कोरोना आणि नव्या वर्षातील शिक्षणव्यवस्था

विवेक मराठी    03-May-2021
Total Views |

@आनंद मोरे 

कोरोनाचे
संकट अनपेक्षितपणे आले असले, तरीही आपण त्याचा वापर करून शिक्षण क्षेत्राला विधायक वळण देणार असू, तर त्यासाठी आतापासूनच साधकबाधक विचार आणि मग त्याआधारे अंमलबजावणी केली, तर त्याचा आपल्या पुढील पिढीला नक्कीच उपयोग होऊ शकतो.


education_1  H

केंद्रीय आणि राज्य शैक्षणिक महामंडळाच्या शालांत परीक्षा रद्द झालेल्या आहेत आणि आपण देशव्यापी साथीला तोंड देत आहोत. विद्यार्थ्यांचे मागील शैक्षणिक वर्ष ज्याप्रमाणे घरात बसून गेले, त्याप्रमाणे आगामी शैक्षणिक वर्षही जाण्याची लक्षणे दिसत आहेत. शालांत परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण अशी अभूतपूर्व परिस्थिती तयार झाल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालय प्रवेशाच्या जुन्या व्यवस्थेची कसोटी लागणार आहे आणि जर मुलांना याही वर्षी घरून अभ्यास करायला लागणार असेल, तर पहिली ते आठवीपर्यंतची लहान मुले, शालांत परीक्षेला बसणारी मुले, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात शिकणारी मुले आणि व्यावसायिक परीक्षांचा अभ्यास करणारी मुले या सगळ्यांच्या अभ्यासाची आणि परीक्षांची उत्तम सोय लावण्याची जबाबदारी आपल्या शैक्षणिक व्यवस्थेवर आली आहे. हे शिवधनुष्य असले, तरी कित्येकदा मोठ्या संकटांच्या काळात अनेक बदल स्वीकारण्यासाठी समाज तयार असतो, या वैश्विक सत्याचा वापर करून आपण आपल्या जुन्या शैक्षणिक व्यवस्थेत अनेक विधायक बदल घडवून आणून आपल्या पुढील पिढीला जागतिक अर्थव्यवस्थेत जिंकण्यासाठी तयार करू शकतो.

 

एक मुलगा बारावीत, दुसरा शालांत परीक्षेला, आजूबाजूला अनेक सुखवस्तू आणि गरीब घरांतील मुले आणि स्वत:चा सीए कोर्ससाठी प्रशिक्षण देण्याचा वीस वर्षांचा व्यवसाय, ज्यात गेल्या वर्षी वर्गात शिकवण्याच्या संपूर्ण व्यवस्थेला इंटरनेटच्या माध्यमातून शिकवण्यासाठी रूपांतरित करण्यासाठीचा प्रशासकीय आणि शिक्षकी अनुभव, या पार्श्वभूमीतून मला दिसणारे शैक्षणिक विश्व आणि त्यातील अडचणी आणि त्यावरील मला सुचलेले उपाय मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

विविध आर्थिक स्तरांतील विद्यार्थी शाळा-कॉलेजवर वेगवेगळ्या कारणांसाठी अवलंबून असतात.

कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब घरांतील मुले शाळा-कॉलेजांतच शिकता येईल आणि तिथेच परीक्षा होऊन शैक्षणिक प्रमाणपत्र मिळेल म्हणून शिकतात. अभ्यासक्रमाबाहेरचे व्यक्तिमत्त्वविकासाशी संबंधित विद्यालयीन उपक्रम त्यांनी शाळा-कॉलेज निवडण्याचे प्रमुख कारण नसतात.

याउलट मध्यमवर्गातील आणि श्रीमंत घरातील मुले शिकण्यापेक्षा परीक्षेसाठी आणि त्यातून मिळणार्या प्रमाणपत्रासाठी शाळा-कॉलेजांवर अवलंबून असतात. अभ्यासासाठी कोचिंग क्लासेस आणि व्यक्तिमत्त्वविकासासाठी विविध छंदवर्ग किंवा कार्यशाळा वापरणे त्यांना सहज शक्य असते. तिथून पैलू पाडले गेलेले गुण शालेय उपक्रमात वापरून त्यासाठीच्या प्रमाणपत्रांवर आपले नाव आणणे त्यांना शक्य असते.


education_2  H

म्हणजे नोकरीसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमाणपत्र मिळावे ही शैक्षणिक संस्थांकडून सर्व वर्गांतील मुलांची अपेक्षा असते, तर शाळेत शिक्षक चांगले हवेत ही सर्व वर्गांतून येणार्या विद्यार्थ्यांची मागणी असली, तरी चांगले शिक्षक असणे ही कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गातील मुलांची गरज असते, हे लक्षात ठेवून आपण आपल्या शैक्षणिक व्यवस्थेची रचना बघू या.

कुठल्याही शैक्षणिक व्यवस्थेत अभ्यासक्रम ठरवणारे (शैक्षणिक महामंडळ), त्यानुसार पाठ्यपुस्तके तयार करणारे (पाठ्यपुस्तक मंडळ), पाठ्यपुस्तकातील मजकूर समजून घेण्यासाठी मुलांच्या सध्याच्या बौद्धिक आणि आकलन पातळीवर उतरून मदत करणारे (शिक्षक) आणि वर्षअखेरीस मुलांना त्या वर्षीचा अभ्यासक्रम किती समजला आहे त्याचे मूल्यमापन करणारे (परीक्षा मंडळ) असे वेगवेगळे घटक असतात. यातील पहिल्या दोन घटकांचा विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क दैनंदिन स्वरूपाचा नसतो. ते सरकारप्रणीत आणि सरकार संचलित असतात. याउलट शिकवण्याचे काम करणारे शिक्षक मात्र दैनंदिन स्वरूपात विद्यार्थ्यांना जिथे भेटतात, ती शाळा किंवा कॉलेज ही संस्था मात्र सरकारी असेलच असे नाही. ती सरकारी असू शकते, किंवा सरकारी अनुदानावर चालणारी असू शकते किंवा मग संपूर्णपणे खाजगी असू शकते. परीक्षा मंडळे सरकारप्रणीत आणि सरकार संचालित असतात आणि त्यांचा विद्यार्थ्यांशी अप्रत्यक्ष संपर्क वर्षअखेरीस येतो, तेही शालांत किंवा तत्सम परीक्षा असेल तरच. अन्यथा शालांतपूर्व किंवा पदवीपूर्व परीक्षा घेणे ही त्या शाळेची किंवा कॉलेजची जबाबदारी असते.

आपल्या शैक्षणिक व्यवस्थेची रचना ढोबळमानाने वरील परिच्छेदात नमूद केल्याप्रमाणे आहे. कोरोनामुळे या रचनेतील पहिल्या दोन घटकांवर परिणाम झालेला नाही. पण मुलांच्या बौद्धिक आणि आकलन पातळीवर उतरून त्यांना पाठ्यपुस्तकातील विषय समजावून देण्यासाठी सुयोग्य शिक्षकांची नेमणूक करणार्या शाळांची आणि मुलांच्या परीक्षा घेण्यासाठी शालेय स्तरावर किंवा राज्य/देशव्यापी स्तरावर काम करणार्या परीक्षा मंडळांची कामे कोरोनामुळे संपूर्णपणे विसकळीत झाली आहेत. जिथे मुलांचे अभ्यास करून घेण्याच्या मूळ कामात अनपेक्षित आणि पर्वतप्राय अडथळे आले आहेत, तिथे अभ्यासेतर उपक्रम चालवणे संपूर्णपणे अशक्य झाले आहे.

गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हा अभ्यास करून घेण्यासाठी आपण इंटरनेटचा मार्ग वापरायला सुरुवात केली आणि यातील अडचणी समोर येऊ लागल्या. या अडचणी गेल्या वर्षी होत्या आणि आणखी काही वर्षे त्या कमी होतील याची खात्री नाही.

. व्यवस्थात्मक अडचणी

1) सर्व विद्यार्थी इंटरनेटशी जोडलेले नसणे.

2) सर्वांकडे इंटरनेटआधारित अभ्यास करण्यासाठी आवश्यक सामग्री (संगणक किंवा स्मार्टफोन) नसणे.

3) इंटरनेट वापरण्यासाठी विजेचा आणि डेटा कनेक्शनचा पुरवठा अनियमित स्वरूपाचा असल्याने शिकवण्याच्या वेळी मुलांना किंवा शिक्षकांना अनुपस्थित राहावे लागणे.

. शिकवताना येणार्या अडचणी

अनेक शिक्षक वर्गात शिकवण्याच्या तंत्रात अनुभवी असले, तरी ऑनलाइन तंत्र त्यांच्यासाठी संपूर्णपणे नवे आहे. खडू आणि फळा याऐवजी कॉम्प्युटर, कॅमेरा आणि कीबोर्ड किंवा फोनच्या कॅमेर्यासमोर मांडलेला फळा आणि त्यासमोर एकटेच उभे राहून मुलांना शिकवणे कठीण गोष्ट आहे. ती वर्गात शिकवण्याइतकी परिणामकारक होणार नाही, असे कित्येक शिक्षकांचे मत आहे. याशिवाय त्यांना येणार्या अडचणी पुढीलप्रमाणे -

1) शिकवताना मुलांचे कॅमेरे बंद असल्याने मुलांचे चेहरे दिसणे. किंवा कॅमेरे चालू ठेवल्यास त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील गोष्टी दिसून वर्गातील सर्वांचे लक्ष विचलित होणे.

2) मुलांना प्रश्न विचारल्यास त्यांनी माइक बंद ठेवणे, किंवा माइक चालू केल्यावर त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील गोंगाट ऐकू येऊन वर्गातील इतर मुलांचे लक्ष विचलित होणे,

3) मुले समोर नसल्याने त्यांनी सर्व मुद्दे व्यवस्थित लिहून घेतले आहेत का, ते तपासायला मिळणे.

. शिकताना येणार्या अडचणी

शिकण्याची क्रिया केवळ शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील संवादाचे फलित नसून ती संपूर्ण वातावरणाचे फलित असते. अगदी वर्गात शिकतानाही मुले शिक्षकाचे ऐकत असतात आणि त्याच वेळी शेजारच्या मित्र-मैत्रिणीची वहीदेखील त्यांच्यासाठी मार्गदर्शक असते. शिक्षकाच्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना वर्गमित्रांची मदत होत असते. ऑनलाइनमध्ये प्रत्येक जण आपल्या घरात एकेकटा असल्याने ही सामूहिक शिक्षणाची आणि वेग जुळवून घेण्याची शक्यता मावळते. त्याशिवाय मुलांना येणार्या अडचणी पुढीलप्रमाणे -

1) सलग एका ठिकाणी एकट्याने बसून स्क्रीनकडे लक्ष देणे कठीण जाते.

2) स्क्रीन लाइटचा डोळ्यांना त्रास होतो.

3) आपण घरातच असल्याने घरातील गोंगाट, घरातील जागेची अडचण या सगळ्याचा परिणाम होऊन लक्ष कमी लागते.

4) कॉम्प्युटर किंवा फोन एकाच वेळी अनेक कामे करू शकत असल्याने, अभ्यास करताना ऑनलाइन गेम किंवा मनोरंजनाचे व्हिडिओ बघावेसे वाटणे.

या सगळ्या अडचणी दूर करता येणे अशक्य आहे, पण त्यांची तीव्रता कमी करता येणे शक्य आहे. पण यातील बहुतेक उपाय चाकोरीबाहेरचे आहेत.

1) शैक्षणिक वर्षाचा कालावधी वाढवणे. यामुळे कोरोनाची तिसरी किंवा चौथी लाट आल्यास, सरकारला लॉकडाउनसारखा पर्याय अमलात आणावा लागल्यास मुलांसाठी वातावरण अस्थिर होणार नाही.

2) सर्व मुलांना एकाच वेळी शाळेत आणण्याचा मार्ग वापरता पन्नास टक्के विद्यार्थी एका दिवशी, तर उरलेले पन्नास टक्के विद्यार्थी दुसर्या दिवशी अशी व्यवस्था करणे. ज्या दिवशी विद्यार्थी घरी असेल त्या दिवसासाठी त्याच्याकडे अभ्यासाचे काम नेमून दिलेले असेल. ज्या दिवशी तो शाळेत येईल, त्या दिवशी तो अभ्यास तपासण्याचे काम शिक्षकांना करावे लागेल.

3) यामुळे शिक्षकांचा शिकवण्याचा वेळ कमी होईल. म्हणून पाठ्यपुस्तक महामंडळाने आपले काम जर केवळ क्रमिक पुस्तके तयार करणे या पारंपरिक सीमेच्या आत ठेवता क्रमिक पुस्तके दृक्-श्राव्य माध्यमात रूपांतरित करण्याचेही काम सुरू केले, तर तुटपुंज्या साधनांनी मुलांना शिकवण्याचे काम करणार्या शिक्षकांना मुलांच्या अन्य अडचणींकडे आपले लक्ष वळवता येईल. विज्ञानातील प्रयोग आणि संकल्पना, गणितातील संकल्पना यासाठी दृक्-श्राव्य आणि भाषा विषयासाठी श्राव्य माध्यमाचा वापर केल्यास टप्प्याटप्प्याने काम करतानाही वेग वाढवता येईल.

4) ही दृक्-श्राव्य पाठ्यपुस्तके मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी इंटरनेट, दूरदर्शन, रेडियो अशी विविध माध्यमे वापरता येतील.

5) हे रूपांतरण करण्यासाठी पाठ्यपुस्तक मंडळ विकेंद्रित व्यवस्थादेखील वापरू शकते. रूपांतरण कसे करायचे त्याबद्दलची मार्गदर्शक तत्त्वे मंडळाने बनवावीत. ज्याला शक्य असेल त्याने रूपांतरण करून ते मंडळाकडे सुपुर्द करावे आणि ते निकषांबरहुकूम असेल, तर पाठ्यपुस्तक मंडळाकडून त्या रूपांतरणकर्त्याला त्याचे पैसे मिळावेत.

6) परीक्षेच्या काळात - विशेषतः शालांत परीक्षेच्या काळात राज्यातील किंवा देशातील वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन, परीक्षेचे एकच वेळापत्रक ठेवता किमान दोन वेळापत्रके तयार करून ती आधीच जाहीर करावीत. परीक्षेच्या काळात ज्या विद्यार्थ्यांना आजाराला तोंड द्यावे लागेल, त्यांना दुसर्या वेळापत्रकाचा पर्याय उपलब्ध ठेवावा. एक किंवा त्यापेक्षा जास्त पेपर आधीच्या वेळापत्रकात देऊन झाल्यावर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या विभागातील सर्व विद्यार्थ्यांना उरलेले पेपर त्याच वेळापत्रकानुसार देणे कोरोनामुळे शक्य नसेल, तर उरलेले पेपर दुसर्या वेळापत्रकानुसार देण्याची मुभा असावी.

येत्या वर्षात कोरोनाने पुन्हा आपले बळ दाखवले, तरीही या उपायांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा अनिष्ट परिणाम होणार नाही.

शैक्षणिक प्रमाणपत्र ही शिक्षणव्यवस्थेकडून सर्व आर्थिक वर्गांतील विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. हे प्रमाणपत्र नोकरीसाठी किंवा पुढील शिक्षणासाठी उपयुक्त असते. खरे तर भारतीय शिक्षणव्यवस्थेने तयार केलेल्या सर्व सुशिक्षितांना नोकरी देण्याची ताकद संघटित उद्योग क्षेत्रात नाही. केवळ दहा टक्क्यांच्या आसपास सुशिक्षितांना संघटित क्षेत्रात नोकरी मिळू शकते. बाकी सर्वांना असंघटित क्षेत्रात नोकरी किंवा मग स्वतःचा उद्योग हाच पर्याय उपलब्ध असतो. त्याशिवाय 2024पासून लागू होणार्या नवीन शैक्षणिक धोरणानेदेखील प्रमाणपत्रापेक्षा कौशल्य विकासावर भर दिलेला आहे. त्यामुळे कोरोनाच्या निमित्ताने शैक्षणिक व्यवस्थेतील परीक्षेचे महत्त्व कमी करून विद्यार्थी सहभागाचे महत्त्व वाढवण्यासाठी आताच बदल करता येऊ शकतील.

आता शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देताना सायन्स, कॉमर्स, आर्ट्स असा जुन्या पठडीप्रमाणे प्रवेश देता क्रेडिट सिस्टिमप्रमाणे प्रवेश द्यावा. पहिले वर्ष असल्याने त्यात मुलांवर ताण येऊ नये आणि कोरोनाने डोके वर काढल्यास नवीन परीक्षापद्धती स्थिर होण्यास वेळ मिळावा, म्हणून वर सुचवल्याप्रमाणे शैक्षणिक वर्षाचा कालावधी वाढवणे फायद्याचे ठरेल.

भलेही कोरोनाचे संकट अनपेक्षित असले, तरीही आपण त्याचा वापर करून शिक्षण क्षेत्राला विधायक वळण देणार असू, तर त्यासाठी आतापासूनच साधकबाधक विचार आणि मग त्याआधारे अंमलबजावणी केली, तर आपल्या पुढील पिढ्या आपल्याकडे आदराने पाहतील.


लेखक
सनदी लेखापाल असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.