भारतातील परिवर्तनाचे सर्वात मोठे प्रवर्तक डॉ. केशव बळीराम हेडगेवार

विवेक मराठी    21-Jun-2021
Total Views |

@तरुण विजय 

डॉ. हेडगेवार यांनी लाखो लोकांना राष्ट्राच्या व्यापक कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा दिली, भारताची सार्वभौम मूल्ये आणि धार्मिक परंपरा जपण्यासाठी अभिमान धैर्यभावनेने ओतप्रोत केले.
मात्र, याबद्दल देशाला अधिक माहिती मिळवण्याची आणि त्याचे मूल्यांकन करण्याची आवश्यकता आहे. ते भारतात झालेल्या परिवर्तनाचे आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रवर्तक आहेत.


RSS_1  H x W: 0

तेरा वर्षांचे कोवळे वय आणि त्या सुकुमार वयात एकाच दिवशी माता-पिता दोघांचाही आपल्या हातांनी दाहसंस्कार करायची वेळ यावी! केवढा हा आघात त्या लहानग्या बालकावर त्या संकटसमयी आणि प्लेगसारख्या महाभयंकर प्राणघातक साथीच्या वेळी? दररोज प्लेग पीडितांकरता औषधाची, भोजनाची व्यवस्था, प्लेगला अकाली बळी पडून मृत्यू पावलेल्यांना स्मशानात नेणे, कित्येक वेळा त्यांचे आप्त आले नाहीत तर त्या मृतकांच्या विधिवत दाहसंस्काराचीदेखील व्यवस्था लावणे आणि आता रोग्यांची सेवा करता करता माता-पित्यांचा एकाच दिवशी स्वर्गवास.

केशव बळीराम हेडगेवार यांच्या दुःखांना कुठे अंत नव्हता. गरिबी, समाजिक कार्य करणार्यांप्रती जातिव्यवस्थेमुळे कठोर व्यंगबाण, स्पृश्यास्पृश्यता, एकटेपणाची भीती. परंतु, केशवने त्या वयातही अशा सर्व आव्हानांना धैर्याने तोंड दिले. हिंदू समाजासमोर दाटलेले काळे ढग, विदेशी सामान, साम्राज्यवादी, इस्लामी जिहादींच्या हल्ल्यांना सामोरे जाऊन तोंड देण्याचे मनोमन निश्चित केले आणि सेवाभावनेेबरोबरच शक्तीचा समन्वय साधत नवभारत अभ्युदयाचे लक्ष्य समोर ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

पीडा-वेदनेच्या आणि सर्व समाजाच्या निर्भेद सेवेच्या खत-पाण्याच्या, हवा-मातीच्या संयोगाने जन्माला आला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.

आज भारतात कोरोना नावाच्या साथीच्या आजाराने ग्रासलेल्या लोकांच्या सेवाशुश्रुषेचे जे मूक कार्य संघाचे स्वयंसेवक विविध संघटनांच्या माध्यमातून करीत आहेत, त्याच्या मुळात कोठेतरी त्या तेरा वर्षीय केशव हेडगेवारांच्या मनावर झालेल्या संस्कारांचे आणि त्यातून जन्माला आलेल्या संघटनेचे पडसाद उमटत आहेत, असे म्हणता येईल.

जर आपल्याला अशी एखादी व्यक्ती निवडायची असेल, ज्यांच्या जीवन आणि संघटनात्मक क्षमतेने सामान्य भारतीयांच्या जीवनाला सर्वाधिक प्रभावित केले आहे, तर निर्विवादपणे ती व्यक्ती डॉ. केशव बळीराम हेडगेवार असतील.

नागपूरला 1889मध्ये हिंदू नववर्षाला (1 एप्रिल रोजी) जन्मलेले डॉ. हेडगेवार पुढे जाऊन या राष्ट्राच्या हिंदू संस्कृतीशी संबंधित वारसा जपण्याचा उद्देश ठेवून सुस्पष्ट, गौरवयुक्त आधुनिक सर्वशक्तिमान भारताचे वास्तुकार बनले.

ही एका अशा महान व्यक्तीची अविश्वसनीय गाथा आहे, जो समर्पित युवकांच्या एका अशा नवीन व्यवस्थेच्या आधारे समाजात परिवर्तन घडवून आणण्यात समर्थ राहिला, ज्याचा प्रसार आज तवांगपासून तर लेहपर्यंत आणि ओखापासून तर अंदमानपर्यंत भारताच्या कानाकोपर्यात झालेला दिसतो.


RSS_2  H x W: 0 

त्यांनी 1925 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आर.एस.एस. ची) स्थापना केली होती. परंतु त्याला हे नाव एका वर्षानंतर देण्यात आले. या संघटनेविषयी पहिली घोषणा एका साधारण वाक्यानेमी आज संघाच्या स्थापनेची घोषणा करतोने झाली. गहन विचार-विमर्शानंतर आणि अनेक सल्ला-सूचनांनंतर या संघटनेला आर.एस.एस. हे नाव वर्षभराच्या दिले गेले, ज्यात भारत उद्धारक मंडळ (ज्याचा सुस्पष्ट अर्थ - भारताला पुनरुज्जीवित करणारा समाज असा होतो) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा समावेश होता. आंतरिक कलहांचे शिकार होणार नाहीत अशा समाजाची रचना करणे आणि एकात्मता कायम करणे हे याचे प्रमुख उद्देश होते, जेणेकरून भविष्यात कोणीही आम्हाला आपला गुलाम बनवू शकणार नाही.

यापूर्वी ते काँग्रेसचे सक्रिय सदस्य आणि काँग्रेसच्या प्रसिद्ध नागपूर अधिवेशनाच्या आयोजनाचे सह-प्रभारी राहिले होते. त्यांनी असहकार चळवळीत भाग घेतला होता आणि स्वातंत्र्यासाठी ज्वलंत भाषणे केल्याबद्दल त्यांना एक वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. अनुशीलन समितीच्या क्रांतिकारकांशी आणि त्यांचे नेता पुलिन बिहारी बोस यांच्याशी संबंध असल्यामुळेदेखील ते ब्रिटनच्या निशाण्यावर होते.

परंतु त्यांना फारशी प्रसिद्धी नाही मिळाली आणि त्यांच्या जीवनाविषयी त्या लोकांकडूनही थोडेच जाणता आले, ज्यांना त्यांनी घडविले आणि जे नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित व्यक्ती बनले. आज जर एखादी संस्था भारतात सेवा आणि प्रकल्पांचे सर्वात मोठे नेटवर्क चालवीत असेल तर ती संभवत: आर.एस.एस. - डॉ. हेडगेवारांकडून प्रेरित झालेल्या लोकांद्वारे संचालित केले जात असलेले नेटवर्कच असणार. या उपक्रमांची संख्या 1 लाख 70 हजार आहे, ज्यांमध्ये दवाखाने, रक्तपेढ्या, नेत्रपेढ्या, दिव्यांग, दृष्टिबाधित आणि थेलेसीमियाने पीडित बालकांच्या साहाय्याकरता विशेष केंद्रांचा समावेश आहेत. युद्ध असो वा नैसर्गिक आपत्ती - हेडगेवारांचे समर्थक अशा ठिकाणी सर्वात प्रथम पोहोचून मदत पोहोचवतात. चरखी दादरी विमान दुर्घटना असो, सुनामी, भुज, उत्तरकाशी भूकंप असो की केदारनाथसारखी दुःखद घटना असो, आर.एस.एस.चे स्वयंसेवक पीडितांना मदत करण्याच्या बाबतीत आणि नंतर पुनर्वसन कार्यातही सदैव अग्रेसर असतात.

हे खरे आहे की भाजपाचे बरेचसे नेते स्वयंसेवक आहेत, देशाचे दोन पंतप्रधान असे झालेत, जे रा.स्व. संघाच्या भावविश्वात मिसळून गेलेले प्रचारकही राहिलेले होते. तेव्हा भारतीय समाजावर होणारे डॉ. हेडगेवारांच्या प्रभावाचे आकलन, केवळ भाजपाच्या राजकीय प्रसाराशी करणे म्हणजे त्यांना कमी लेखणे होईल.

भारत-म्यानमार सीमेच्या अगदी शेवटच्या टोकाजवळ वसलेले मोरेह गाव घ्या - तेथे शाळा कोण चालवीत आहे आणि स्थानिक गावकर्यांना औषध-पाणी कोण पुरविते आहे? हे ते लोक आहेत, जे डॉ. हेडगेवार यांच्या दृष्टीकोनाने प्रेरित आहेत. त्याचप्रमाणे, ईशान्य भागात स्थानिक लोकांच्या सेवेसाठी मोकुकचेंग आणि चांगलांग प्रकल्प आणि स्थानिक अंदमानमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पोर्ट ब्लेअर आश्रमदेखील हेच लोक संचालित करीत आहेत. आर.एस.एस.कडे आज शाळा आणि शिक्षकांचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. आज विद्या भारती 25000पेक्षा जास्त शाळा चालवीत आहे, त्यात ईशान्य भारतामधील दुर्गम खेड्यांपासून ते लदाखच्या बर्फाळ प्रदेशांपर्यंत, राजस्थान, जम्मू आणि पंजाबच्या सीमेवरील प्रदेशांमध्ये 2,50,000 विद्यार्थी अभ्यास करतात आणि एक लाख शिक्षक शिक्षण देण्याचे कार्य करतात.

दोन वर्षांपूर्वी मी एक वृत्तचित्र बनवण्यासाठी हेडगेवार यांचे मूळ गाव तेलंगणातील कंडाकुर्थी येथे गेलो होतो. हे गोदावरी, हरिद्रा आणि मंजरीच्या संगमावर वसलेले एक ऐतिहासिक गाव आहे. हेडगेवार कुटुंबाचे वडिलोपार्जित घर जवळजवळ 50 बाय 28 चौ.फु.चे आहे, ज्याचे, आरएसएसचे ज्येष्ठ नेते मोरोपंत पिंगळे यांच्या मदतीने आणि प्रेरणेने, स्थानिक ग्रामस्थांनी स्मारकात रूपांतर केलेले आहे.

येथे केशव बाल विद्या मंदिर या एका उत्कृष्ट सह-शैक्षणिक शाळेचे संचालन सुरू आहे, ज्यामध्ये सुमारे 200 मुले अभ्यास करतात. त्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये बर्याच मोठ्या संख्येत - सुमारे 30 टक्के विद्यार्थी मुस्लीम मुली आणि मुले होती, हे पाहून मी आश्चर्यचकित झालो. त्या गावात आणखी शाळा नाहीत असे नाही. शांत अशा या गावात सुमारे 65 टक्के लोकसंख्या मुस्लीम आणि 35 टक्के लोकसंख्या हिंदूंची आहे. तिथे जितकी प्राचीन मंदिरे आहेत, तितक्याच मशिदीदेखील आहेत. दोघेही सोबतच आहेत आणि कधीही कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. मुस्लीम आपल्या मुलांना अशा शाळेत का पाठवत असतील जिची स्थापना आरएसएसच्या संस्थापकांच्या स्मरणार्थ केली गेली आहे?

तेथे एक पालक जलील बेग यांच्याशी माझी भेट झाली, ज्यांच्या पूर्वजांचे संबंध मोगलांशी होते. ते एक पत्रकार असून उर्दू दैनिक मुन्सिफसाठी लिहितात. ते म्हणाले की, त्यांचे कुटुंब या शाळेला अभ्यासासाठी चांगले मानते, कारण ही शाळा गरीब आर्थिक दृष्टीने दुबळ्या लोकांना उत्कृष्ट सुविधा पुरवते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शाळेचे मानक चांगले आहे आणि त्यात डिजिटल वर्गदेखील आहेत, जिथे मुलांना संगणक शिक्षण दिले जाते. मी शाळेतील एक लहानशी मुलगी रफिया हिला लयबद्ध स्वरातहिंद देश के निवासी सभी हम एक हैं, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक हैंगाताना ऐकले.

अनेक प्रमुख नेत्यांना प्रभावित करणार्या डॉ. हेडगेवार यांनीसबका साथ सबका विकासया थीमला अभिमानाने सादर करणार्या आपल्या वडिलोपार्जित गावाच्या माध्यमातून जणू आपल्याला एक सर्वोत्तम बक्षिसच दिले आहे.

ज्या व्यक्तीने लाखो लोकांना अखिल भारतीय दृष्टीकोन दिला, प्रतिभावान भारतीय तरुणांना प्रचारक - भिक्षूंच्या रूपात एका नवीन विचारधारेचा भाग होण्यासाठी प्रेरित केले, जे भलेही भगवी वस्त्रे धारण करत नसतील परंतु तपस्वींप्रमाणे जीवन व्यतीत करत, लोकांना शांततेने, कोणत्याही प्रसिद्धीशिवाय, माध्यमांच्या चकाकीपासून दूर संस्कृतीच्या उन्नतीत आपले उल्लेखनीय योगदान देत शिक्षण, आरोग्यसेवा इत्यादी प्रदान करण्याचे उत्कृष्ट कार्य करीत आहेत. ही एका अशा भारताची गाथा आहे, जो अभूतपूर्व गतीने बदलत आहे.

 

डॉ. हेडगेवार यांनी लाखो लोकांना राष्ट्राच्या व्यापक कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा दिली, भारताची सार्वभौम मूल्ये आणि धार्मिक परंपरा जपण्यासाठी अभिमान धैर्यभावनेने ओतप्रोत केले.

 

मात्र, याबद्दल देशाला अधिक माहिती मिळवण्याची आणि त्याचे मूल्यांकन करण्याची आवश्यकता आहे. ते भारतात झालेल्या परिवर्तनाचे आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रवर्तक आहेत.

(लेखक माजी खासदार, माजी संपादक पाञ्चजन्य, डॉ. हेडगेवार यांच्यावरीलकन्द्कुर्ति से नागपुर की पुण्यशाली यात्रावृत्तचित्राचे निर्माता-दिग्दर्शक आहेत.)

 

भावानुवाद - अनुराधा धर्माधिकारी

99090 89169