‘तत्त्वज्ञानाच्या राजस कथा’

विवेक मराठी    15-Jun-2021
Total Views |

 – वैचारिक इतिहासाची रंजक कथा मांडणारी व्हिडीओ मालिका


hi_1  H x W: 0

वानरसदृश प्राण्यापासून उत्क्रांत झालेल्या माणसाने निसर्गांत आपले वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्त्व निर्माण केले आहे. इतर नैसर्गिक जीवांपेक्षा अगदीच वेगळी आणि अद्भुत अशी मानवी अस्तित्त्वाची कथा आहे. हे सर्व शक्य झालं ते माणसाच्या वैचारिक आणि बौद्धिक विकासामुळे. माणसाच्या मेंदूचा जैविक आणि वैचारिक विकास हेच माणसाच्या अचाट अशा प्रगतीचेगमक आहे.

निसर्गात जीवन जगता जगता माणूस समूहजीवन जगू लागला. त्याला समूहभान प्राप्त झाले. आणि यासोबतच स्वतःच्या अस्तित्त्वाची वेगळी जाणीव त्याला झाली. कल्पना, विचार, चिंतन, स्मरण, तर्क अशा एक ना अनेक शक्यता आणि शक्ती मानवी मेंदूने माणसाला बहाल केल्या.

त्यापासून समूहजीवन जगणारा माणूस हळूहळू सामाजिक जीवन जगू लागला. आदिम अवस्था ते नागरी अवस्था असा माणसाच्या सामाजिक विकासाचा आलेख आपण मांडू शकतो. आज, २१व्या शतकात माणूस तर्काधिष्ठित विचारांच्या सहाय्याने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अशा आसमंतात पोहोचला आहे की तिथून आर्टीफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कम्प्युटिंग सारखीप्रगतीच्या उच्चतम वाटा दाखवणारी नवी क्षितिजे तो बघू लागला आहे.

या सर्व प्रगतीचा पाया हा माणसाचा विचार आहे. तत्त्वज्ञान, कला, साहित्य, विज्ञान आणि समाज-शास्त्र अशा विभिन्न अंगांनी उन्नत झालेला मानवाचा विचार त्याला या आजच्या स्थितीपर्यंत घेऊन आला आहे. यातील प्रत्येक क्षेत्र हे विचारांच्या इतर क्षेत्रांशी घट्ट जोडलेले असते. एकाचा विकास म्हणजे सर्वांचा विकास! मानवी विचारांचा हाइतिहास अतिशय रंजक आणि आपल्या बुद्धीला नव्याने चालना देणारा, नव्या वाट दाखवणारा आहे.

माणसाचा समाज आणि समाजाचा विचार करणारे तत्त्वज्ञ, विचारवंत यांचा इतिहासकाळापासून घनिष्ठ संबंध राहिला आहे. या ऐतिहासिक संबंधातून मानवी तत्त्वज्ञान, सामाजिक विचार यांची मोठी प्रगती झालेली आहे. जागतिक पटलावरील ही माणसाची आगळीवेगळी कथा म्हणजे माणसाच्या येत्या भविष्याचा पाया आहे.

जगाच्या पाठीवर, हिंदू संस्कृती, ग्रीक आणि युरोपीय संस्कृती, चीनी संस्कृती यांनी सामाजिक विचार आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेत माणसाचा सामाजिक विचार आणि जीवनाविषयीचा दृष्टीकोन प्रगल्भ केला आहे. २१व्या शतकात पदार्पण करणारा माणूस याच सर्व विचारांचा वारसा घेऊन आला आहे. त्याचे आजचे प्रश्न, त्यांची उत्तरे आणि उद्याचे स्वप्न यांना संपूर्ण वैचारिक इतिहासाचा संदर्भ आहे. आणि म्हणून तो समजून घेणे अतिशय आवश्यक आहे.

याच अनुषंगाने एक लहानसा प्रयत्न साप्ताहिक विवेक आणि इ-विवेकच्यावतीने आपण करणार आहोत. ‘तत्त्वज्ञानाच्याराजस कथा’ या नावाने जागतिक तत्त्वज्ञानाच्या आणि विचारांच्या इतिहासावर दृष्टीक्षेप टाकणारी, विचार आणि अभ्यास प्रवृत्त करणारी अशी एक रंजक व्हिडीओ-मालिका आपण सुरु करत आहोत.

हिंदू संस्कृतीतील विचारवंत, ग्रीक-युरोपीय विचारवंत आणि चीनी विचारवंत यांच्या वैचारिक इतिहासाची तोंडओळख आपण या मालिकेतून करून घेणार आहोत.यात १००हून अधिक भाग असतील आणि प्रत्येक भाग हा ८ ते १० मिनिटांचा असणार आहे. यासोबतच अधिक माहिती आणि अभ्यासासाठी वेगवेगळ्या लिंक्स दिल्या जातील.

अभ्यासक श्री. राजस वैशंपायन ही मालिका सादर करणार आहे. राजस वैशंपायन तत्त्वज्ञान, संस्कृत आणि पुरातत्वशास्त्र अशा विषयांचा अभ्यासक असून, संशोधन सहाय्यक म्हणून त्याला कामाचा व अभ्यासाचा अनुभव आहे.

साप्ताहिक विवेकच्या फेसबुक आणि युट्युब चॅनलवरून दर आठवड्याला दोन याप्रमाणे व्हिडीओ प्रसारित केले जातील. अधिकाधिक लोकांनी ही मालिका पहावी, फॉलो करावी, अभ्यास करावा, विचार करावा असा या मालिकेमागील आपला मानस आहे.

तेव्हा या विषयातील उत्तम व सखोल माहिती जाणून घेण्यास उत्सुक असलेल्या सर्व वाचक-दर्शकांनी साप्ताहिक विवेकच्या फेसबुक पेज व युट्यूब चॅनलला लवकरात लवकर लाईक व सबस्क्राईब करावे, असे आवाहन विवेकतर्फे करण्यात येत आहे.