विज्ञान कुंडलिनीचे

विवेक मराठी    18-Jun-2021
Total Views |

@डॉ. सुवर्णा रावळ

कुंडलिनी ही मानवी शरीराच्या आत आहे. ती प्रत्यक्ष आहे. शरीराचा मूलभूत भाग आहे. म्हणजे तिथपर्यंत पोहोचणे शक्य आहे. योग्य गुरूच्या मार्गदर्शनाने ही साधना करणे शक्य आहे. शेवटी तेे शरीरविज्ञान आहे. शरीराच्या अचाट क्षमतेची जाणीव करून घेण्याचा मार्ग आहे.


man_1  H x W: 0

आदियोगीशिवाने सांगितलेला शरीरशास्त्रातील कुंडलिनी योग पुढीलप्रमाणे -

मानवी शरीरात एकूण 114 चक्रे आहेत. ही प्रमुख चक्रे आहेत. उप किंवा लहान याहीपेक्षा जास्त असू शकतात. ही चक्रे म्हणजे शरीरातील मार्गिकांचे जंक्शन केंद्र. हे त्रिकोणी आकाराचे असून ते फिरत असल्याने त्याची लय चक्रासारखी भासते. कारण हे त्रिकोण (Neurons) जिवंत आहेत, ऊर्जायुक्त आहेत. त्यामुळे त्याचे भासमान स्वरूप चक्रासारखे आहे. या 114पैकी दोनचक्रेशरीराच्या बाहेर आहेत. 112 चक्रे शरीराच्या आत आहेत. त्यातील 4 चक्रे प्रोत्साहित करण्यासाठी विशेष काही करावे लागत नाही. ती आपोआप प्रोत्साहित होतात बाकी 108 चक्रांबरोबर. ही 108 चक्रे प्रयत्नांनी प्रत्यक्ष कार्यरत होऊ शकतात, बाकीची 4 चक्रे त्यांच्याबरोबर आपोआप प्रोत्साहित होतात.

या 112 चक्रांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध मार्ग आहेत. 108 ही संख्या ब्रह्मांडाच्या सूर्यमालेवर आधारित आहे. सनातन हिंदू संस्कृतीत 108 संख्येला खूप महत्त्व आहे. त्यामागे शास्त्र आहे. सूर्याची त्रिज्या (डायमीटर) आणि पृथ्वीचे अंतर यावर आधारित आहे, म्हणून 108 संख्या पूज्य मानली गेली आहे.

सूर्य आणि पृथ्वी यांचे अंतर सूर्याच्या 108 त्रिज्याएवढे आहे. (108 सूर्याची त्रिज्या). पृथ्वी आणि चंद्र यातील अंतर चंद्राच्या 108 त्रिज्येएवढे आहे. (108 चंद्राची त्रिज्या). 108 हे सूर्य, चंद्र, पृथ्वी यांच्या सूर्यमालेतील एकमेकांशी असणार्या संतुलनावरून प्रमाणावरून आलेला आकडा आहे. (आधुनिक विज्ञान आजपर्यंत सूर्याची त्रिज्या मोजू शकलेले नाही, हे वाचकांनी ध्यानात घ्यावे.)

हे प्रमाण संतुलन फक्त पृथ्वीवरील मानवासच लागू आहे, जर अन्य ग्रहावर - उदा., मंगळावर आपण जन्माला आलो असतो, तर हा संतुलनाचा आकडा वेगळा असला असता. आपल्याला ज्या प्रकारचे मानवाचे शरीर दिसते, हे या सूर्यमालेमुळे आहे. जर सूर्यमाला बदलली, तर मानवाच्या शरीराचा बाजही बदलेल.

या 112 चक्रांपैकी जर 21 चक्रे उघडली गेली (योगसाधनेमुळे), तर आपण सामान्य भौतिक जीवन जगू शकतो. या 21 चक्रांमुळे माणूस सर्वसामान्यांच्या भौतिक जीवनाच्या सर्व आशा-आकांक्षापूर्तीची भरारी मारू शकतो. सर्वसामान्यपणे जीवनात विहार करू शकतो. पूर्णत्वाने आयुष्य जगू शकतो.

बाकीची उरलेली चक्रे उघडली गेली, तर तुमचा विविध स्तरांवरचा दृष्टीकोनच बदलून जाऊ शकतो. अद्भुत, चमत्कारिक गूढ उकल त्यास होऊ शकते. सर्वसामान्यांसाठी चमत्कार वाटावे असे त्याचे आयुष्य होऊ शकते. त्यासाठी त्या प्रकारचे वातावरण निर्माण व्हावे लागते. संस्कारातून सभोवतालची मशागत करावी लागते. त्यालाच आपण साधना म्हणतो.

एकाच वृक्षाची बीजे जर वेगवेगळ्या वातावरणात, वेगवेगळ्या प्रदेशातील वातावरणात रुजवली गेली, तर त्यातून निर्माण होणारे वृक्ष वा फळे संख्यात्मक गुणात्मक दृष्टीने वेगवेगळी फुलतील. पोषक वातावरणात पूर्णरूपात फुलतील, फळतील. माणसाचेही तसेच आहे. माणूस पूर्णरूपाने प्रकट होऊ शकत नाही, जोपर्यंत तो त्याच्याभोवती पोषक वातावरण निर्माण करीत नाही.

जर सर्व चक्रे उघडली गेली, तर माणूस त्याच्या इच्छेप्रमाणे काहीही करू शकतो. जागेवरून हलता तो सर्व ठिकाणी विहार करू शकतो. कुणामध्येही ही शक्ती निर्माण करू शकतो. जे सामान्य इंद्रियांनी अनुभवायला येते, त्यापेक्षा वेगळे स्वरूप त्यास देऊ शकतो. फक्त स्वीकारण्याची क्षमता त्यामध्ये असावी लागते.

भारतात अशा चमत्काराची अशी अनेक उदाहरणे आहेत. रामकृष्ण परमहंसांनी केवळ स्पर्शाने नरेंद्रमध्ये सर्व ज्ञान परावर्तित केले होते. केवळ स्पर्शाने नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद यांची कुंडलिनी चक्रे क्रियान्वित झाली होती. हा काही फार मागचा इतिहास नाही. त्याच नरेंद्राने केवळ 15-20 वर्षांच्या कालावधीत अफाट, अचाट, युगानुकूल कार्य केले. हा चमत्कार नाही, तर काय म्हणावे याला?

माणसाच्या कल्पनेपेक्षा वेगळे असे हे चमत्कार होऊ शकतात, फक्त ही शक्ती विधायकपणे वापरली गेली पाहिजे. माणसामध्ये ही प्रज्ञा असणे आवश्यक आहे.


man_3  H x W: 0

जर 63 चक्रे क्रियान्वित झाली, तर तुम्ही अतिशक्तिशाली स्वरूपात परावर्तित होऊ शकता आणि तुम्ही सभोवतालच्या सर्वांमध्ये परिवर्तन करू शकता. आध्यात्मिक शक्तीने तुम्ही असाल त्या ठिकाणाचे, तेथील प्राणिमात्रामध्ये, मानवामध्ये ती आध्यात्मिक ताकद निर्माण करू शकता.

जर 84 चक्रे उघडली गेली, याचा अर्थ मानवाच्या कल्पनेपलीकडच्याही मर्यादा ओलांडल्या असे होते. माणसाची कल्पनाशक्ती जिथपर्यंत पोहोचणार नाही, अशी काहीशी शक्ती या साधकामध्ये येऊ शकते.

जर 108 चक्रे उघडली गेली, तर या इहलोकीपासून अलिप्त वेगळ्या अशा विश्वात आपण गेलात असे काहीसे होईल, जे शब्दांकित करणे शक्य नाही. त्या ब्रह्मांडाशी एकरूप होण्याची ताकद या साधकात निर्माण होऊ शकते. आणि ज्याची 114 चक्रे उघडली गेली, तर हा साधक आणि आदियोगी समान पातळीवर आला असे समजावे. कुठेही जाता हा साधक कधीही, कुठेही, कसाही बदल घडवून आणू शकतो.

हे सारे विश्लेषणआदियोगीशिवाने केले. शिव हाचयोगचा निर्माता आहे, ज्याने मानवी शरीर, त्याचे येणे-जाणे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखविला आहे आणि हे शक्य आहे. त्यासाठी गरज आहे संस्कारांची. शुद्ध बीज, बीजावर शुद्ध संस्कार (भूतकाळातला, वर्तमानकाळातला) होणे गरजेचे.

आता प्रश्न पडतो - सर्वसाधारण माणसाला हे शक्य आहे का? याचे उत्तर आहे - होय. बंधन एकच - संपूर्णपणे झोकून देण्याची मानसिकता, व्यवहार पूर्णत: त्या आदियोगी शिवचरणांशी अधीन होण्याची तयारी, का कसे हे प्रश्न मनात येऊ देण्यापर्यंत मनाची तयारी शुद्धता.

कुंडलिनी ही मानवी शरीराच्या आत आहे. ती प्रत्यक्ष आहे. शरीराचा मूलभूत भाग आहे. म्हणजे तिथपर्यंत पोहोचणे शक्य आहे. योग्य गुरूच्या मार्गदर्शनाने ही साधना करणे शक्य आहे. शेवटी तेे शरीरविज्ञान आहे. शरीराच्या अचाट क्षमतेची जाणीव करून घेण्याचा मार्ग आहे. फक्त या मार्गावर कधी यायचे? कसा प्रवास करायचा आणि काय करायचे नाही, यासाठी गुरूची आवश्यकता आहे आणि तुमच्यात ती पात्रता असेल तरी गुरू आपोआप भेटतो किंवा तुम्ही गुरूच्या मार्गावर आपोआप मार्गक्रमण करायला लागता.

कुंडलिनीचे शरीरातले अस्तित्व शास्त्र बघू या. माणसाचे शरीर व्यवस्थापन पाचस्तरीय आहे. अन्नमय कोष, मनोमय कोष, प्राणमय कोष, विज्ञानमय कोष आनंदमय कोष.


man_2  H x W: 0

वरील पाचपैकी प्राणमय कोष प्रमुख महत्त्वाचा आहे. प्राणमय कोष (नाभी) 72 हजार (72,000) नाड्या यातून प्रवाहित होतात. त्यातून 108 ध्वनी निर्माण होतात. त्यास नादयोग म्हटले जाते. या सर्वांचे अस्तित्व हे स्पंदनरूपी अनुभवता येते. भौतिक अर्थाने त्याचे असणे हे आपण स्पंदन थरथराटावरून अनुभवू शकतो. ही स्पंदने, आवाज आपल्या ऋषिमुनींनी हजारो वर्षांपूर्वी ओळखली आहेत, शोधली आहेत. आधुनिक विज्ञानात याच आवाजांना/स्पंदनांनासबसॉनिकआणिअल्ट्रासॉनिकआवाज म्हटले आहे. याच स्पंदनाचा आवाजाचा आधार भारतीय शास्त्रीय संगीतात घेतला आहे. शास्त्रीय संगीत साधना हा कुंडलिनी जागृतीसाठीचा एक साधनामार्गच आहे.

या ज्या 72 हजार नाड्या प्राणमय कोषातून बनलेल्या आहेत, त्या पुन्हा 114 नाड्यांमध्ये विभाजित होतात. (72+72=114) प्रत्येक नाडीच्या विस्तारामध्ये किंवा प्रसरणामध्ये 114 संगमस्थाने आहेत. जंक्शन बिंदूपैकी दोन शरीराच्या बाहेर आहेत, जे बाहेरच्या भौतिकेशी संगम साधतात (पिंडी तेच ब्रह्मांडी), तर 112 शरीराच्या आतमध्ये आहेत. या 112पैकी 4 स्थाने सुप्त किंवा निद्रिस्त अवस्थेत असतात. 108 चक्रे मात्र क्रियाशील असतात.

ही 108 चक्रे दोन विभागात (समान) विभाजित होतात. 54-54 चक्रे ही शरीराच्या दोन भागात, दोन कंपनात आणि दोन शरीरप्रकारात विभागतात. स्त्री आणि पुरुष. यालाच इडा आणि पिंगळा म्हटले आहे. 54 चक्रे इडामध्ये, 54 चक्रे पिंगळामध्ये विभाजित होतात. शुद्ध-अशुद्ध रक्तवाहिन्या/नाड्या होत, जे संपूर्ण शरीराचे संतुलन संचालन करीत असतात. मानवी शरीरातली ग्रंथींची ठिकाणे हीच या मुख्य स्थूलचक्राची ठिकाणे आहेत. या ग्रंथीतील स्राव वाहून नेणार्या या 72 हजार नाड्या आपल्या बेंबीतून (नाभीतून) उगम पावतात शरीरभर पसरतात.

प्रामुख्याने सात चक्रांची अनुभूती तर सहज साधनेने घेता येऊ शकते. त्यांचे स्थान रंग सोबत दिलेल्या चित्रावरून जास्त चांगले समजेल. शब्दांच्या मर्यादेमुळे विस्तार आवरता घेते. हे शरीराचे विज्ञान आहे. चक्रे-चक्रे म्हणजे या मूळ पेशी त्यांचा पुंजका, जो शरीरात विशिष्ट स्थानी आहे. अंत:स्थ ध्यानधारणेने त्यांची स्पंदने आपण अनुभवू शकतो. यालाच नित्यसाधना म्हटले आहे. हे काही अंधारीत, काल्पनिक नाही, तर ते प्रत्यक्ष शरीरशास्त्र, संस्कार विज्ञान आहे.

या चक्रांच्या संस्काराविषयी पुढील लेखात बघू या.

क्रमश: