कम्युनिस्टांची शंभरी

विवेक मराठी    25-Jun-2021   
Total Views |

कम्युनिस्ट पक्ष भारतात शंभर वर्षांचा होत आहे. ते सत्तेवर जरी आले नाहीत, तरी बौद्धिक सत्तेवर त्यांनी ताबा मिळविला. शिक्षण, इतिहास, कलाक्षेत्र, सिनेसृष्टी यामध्ये त्यांनी संस्कृतिभंजक, धर्मनाशक, राष्ट्रविघातक विचार पेरले आहेत आणि माणसे उभी केली आहेत. त्यांची शंभरी आता सुरू होईल, पण आपण सर्वांनी अत्यंत जागरूक राहून त्यांच्या विचारधारेची शंभरी भरविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे.


100 years of communist pa

भारतातील कम्युनिस्ट पक्ष 17 ऑक्टोबर 2021 रोजी आपली शंभरी पूर्ण करीत आहे. शंभर हा आकडा चांगला आहे. एखादी व्यक्ती शंभर वर्षे जगली, तर तिचे कौतुक होते, वर्तमानपत्रात तिचे फोटो येतात. तिच्या दीर्घायुष्याचे रहस्य जो तो आपापल्यापरीने सांगायला लागतात. संस्थांचेदेखील असेच आहे. एखादी संस्था शंभर वर्षेजगणेहेदेखील कमी महत्त्वाचे नसते आणि त्यातही राजकीय पक्ष शंभर वर्ष जगणे हे तर खूपच झाले. निवडणुकांच्या मौसमात कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे राजकीय पक्ष जन्माला येतात आणि मौसम संपला की त्यांचे अस्तित्वदेखील संपते.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शंभर वर्षांची वाटचाल केली, हे अनेक कारणांसाठी कौतुकास्पद आहे. या शंभर वर्षांच्या वाटचालीत मूळच्या कम्युनिस्ट पक्षाचे अनेक तुकडे झाले. डावे कम्युनिस्ट, उजवे कम्युनिस्ट, माओवादी-लेनिनवादी कम्युनिस्ट असे त्यांच्यात गट पडलेले आहेत, पण नाव मात्र कायम आहे. ‘धर्महा ज्या देशाचा आत्मा आहे, त्या देशात अधर्मी कम्युनिस्ट पक्ष शंभर वर्षे जगला, हे खरोखरच महान आश्चर्य आहे. नुसता जगलाच नाही, तर . बंगालमध्ये त्यांनी तेहतीस वर्षे सत्ता भोगली आणि आज केरळमध्येदेखील त्यांच्याच आघाडीचे सरकार आहे. यामुळे भारताच्या राजकीय वाटचालीसंबंधी कसलेही सैद्धान्तिक विवरण करणे फारच अवघड आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना भारतात झाली नाही. ती झाली ताश्कंदमध्ये आणि तिची तारीख आहे, 17 ऑक्टोबर 1920. (या ताश्कंदमध्ये भारताचे कर्तृत्ववान पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री संशयास्पद स्थितीत मृत्यू पावले.) ही तारीख ज्यांना मान्य आहे, त्या कम्युनिस्ट पक्षाचे नाव आहेकम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट)’; त्याच्या दुसर्या भावंडाचे नाव आहेकम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’, त्यांना ही तारीख मान्य नाही. त्यांचे म्हणणे असे की, 26 डिसेंबर 1925 रोजी कानपूर येथे कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. तेथे देशातील कम्युनिस्ट पक्षांचे संमेलन भरले होते. ताश्कंदमध्ये झालेल्या कम्युनिस्ट पार्टीचे सात संस्थापक सदस्य होते. एम.एन. रॉय, एव्हीलन रॉय-ट्रेंट, अमानी मुखर्जी, रोजा फिटीनलॉव, मोहम्मद अली, मोहम्मद शफीक, आचार्य. यातील दोन जे मुसलमान आहेत, तेमोहाजिरहोते. मोहाजिर म्हणजे गैर इस्लामी प्रदेश सोडून इस्लामी प्रदेशात जो स्थलांतर करतो, तो. खिलाफत आंदोलनाच्या काळात भारत दार-उल-हरब झालेला आहे, म्हणून अनेक लोकांनी देश सोडला. ते मध्य आशियात गेले आणि कम्युनिस्ट झाले. म्हणजे धर्मासाठी देश सोडला आणि कम्युनिस्ट बनून धर्माला तिलांजली दिली.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कम्युनिस्टांची भूमिका नेहमी संशयास्पद राहिली आहे. दुसर्या महायुद्धाच्या काळात रशिया आणि ब्रिटन यांची दोस्ती झाली. भारतातील कम्युनिस्टांनी या दोस्तीचे समर्थन केले आणि इंग्रजांना पाठिंबा दिला. 1920च्या आंदोलनात ते घुसले आणि त्यांनी हिंसाचार केला. चौरीचौरा येथे 23 पोलिसांना ठार केले. महात्मा गांधीजींनी स्वराज्याचे आंदोलन स्थगित केले. म्हणून गांधी हे कम्युनिस्टांचे क्रमांक एकचे शत्रू झाले.

100 years of communist pa

कम्युनिस्टांचा विचार करीत असताना दोन गोष्टींचा गंभीरपणे विचार करावा लागतो. पहिली गोष्ट त्यांच्या तत्त्वज्ञानाची आहे आणि दुसरी गोष्ट तत्त्वज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आणि सत्तेचे अनन्यसाधारण महत्त्व याचा विचार करावा लागतो. कम्युनिस्टांचे तत्त्वज्ञान थोडक्यात सांगायचे तर - इतिहास आर्थिक कारणाने घडतो. माणूस दु:खी आहे याचे कारण खासगी मालमत्तेचा अधिकार आहे. खासगी मालमत्तेचा अधिकार नष्ट केला पाहिजे. तो कसा नष्ट करणार? आणि कोण नष्ट करणार? तो नष्ट करण्याचे काम श्रमिक वर्गाचे आहे. खासगी मालमत्तेचा अधिकार (राइट टू प्रॉपर्टी) राज्यसत्ता हातात घेऊनच संपविता येईल. यासाठी श्रमिकांनी एकजूट करून क्रांती केली पाहिजे. सर्व सत्ता आपल्या हाती घेतली पाहिजे. सत्तेचा वापर करून प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे सर्व गोष्टी मिळतील याची व्यवस्था केली पाहिजे. शेतजमीन, कारखानदारी, लहानसहान उद्योग यावर समाजाची मालकी पाहिजे. कोणाचीही खासगी मालकी असता कामा नये. संपत्तीचा अधिकार हा श्रमिकांचे शोषण करतो. ज्यांच्याकडे संपत्ती आहे ते भांडवलदार आहेत आणि ज्यांच्याकडे काहीच नाही तेनाही रेवर्गातील आहेत. ‘आही रेआणिनाही रेया वर्गांतील हा संघर्ष आहे. या संघर्षात नाही रे वर्ग हाच विजयी होणार आणि त्यानंतर साम्यवादी समाजरचना निर्माण होईल. (जिला समाजवादी समाजरचना असे म्हटले गेले.) आणि माणूस सुखी होईल.

नुसते तत्त्वज्ञान वाचले की, ते चांगले वाटते. हिंदू संस्कृतीचे तर हे घोषवाक्यच आहे, ‘सर्वेपि सुखिन: संतु, सर्वे संतु निरामय:’ पण हिंदूंचा मार्ग हा कम्युनिस्टांच्या हिंसक क्रांतीचा मार्ग नाही. हे तत्त्वज्ञान अशा काळात जन्माला आले, ज्या काळात प्रचंड कारखाने उभे राहत होते आणि कारखान्यात काम करणारा श्रमिक उसाच्या चरख्यात जसा ऊस पिळला जातो, तसा पिळला जात होता. या कारखानदारीतून प्रचंड भांडवल निर्माण झाले. त्यांचा राज्यसत्तेवर जबरदस्त प्रभाव निर्माण झाला. कारखान्यासाठी लागणार्या कच्च्या मालासाठी आणि उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी वसाहतवाद सुरू झाला. आशिया-आफ्रिका खंडातील बहुतेक देश गुलाम झाले. ते लुटले गेले. अशा पिढीतील लोकांना मार्क्सचे हे तत्त्वज्ञान खूपच भावले. शिकलेला तरुण या तत्त्वज्ञानाची शिकार झाला. चाळीस-पन्नासच्या दशकातील विनोद होता की, ‘विशीत जो कम्युनिस्ट होत नाही, त्याला हृदय नाही असे समजले पाहिजे आणि चाळिशीनंतर जो कम्युनिस्ट राहतो, त्याला डोके नाही असे समजले पाहिजे.’

कामगारांची क्रांती प्रथम रशियात झाली. मार्क्सच्या सिद्धान्ताप्रमाणे ती इंग्लंड, फ्रान्स किंवा जर्मनीत व्हायला पाहिजे होती, पण तुलनेने मागास रशियात ही क्रांती झाली. तेथे भूलोकीचा स्वर्ग आणण्यासाठी समाजवादाचा प्रयोग सुरू झाला. स्वर्ग काही आला नाही, पण या प्रयोगात रशियात जी माणसे मेली, त्यांचे आकडे इथे देतो. हे आकडे स्टालिनच्या काळातील आहेत. स्टालिनने पक्षसफाईच्या दोन मोहिमा चालविल्या, त्यालाग्रेट पर्जम्हणतात. यात एक कोटी 20 लाख लोक ठार झाले. स्टालिनने ज्या श्रम आणि छळ छावण्या उभारल्या, त्यांनागुलागअसा शब्द आहे. त्यात एक कोटी सात लाख तेरा हजार माणसे मेली. ज्यांना हद्दपारीच्या शिक्षा झाल्या, त्यातील पाच लाख 66 हजार रशियन माणसे मेली. ही सर्व मेलेली माणसे क्रांतीची विरोधक, भांडवलशाहीचे हस्तक, भांडवलशाही देशाचे हस्तक, कम्युनिझमचे शत्रू ठरवून संपविण्यात आली.

रशियाने भूलोकावर स्वर्ग आणण्यासाठी पूर्व युरोपातील देशांत रणगाडे घातले. पूर्व जर्मनी, पोलंड, हंगेरी, युगोस्लाव्हिया, झेकोस्लोव्हाकिया, रोमानिया, युक्रेन या देशांना रशियाचे गुलाम केले. नागरिक आपल्या स्वर्गातून भांडवलशाही नरकात पळून जातात, म्हणून त्यांना अडविण्यासाठी 27 मैल लांबीची आणि 12 फूट उंच बर्लिनची भिंत बांधली. तरीही ती भिंत ओलांडून, स्वत:चा जीव धोक्यात घालून, कम्युनिस्ट स्वर्गाला रामराम ठोकून पाच हजाराहून अधिक जर्मन . जर्मनीत आले.

कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर आला की, तो दुसर्या कुठल्याही विचारधारेला जिवंत ठेवीत नाही. त्यांना कसे ठार मारायचे, याच्या पद्धतीचा विकास स्टालिनने केला. विचारस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य, लेखनस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, संचारस्वातंत्र्य कम्युनिस्ट राजवटीत रणगाड्याखाली चिरडून टाकतात. पार्टी जे म्हणेल, तो विचार. पार्टी जो देईल तो कार्यक्रम आणि पार्टी म्हणजे पार्टी चालविणारे सात-आठ लोक. त्यांना हुकूमशहा म्हणायचे नाही (ते हुकूमशहाचे सुपर बाप असतात.) त्यांची अवज्ञा करणे म्हणजे स्वत:चाच मृत्यू ओढवून घेणे असे नाही, तर आपल्या बायका-पोरांंनादेखील देशोधडीला लावणे आहे.

तत्त्वज्ञान आणि सत्ता यांचा मिलाप कसा करायचा, याचे एक रोल मॉडेल कम्युनिस्टांनी रशियात उभे केले. त्यानंतर जे जे देश कम्युनिस्ट झाले, त्यांनी रशियाचा कित्ता आपल्या देशात गिरवायला सुरुवात केली. अनेक कम्युनिस्ट देशांची आकडेवारी येथे देता येईल, पण आपण फक्त चीनची आकडेवारी बघू या. 1949 साली सत्तेवर येताच माओनेग्रेट लीप फॉरवर्डयोजना जाहीर केली. जमिनीवरील खासगी मालकी रद्द करून टाकली आणि सामूहिक शेतीला सुरुवात केली. सामूहिक राहण्यासाठी लोकांवर जबरदस्ती केली. ही योजना पूर्णपणे फसली. 1958 ते 1962 या काळात चीनमध्ये या योजनेमुळे जो दुष्काळ पडला, आणि ज्यांनी विरोध केला त्यात साडेचार कोटी लोक ठार झाले. हिटलरने तर केवळ 60 लाख ज्यू मारले आणि माओच्या काळात चार कोटी पन्नास लाख लोक ठार झाले. मग क्रूरकर्मा कोणाला म्हणायचे? वाचकांनी ठरवावे.

असा कम्युनिस्ट पक्ष भारतात शंभर वर्षांचा होत आहे. बंगालमध्ये ते सत्तेवर आले आणि तिथेही त्यांनी जो हिंसाचार केलेला आहे, त्याची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यातल्या कथा अंगावर काटा आणणार्या आहेत. त्यांचे भाऊबंद नक्षलवादी आहेत. निरपराध लोकांना ठार करतात, कर्तव्य बजावणार्या पोलिसांना ठार करतात. या शंभर वर्षांत त्यांनी इंदिरा गांधींच्या काळात देशाची सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करून पाहिला. कम्युनिस्ट कार्डहोल्डर यांनी इंदिरा गांधींना घेरले, त्यांनीच आणीबाणी लावायला लावली आणि ते जर सत्तेवर असते तर हा लेख लिहायला मी जिवंत राहिलो नसतो. कारण तेव्हा मी तुरुंगात होतो. कम्युनिस्टांनी तुरुंगात टाकलेला माणूस जिवंत परत येत नसतो. ते सत्तेवर जरी आले नाहीत, तरी बौद्धिक सत्तेवर त्यांनी ताबा मिळविला आणि यामुळे आपल्याला विकृत इतिहास शिकविला जातो, आपल्या प्राचीन परंपरा, तत्त्वज्ञान, महापुुरुष यांचे आपल्याला काहीही ज्ञान होत नाही. शिक्षण, इतिहास, कलाक्षेत्र, सिनेसृष्टी यामध्ये त्यांनी संस्कृतिभंजक, धर्मनाशक, राष्ट्रविघातक विचार पेरले आहेत आणि माणसे उभी केली आहेत.

 

त्यांची शंभरी आता सुरू होईल, पण आपण सर्वांनी अत्यंत जागरूक राहून त्यांच्या विचारधारेची शंभरी भरविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. भारताला जेवढा इस्लामचा धोका आहे, तेवढाच - किंबहुना त्याहून जास्त कम्युनिस्ट विचारधारेचा धोका आहे. कारण ही माणसे आपली माणसे वाटतात, आपल्या भाषेत बोलतात, आपल्यासारखाच वेश करतात, आपल्या हिताची काळजी असल्याचा चेहरा निर्माण करतात, अतिशय सुंदर बौद्धिक युक्तिवाद रचत जातात, सामान्य माणसाला मोहात पाडतील असे नॅरेटिव्ह तयार करतात. या सर्व कालखंडातून आपण चाललो आहोत. निरंतर जागरूकता ही स्वातंत्र्याची किंमत असते. आपण जर बेसावध राहिलो, झोपून राहिलो आणि त्यांच्या मुखवट्याला फसलो, तर जे रशियात झाले ते भारतात होईल.