सुसंगती सदा घडो

विवेक मराठी    07-May-2021
Total Views |

@मयुरेश डंके

उत्तम शिक्षण म्हणजे परीक्षेत उत्तम गुण मिळवणं एवढाच त्याचा मर्यादित अर्थ होत नाही. योग्य सवयींचा विकास घडवणं याचं महत्त्व नजरेआड करून चालणार नाही. पालक आपल्या मुलांना जेव्हा काही गोष्टी शिकवतील, तेव्हा मुलांचं कौटुंबिक आणि सामाजिक असं दोन्ही प्रकारचं शिक्षण घडायला लागेल, जे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे. शालेय शिक्षण क्रमाक्रमाने घडेलच, पण व्यक्तिमत्त्वाची जडणघडणसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे.


education_1  H

दीड वर्ष झालं बघ, मुलाचं शिक्षण असं काही विशेष झालंच नाही. नुसतंच घराच्या चार भिंतींमध्ये बसायचं. मित्रांशी खेळणं नाही, कुठं फिरायला जाणं नाही, बागा नाहीत, काहीच नाही. सुरुवातीला फारसं काही वाटलं नाही, पण आता काळजी वाटतेय.” तो सचिंतपणे म्हणाला.

मग तो करतो तरी काय दिवसभर?”

करून करून काय करणार? नुसत्या टिवल्याबावल्या..”

दिवसभर फक्त एवढंच?”

तसं नाही, पण सगळा टाइमपासच होतो दिवसभर. अख्खी एक वर्षाची गॅप पडल्यासारखंच झालंय त्याचं. आता जेव्हा शाळा पुन्हा सुरू होतील, तेव्हा अवघडच होणार आहे सगळं.”

अरे, किती काळजी करशील? देशातल्या सगळ्याच मुलांचा हा प्रश्न आहे, फक्त आपल्याच मुलाचा नाहीय. त्याला टीव्ही-मोबाइलची सवय लागलीय म्हणून तुला काळजी वाटतेय का?”

ते एकवेळ परवडलं असतं, पण ह्याचं सगळं विचित्रच आहे. अरे, किती वेळ वाया घालवावा? थोडा तरी अभ्यास करावा माणसाने. पण इथे सगळा शंखच आहे. नावाला एक-दीड तास शाळा ऑनलाइन घेतात, एवढ्या वेळात काय शिकवून होणार? हे सगळं या कोविडमुळे झालंय. कुठे खिडकीतून खारीकडेच बघत बस, कुठे चिमणीचा आवाज काढ, आजीबरोबर तांदूळ निवडत बस, कागदाची विमानं अन् होड्या करत बसायचं. दिवसभर असलेच उद्योग.. कशी टिकायची ही पोरं स्पर्धेत? कसा होणार त्यांचा विकास? वर्षभर घरात बसून बसून उद्या शाळाच आवडेनाशी झाली, तर काय करायचं?” एक कर्तव्यदक्ष पिता माझ्यासमोर काळजीने बोलत होता. पण त्याची मुलाविषयीची काळजी केवळ स्पर्धेत टिकण्याविषयीची होती, बाकीच्या गोष्टींकडे त्याने साफ दुर्लक्ष करून टाकलं होतं.


education_4  H  

त्याचा मुलगा फार छान आहे. कोविडच्या वर्षात तो घरातच होता, पण घरी राहूनसुद्धा कितीतरी गोष्टी सहज शिकला. पहिलीतच आहे, पण लिंबाचं सरबत, कोकम फार छान करतो, चवीला जरासुद्धा चुकत नाही. पक्षी पाहिला की त्याचं नाव सांगतो. मारुती स्तोत्र आता पूर्ण पाठ झालंय. पालेभाज्या निवडता येतात. तीन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करता येतो. स्वतःचं ताट, वाटी जेवणानंतर धुऊन ठेवतो. भाज्या धुतो, पुसतो, फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून ठेवतो. तसं पाहिलं, तर त्याच्या वयाच्या मानाने तो घरातल्या बर्याच गोष्टी शिकला आहे, अजूनही शिकतोय. पण आईवडिलांच्या दृष्टीने या गोष्टींना शून्य किंमत. दोघेही उच्चशिक्षित. पण त्यांच्या दृष्टीनं भाज्या ओळखणं, भांडी धुणं, कपड्यांच्या घड्या घालणं, देवाची पूजा करणं हे शिक्षणच नाही. या गोष्टी करायला काहीही डोकं लागत नाही, असं पालकांचं मत. मेरिटची मार्कलिस्ट नसेल तर आपल्याला कुणी विचारत नाही, असं त्या दोघांनाही वाटतं. मुलगा चांगली गाणी गातो, चित्रं रंगवतो. पण पाढे म्हणत नाही, अजूनही बेरजा-वजाबाक्या करत नाही, गणित त्याला आवडत नाही, विज्ञान आवडत नाही, अशा त्यांच्या मुलाविषयीच्या तक्रारी.

 

थोड्याफार फरकाने अनेक घरांमध्ये मला असंच चित्र दिसतं. या चित्रातकोविडपूर्व आणि कोविडोत्तरअसा भेद करता येणार नाही, तसा तो करूही नये. पण कोविडमध्ये मुलं त्यांच्यातला नैसर्गिकरित्या शिकण्याचा गुण अधिक प्रभावीपणे वापरायला लागली आहेत, असं माझं निरीक्षण आहे. पालक मात्र औपचारिक शिक्षणाविषयी हट्ट धरून बसले आहेत.

हा नैसर्गिकरित्या शिकण्याचा गुण म्हणजे काय? ते जरा समजून घेतलं पाहिजे. कारण, तेच फार महत्त्वाचं आहे. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ह्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टींशी आपल्या मुलांचा अगदी सहजगत्या परिचय होत जाईल, त्या त्या गोष्टी आपली मुलं झपाझप शिकत जाणारच. ज्या गोष्टी त्यांना आकर्षक वाटतील, त्या गोष्टी तर मुलं फार लवकर शिकायला लागतील. मुलांनी ज्या गोष्टी आपोआप स्वतःहोऊन शिकाव्यात असं आपल्याला वाटत असतं, त्या गोष्टी प्रभावीपणे त्यांच्या ज्ञानेंद्रियांना जाणवणं गरजेचं असतं. मोबाइल फोन, इंटरनेट, टीव्ही वाहिन्या या माध्यमातून सगळं आपोआपच होईल, असं जर आपल्याला वाटत असेल तर तो आपला मोठा भ्रम आहे. कोविडच्या काळात अनेक कुटुंबांमध्ये पालकांच्या सहवासात चोवीस तास राहूनही मुलांचं वागणं बिघडत गेल्याचं आढळलं. अनेक मुलंमुली त्यांच्या आईवडिलांसारखं बोलायला लागली, भांडायला लागली, अनेक मुलामुलींची बोलण्याची भाषा बदलली, बोलण्यात तुसडेपणा आला, वागण्यात उर्मटपणा आला. बाहेरच्या कोणत्याही घटकाशी औषधालाही संबंध येतादेखील हे बदल कसे काय घडले? यातच खरी गोम आहे.

 

education_2  H  

पालक, शिक्षक आणि समाज या त्रिसूत्रीच्या एकत्रित गुंफणीतून नवी पिढी घडत जाणार आहे, हे आता आपण सगळ्यांनीच समजून घेतलं पाहिजे. मुलांना शाळेत घालून, त्यांच्या पालनपोषणाची आणि शिक्षणाचं शुल्क भरण्याची अशा दोनच जबाबदार्या आमच्या आहेत, अशा गैरसमजात आजही अनेक पालक असतात, आहेत. शिक्षणव्यवस्थेकडून त्यांना डोंगराएवढ्या अपेक्षा आहेत. आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास केवळ औपचारिक शिक्षणानेच होईल, अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे. त्यापलीकडची कुठलीही गोष्ट केवळ विरंगुळ्यासाठीच आहे, असं पालकांना आजही वाटतं. शाळा इंग्लिश माध्यमाचीच हवी, ती चकचकीत हवी, पॉश हवी, अशी अपेक्षा आहेच. त्याचा आपल्याला आणि आपल्या पाल्याला कितपत उपयोग होणार आहे, हा विचार पार लांब राहतो आणि वरलिया रंगा भुलण्याचा अध्याय सुरू होतो. सामाजिक-आर्थिक आणि वैकासिक स्तरावर प्रचंड मोठी विविधता असतानाही शिक्षणाच्या बाबतीत मात्र केवळ औपचारिक शिक्षणालाच सर्वथा महत्त्व देणार्या पालकांची संख्या मोठी आहे, याला काय म्हणावं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोष्ट जुनी आहे, पण शिक्षणाच्या बाबतीत आजही तिचं महत्त्व अबाधित आहे. एकदा दरबारात अकबर बादशहाने प्रश्न विचारला की, “कोणतं शस्त्र उत्तम?” दरबारातले सरदार, विद्वान त्यांची त्यांची उत्तरं सांगू लागले. कुणी म्हणालं, तलवार उत्तम, कुणी म्हणालं तोफ उत्तम, कुणी सांगितलं धनुष्यबाण उत्तम. लोक अनेक शस्त्रांची नावं सांगत राहिले, पण बादशहाचं समाधान झालं नाही. बिरबलावर उत्तर देण्याची वेळ आली, तेव्हा तो म्हणाला, “वेळेला उपलब्ध असेल ते शस्त्र उत्तम.” हे विचित्र उत्तर ऐकून बादशहासहित सगळेच चक्रावले. “तुला नेमकं काय म्हणायचंय?” त्याने बिरबलाला विचारलं. “खाविंद, योग्य वेळी मी हे उत्तर सिद्ध करून दाखवेन.” बिरबल उत्तरला. हा विषय तेवढ्यावरच थांबला आणि काही दिवसांनी लोक विसरूनही गेले. एके दिवशी बादशहा त्याच्या निवडक सरदारांसह शहरात फेरफटका मारायला निघाला. बाजारपेठेत खूप गर्दी होती. लोक खरेदी करत होते. नेमका ह्याच वेळी कोणाचा तरी हत्ती पिसाळला. माहुताने खूप प्रयत्न करूनही तो काही केल्या आवरेना. त्या प्रचंड गर्दीमध्ये हत्ती सैरावैरा धावत सुटला. सोंडेने लोकांना उचलून फेकू लागला. पायाखाली माणसांना चिरडू लागला. लोक घाबरून गेले. हत्तीला दगड मारू लागले, बाण मारू लागले, तरीही उपयोग होईना. उन्मत्त झालेला तो हत्ती बादशहाच्या दिशेने धावत येऊ लागला. तो अगदी जवळ आला. लोक इकडेतिकडे वाट फुटेल तसे धावत सुटले. बिरबल हे सगळं शांतपणे पाहत होता. हत्ती अगदी काही पावलांवर आला, तसं बिरबलाने इकडेतिकडे पाहिलं. बाजूने एक कुत्रं धावत जात होतं, ते धरलं आणि त्याचे दोन्ही पाय धरून गोफण फिरवतात तसं गरागरा फिरवून हत्तीवर भिरकावून दिलं. आधीच घाबरलेलं ते कुत्रं आणखीनच बावचळलं आणि मोठमोठ्याने ओरडत हत्तीवर जाऊन आदळलं. अचानक आलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याने हत्ती गोंधळून गेला आणि जगाच्या जागी थिजून उभा राहिला. कुत्रं पळून गेलं. आजूबाजूच्या माणसांनी काढण्या लावून हत्तीला जेरबंद केलं आणि घेऊन गेले. बादशहाचा चेहरा घामाने निथळत होता, त्याने बिरबलाकडे पाहिलं. बिरबल म्हणाला, “खाविंद, मी म्हटलं होतं ना, वेळेला उपलब्ध असेल ते शस्त्र उत्तम.” बादशहाने मान डोलावली. प्रसंगावधान, सावधानता, सूक्ष्म निरीक्षण, अचूक अंदाज आणि निर्णय घेणं ह्या गुणवैशिष्ट्यांचा योग्य विकास झाला असेल, तर ते शिक्षण खर्या अर्थाने उपयुक्त ठरतं. आपण जे शिकतो ते आपल्याला व्यवहारातही वापरता आलं पाहिजे. जर शिकलेल्या गोष्टी वापरताच येत नसतील, तर त्या शिकण्याला अर्थच काय?





education_3  H  

हे गुण कसे विकसित होतील? याकरिता प्रयत्न व्हायला हवेत आणि ते प्रयत्न केवळ शिक्षकांनी किंवा शिक्षणव्यवस्थेने करून भागणार नाही, त्यातली पालकांचीही जबाबदारी मोठी आणि महत्त्वाची आहे. आपलं राहतं घर हीसुद्धा एक मोठी शाळाच आहे. त्यातल्या गोष्टींना ठरावीक अभ्यासक्रम नसतो, क्रमिक पाठ्यपुस्तकं नसतात, एकवीस अपेक्षित वगैरे नसतं, तज्ज्ञ शिक्षकही नसतात. लेखी परीक्षा नसते, घटक चाचण्या नसतात, एटीकेटी वगैरे पळवाटा नसतात, प्रश्नपत्रिकेत प्रिंटिंगच्या चुका होत नाहीत, ग्रेस मार्क मिळत नाहीत आणि कुणीही थिअरी विचारत नाही. महत्त्व असतं ते गोष्टी जमण्याला. सरप्राइज टेस्ट तर पावलोपावली सुरूच असतात आणि त्या देतादेताच माणूस शिकत जातो. फरक फक्त एवढाच असतो की, हा अभ्यासक्रम कधीही आउटडेटेड होत नाही, उलट जितका वापरत जाऊ, तितकी तज्ज्ञता वाढत जाते. एका जागी बसूनच या गोष्टी शिकता येतील असं नाही. जितकं जास्त निरीक्षण, जितकं जास्त सातत्य, तितका अभ्यास उत्तम. ह्या शिक्षणात तासिका नसतात आणि पूर्वपरीक्षासुद्धा नसते. जे असतं ते अगदी थेट! म्हणूनच, त्यात खंड पडून चालत नाही, ते नित्य सुरू राहावंच लागतं. मुलांच्या शिक्षणातलं पालकांच्या आणि कुटुंबाच्या सहभागाचं महत्त्व आहे ते हे असं!

 

वर्षभर औपचारिक शिक्षण कदाचित अपेक्षेप्रमाणे प्रभावी झालं नसेलही, पण त्याजागी कितीतरी उत्तम गोष्टींच्या सवयी आपल्या मुलांमध्ये रुजवता येणं शक्य होतं. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणं, साधारणपणे अर्धा तास तरी व्यायाम करणं, (त्यात सूर्यनमस्कार घालता येतील. लहान मुलांसाठी हा अतिशय उत्तम व्यायामप्रकार आहे.) ह्या सवयी तर फारच महत्त्वाच्या आहेत. कारण पुढच्या वर्षी तरी शाळा नियमितपणे सुरू होतीलच, तेव्हा वर्षभराच्या स्वच्छंदी जगण्याचा नक्कीच त्रास होईल. सगळ्या भाज्या, कोशिंबिरी, उसळी खाण्याची सवय लावणं आणि जंक फूडपासून दूर ठेवणं हे कोविड लॉकडाउनमध्ये निश्चित करता आलं असतं. बाराखडी मोठ्या आवाजात स्पष्ट, निर्दोष उच्चारांनिशी रोज म्हणून घेणं, किमान मराठी-हिंदी-इंग्लिश या तिन्ही भाषांमधल्या शब्दसंपत्तीचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. टेलिफोनवर व्यवस्थित स्पष्ट बोलणं, समोरच्याने दिलेला निरोप योग्य व्यक्तीला अगदी आठवणीने देणं हे आवश्यक कौशल्य आहे. आईवडिलांचं पूर्ण नाव आणि फोन नंबर किंवा मोबाइल नंबर पाठ करून घेणं हे नक्कीच घराच्या घरी शिकवता आलं असतं. ठिपक्यांची रांगोळी शिकवणं, अगदी लहान मुलांना रंग, चवी, वास, डाळी, कडधान्यं, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ यांचा परिचय करून देणं हे घरच्या घरी नक्कीच होऊ शकतं.

प्राथमिक शिक्षणाच्या वयोगटातल्या मुलामुलींना स्पर्शातला फरक शिकवणं, घरातल्या मोजक्या आणि मुख्य व्यक्ती वगळता अन्य व्यक्तींशी विशिष्ट शारीरिक अंतर राखून वागणं, आईवडिलांपासून कोणतीही गोष्ट लपवणं, जे जे घडलं असेल ते ते सगळं पालकांना सांगणं या सवयींचं शिक्षण महत्त्वाचं आहे. मुलामुलींना नैसर्गिक विधींचं प्रशिक्षण योग्य प्रकारे देणं आणि स्वच्छता राखणं हे शिकवण्यासाठीसुद्धा हा कालावधी महत्त्वाचा आहे. उत्तम शिक्षण म्हणजे परीक्षेत उत्तम गुण मिळवणं एवढाच त्याचा मर्यादित अर्थ होत नाही. योग्य सवयींचा विकास घडवणं याचं महत्त्व नजरेआड करून चालणार नाही. पालक आपल्या मुलांना जेव्हा या गोष्टी शिकवतील, तेव्हा मुलांचं कौटुंबिक आणि सामाजिक असं दोन्ही प्रकारचं शिक्षण घडायला लागेल, जे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे. शालेय शिक्षण क्रमाक्रमाने घडेलच, पण व्यक्तिमत्त्वाची जडणघडणसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. कारण, व्यक्ती ओळखली जाते ती तिच्या सवयींमुळेच!

जाता जाता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका प्रतिष्ठित व्यक्तीने एके दिवशी बाजारातून दोन पोपट विकत आणले. दोन स्वतंत्र पिंजर्यांमध्ये त्यांची सगळी व्यवस्था केली. चकचकीत पितळी तारांच्या नक्षीदार पिंजर्यात पोपट फार छान दिसत होते. खाण्यापिण्याची बडदास्त तर अत्यंत उत्तम होती. भिजवलेली हरभर्याची डाळ, मिरची, ताजी फळं, प्यायला स्वच्छ पाणी असा सगळा थाट होता. मालकाने एक पोपट त्याच्या दिवाणखान्यात ठेवला आणि दुसरा पोपट घराच्या मागच्या दारच्या ओसरीवर ठेवला. दोन्ही पोपटांची जागा वेगवेगळी असली, तरी व्यवस्था मात्र अगदी समान होती. असेच पाच-सहा महिने गेले आणि मालकाला दोन्ही पोपटांमध्ये फरक दिसायला लागला. दिवाणखान्यातला पोपट छान शीळ घालायचा, येणार्याजाणार्यांशीया, बसा, नमस्कारअसं बोलायचा. पण मागच्या दारच्या पोपटाचं वागणं अगदी उलटं. त्याची भाषा अतिशय खालच्या दर्जाची झाली. चांगलं बोलणं तर दूर, तो चक्क शिव्या द्यायचा. मालकाला यातलं गौडबंगाल काही केल्या कळेना. शेवटी, ज्या माणसाकडून त्याने पोपट विकत घेतले होते, त्या माणसाला बोलावून आणलं आणि सगळा प्रकार सांगितला. तो पोपट विकणारा माणूस काही काळ दोन्ही पोपटांचं निरीक्षण करत राहिला आणि नंतर मालकाला म्हणाला, “अहो साहेब, हे पोपट चांगलेच आहेत. फक्त सहवासाने त्यांच्यात फरक पडला आहे. जो पोपट दिवाणखान्यात आहे, तो तिथे येणार्या माणसांची भाषा शिकला, आणि जो पोपट मागच्या दारी आहे, तिथे तुमची नोकर मंडळी गप्पा मारत बसतात, तो पोपट सतत त्यांच्या सहवासात राहिला आणि त्यांची भाषा शिकला.”

मालक म्हणाला, “मला काही हे पटत नाही. असं कसं शक्य आहे? एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या दोन पोपटांमध्ये केवळ सहवास बदलल्याने इतका फरक कसा पडेल?” विक्रेता म्हणाला, “साहेब, असं करा, फक्त सहा महिन्यांसाठी या दोन्ही पोपटांच्या जागांची अदलाबदली करा. मी काय म्हणतो आहे, हे तुम्हाला नक्की समजेल.” मालकाने खरोखरच दोन्ही पोपटांच्या जागा बदलल्या आणि खरोखरच पुढच्या सहा महिन्यांमध्ये दोन्ही पोपटांची भाषा आमूलाग्र बदलली.

आता दिवाणखान्यात बदली होऊन आलेला पोपट हळूहळू चांगलं बोलायला लागला आणि मागच्या दारी बदली होऊन गेलेला पोपट सहा महिन्यांतच चक्क अस्खलित शिवीगाळ करायला लागला. आपली चूक मालकाच्या लक्षात आली आणि त्याने दोन्ही पोपट दिवाणखान्यात ठेवले. सहवास आणि वातावरण यांच्याविषयी आपण किती काळजी घेणं आवश्यक आहे पाहा.

पालकमित्रांनो, एक पोपट केवळ सहा महिन्यांमध्ये इतका बदलू शकतो, मग आपण तर माणसं आहोत. पृथ्वीवरचे सगळ्यात बुद्धिमान प्राणी! आपण तर जास्त काळजी घेतली पाहिजे. कोविड आज ना उद्या जाईलच किंवा त्याचा प्रभाव हळूहळू कमी होत जाईल आणि आपल्याला त्याचं विशेष काही वाटेनासं होईल. आपलं सामाजिक आयुष्य पूर्वपदावर येईल. मुलांचं शैक्षणिक इंजीनसुद्धा पुन्हा रुळावर येईल. पण ह्या पोपटाच्या गोष्टीतलं मर्म मात्र विसरू नका.

कविवर्य मोरोपंतांची एक फार सुंदर कविता आहे -

सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो,

कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो

सदन्घ्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो,

वियोग घडता रडो मन भवत्चरित्री जडो

निश्चय कधी ढळो उजन्विघ्नबाधा टळो,

चित्त भजनी चळो मतीस दुप्त मार्गे वळो

स्वतत्त्व हृदया कळो दुरभिमान सारा गळो,

पुन्हा मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो

नजे प्रियस दोष ते प्रियस दोषही चांगले,

स्वतोक पितरा रुचे जरी हि कर दमी रांगले

तुलाची धरी पोटीशी कशी तदा यशोदा बरे,

जरी मळवीशी रजो मलीन काय तू अंबरे

पिता जरी विटे विटोन जननी कुपित्री विटे,

दया मृतर सार्धधी नकुल :जले त्या किटे

प्रसादपट झाकिती परीपरा गुरुचे थिटे,

म्हणोनी म्हणती भले ऋण जन्मदेचे फिटे

कृतात्त कटका मल ध्वज जरा दिसो लागली,

पुर:सर्गता स्वये झगडता तनु भागली

सहाय दुसरा नसे तुज विणे बळे आगळा,

लहू जरी उताविळा स्वरी तो कापितो आगळा

दया मृतघना अहो हरीवळा मयुराकडे,

रडे शिशुतया सी घे कळवळोनी माता कडे

असा अतिथी धार्मिकस्तुतपदा कदा सापडे,

पुन्हा जड भवारणवी उतरिता नदा सापडे

 
 

(लेखक मानसतज्ज्ञ असून पुणे येथील आस्था काउन्सेलिंग सेंटरचे संचालक-प्रमुख आहेत.)