अष्टावक्र गीता 3

विवेक मराठी    06-May-2021   
Total Views |

जनकाचे तीन प्रश्न ऐकल्यानंतर अष्टावक्र मुनी म्हणतात, “तुला जर खरोखरच मुक्ती हवी असेल, तर तुलाविषयालात्यागले पाहिजे.” अष्टावक्रांनी जनकाला सांगितलेला बोधमार्ग स्पष्ट करणार्या लेखाचा हा अंतिम भाग.


geeta_1  H x W:

राजा जनक बोधाने भारलेला होता. त्यामुळे त्याने विचारलेल्या प्रश्नापासून अष्टावक्र संहितेचा जन्म झाला! जनक हा तात्त्विक जाणिवेने युक्त असा मनुष्य होता. ज्ञान, मुक्ती आणि वैराग्य म्हणजे काय हे त्याला माहीत होते.

मनुष्य जेव्हा उपयुक्ततावादाकडून आध्यात्मिकतेकडे जाऊ लागतो, तेव्हा त्याला आपल्यातील अंतर्विरोध दिसू लागतात. त्याचबरोबरीने बोधाची अदृश्य पावले आपल्यासोबत चालत असल्याचे जाणवू लागते आणि मग तो गुरूचा शोध घेऊ लागतो. म्हणूनच जी व्यक्ती ज्ञानी आहे, मुक्त आहे आणि विरागी आहे अशा व्यक्तीला जनक विचारतो की, “ज्ञान, मुक्ती आणि वैराग्य मिळवायचे कसे?”

या संकल्पनांचा थोडक्यात अर्थ पाहू या.

* मुक्त असणे म्हणजे प्रकृतीच्या नियमांनी बद्ध नसणे होय.

* वैराग्य म्हणजे बघितलेल्या आणि ऐकलेल्या विषयांबद्दल वितृष्णा असणे होय.

* विगतो राग - ज्याची आसक्ती गेली आहे तो म्हणजे विरागी.

* ज्ञान म्हणजे देश, काल आणि निमित्ताच्या पलीकडे असलेल्या सत्तेला जाणणे होय.

जनकाचे तीन प्रश्न ऐकल्यानंतर अष्टावक्र मुनी म्हणतात, “तुला जर खरोखरच मुक्ती हवी असेल, तर तुलाविषयालात्यागले पाहिजे.”

विषयहा शब्द अध्यात्मामध्ये वारंवार येतो.

याविषयालादोन स्तरांवर समजून घेतले पाहिजे - एक म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये आणि उभयात्मक इंद्रिय मन यांची आंतरिक सृष्टी आणि बाह्य सृष्टी यांची परस्परांशी चाललेली देवाणघेवाण, याला विषय असे म्हणतात.

विषयाचा दुसरा एक स्तर असतो. जेव्हा प्रकृतीची अकरा इंद्रिये बाह्य सृष्टीशी संपर्क करतात, तेव्हा त्यातून स्मृती, भावना आदी कोष निर्माण होतात. या कोषांमुळे ज्ञेय वस्तूविषयीकृतहोते. ती मनामध्ये संस्कार रूपाने शिल्लक राहते आणि मग नव्याने येणारे विषय त्या संस्कारांबरोबर गुंतत जातात.

अष्टावक्र सांगतात, “या विषयांना विष समजून तुला त्यांचा त्याग केला पाहिजे. म्हणजेच या अकरा इंद्रियांच्या दारातून, परवानगीशिवाय आत येणारे विषय तू थांबवले पाहिजेत आणि क्षमा, दया, आर्जव, संतोष सत्य या गुणांना तुझ्यामध्ये अमृत समजून वसवले पाहिजे.”

जेव्हा आपण या नेहमी माहीत असलेल्या शब्दांना अशा एखाद्या सूत्र वाङ्मयात वाचतो, तेव्हा त्या शब्दांचे पारिभाषिक अर्थ आपण लक्षात घेतले पाहिजेत. अशी वचने ही सूक्ष्म पातळीवर सांगितलेली असतात.

मनालाउभयात्मक इंद्रियअसे म्हटले जाते - म्हणजे ते एकाच वेळी ज्ञानेंद्रियही आहे आणि कर्मेंद्रियही आहे. मनाला जाणणे, समजून घेणे ही बोधप्राप्तीच्या मार्गावर पहिली पायरी असते.

संत कबीर म्हणतात,

मन चाहे तो जाने दो।

मत जाने दो शरीर।

कितना भी तने धनुष कुछ हो।

जब तक ना छुटे तीर।

म्हणजेच स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर यातील स्थूल शरीराला जेव्हा आपण थांबवू शकतो, तेव्हा वैराग्याची वाट सुरू होते.

अष्टावक्र मुनींनी अमृतासमान असणारे जे गुण सांगितले, त्यांची लक्षणे पाहू या.

क्षमा - म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या, आपल्याला अवांछित वर्तनामुळे निर्माण होणारी मानसिक प्रतिक्रिया थांबवणे होय. ती व्यक्ती आणि आपल्यामध्ये द्वेषाचे, अपराध भावनेचे अथवा हीन भावनेचे नाते निर्माण होऊ देणे हे महत्त्वाचे असते.

आर्जव - म्हणजे सर्वकाळी सर्व प्राणिमात्रांशी समभावाने वागणे होय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

 

जैसे हितकारी बालकासि स्तन्य। सारिखे चैतन्य नाना भूती।

तैसी प्राणिमात्री भली वागणूक। आर्जव ते देख। पंडुसुता॥

दया - बोधप्राप्त व्यक्ती एका वेगळ्या विश्वामध्ये प्रवेशित झालेली असते. तिला आजूबाजूच्या लोकांचे वर्तन खटकू लागते. अशा वेळी त्यांचे विश्व जाणून घेणे म्हणजे दयाभाव होय. उदा., लहान मुलाला एखादे खेळणे तुटल्यावर अत्यंत दुःख होते आणि तो रडू लागतो, अशा वेळी त्या खेळण्याला काहीच मोल नसतानाही आपण त्याची समजूत काढतो, कारण त्याच्या भावविश्वात त्या खेळण्याचे तितके महत्त्व असते. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा सर्वसामान्य संसारी लोक आपल्या लहान-मोठ्या समस्या विश्वरूप समजून त्यांच्याशी झगडत असतात, तेव्हा त्यांच्या त्या भावविश्वाला धक्का लावता होता होईतो मदत करणे म्हणजे दयाभाव होय. ॥अनाग्रहो नाम प्रथमं बुद्धी लक्षणम्॥ असे बोधाचे वर्णन केले जाते.

संतोष - सुख-दुःख येत-जात राहणारच. सुखाबद्दल आसक्ती अथवा अनुराग नसणे आणि दुःखाबद्दल द्वेष अथवा विषाद नसणे म्हणजे संतोष होय.

सत्य - ही एक वेगळी संकल्पना आहे. सर्वसामान्य भाषेत आपण खरेपणा जसेच्या तसे असणे याला सत्य म्हणतो. परंतु सत् म्हणजेजे आहे तेया शब्दापासून सत्य हा शब्द तयार झाला आहे. सत् काय आणि असत् काय हे ओळखता येणे आणि त्यातील सत्ला नेहमी मनामध्ये स्थान देणे म्हणजे सत्य धारण करणे होय. उदा., एखादी वस्तू वरून फेकली असता खाली पडते, हा पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. परंतु स्वतः पृथ्वी आणि ग्रहगोल अधांतरी फिरत असतात, ते कुठे पडत का नाहीत? कारण तेथे कशावर तरी पडणे ही संकल्पनाच नाही!! या उदाहरणातून हे जाणून घ्यायचे आहे की आहे-नाही, खरे-खोटे, काळे-पांढरे या द्विमितीय विचारांच्याही पलीकडे इंद्रियातीत असे काही असू शकते, याची जाणीव होणे म्हणजे सत्य होय.

या सर्व गोष्टींना तू धारण केलेस तर तुला मुक्ती मिळू शकेलअसे अष्टावक्र जनकाला सांगतात.

पुढे ते म्हणतात, “पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपैकी कोणीही नाहीस. तू केवळ साक्षी आहेस आणि तुला जर हा देह वेगळा काढता आला, तर तुला याच क्षणी शांतीचा आणि सुखाचा लाभ होईल.

कोणत्याही वर्ण-आश्रम यांचा आश्रय करून राहिलेले व्यक्तित्व किंवा डोळ्यांनी दिसणारे हे तुझे शरीर म्हणजे तू नाहीस.

धर्म-अधर्म, सुखदुःख हे मनाचे धर्म म्हणजे तू नाहीस. या सर्वांचा कर्ता तू नाहीस आणि भोक्ताही तू नाहीस. या सर्व गोष्टींना साक्षित्वाने पाहणारा असा तू द्रष्टा आहेस हे एकदा जाणले की सदासर्वदा तू मुक्तच आहेस.”

या सूत्रांमध्ये अष्टधा प्रकृतीचे वर्णन, सामाजिक व्यक्तित्वाचे वर्णन आणि दृश्य आणि द्रष्टा या दोन महत्त्वाच्या संकल्पना आलेल्या आहेत.

आपण जनकाच्या बोधाविषयी थोडे अधिक जाणून घेऊ या.

सृष्टीची तत्त्वे सृष्टीमध्ये मिळून गेली की सर्व मुक्त चैतन्य सर्वव्यापी होते.

अष्टावक्र येथे जनकाला हाच उपदेश करतात. ते म्हणतात, “हे पुत्रा, तू देहाच्या अभिमानपाशाने बद्ध झालेला आहेस. मी बोध आहे, या ज्ञानाच्या तलवारीने हे बंधन कापून टाक. असंग, क्रियारहित, दोषरहित असा असलेला तू, ईश्वरप्राप्तीसाठी समाधी अनुष्ठान करतोस हेच खरे म्हणजे तुझे बंधन आहे!”

या सूत्रामध्ये अष्टावक्रांनी हा मार्ग बोधमार्ग आहे आणि योगमार्ग नाही, हे स्पष्ट केले आहे. येथे समाधी आदी अनुष्ठाने बंधनास कारणीभूत म्हटली आहेत. बोधमार्ग हा योगमार्गापेक्षा भिन्न असतो. योगमार्गामध्ये वृत्ती आणि क्लेश यांना जाणून घेऊन त्यांचे हळूहळू तनुकरण करणे - म्हणजेच त्यांना लहान करत जाणे अभिप्रेत असते. त्यामध्ये विधी असतात, योगाचे प्रकारही असतात.. टप्प्याटप्प्याने साधक पुढे जात असतो. साधकाला मार्गामध्ये कोणकोणत्या सिद्धी प्राप्त होतील, याचेही संपूर्ण विवरण असते.

तर बोधमार्ग हा याहून पूर्णपणे निराळा असतो. यामध्ये केवळ आनंदाचा स्रोत नाही, तर दुःखाचे मूळदेखील शोधले जाते. कोणत्याही विधीशिवाय क्षणात बोधी प्राप्त होते.

त्यानंतरही अनेक वेळा जनकाला या प्रश्नांचा सामना करावा लागला आहे. कारण तो सरधोपट मार्गाने चालला नाही. साधारणपणे बोध झाल्यावर, ज्ञान मिळाल्यावर, मुक्ती प्राप्त झाल्यावर, वैराग्य प्राप्त झाल्यावर मनुष्य कर्मापासून निवृत्त होतो असेच सार्यांनी पाहिले होते. त्यामुळे आश्रमात राहून ज्ञान प्राप्त झाल्यावर पुन्हा एकदा राजाची वस्त्रे घालून जनक निघाला, तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. राजमहालातील सुखे भोगावयाची होती, तर दीक्षा का घेतली? असे प्रश्न निर्माण झाले.

राजा जनक राजमहालात गेला. तेथील जीवनात व्यग्र झाला. ते पाहून आश्रमातील बंधूंना प्रश्न पडत. ज्या वातावरणामध्ये जनक गेला आहे, त्या वातावरणामध्ये त्याला आपला नि:संग निर्लेप बोधाचा स्वभाव कायम राखता येत असेल का? आजूबाजूला असलेली आकर्षणे त्याला मोहात पाडत नसतील का? सत्तेची नशा असते आणि त्यातच राहून बोधाचा मार्ग अनुसरणे हे कसे जमत असेल?

एक कथा सांगितली जाते. राजा जनक अष्टावक्रांकडून अनुग्रह घेऊन पुनश्च एकवार राजपाठाच्या कामाला लागला. त्यांच्यासह साधना केलेला गुरुबंधू, संन्यासी एकदा त्याच्याकडे गेला. त्याने दिवसभर जनकासोबत घालवला. जनक राजोचित विलासांचा उपभोग घेत असलेला त्याला दिसला.

 

शेवटी त्याने जनकाला विचारले कीया सगळ्या वातावरणामध्ये तू बोधाचे अमृत कसे सुरक्षित ठेवतोस?”

तेव्हा जनकाने रात्री त्या साधूची आपल्या मंचकावर झोपण्याची व्यवस्था केली. मऊ परांच्या बिछान्यावर झोपल्यानंतर साधूने सहज वर बघितले. तो दचकला, कारण बरोबर छातीच्या वर एक तलवार टांगलेली होती. ती तलवार एका दोर्याने छताला बांधलेली होती. तुळईला बांधलेली ती तलवार कोणत्याही क्षणी आपल्या अंगावर पडू शकेल, या भयाने साधू रात्रभर झोपला नाही.

पहाट होताच तो जनकाकडे गेला आणि म्हणाला, “अरे, ती तलवार का टांगून ठेवली आहेस? तेही दोर्याने? अशाने मंचकावर झोप कशी येणार तुझ्या?” त्या साधूला जनकाने जी उत्तरे दिली, तीच या तीन सूत्रांमध्ये मांडलेली आहेत.

जनक म्हणाला, “आपल्याला बोधाच्या मार्गावर चालताना जड संसार सहजगत्या दूर सारता येतो. कारण पंचमहाभूतांमधून निर्माण होणारे विकार, त्यांचे स्वरूप, त्यांच्या वृत्ती ह्या सहजपणे पकडीत येतात.

मात्र ज्या वेळी जड, चैतन्याचे मायावी रूप घेऊन फसवण्यासाठी येते, त्या वेळी ती तलवार कामाला येते, जी सातत्याने सांगते की तू जो विचार करत आहेस, ज्या भावना तुझ्या मनामध्ये उदित होताना दिसत आहेत, त्या माझ्या आहेत असे तुला वाटत आहे. हे विचार शाश्वत आहेत असे वाटत आहे! असे सर्वच त्या जड तलवारीने क्षणार्धात नाहीसे होऊ शकते. कारण तुझ्या पंचमहाभूतांच्या शरीराप्रमाणेच तुझे विचार, भाव, अस्मिता, अहंकार सर्व जड आहे. शरीराबरोबरच नष्ट होणारे आहेत, हे लक्षात ठेव.”

चौथ्या प्रकरणाच्या शेवटच्या तीन सूत्रांमध्ये जनक हेच सांगत आहे. मात्र सूत्रे ही घनीभूत असतात. त्यांना समजून घेण्यासाठी ज्याने सांगितली त्याच्या जीवनातील उदाहरणे उपयुक्त ठरतात.

जनक म्हणतो कीज्याने आत्मरूप जाणले, त्याने सगळे ब्रह्मांड जाणले. त्याने इच्छा आणि अनिच्छा दोन्हींचा त्याग करण्याचे सामर्थ्य मिळवलेले असते. त्याला आता कसलेही भय नसते.”

ही सगळी सहा सूत्रे निरंतर बोध मार्ग कसा चालत राहावा याची मार्गदर्शक सूत्रे आहेत. एकत्रितपणे त्यांचे सार असे होईल -

चैतन्याचा शोध घेण्यासाठी जडाची सतत जाणीव राखणे आवश्यक आहे. मायेच्या आवरणाने विक्षेपाने जड कधीकधी चेतन भासते. तेव्हा त्याचेही सतत निराकरण करत राहणे म्हणजे बोधमार्ग होय. आपल्यात काय चेतन नाही, ते जाणत राहिले की सत्याचे ऋतात रूपांतरण होते. म्हणजेच बोध!