सारे खेळ शब्दांचे...

विवेक मराठी    18-Jun-2021
Total Views |

@देविदास देशपांडे

हे
राजकारण म्हणजे फक्त शब्दांचा खेळ झाले आहे. मुख्यमंत्री म्हणवणारी व्यक्ती अधूनमधून फेसबुकवर येऊन शाब्दिक कोट्या करून लोकांचे मनोरंजन करते. त्यांचा मित्रपक्ष म्हटला जाणारा एक कळप त्यांना शब्द पाळण्याची आठवण करून देतो. या दोघांमध्ये लिंबूटिंबू म्हणून घेतलेला तिसरा एक गटहम भी कुछ कम नहींहे दाखवण्यासाठी शब्दबाण सोडत राहतो.


shivsena_1  H x

शब्द देणे, शब्द टाकणे, शब्द फिरवणे, शब्द पाळणे, शब्द मोडणे... असे अनेक प्रकारचे वाक्प्रचार मराठी भाषेत प्रचलित आहेत. शब्द हा त्यांच्यातील समान धागा आहे. शब्दांच्या आवतीभोवती रचलेल्या या वाक्प्रचारांमधून वेगवेगळे अर्थ निघतात. त्यांचे संदर्भसुद्धा वेगवेगळे आहेत. महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण पाहिले, तर या सगळ्या वाक्प्रचारांचा साक्षात अनुभव पाहायला मिळतो. शब्द देण्यापासून सुरू झालेला राजकारणाचा प्रवास परत शब्द देण्याच्या या आरंभबिंदूवर परत आला आहे.


राष्ट्रवादी
काँग्रेसच्या स्थापनादिन कार्यक्रमात बोलताना पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगितली. शिवसेनेचे प्रमुख असताना बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांची पाठराखण केली होती. “आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या विरोधात एकही उमेदवार उभा केला नाही आणि आपला दिलेला शब्द खरा केलाअसे पवार यांनी सांगितले. त्यामुळेच शिवसेना हा विश्वासार्ह पक्ष असल्याचे पवार यांनी छातीठोकपणे सांगितले.


पवारांनी
या दिलेल्या भूतकाळातील उदाहरणांमुळे भविष्यातील वाटचालीचे संकेत मिळाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याचा समझोता झाला आहे, असे म्हटले जाते. महाविकास आघाडी नावाची एक तद्दन कामचलाऊ गोधडी 2019च्या हिवाळ्यात शिवण्यात आली, तेव्हापासून अशा प्रकारची चर्चा आहे. आपल्या कन्येला या पदावर बसवून राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री करण्याचा थोरल्या पवारांचा मनसुबा कधी लपून राहिलेला नाही.


shivsena_2  H x

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाला नुकतीच दीड वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या चिरंजीवांना दूर करून आपल्या कन्येला तिथे बसविण्याची त्यांची घाई समजण्यासारखी आहे. त्या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत आणि दिलेल्या शब्दाची ही आठवणसुद्धा त्यासाठीच करून दिली आहे. पवारांनी एका वाक्यात अनेक दगड मारले आहेत. एक म्हणजे आपण बाळासाहेबांचे पुत्र असल्याचे पालुपद उद्धव ठाकरे यांच्या तोंडात असते. तुमचे पिताश्री शब्द पाळणारे होते, त्यामुळे तुमच्यावरही ती जबाबदारी आहे, हे थोरल्या पवारांनी हळूच जाणवून दिले आहे. याशिवाय दिलेल्या शब्दाला जागणे ही शिवसेनेची परंपरा असल्याचे त्यांनी मुद्दाम अधोरेखित केले आहे. दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाशी असलेली युती तोडून शिवसेनेने दुसरा घरोबा केला, तेव्हा नेमके हेच तर कारण शिवसेनेने दिले होते! आता सत्ता सोडताना त्या बाजूने कुठलीही खळखळ होऊ नये, याची काळजी पवार घेत आहेत. उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे भाजपाला दिलेला शब्द फिरविला, वडिलांना दिलेल्या वचनाचा बहाणा करून दगाबाजी केली, तसा प्रकार आपल्याबरोबर होऊ नये यासाठी त्यांनी केलेला हा प्रपंच म्हणावा लागेल! चोरांची पावले चोराला ठाऊक!


या
संदर्भात उद्धव ठाकरेंचेनारायणसंजय राऊत यांनी केलेले वक्तव्य पाहण्यासारखे आहे. नाशिकमध्ये एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की, “आघाडीत सत्तेचा फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला ठरलेला आहे का?” त्या वेळी राऊत म्हणाले कीया महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण पाच वर्ष राहील. यामध्ये कुठल्याही वाटाघाटी नाहीत. ही कमिटमेंट आहे.” नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या अधिकृत भेटीनंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ दुसरी खासगी भेट झाली, असे म्हटले जाते. तीसुद्धा मोदी आणि ठाकरे यांची एखादी रणनीती आहे की काय, या भयाने राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनाही पछाडले असल्यास नवल नाही. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून वाग्बाणांची सरबत्ती व्हायला सुरुवात झाली. हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही!


आता
शिवसेनेची गोची अशी झाली की आपण शब्द दिला नव्हता असे ती म्हणू शकत नाही. कारण शिवसेनेने भाजपाला वार्यावर सोडताना नेमका हाच दावा केला होता. मुख्यमंत्रिपदाचा शब्द कधीही दिलेला नव्हता, असे भाजपाच्या सर्व पातळ्यांवरील नेत्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. पण शिवसेना आपला धोशा सोडायला तयार नाही. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोघांमध्ये फाटले शिवसेनेने शब्द मोडला असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसनेही केला, तर कोणाची बाजू बळकट असेल बरे?


एकीकडे
हा सगळा प्रकार सुरू असताना प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्यासह भोजन करीत तीन तास चर्चा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होणे स्वाभाविक आहे. ममता बॅनर्जी, नितीशकुमार आणि एम.के. स्टॅलिन अशा देशाच्या राजकारणातील मोदीविरोधकांना सल्ले देणारे प्रशांत किशोर सिल्व्हर ओकवर आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यात पश्चिम बंगालमध्ये अलीकडे ममता बॅनर्जी यांना यश मिळवून दिल्यामुळे प्रशांत किशोर उर्फ पीके यांचा रूतबा जरा जास्तच उंचावलेला. त्यामुळे वावड्यांना पारावार उरला असता तर नवलच. पवार यांना विरोधी पक्षाचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार होण्यापासून पवार यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करावे, इथपर्यंतच्या ऑफर किशोर यांनी दिल्याचे म्हटले गेले.


आता
पवारांनी विरोधी पक्षांचे नेतृत्व करायचे याचा अर्थ राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी यांची गच्छंती अटळ आहे. भलेही 50पेक्षा कमी जागा का असेनात, पण लोकसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेस आहे. त्याचे अधिकृत असो वा अनधिकृत, पण राहुल गांधी हेच नेते आहे. त्यामुळे त्यांच्या स्थानाला धक्का लागणे हे गांधी घराण्याची प्रजा असलेल्या काँग्रेसजनांना कधीही मानवणारे नाही.


याच
अस्वस्थतेतून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यूपीएचे नेतृत्व राहुल गांधीच करतील आणि आगामी पंतप्रधान पदाचे राहुल गांधी हे उमेदवार असतील, हे स्पष्टपणे सांगून टाकले. त्याच वेळी महाराष्ट्रातील आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची घोषणाही काँग्रेसने केली आहे.


महाविकास
आघाडीमध्ये काँग्रेसला दुय्यम भूमिका दिली जात असल्याची चर्चा नेहमीच होते. त्यामुळे नाना पटोले यांनी घेतलेली ही भूमिकासुद्धा काँग्रेसची रणनीती मानायला हरकत नाही. गोष्ट एवढ्यावर थांबत नाही. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री काँग्रेसचा व्हायला हवा असे सांगून आपले घोडे पुढील दामटण्याचा प्रयत्नसुद्धा केला. नाना पटोले यांनी अकोला येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यावर गदारोळ झाला, तेव्हा मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात गैर ते काय, असा सवालही केला.


या
संदर्भात गेल्या आठवड्यात मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घातलेला गोंधळ आणि मुख्यमंत्र्यांची केलेली गोची यांच्याकडे पाहावे लागेल. मंत्रीमंडळात अनलॉकची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय झाला असे सांगून वडेट्टीवार यांनी राज्यात एकच खळबळ निर्माण केली. दुसरीकडे मुख्यमंत्री कार्यालयाने असा काही निर्णय झाला नसल्याचे सांगून सारवासारव करायचा प्रयत्न केला. त्यानंतर चार तासांनी असा निर्णय झाला नसल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले. कळस म्हणजे रात्री एकच्या सुमारास या संदर्भातला सरकारी आदेश जाहीर करण्यात आला आणि तो वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणेच होता. या सर्वातून निष्पन्न काय झाले, तर सरकारमध्ये कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, हेच!


थोडक्यात
म्हणजे हे राजकारण म्हणजे फक्त शब्दांचा खेळ झाले आहे. मुख्यमंत्री म्हणवणारी व्यक्ती अधूनमधून फेसबुकवर येऊन शाब्दिक कोट्या करून लोकांचे मनोरंजन करते. त्यांचा मित्रपक्ष म्हटला जाणारा एक कळप त्यांना शब्द पाळण्याची आठवण करून देतो. या दोघांमध्ये लिंबूटिंबू म्हणून घेतलेला तिसरा एक गटहम भी कुछ कम नहींहे दाखवण्यासाठी शब्दबाण सोडत राहतो. या सगळ्यासाठी ते आपापसातच शब्दांची देवाणघेवाण करतात. शब्द वाटेल तसे फिरवतात. ‘हरामखोर म्हणजे नॉटीअसे शब्दांचे नवनवोन्मेषशाली अर्थ मांडणारे वाचाळवीर त्यासाठी आपल्या जिभेचा दांडपट्टा चालवतात.


दुसरीकडे
कोरोनासारख्या महामारीच्या विळख्यात राज्याची जनता सापडली आहे. कसे जगायचे हा प्रश्न लोकांच्या समोर वासून उभा आहे. अशा वेळेस शौक बहराइची यांचा एक शेर अगदी चपखल बसतो. तो म्हणजे -


बर्बाद
गुलिस्तां करने को तो एक ही उल्लू काफी था

हर शाख पे उल्लू बैठा है अंजाम--गुलिस्तां क्या होगा!


(बाग उद्ध्वस्त करण्यासाठी फक्त एक घुबड पुरेसे होते. आता तर प्रत्येक फांदीवर घुबड बसले आहे. बागेची अवस्था काय होईल?)