बदलणाऱ्या प्रायव्हसीची व्याख्या ( भाग १)

विवेक मराठी    08-May-2021
Total Views |

प्रायव्हसी कान्ट बी मिथ

प्रायव्हसी म्हणजे काय? ती ब्रिच होणे म्हणजे काय?? तुमच्या नकळत मोठ्या टेक कंपनी तुमचा डेटा का आणि कशा ऍक्सेस करतात?? ह्या मोठ्या कंपनीचे रेव्हिन्यू मॉडेल कसे काम करतात ह्यावर विस्तृत चर्चा करतोय. उद्याच्या भागात काय चर्चा करू ह्याचे डिटेल्स तळटीपमध्ये असतील. 

pr _1  H x W: 0

आज जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट काय आहे माहितीय?? नाही, खनिज तेल (क्रूड ऑइल) किंवा सोनं ही सगळ्यात मौल्यवान वस्तु नाही!! काही काळापूर्वी त्याला मागे टाकून जगातली सगळ्यात मौल्यवान वस्तू बनली आहे डेटा!! तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट मध्ये असणारा तुमचा आमचा डेटा. आता तुम्ही म्हणाल अरेच्चा असा काय महत्वाचा डेटा आहे आमचा?? स्वतःचे असंख्य हावभावातले सेल्फी, काही फिल्टर लावून चांगले केलेले फेक कॅन्डीड, बायको१, बायको न्यू, बायको एयरटेल, कुत्रा बॉस, जाड्या/शेम्बड्या गोट्या असे काहीसे अतरंगी नावाने सेव्ह केलेले नंबर ह्या शिवाय असं आहे तरी काय आमच्या मोबाईलमध्ये की आमचा डेटा आज जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट झालाय?? वर वर बघता तुमचं म्हणणं काही खोटं नाहीय फक्त ते अर्ध सत्य आहे!! हा डेटा ही डेटा नावाच्या महासागराची फक्त दृश्य अफाटता झाली. पण खरा खजिना ह्या महासागरात खोल डुबकी मारल्याशिवाय हाती लागत नाही. आणि ही डुबकी मारतात 'फेसबुक' आणि 'गुगल' सारख्या अब्जाधीश कंपन्या!! आता ही डुबकी कशी असते आणि नेमकं तुमच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात किती प्रचंड लुडबुड ह्या कंपनी करतात हे बघितलं की वाचकांना ह्या गोष्टीतलं गांभीर्य कळेल!!

माझा एक मित्र यूएसला राहतो, करियरच्या नादात लग्न खूप उशिरा झालं. मेडिकल कॉम्प्लिकेशन्समुळे घरी पाळणा हलायचं काही नाव घेत नव्हता. सगळे नवस बोलून झाले आणि एक दिवशी भगवंताने त्यांची प्रार्थना ऐकली. त्याच्या बायकोचे पिरीएड्स मिस झाले, पिरीएड्स कॅल्क्युलेटिंग ऍप वर ओव्ह्युलेशन डेट, इम्प्लांटेशन डिप वगैरे दोनदा कन्फर्म करून झालं, इम्प्लांटेशन डिप ऍपनी सांगितलेली लक्षणं तंतोतंत जुळत होती. 'युट्युब' आणि 'गुगल' वर ह्या विषयावरील होतं नव्हतं ते सगळं आधीच सर्च करून वाचून झालं होतं त्यामुळे आता फक्त एकदा घरी कन्फर्म केलं की गायनॅक कडे जायला हे मोकळे!! मित्र ‘First Response’ Kit आणायला जवळच्या वॉलमार्टमध्ये गेला ऑनलाईन पेमेंट केलं आणि घरी आला!! घरीच टेस्ट केली आणि 'अपेक्षित' रिझल्ट दिसला दोघेही आनंदाने वेडेच व्हायचे बाकी होते. बास आता गायनॅक कडे जाऊन एकदा कन्फर्म करायचं आणि सगळं ठीक असलं की बाकीची तयारी करायची हा निश्चय त्यांनी केला. शिवाय फक्त दोघांचे आई वडील सोडून लगेच कुणालाही काहीही सांगायचे नाही हेही ठरवून झाले. एक दोन दिवसात गायनॅकची अपॉइंटमेंट झाली सगळं कन्फर्म झालं इतकंच काय पिरीएड्स कॅल्क्युलेटिंग ऍप आणि बाकी 'प्रेग्नन्सी' ऍप वर हे अपडेट करून झालं!! हे झाल्यावर ३-४ दिवसांनी त्यांना एका मेडिकल इंश्योरन्स कंपनीमधून त्यांच्यासाठी कस्टमाइज्ड असलेला फुल प्रूफ इंश्योरन्स प्लॅनसाठी फोन आला पुढे आणखीन दोन तीन इंश्योरन्स कंपन्यांचे फोन येऊन गेले आणि मग मात्र माझ्या मित्राच्या पायाखालची जमीन सरकली!! विचार करा त्या दाम्पत्यासाठी ही प्रेगनन्सी किती 'खाजगी' गोष्ट होती?? जी आज थेट इंश्योरन्स कंपन्यांच्या चर्चेचा विषय झाली होती!! हे एक खूप प्रातिनिधिक उदा मी दिलं अजून खोलवर उदा द्यायची झाली तर तुमचा प्लस रेट, तुमचा ईसीजी, तुमचे बँकिंग पासवर्ड, तुमचे फोटो, तुमचं जिपीएस लोकेशन, तुमच्या स्केड्यूल्ड मिटिंग, तुमच्या अपॉईंटमेंट्स, तुमचे हॉलिडे डेस्टिनेशन, तिथला खर्च, तिथे तुम्ही काय काय केलंत, तुमच्या प्रॉपर्टी डीलिंग्स, तुमचे व्हाट्स ऍप्प किंवा मेसेंजर चॅट, काही अत्यंत खाजगी चॅट्स, कधीकधी तुम्ही फोनवर कुणाशी कितीवेळ आणि काय बोलताय हे सुद्धा, तुमचं पिरियड सायकल हे सुद्धा कंपन्यांना माहिती असतं!! बरं फेसबुक आणि गुगलला वर सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी माहिती असतात का?? तर नाही, पण बहुतांश गोष्टी माहिती असतात, थर्ड पार्टी ऍप मात्र एन्ड युझर्सच्या डेटाशी जो खेळ करतो त्याला फक्त एकच शब्द वापरता येईल अनैतिक!!

 

 privacy_1  H x 

विचार करा इतकी खाजगी स्वरूपातली माहिती आज ह्या कंपन्यांजवळ असते. सामान्य माणूस विचार करतो की मी कुठला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष लागून गेलोय की माझ्या ह्या डेटाचा ह्या कंपन्यांना उपयोग होत असेल?? आणि मुळात प्रश्न हा आहे की हा डेटा तुमच्याच नकळत ह्या कंपन्या का आणि कशा आणि कश्यासाठी उचलत असतील?? उत्तर जरा विस्तृत द्यावं लागेल. ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर एकूण ह्या कंपन्यांचे बिझनेस मॉडेल समजून घ्यावे लागतील. मी माझ्या कुठल्याही डेटा सिक्युरिटी नामक लेखात कायम एक तकियाकलम वापरत असतो. ‘Nothing comes free of cost in this brutal capitalistic world’ म्हणजे ह्या जगात कुठलीही गोष्ट फुकट मिळत नसते!! जे फेसबुक, युट्युब, व्हाट्स ऍप, मेसेंजर, जीमेल, याहू, क्लाउड ड्राइव्ह, स्प्रेड शीट्स, मॅप्स तुम्ही फुकट कुठलाही स्वरूपाचा दृश्य पैसा न वापरता उपयोगात आणता ते तुम्हाला खरोखर फ्री मिळतं?? वेल उत्तर आहे नाही!! त्यासाठी तुम्ही पैसे मोजत नसाल पण त्याहून मौल्यवान गोष्ट तुम्ही मोजता तो म्हणजे तुमचा डेटा!! आता तुमचा डेटा म्हणजे काय हे तुम्हाला आधीच्या परिच्छेदात लक्षात आलाच असेल. बरं ही गोष्ट ह्या कंपन्या तुमच्याकडून चोरून घेतायत का?? अजिबात नाही!! कुठलंही ऍप वापरायच्या आधी किंवा अगदी अँड्रॉइड डिव्हाईस वापरायच्या आधी तुम्ही एक कन्सेंट फॉर्म न वाचता 'Allow' किंवा 'I agree' नावाचा चेक बॉक्स क्लिक करून ह्या कंपन्यांना तुमचा डेटा त्यांना हवा तसा वापरायची तुम्ही पूर्ण मुभा आणि परवानगी दोन्ही दिलेली असते!! न वाचता क्लिक केल्याचे दुष्परिणाम म्हणा की अज्ञान सामान्य माणसाला ह्याची काहीच कल्पना नसते. तुमचा खाजगी डेटा मोजल्यावरच तुम्हाला वरील गोष्टी फुकट मिळतात!! आता ह्या डेटाचं नेमकं ह्या कंपनी काय करतात?? तर मिळालेल्या ह्या डायनॅमिक डेटाला अनलाईज करून कस्टमर सेंट्रिक आणि युझर सेंट्रिक जाहिराती ह्या टार्गेटेडरित्या लोकांपर्यंत पोहचवल्या जातात.

आता हे नेमकं कसं होतं हे समजून घ्यायचं असेल तर थोड्या तांत्रिक बाबी समजून घ्याव्या लागतील कारण फेसबुक आणि गुगल ह्या दोन्ही कंपन्यांचे अल्गोरिथम आणि त्यांची मेथड ही थोडी वेगळी गुगल दोन मेथड्स वर काम करतो एक आहे Ad world आणि दुसरं आहे Ad Sense आता हे Ad world काम कसं करतात तर समजा तुम्ही गुगलवर Hotels near by me हा सर्च कीवर्ड टाकला तर तुम्हाला पहिले दोन तीन रिझल्ट्स उदा Bookings dot com किंवा Goibibo हे 'Ad' (ऍडव्हर्टाइझमेंट) ह्या कीवर्ड सकट दिसतील. ह्या कंपन्या गुगलला प्रत्येक कीवर्डसाठी आणि त्याच्या क्लिक साठी काही ठराविक रक्कम देतात जी अगदी ५ सेंट्स ते ५० डॉलर्स पर्यंत असू शकते. मग ह्या सगळ्या पेड Ad’s ला गुगलचा कॉम्प्लेक्स अल्गोरिथम 'ऍडरँक' कुठल्या कीवर्ड साठी कुठल्या Ad’s हव्या हे ठरवून आपल्या समोर सर्च रिझल्ट्स ठेवतो. म्हणजे Ad World मध्ये कंपनी गुगलला त्यांच्या सर्च रिझल्ट्समध्ये टॉपवर दाखवायला पैसे देते. पण मग तुम्ही त्या सर्च रिझल्ट्स वर क्लिक केलंत तर त्यानंतर गुगल तुम्हाला त्यांच्या Ad कशा दाखविणार?? इथे गुगलचं Ad Sense कामात येतं आणि ह्यांतर्गत गुगल एखाद्या कंपनीला त्यांच्या Ad त्या कंपनीच्या वेबसाईटवर दाखविण्याचे पैसे देतात. म्हणून कुठल्या वृत्तपत्राच्या वेबसाईटवर ज्या असंख्य गुगल स्पॉन्सर्ड ऍड तुम्हाला दिसतात ते ह्यामुळेच!! ह्या मॉडेलपर्यंत तुमची प्रायव्हसी भंग होण्याचे काही कारण नव्हते. पण हळुहळु काळ बदलत गेला आणि मोबाईल ऍप यायला लागले. ब्राऊझरचा वापर कमी होत गेला. त्यामुळे गुगलला देखील त्यांच्या सर्च मेथडॉलॉजीमध्ये बदल करावे लागले. तुमच्या ब्राऊझरच्या कुकीज, तुमचे इंडिक किंवा गुगल कीबोर्ड, किंवा तुमचे अँड्रॉइड फोन, त्यावरच्या गुगल ऍप्स हे युझरचा डेटा गोळा करण्याची कुरणं झाली आणि मग मात्र युझर्सच्या डेटा प्रायव्हसीशी खेळ खंडोबा सुरु झाला. फेसबुकचे अल्गोरिथम आणि त्यांचे ऍड मार्केटिंग गुगलपेक्षा वेगळे होते. फेसबुक युझर सेंट्रिक ऍडमध्ये गुगलपेक्षा बरेच सरस आहेत. फेसबुक त्यांच्या युझर्सच्या ऍक्टिव्हिटी म्हणजे त्यांनी अपलोड केलेले फोटो, त्यांचे फेसबुक चेक इन, त्यांच्या पोस्ट, त्यांच्या कमेंट्स, त्यांच्या लाईक अगदी डिसलाईक सुद्धा ह्यानुसार अगदी व्यवस्थित कस्टमाईझ्ड ऍड तुमच्या समोर आणते. ती लिंक असते, कुठल्याश्या पोर्टलच्या पेजवर अपलोड केलेल्या आर्टिकलची लिंक असते, छोटे छोटे व्हिडियो असणाऱ्या पेजची लिंक, व्हिडियोज सुद्धा असतात. ह्यावर पूर्णपणे कंट्रोल हा फेसबुकचा असतो बरं का!! म्हणजे एखाद्या मोदी भक्त युझरला राहुल गांधींची आणि काँग्रेसी किंवा शिवसैनिक युझरला मोदींच्या व्हिडियो, पेज किंवा बातमीची लिंक जाऊच शकते आणि त्याला ते काही पर्याय नाही म्हणून बघावं लागतं!! पुढे फेसबुक, इंस्टाग्राम ह्यांच्या मोबाईल ऍप्स आल्यावर मात्र युझर्सच्या प्रायव्हसीची व्यवस्थित काशी घालण्याचे काम फेसबुकने केलं.इतकंच कशाला फेसबुकने व्हाट्स ऍप्प ला तब्बल १९ बिलियन डॉलर्स मध्ये विकत घेतल्यावर मार्क झुकरबर्ग वर प्रचंड टीका झाली होती तरीही त्याने इतक्या मोठ्या किमतीच्या सौद्याला वाजवी सौदा ठरविले होते. आज जेंव्हा आपण ह्या सौद्याकडे बघतो तेंव्हा मार्कचे बोलणे खरे होतांना दिसते कारण फेसबुकच्या अवाढव्य रेव्हिन्यू कलेक्शनमध्ये मोठा वाटा व्हाट्स ऍप मुळे आहे आणि आता तर व्हाट्स ऍप पेमेंटमुळे आणि व्हाट्स ऍप ऍड मुळे तो अजुन वाढणार आहे. गुगलच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या जवळजवळ ९०% वाटा आणि फेसबुकच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या एकूण ९७% टक्के वाटा हा ऍडव्हर्टाइसमेन्ट मधून येतो!! पण अगेन्स्ट व्हॉट कॉस्ट?? तर लोकांच्या मूलभूत गरजेच्या म्हणजे प्रायव्हसी ह्या विषयावर कॉम्प्रोमाइज करून!!

 privacy_3  H x

ह्याच विषयावर तोडगा काढायचा प्रयत्न ऍपल ह्या जगातल्या सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात श्रीमंत टेक जायंट कंपनीने केला आहे. आणि कंपनीची पॉलिसी आहे प्रायव्हसी सेंट्रिक बिझनेस!! ज्यात युझर प्रायव्हसी ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी असेल!! ऍपलच्या ह्या एका निर्णयाने समस्त टेक वर्ल्ड हादरलं आहे, असं ही म्हणू शकता की बदलाच्या उंबरठ्यावर येऊन ठाकलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या सगळ्या प्रायव्हसी सेंट्रिक पॉलिसी सामान्य लोकांच्या आवाक्यात आहेत का?? किंवा त्या खरोखरच चांगल्या आहेत का?? त्या युझर्स डेटाची कितपत सुरक्षा करतील?? आणि ऍपलने जे प्रायव्हसी फिचर्स आणले आहेत ते अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टममध्ये येणार का?? ह्या सगळ्याचा परामर्श करूयात उद्याच्या भागात!! तोपर्यंत स्टे ट्यून्ड!!

#प्रायव्हसी_मॅटर्स #बेसिक_राईट #आयओएस_अपडेट

प्रसाद देशपांडे