बहुआयामी उद्योजक - उल्हास जोशी

विवेक मराठी    24-Jun-2021
Total Views |

ऑरो कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि ऑटर कंट्रोल इंडिया (Otter controls India)चे व्यवस्थापकीय संचालक उल्हास जोशी हे खरोखरच एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. आपली जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या बळावर अगदी छोट्या प्रमाणात सुरू केलेल्या व्यवसायाचं रूपांतर आज एका प्रचंड उलाढाल असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीत करतानाचा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायक आहे. त्यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने अपर्णा देशपांडे यांच्याशी झालेल्या दिलखुलास गप्पांतून जाणून घेऊ या त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा प्रवास.


buget_1  H x W:

आजच्या तरुण मराठी व्यवसायिकांसमोर आपल्यासारख्या अनेक यशस्वी उद्योजक आणि त्यांच्या वाटचालीची प्रेरणा देणारी भरपूर उदाहरणं आहेत. पण सुमारे दोन दशकांपूर्वी आपल्याला ह्या व्यवसायाची प्रेरणा कशी मिळाली?

खरं सांगायचं तर माझी सुरुवात ह्या उद्योगापासून झालेली नाही. मी मुळात कॉमर्सचा पदवीधर होतो. त्यानंतर एलएल.बी., एलएल.एम. केलं, सी.एस. पूर्ण केलं आणि मग डी.बी.एम.देखील केलं. अल्पकाळ वकिली केली, काही काळ नोकरीही केली. वडिलांचा कन्सल्टन्सीचा व्यवसाय होता, ते काम मी बघायला लागलो. त्या कामातून माझा अनुभव वाढत गेला. परदेशातील व्यवसायिकांच्या संपर्कात आलो आणि त्यातून व्यवसायाची कल्पना मनात घोळू लागली. पण त्या वेळेला माझ्याकडे कुठलंही तांत्रिक शिक्षण नव्हतं. म्हणजे अभियांत्रिकी शिक्षणाची पार्श्वभूमी नव्हती आणि मग मी अत्यंत धाडसी निर्णय घेतला ...तो म्हणजे इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगची पदविका घेण्याचा निर्णय. कल्पना करा, लग्न झालेला, दोन अपत्यं असलेला मी.. कन्सल्टन्सी बंद करून नव्याने शिक्षण घेण्याचं ठरवतो, हा केवढा वेडेपणा म्हणवला गेला असेल तेव्हा!

आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेणं घरच्यांसाठी निश्चितच सोपं नसणार. ह्यासाठी आपल्या पत्नी गायत्री जोशी आणि कुटुंबीयांचं कौतुक करायला हवं.

शंभर टक्के! वयाच्या सदतिसाव्या वर्षी मी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला, तेव्हा जी काही तुटपुंजी मिळकत होती, त्याच्या बळावर काही वर्षं घर चालवायची तयारी असणं हे माझं त्या काळातील सर्वात मोठं भांडवल होतं असं म्हणायला हरकत नाही. चाळिसाव्या वर्षी मी इंजीनिअर झालो आणि मग खर्या अर्थाने व्यवसायाकडे बघण्यास सुरुवात झाली. इतर व्यावसायिक ज्या वयात शिखरावर पोहोचतात, त्या वयात मी शून्यापासून सुरुवात करत होतो.

माझ्या आईची फार इच्छा होती की मी आर्किटेक्ट किंवा उद्योजक व्हावं आणि त्या दिशेने माझं पहिलं पाऊल मी टाकलं होतं.


buget_2  H x W:

त्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

इंजीनिअर झाल्यावर मी ब्रिटिश हायकमिशनशी संपर्क साधला. शिवाय माझ्या कन्सल्टन्सीमधून संपर्कात आलेल्या काही परदेशी व्यवसायिकांकडे कल्पना मांडली, जर्मन वकिलातीकडे गेलो. त्यांच्याकडील उद्योजकांना भारतात त्यांचा व्यवसाय सुरू करायचा असल्यास मी सर्वतोपरी मदत करायला तयार आहे, जबाबदारी घायला तयार आहे हे सांगितल्यावर काही जणांनी तशी तयारी दाखवली.

इथे बाजारपेठ मिळवली आणि मग व्यवसाय सुरू झाला. आधी त्यांच्या कंपनीचा टेक्निकल ऍडव्हायझर म्हणून काम सुरू केलं. त्यांची उत्पादनं विकताना त्याबरोबर आणखी काही असेम्ब्लीची गरज आहे, हे जाणवल्याने त्याचं उत्पादन सुरू केलं. त्यातून मग इथल्या भारतीय कंपन्यांकडून कामं मिळायला सुरुवात झाली. Auro controls ही आता पूर्णतः मी, पत्नी गायत्री अशी आमची कंपनी आहे. Auro Controlsची आता Otter Indiaमध्ये भागीदारी आहे. त्याअंतर्गत आम्ही वायर हारनेस, एकचुटर्स, हीटिंग एलिमेंट्स, प्रोटेक्टर्स, रेल्वेचे स्विच गिअर अशी अनेक अनेक प्रॉडक्ट्स बनवतो. आम्ही ऑटोमोटिव्ह आणि नॉन ऑटोमोटिव्ह क्षेत्रात भारतातच नव्हे, तर भारताबाहेर चीन, फ्रान्स (युरोप), लॅटिन अमेरिका, इंग्लंड येथेही सेवा पुरवतो. Otter control U.K. ह्या कंपनीशी संलग्न असल्याने त्याचा विस्तार अनेक देशांमध्ये आहे.

आपल्या काही खास ग्राहक आणि व्यावसायिक भागीदारी असलेल्या कंपन्यांचे काही विशेष अनुभव सांगता येतील का?

नक्कीच! सगळ्यात आधी मला IFB कंपनीने ब्रश कार्ड आणि त्यातील एका छोट्या पार्टची ऑर्डर दिली. ते काम त्यांना खूप आवडलं, म्हणून आणखी काम मिळत गेलं.. इतकं की महिन्याला वीस वीस हजार पार्ट्स पुरवायला लागलो आणि ती बातमी ब्रिटिश कंपनीपर्यंत गेली. छोट्याशा जागेत बनवल्या जाणार्या प्रॉडक्ट्सची कमाल गुणवत्ता बघून ते खूप प्रभावित झाले आणि त्यांनी माझ्याबरोबर मोठा व्यवसाय करण्याचं पक्कं केलं. 2012 साली Otter Control Asia.शी भागीदारी करून जीींंशी लेपीीेंश्र खपवळरची स्थापना केली आणि 2013 साली उत्पादन सुरू झालं. उत्तम गुणवत्तेमुळे कामं मिळत गेली आणि तिथून मग मागे वळून पाहिलंच नाही.

आपल्याला अनेक अवॉर्डस मिळाले, उद्योग विश्वाने आणि शासनाने कामाची दखल घेतली, ह्याबद्दल काय सांगाल?

India 5000 Best MSME अवॉर्डसचं 2019चं विजेतेपद, चेंबर ऑफ कॉमर्सचं अवॉर्ड, नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी काउन्सिलचं इनोव्हेशनचं अवॉर्ड असे बरेच अवॉर्डस मिळाले. आपण करतोय ते योग्यच करतोय ह्याचा विश्वास आमच्या 200 जणांच्या कुटुंबास मिळाला, ह्याचं खूप समाधान आहे.

व्यवसायात येऊ पाहणार्या आजच्या तरुण पिढीस आपण काय सांगाल?

माझ्या काळात व्यवसाय उभा करण्यासाठी अनेक दरवाजे ठोठावावे लागले. आज परिस्थिती त्या मानाने उद्योगपूरक आहे. आज ब्रिटिश ट्रेड कमिशन आहे, इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स आहे, अमेरिकेचं ट्रेड कमिशन आहे. आपल्याकडे येऊन त्यांचे व्यवसाय उभे करण्यासाठी त्यांचं सरकार ह्यामार्फत मदत करत असतं. ही सोय त्या काळी नव्हती. आजच्या तरुणांना मी आवाहन करेन की त्यांनी ह्या अशा कमिशनची नीट माहिती घ्यावी, त्यांच्याकडे जावं आणि आपल्या व्यवसायवृद्धीसाठी त्यांचा योग्य त्या पद्धतीने जरूर फायदा करून घ्यावा.

आता ह्या टप्प्यावर येऊन मागे वळून बघताना आपले कुठले निर्णय चुकले असं कधी वाटलं का? किंवा त्याची काही चुटपुट लागली का?

माणूस जेव्हा काही धाडसी निर्णय घेतो, तेव्हा कुठे कुठे त्याचे पडसाद उमटणारच. सदतिसाव्या वर्षी सगळं सोडून मी जेव्हा इंजीनिअरिंग करण्याचं ठरवलं, तेव्हा माझी मुलं लहान होती. पत्नीची मला पूर्ण साथ होती, पण त्या काळात माझ्या मुलांच्या कोवळ्या हौसमौजेला थोडा आवर घालावा लागला, ह्याची किंचितशी बोच आहे मनाला. हा उद्योगाचा वटवृक्ष नंतर खूप शीतल छाया देऊन गेला, त्यात माझ्या मुलांचादेखील वाटा आहे.buget_3  H x W: 

बरेच उद्योजक फक्त आणि फक्त व्यवसाय जगतात. त्यापलीकडे आयुष्यात आपल्या जगण्यातील आनंद शोधणं त्यांना जमत नाही. पण आपण उभयता मात्र सायकलिंगचं वेड मनापासून जोपासता आणि इतरांनाही सामील करून घेता.

हो. अगदी लहानपणापासून मला सायकलिंगचं प्रचंड वेड. ह्या वेडात पत्नीचीही साथ लाभली आणि त्यातून आमची भन्नाट भ्रमंती सुरू झाली. गेले पंधरा वर्षं आम्ही चुकता दर वर्षी लेह-खारडूंगपर्यंत सायकल चालवत जातो. तिथे विश्वातील पंचतत्त्वाशी तादात्म्य पावण्याची विलक्षण अनुभूती मिळते. फिटनेस हे तर त्याचं बायप्रॉडक्ट. फक्त आम्हीच तिथे जातो असं नाही, तर आमच्यासारख्यावेड्यांनाहीसोबत घेऊन जातो. सायकलिंग हे आमच्यासाठी जबरदस्त टॉनिक आहे आणि ईश्वर बळ देईल तितकी वर्षं हे आम्ही हे करत राहणार.

आज आपला उद्योग इतक्या उंचीपर्यंत नेल्यावर मोठं आत्मिक समाधान आणि पूर्णत्वाची भावना नेमकं काय सांगते?

हे फार छान विचारलंत. आपण आपल्या आनंदासाठी काम करतो, यशस्वी होतो, पण ते करत असताना माझा 200 जणांचा परिवार इथे कंपनीसाठी झटतोय, त्यातून त्यांचं कुटुंब उभं राहतंय हे समाधान कुठल्याही अवॉर्डच्या पलीकडचं आहे. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी इथे सकाळी योग, प्राणायाम वर्ग चालवले जातात. माझ्या ह्या परिवाराच्या साथीने आम्ही आणखी एक मोठं युनिट सुरू करत आहोत. व्यवसायवृद्धी म्हणजेच माझ्या ह्या कुटुंबीयांचीही प्रगती आहे. ह्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत.

आपल्या ह्या पुढील प्रवासासाठी आमच्या अनंत शुभेच्छा.

मुलाखतकार - अपर्णा देशपांडे