समर्पित जीवनाची प्रेरणा स्व. बळवंतराव ताठे

विवेक मराठी    14-Jun-2021
Total Views |

बळवंतराव ताठे यांनी वनवासी कल्याण आश्रम, रा. स्व. संघ, वैदिक गणित इत्यादींत भरीव काम केले आहे. प्रत्येक कामात त्यांची समर्पण वृत्ती असे. कुठल्याही गोष्टीचा मोह नाही. संयमी जीवन, अत्यंत साधी राहणी; त्यांची प्रत्येक गोष्ट स्वाभाविक होत होती.

RSS_1  H x W: 0

 

मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीवरून फोन आला, बळवंतराव ताठे गेले! एकदम एका समर्पित जीवनाचे एकेक पैलू आठवायला लागले.
 

 

 

भद्रावतीला दि. 16 ऑक्टोबर 1939 रोजी जन्म झालेले बळवंतराव ताठे यांचे जीवन सर्वांना प्रेरणा देणारे होते. मला समजायला लागल्यापासून मी त्यांना ओळखत होतो. ते लोकमान्य विद्यालयात शिक्षक होते. मी संघात जायला लागलो, तेव्हा ते संघाचे स्वयंसेवक आहे असे माहीत झाले. त्यांच्या घरासमोरून नेहमी जावे लागत होते. तेव्हा त्यांच्या अंगणात, समोरच्या खोलीत सर्वत्र विद्यार्थी दिसत असत. ते विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करीत होते. ते जेव्हा जेव्हा घरी राहत, तेव्हा तेव्हा विद्यार्थी दिसतच होते. अगदी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी राहत असत, त्यामुळे ते स्वत:चे आवश्यक कार्य कधी कसे करत हे त्यांनाच माहीत. हळूहळू माझे त्यांच्याकडे जाणे वाढले, तसतसे ते समजायला लागले. ते संघाचे तृतीय वर्ष शिक्षित होते. वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक सदस्य होते. त्यांचा वैदिक गणिताचा अभ्यास होता. त्याच्या प्रचार प्रसारासाठी भरपूर प्रवास करत होते. त्यासाठी संघटन उभे केले. विशेष म्हणजे कविकुलभूषण कालिदास संस्कृत विद्यापीठामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सर्टिफिकेट कोर्स) पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा कोर्स) त्यांच्या प्रेरणेने सुरू झाले.

 

 

मीसुद्धा त्यांच्याकडे गणिताच्या अडचणी सोडवायला जायला लागलो. ते गणित समजावून सांगत असताना अनेक संदर्भ देत, सर्व वेगवेगळ्या विषयांचे असत, अनेक ग्रंथांचा उल्लेख करत असत. त्यांच्याकडे अनेक दुर्मीळ ग्रंथांचा संग्रह होता. त्यांचे वाचन स्मरणही अद्भुत होते. ते उदाहरण देत असताना ग्रंथाचे नाव, अनेकदा तर ग्रंथातील प्रकरण पृष्ठ क्रमांकही सांगत होते, हे आश्चर्यकारक होते!

 

 

ते विद्यार्थ्यांना गणिताची रुची कशी निर्माण होईल या दृष्टीने शिकवीत होते. गणिताची आवश्यकता उपयोग समजावून सांगत असत. यामुळे विद्यार्थ्यांना आनंद होत होता. त्याची रुची वाढत होती विषयाचा पाया मजबूत होत होता. त्यांना अनेक खेळांमध्ये रुची होती. ते टेबलटेनिस उत्कृष्ट खेळत होते. अनेक खेळांची माहितीही होती.

 

 

त्यांच्या जीवनावर 1975च्या सरकारने लावलेल्या आणीबाणीचा खूप परिणाम झाला होता. सर्वत्र भीतीचे वातावरण होते. अनेक कार्यकर्ते कारागृहात होते. त्या परिस्थितीत कार्य सुरू ठेवणे, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे, तुरुंगामध्ये असलेल्या कार्यकर्त्यांच्या परिवाराची व्यवस्था करणे अशा अनेक गोष्टी होत्या. बळवंतरावांना जिल्हा संघचालकांनी अशी सूचना केली होती की तुम्हाला बंदी व्हायचे नाही. त्यामुळे त्यांची खूपच धावपळ होत होती. कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या गावांना गुप्त सूचना पाठवणे, पत्रक पाठवणे यासाठी ते रात्रभर त्यांच्याच घरी पत्रक छापत होते. अनेक दिवस त्यांचे जागरण होत होते. सतत प्रवास, सतत दगदग याचा परिणाम त्यांना एक दुर्धर आजार झाला. मेंदूमध्ये गाठ (ट्यूमर) झाला होता. त्यासाठी त्यांनी एका आश्रमात निसर्गोपचार होमिओपॅथीचे औषध उपचार सुरू केले. त्यांचे सातत्य आत्मिक बळ वाखाणण्यासारखे होते. अनेक वर्षे उपचार सुरू होते. बरेच पथ्य पाळत होते. हे असतानाही शिकवणी वर्ग सुरूच होते. ते वर्षातून काही आठवडे, कधीकधी पंधरा दिवस औषधोपचारासाठी आश्रमात जात होते. त्यांच्या मानसिक बळामुळे इतक्या दुर्धर आजारावर विजय मिळवला. हे सर्व असतानाही त्यांची दिनचर्या स्वाभाविकच होती. शिस्त होती, शब्दांना नैतिक वजन होते. त्यांना इतरांनीही शिस्त पाळावी असे वाटत होते. त्यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी प्रवास केला, त्यांना याचा अनुभव येत होता. सतत प्रवास सुरू असे.. कधी वनवासी कल्याण आश्रमासाठी, संघासाठी, वैदिक गणितासाठी, औषधोपचारासाठी. असे हे समर्पित जीवन. कुठल्याही गोष्टीचा मोह नाही. संयमी जीवन, अत्यंत साधी राहणी; प्रत्येक गोष्ट स्वाभाविक होत होती.
 

 

 

अलीकडेच त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार समारंभ घेतला. त्यात अनेकांचे अनुभवकथन झाले. त्यांचेही मनोगत झाले. ते मनोगतात म्हणाले, “हिंदू लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. माझा पुनर्जन्म झाला तर मला शिक्षकच कर, विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी मिळेल.” हे मनोगत प्रत्येकाच्या मनाला भिडणारे होते. असे हे बळवंतराव, सतत प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व वयाच्या 81व्या वर्षी दि. 16 जून 2020 रोजी आपल्यातून निघून गेले. ते सतत स्मरणात प्रेरणा देत राहो, हेच त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

 

- विलास भास्करवार, वर्धा

9371895524