‘उद्योग’ निसर्गाच्या सान्निध्यातले

विवेक मराठी    01-Jun-2021
Total Views |

@रवींद्र फालक

उद्योग करतानाच पर्यावरणाच्या संवर्धनातील आपला वाटा उचलता येतो, याचा मला अतिशय आनंद वाटतो. माझ्या उद्योगाप्रमाणेच माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा असा निसर्गाशी जोेडलेला असतो. हे निसर्गाच्या सान्निध्यातले, निसर्गाने शिकवलेले उद्योग माझे आयुष्य अधिकाधिक समृद्ध करत आहेत.

environment_3  
 

गेल्या अनेक वर्षांपासून मी प्लास्टिक पुन:प्रक्रियेच्या उद्योगात आहे. जळगाव एमआयडीसीमध्येरवी प्लास्टिक्सहा माझा कारखाना आहे. मी स्वत: पर्यावरणप्रेमी असल्यामुळे माझा उद्योग मला आवडतोच. माझा उद्योग पर्यावरणपूरक आहे म्हणजे काय? तर आपल्या रोजच्या वापरातील प्लास्टिकच्या आपण टाकून दिलेल्या वस्तू - उदा., बादलीसारख्या अनेक वस्तू फेकल्या जातात आणि त्या फेकल्यावर सडत नाहीत, त्यामुळे त्या परत मातीत मिसळत नाहीत त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. परंतु त्यांना रीप्रोसेसिंग करून त्याचा पुनर्वापर करत असल्याने दोन फायदे होतात - एक तर या वस्तूंमुळे होणारी निसर्गाची हानी टळते, तर दुसरा रोज वापरासाठी नवीन प्लास्टिकचा वापर यामुळे कमी होतो.

उद्योग करतानाच पर्यावरणाच्या संवर्धनातील आपला वाटा उचलता येतो, याचा मला अतिशय आनंद वाटतो. त्याचबरोबर पर्यावरणाशी संबंधित इतरही अनेक कामांमध्ये मी सहभागी असतो. पर्यावरणाशी, निसर्गाशी माझे नाते लहानपणापासूनचे. बारीकसारीक कीटक, पाली, विंचू, झाडे, वेली यांचे निरीक्षण करणे मला लहानपणापासूनच आवडते. त्यांची नावे वगैरे त्या वेळी जरी माहीत नसली त्याविषयी योग्य मार्गदर्शन करणारे कोणी नव्हते, तरी त्यांना बघत बसणे, त्यांच्या सवयी पाहणे, झाडांचे निरीक्षण करणे हा माझा छंद होता. त्यातूनच मला परिसरात आढळणार्या सापांविषयी मैत्रभाव वाटू लागला.

साप दिसताच लोक त्यांना मारून टाकत, याचे मला फार वाईट वाटायचे. या सापांची माहिती नसतानाही मला त्यांची भीती वाटली नाही आणि वयाच्या चौदाव्या वर्षी मी पहिला साप पकडला. अर्थातच तो विषारी की बिनविषारी, त्याचा स्वभाव काही माहीत नव्हते आणि सांगणारेही कोणीच नव्हते. अशा परिस्थितीत फक्त एकच कळत होते की याला वाचवले पाहिजे. मी अगदी लहान असताना साप पकडला, तरीही माझ्या घरच्यांनी मला खूप काही असा विरोध केला नाही. असे करू नये वगैरे नक्कीच सांगितले, पण त्यात ठाम विरोधाची भूमिका नव्हती. आतापर्यंत मी अंदाजे 2 ते 3 हजार साप पकडले आहेत. मी साप पकडतो हे कळल्यावर, साप दिसला की अनेक लोक मला बोलवू लागले. त्या वेळी मोबाइल नव्हते, पण कुठून कुठून लोक यायचे. हळूहळू मी सापांची, त्यांच्या प्रकारांची, स्वभाववैशिष्ट्यांची माहिती मिळवू लागलो.



environment_2  

त्याचबरोबर जखमी पक्षी, घरट्यातून पडलेली पक्ष्यांची लहान पिल्ले असे कोणी सापडले की त्यांना घरी आणायचे, त्यांच्यावर योग्य उपचार करायचे, त्यांना खायला प्यायला घालून ते बरे झाले की पुन्हा अधिवासात सोडायचे, हा आणखी एक आवडताउद्योग’. या बरे झालेल्या पक्ष्यांना सोडताना जो आनंद मिळतो, तो अगदीच वेगळा, दुर्मीळ म्हणावा लागेल.

वनीकरणाची गरज लक्षात घेऊन मी आणखी एक उपक्रम हाती घेतला. जंगलात म्हणा किंवा शहरातील ठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षांच्या बिया गोळा करून त्यापासून रोपे बनवून पुढील वर्षी लोकांना त्याचे वाटप करायचे. हा उपक्रम जवळपास पंधरा ते सोळा वर्षांपासून अखंडित सुरू आहे. त्याला निसर्गप्रेमी लोकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही दिलेली झाडे लावली गेली आहेत, ती चांगली जगली आहेत आणि मोठीसुद्धा झाली आहेत. आज त्या सर्व झाडांची उंची साधारण सात ते अकरा फूट एवढी आहे. या वर्षी परत दोन हजार झाडे लावण्याचे प्रयोजन आहे.

मी जळगावमधील वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचा अध्यक्ष आहे. प्राणी, पक्षी, झाडे वाचवणे, त्यांचे संवर्धन करणे, जवळच असलेल्या सातपुडा बचाव अंतर्गत प्रश्न सोडवणे ही या संस्थेची उद्दिष्टे आहेत. वन विभागाशी समन्वय साधून जंगलाचा र्हास होऊ नये म्हणून अनेक उपक्रम आम्ही राबवतो. यातच एक मुख्य प्रश्न आहे, तो आदिवासी लोकांच्या विकासाचा. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही आमच्याकडून होईल ती मदत करतो. वह्या-पुस्तके, चपला, टिफिन बॉक्स, दप्तर यांचे त्यांना वाटप करतो. या मुलांना एकत्र करून त्यांना निसर्गाविषयीही माहिती देतो. विद्यार्थ्यांना जंगलातील पक्षिसृष्टीची माहिती करून देणार्या पुस्तिकांचे वाटप करतो.



environment_1  

जळगाव जिल्ह्याचा मानद वन्यजीव रक्षक (वाइल्ड लाइफ वॉर्डन) म्हणून दोन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र शासनाकडून माझी नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्र शासनाचा वसुंधरा पुरस्कारही मिळाला आहे. आतापर्यंत मध्य प्रदेशमधील कान्हा, गांधीसागर, पन्ना, सातपुडा, शिवणी तसेच महाराष्ट्रातील मेळघाट, ताडोबा या सर्व टायगर झोनमधील वाघांची गणना करणे, वॉटर हॉल सेन्सस, व्याघ्रप्रकल्पातील गिधाडांची गणना करणे, त्यांची घरटी शोधणे याबाबतचे बरेच उपक्रम असतात आणि यासाठी मी काम केले. अशा जवळपास 30-35 उपक्रमांत मी सहभागी होतो. दोन-तीन दिवसांच्या या उपक्रमात जंगलात जाऊन राहावे लागते. वीज नाही, पाणी नाही, मोबाइलचे सिग्नल नाही अशा ठिकाणी राहून रोज साधारण दहा ते पंधरा किलोमीटर खडतर प्रवास करावा लागतो. डोंगर-दर्या-नाले हे सगळे पार करत निरीक्षण करणे, प्राण्यांची-पक्ष्यांची नोंद करणे, त्यांचे फोटो आयडेंटिफिकेशन करणे आवश्यक असते.

जंगलात लागणार्या वणव्यांच्या नियंत्रणासाठी बरेच कार्यक्रम राबवतो. आग लागल्यावर आमच्या टीममधील काही लोक तिथे जाऊन आग विझवण्यासाठी वन विभागाला दिवस-रात्र मदत करतात. तसेच वणवे लागू नये म्हणून काय उपाय करायचे, याबाबत विचारविनिमयही करत असतो.

एकूणच माझ्या उद्योगाप्रमाणेच माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा असा निसर्गाशी जोेडलेला असतो. हे निसर्गाच्या सान्निध्यातले, निसर्गाने शिकवलेले उद्योग माझे आयुष्य अधिकाधिक समृद्ध करत आहेत.

 

शब्दांकन : राजेंद्र कानडे

8237657178