचार-प्रसिद्धीमध्ये आबासाहेबांचेही मोठे योगदान आहे.

पुढील दोन वर्षांनी साप्ताहिक विवेक आपली पंचाहत्तरी साजरी करणार आहे. विवेकच्या आजपर्यंतच्या या संघर्षपूर्ण काळामध्येचरैवेति चरैवेतिहा मंत्र घेऊन मार्ग चालणारे आबासाहेब पटवारी यांच्याबद्दल आमच्या सर्वांच्या मनामध्ये सतत स्मरण राहील. आबासाहेबांच्या यशस्वी जीवनाचे निरीक्षण केल्यानंतर मला त्यांच्या जीवनातून पाच सूत्रे सापडतात. त्या पाच सूत्रांना मी आबासाहेबांच्या यशस्वी जीवनाची पंचसूत्री असे म्हणेन. सेवाभाव, समाजातील कोणत्याही घटकाशी मैत्री करण्याचा मैत्री भाव, कर्तृत्वभावना आणि भव्य कार्याची किंवा उपक्रमांची निवड करणे, त्या कार्याला यशस्वी करण्याकरिता जिद्द आणि या सर्वात यश मिळाल्यावर समाजात अत्यंत सौम्य सद्भावनेने वावरणारे आबासाहेब.

आबासाहेब पटवारींच्या सहवासात आल्यानंतर स्वत:च्याही नकळत त्यांनी आमच्या मनावर जे संस्कार केलेले आहेत, त्या संस्कारांमुळे आबासाहेब पटवारी अदृश्य रूपाने सदैव आमच्या स्मृतीमध्ये राहतील. या पंचसूत्रीच्या आधारावर विवेकमधील प्रत्येक घटक विवेक समूहाच्या विकासाकरिता प्रयत्न करत राहील असे मला वाटते. आबासाहेब पटवारी यांना हीच खर्या अर्थाने श्रद्धांजली राहील. आबासाहेब पटवारी यांचे हे स्मरण आमच्या सगळ्यांच्या मनात विवेक समूहाच्या विकासाकरिता कर्तव्यभाव जागा करत राहील, असा आम्हाला विश्वास आहे.

आबासाहेब पटवारींच्या सहवासात आल्यानंतर स्वत:च्याही नकळत त्यांनी आमच्या मनावर जे संस्कार केलेले आहेत, त्या संस्कारांमुळे आबासाहेब पटवारी अदृश्य रूपाने सदैव आमच्या स्मृतीमध्ये राहतील. या पंचसूत्रीच्या आधारावर विवेकमधील प्रत्येक घटक विवेक समूहाच्या विकासाकरिता प्रयत्न करत राहील असे मला वाटते. आबासाहेब पटवारी यांना हीच खर्या अर्थाने श्रद्धांजली राहील.