- नरेश करपे
@अभियानात ८३१३४ कुटुंबांनी सहभाग घेतला
पुणे - खरं तर कुटुंब, आरोग्य व व्यायाम या तीन गोष्टींचे महत्व आपण या स्पर्धेच्या यूगात विसरूनच गेलो होतो. व्यायामाचा आभाव, वाढती भोगवादी व स्वकेंद्रीतवृत्ती यातून निर्माण होणारे मानसिकस्तरावरील प्रश्न, नातेसंबंधातील वाढत्या दुर्घटना यामुळे अनेकांचे आयुष्य नको त्या वयात रोगयुक्त झाले आहे. आपल्याला पडलेला हा विसर, एकुणच आपल्या दैनंदिन जीवनशैलीसह आपल्या मानसिकतेवरही थेट परिणाम करीत आहे. हा परिणाम कौटुंबिक जीवनावर व नातेसंबंधांवरही नक्कीच होत आहे.
मात्र या त्रिसूत्रीचे महत्व पुन्हा एकदा या कोरोना संसर्गकाळात अनेकांना पटले व त्यावर अनेकांनी पुन्हा एकदा जाणीवपूर्वक काम करण्याचे निश्चित केले. 'कुटुंब संस्था व योग साधना' या दोन्ही गोष्टी आपल्या प्राचीन संस्कृतीची प्रतीके आहेत. मानसिक व शारीरिक स्तरावरील आरोग्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने या त्रिसूत्रीचे संवर्धन व जतन हे प्रत्येक कुटुंबात होणे गरजेचे आहे.
कुटुंब संस्थेचे सबलीकरण, सशक्तीकरण, संवर्धन व जतन व्हावे, या संस्थेस आपले कार्य अधिक उठावदार करता यावे, आपली भूमिका व कार्ये अधिक सक्षमपणे पार पडता यावीत या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत कुटुंब प्रबोधन गतिविधी मार्फत ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाचे’ औचित्य साधत एक लक्ष कुटुंबात योग साधना परत एकदा प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने २१ ते २७ जून २०२१ या सप्ताहात एक लक्ष योगयुक्त-रोगमुक्त-स्वस्थचित्त कुटुंब अभियानाची आखणी करण्यात आली. या अभियानास मिळालेला प्रतिसाद पाहता अनेक सकारात्मक गोष्टी भावी काळात घडतील याची निश्चिती होताना दिसत आहे. मुख्य म्हणजे योग-प्राणायाम- ध्यान याविषयीचे प्रभावी जागरण, भारतीय जीवनशैलीचे अवलंबन किती आवश्यक आहे हे ठसवण्याचे प्रयत्न आणि कुटुंब प्रबोधन गतिविधी विषयी समाजात प्रबोधन असे महत्वाचे दोन उद्देश या अभियानात मोठ्या प्रमाणात साध्य झाले असे नक्कीच म्हणता येईल.
प्रत्यक्ष आपल्याच घरात, आपल्या कुटुंबियांसह सात दिवस योग साधना करायच्या या सूत्रास धरून पश्चिम महाराष्ट्रात या अभियानाची रचना लावण्यात आली. कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात घेता या अभियानाचा संपूर्ण ढाचा ऑनलाईन होता. त्यामुळे कुटुंब नोंदणी, गटप्रमुख नोदणी इ सर्व कार्यपद्धती डिजिटल होती. ही सर्व डिजिटल यंत्रणा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने यशस्वीपणे हाताळली.
अभियानाबाबत समाजात जागृती व नोंदणी करिता काही पत्रके, विडियो व पत्रकार परिषदा विभागनिहाय घेण्यात आल्या. महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोशियारीजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह नानाजी जाधव, अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचे कुलगुरू, सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष माधवी कदम, काडसिद्धेश्वर महाराज, संप्रसाद विनोद,सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील इ. महनीय व्यक्तींनी विशेष चित्रफीत संदेशाद्वारे या अभियानासाठी शुभेच्छा/आशिर्वाद दिले. रामदेवजी बाबा यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करून संबोधनही केले.
या आवाहनास समाजातील सर्वच स्तरातील घटकांनी (सर्व धर्मीय, आर्थिक स्तरावरील, व्यवसाय व लिंग) व शासकीय अशासकीय संस्था संघटनांनी प्रतिसाद दिला. ही या अभियानाची एक जमेची बाजू होती. योगा शिकवू शकणार्या व किमान २५ कुटुंबांची नोंदणी करणार्या गतप्रमुखांची नोंदणी करण्यात आली. सर्व गटप्रमुखांचे प्रशिक्षण ७० योगशिक्षकांच्या गटामार्फत करण्यात आले. यामुळे गटप्रमुख अधिक आत्मविश्वासने अभियानात आपआपल्या गटांचे संचालन करू शकले.
एकूण ४५९७ गटप्रमुखांनी आपली नोंदणी केली. पतंजली योगपीठ या संस्थेने प्रांत स्तरावर नियोजन करून या अभियानात सक्रीय सहभाग घेतला तसेच शैक्षणिक संस्था (४०० अंगणवाड्या व २१२ शाळा व महाविद्यालयांनी संस्थेचा कार्यक्रम म्हणून हा उपक्रम स्वीकारला. आपल्या पालकांसह सहभाग घेतला). सोलापूर विद्यापीठ, केंद्रीय पोलिस राखीव दल - सोलापूर, साखर कारखाने, विविध सहकारी संस्था, बँका, आर्ट ऑफ लिव्हींग, मनःशक्ती केंद्र ,योगविद्याधाम, कैवल्यधाम, हास्यकल्ब, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे, आदींनी मोठ्या उत्साहाने या अभियानात सहकुटुंब भाग घेतला. या अभियानात दोन अंध विद्यार्थ्यांनी आवाजावरून योगाभ्यास केला तसेच या कार्यक्रमात चार वर्षे वयाच्या बालवाडी विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. विविध गावांमधील तरूणांचे छोटे छोटे गट ही सहभागी झाले. संघाच्या सर्व श्रेणीचे कार्यकर्ते, राष्ट्रसेविका समिती, जनकल्याण समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संस्कृतभारती, संस्कारभारती ,भारतीय किसान संघ, आयुर्वेद व्यासपीठ, हिंदू एकता आंदोलन, यशवंत प्रतिष्ठान, लक्ष्मी-केशव प्रतिष्ठान, भारतीय जनता पक्ष यांनी आपल्या कुटुंबियांसह या अभियानात सहभाग घेतला.
समजातील दुर्लक्षित व काही अंशी बहिष्कृत असा वाघ्या मुरळी समाजही यात सामील झाला. या समाजाचा सहभाग या अभियानात ‘समरसतेचा भाव’ प्रत्यक्षात उतरविण्यात यशवी ठरला.
अभियानात एकूण ८३१३४ कुटुंबांनी सहभाग घेतला. ऑस्ट्रेलिया, अमेरिका व कॅनडातील काही कुटुंबांनी देखील या अभियानात सह कुटुंब सहभाग घेतला व हे अभियान आंतरराष्ट्रीय स्तरावरही नोंदविले गेले.
४५९७ गटप्रमुखांनी योग सप्ताहासाठी मंदार गायकवाड यांनी तयार केलेल्या विशेष चित्रफीतीद्वारे कुटुंबांकडून योगाभ्यास करवून घेतला, ही चित्रफीत यू ट्यूब या प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आली असून ही चित्रफीत इतर २४००० जणांनी पाहिली. योग सप्ताहानिमित्त तयार केलेले एक विशेष ‘योग गीत’ सातारा येथील गायिका मिथाली लोहार यांनी गायिले व त्याचे ध्वनिमुद्रण अनेक कुटुंबापर्यन्त या काळात पोहचविण्यात आले. श्री जयंतराव रानडे- सांगली यांची ‘यम-नियम’ या विषयावरील चित्रफीत सप्ताहात चौथ्या दिवशी सर्व कुटुंबियांसाठी प्रसृत करण्यात आली. अनेक कुटुंबांनी या चित्रफितीचे कौतुक केले व योग साधना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतली.
चहुगाव ता. मालेगाव, जि. नाशिक या गावाने संपूर्ण गाव म्हणून योगयुक्त-रोगमुक्त-स्वस्थचित्त कुटुंब या अभियानात सहभाग घेतला तसेच अनेक अन्यधर्मीय कुटुंबेही या अभियानात उस्फूर्तपणे सहभागी झाली . ही उदाहरणे या अभियानातील अत्यंत अनुकरणीय अशी उदाहरणे आहेत.
या संपूर्ण जोडणीतून कुटुंब प्रबोधन उपक्रमास प्रत्येक जिल्ह्यात कुटुंब प्रबोधन गतिविधीचे काम करणारे किमान १०० कार्यकर्त्यांचा संच 'कुटुंब मित्र ' योजने करिता मिळणार हे या अभियानाचे फलित आहे.
अभियानास समाजातील शेवटच्या घटकापर्यत पोहचविण्यास कारणीभूत ठरलेल्या वृत्त पत्रांचा सहभागही उल्लेखनीय असा होता. या कार्यक्रमाची गरज व उपयोगिता लक्षात घेवून महाराष्ट्रातील अनेक लोकप्रिय वृत्तसमुहांनी या अभियानास प्रसिद्धी दिली व त्यामुळेही अनेक नागरिक या अभियानाचा भाग झाले.
एकूण काय तर एका सर्वस्पर्शी अभियानाने अनेक कुटुंबांना योगयुक्त-रोगमुक्त-स्वस्थचित्त कुटुंब या संकल्पनेस मूर्त स्वरूप देण्याचे बळ दिले. स्वतःचे आरोग्य व स्वस्थचित्त राखण्याची उर्मी व कौशल्येही दिली. आता आव्हान उरते ते फक्त एकच, सातत्य राखण्याचे व या अभियानाचा प्रचार करून अधिक कुटुंबांना ही कौशल्ये हस्तांतरित करण्याचे.
- नरेश करपे
(प्रांत संयोजक कुटुंब प्रबोधन मंडळ)
98220 28109