मधमाशी आणि माणूस - एकमेका साहाय्य करू...

विवेक मराठी    03-Jun-2021   
Total Views |

*पर्यावरण दिन विशेष*

जर मधमाश्या नाहीशा झाल्या किंवा लुप्त झाल्या, तर त्याचा पर्यावरणावर आणि पर्यायाने माणसावर काय परिणाम होईल याची कल्पना आपल्यातील अनेकांना अजिबात नाही. शास्त्रज्ञांच्या मतानुसार, जर मधमाशी ही प्रजाती नष्ट झाली, तर मानवजात जास्तीत जास्त 3-5 वर्षं तग धरू शकेल.

environment_3   

नुकताच, म्हणजे 20 मे या दिवशीजागतिक मधमाशी दिनसाजरा केला गेला. म्हणजे तो दर वर्षी साजरा केला जातोच, पण लोकांमध्ये असलेल्या जाणिवेच्या अभावामुळे आणि अज्ञानामुळे या दिवसाचं आणि मधमाशीचं आपल्या अस्तित्वाच्या दृष्टीने असलेलं महत्त्व बहुसंख्य लोकांच्या लक्षातच येत नाही. मग तो फक्त काही लोकांसाठी असलेला एक सोहळा राहतो. त्यातून माणसाला, समाजाला काहीच बोध होत नाही आणि या आपल्या अस्तित्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या एक लहानशा जिवाकडे आपलं जवळपास पूर्ण दुर्लक्ष होतं. या लेखात आपण मधमाशी आणि माणूस यांमध्ये असलेल्या नात्याबद्दल, परस्पर संबंधांबद्दल माहिती घेऊ या.

सध्या चाललेला आपला विकास हा औद्योगिक विकास आहे आणि तो बराचसा एकांगी आहे. या विकासाच्या मार्गावर जाताना आपण आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणावर जे काही परिणाम घडवत आहोत, त्यांच्या घातकतेची जाणीव आपल्यातील खूप लोकांना नाहीये, किंवा ज्यांना आहे, तेही भौतिक आणि औद्योगिक विकासाच्या वेगवान प्रवासाच्या मोहापायी किंवा दडपणाखाली याकडे दुर्लक्ष करतात, असं चित्र दिसतंय. माणसाच्या विकासाच्या या एकांगी कल्पनेमुळे पर्यावरणावर जो काही दबाव येतो आहे, भूरचनेमध्ये, नैसर्गिक स्रोतांमध्ये जे काही बदल होत आहेत, जंगलतोड आणि लागवड यांतील समतोल हरवल्यामुळे जीवविविधता धोक्यात यायला लागली आहे. त्यामुळे जे नुकसान होत आहे, ते सर्वांनाच दिसतंय किंवा कळतंय असंही नाही. माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे नैसर्गिक स्रोतांवर ताण येतो आहे आणि त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या सर्व बदलांचा परिणाम आपल्यालाच किंवा आपल्या पुढच्या पिढ्यांना भोगावा लागणार आहे, याची जाणीव बहुसंख्य लोकांना आहे असं काही दिसत नाही. एकूणच पर्यावरणाकडे इतकं दुर्लक्ष होत आहे किंवा पर्यावरणाला गृहीत धरलं जात आहे, तिथे एखाद्या प्रजातीबद्दल - तेही माणसाव्यतिरिक्त दुसर्या एखाद्या प्रजातीबद्दल आणि तेही मधमाशीसारख्या एक छोट्या कीटकाबद्दल काही गांभीर्याने विचार करणं थोडं कठीणच आहे.

 

याचा परिणाम म्हणजे आपल्या कृतीचा त्रास नंतर आपल्यालाच होईल, त्यामुळे आपण योग्य काळजी घेतली पाहिजे हा विचार आपल्याकडे सहसा दिसत नाही. अनियंत्रित जंगलतोड आणि त्यामुळे निर्माण होणार्या समस्या याचा सामना सध्या मधमाश्यांनाही करावा लागतो आहे. त्यातच दिवसेंदिवस वाढत चाललेला रासायनिक खतांचा, तणनाशकांचा वापर इत्यादींचा दुष्परिणाम आता आपल्याला हळूहळू दिसायला लागला आहे. आणि बरेचदा हा परिणाम दीर्घकाळ राहणारा किंवा कायमस्वरूपी राहणारा आहे, हे महत्त्वाचं.

environment_2  

जर मधमाश्या नाहीशा झाल्या किंवा लुप्त झाल्या, तर त्याचा पर्यावरणावर आणि पर्यायाने माणसावर काय परिणाम होईल याची कल्पना आपल्यातील अनेकांना अजिबात नाही. शास्त्रज्ञांच्या मतानुसार, जर मधमाशी ही प्रजाती नष्ट झाली, तर मानवजात जास्तीत जास्त 3-5 वर्षं तग धरू शकेल. त्यापेक्षा जास्त काळ जगणं शक्य होणार नाही. सामान्य लोकांना प्रश्न पडेल की असं काय आहे, ज्यामुळे असं विधान किंवा मत मांडलं गेलं? तसंही रोज पृथ्वीवरून वनस्पती आणि प्राणी यांच्या अनेक प्रजाती कायमस्वरूपी लुप्त होत आहेतच की. त्यात मधमाशी ही आणखी एक प्रजाती. त्यात काय विशेष? तर, आपल्याला मधमाशी या प्रजातीबद्दल, आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक अशा या प्रजातीबद्दल माहिती घेणं आणि त्यावर अभ्यास करून योग्य उपाययोजना करणं गरजेच आहे, हे आधी नक्की करून घ्यायला हवं.

आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की माणूस ही प्रजाती निसर्गात केवळ एक ग्राहक आहे. आपण अशी कोणतीही गोष्ट तयार करत नाही, जिचा उपयोग बाकी प्रजातींना होईल. आपण नीट पाहिलं तर हेही लक्षात येईल की निसर्गात माणूस ही एक अशी प्रजाती आहे, जी कचरा तयार करते. आपण फक्त ग्राहक आहोत हे एकदा लक्षात घेतलं की समस्या आणि उपाय समजून घेणं थोडं सोपं होईल. आपण अन्नासाठी निसर्गावर पूर्णपणे अवलंबून आहोत. जसजशी लोकसंख्या वाढते आहे, जीवनशैली बदलते आहे, शहरीकरण वाढतं आहे, तसतसं जंगल आणि शेतीची जागा कमी होत आहे. म्हणजे एकीकडे मागणी वाढते आहे आणि दुसरीकडे पुरवठा करण्यासाठी उपयुक्त जमिनीची उपलब्धता कमी होते आहे. शेतीच्या उत्पन्नात वाढ व्हावी, म्हणून वेगवेगळी रसायनं वापरली जाण्याचं प्रमाणही वाढत आहे. जंगल तोडून तिथेही शेती किंवा फळझाडांची लागवड केली जात आहे. असं असूनही उत्पन्नात मागणीला पुरेशी वाढ तर होताना दिसत नाहीये, पण रसायनांचा परिणाम म्हणून मधमाश्या आणि इतर कीटक मात्र कमी होताना दिसत आहेत.

 

मधमाशी ही कीटकांची एक प्रजाती आहे. मधमाश्या समूहाने राहतात आणि वर्षभर वेगवेगळ्या झाडांच्या फुलांमधील मध गोळा करून आणतात आणि आपल्या पोळ्यामध्ये साठवतात. या पोळ्यांमध्ये आपल्याला मेण आणि मध या दोन महत्त्वाच्या गोष्टी मिळतात. पण फक्त मध आणि मेण या दोनच महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला मधमाश्यांपासून मिळतात का? की त्यांचं आणखी काही महत्त्व आहे पर्यावरणाच्या आणि माणसाच्या दृष्टीने?

 

मधमाशी या कीटकाचा मानवाशी संबंध अंदाजे 4,000 वर्षांपूर्वी आला असावा. वेदकालीन वाङ्मयात इतर धार्मिक ग्रंथांत मधमाशी मध यांचे उल्लेख आहेत. तसं तर माणसाने अगदी गाय, बैल यांपासून ते अगदी हत्तीपर्यंत अनेक प्राणी माणसाळवलेले आहेत. पण आपल्यापैकी फार कमी लोकांना माहीत आहे की अशा माणसाळवलेल्या प्राण्यांत मधमाशीचं स्थान फार महत्त्वाचं आहे.

 

मधमाशीच्या अनेक उपजाती आहेत. निरनिराळ्या जातींच्या मधमाश्यांच्या आकारमानात खूपच फरक आहे. मधमाशीच्या उपजातींच्या आकारमानात 8-13 मिमी.पासून 18-21 मिमी. लांब इतका फरक असतो. एपिस ही मधमाश्यांची मुख्य प्रजाती असून या मधमाश्यांना नांगी असते. त्यांना दुखावल्यास त्या नांगी मारतात. या मधमाश्यांचे दोन उपप्रकार आहेत. पहिल्या प्रकारात प्रकाशात एकच पोळे बांधणार्या दोन उपजाती येतात, तर दुसर्या प्रकारात जास्त फण्या असलेली आणि अंधारात, झाडांच्या ढोल्यांत किंवा दगडांच्या कपारीत पोळी बांधणार्या जातींच्या मधमाश्या येतात.

 

environment_1  

मधमाश्यांना धोका कशापासून?

युरोपातील आणि अमेरिकेतील मधुमक्षिकापालन उद्योगामध्ये एक धोका सध्या उत्पन्न झाला आहे. यात एकाएकी मधमाश्यांची संख्या कमी होते आणि एक पोळे टिकवून ठेवण्यासाठी जेवढ्या माश्यांची आवशकता आहे, त्याहून कमी माश्या राहिल्या म्हणजे पोळेच नाहीसे होते. अशा प्रकारांमुळे 2007मध्ये मधमाश्यांची तीस ते सत्तर टक्के पोळी नाहीशी झाली. अपुरी प्रथिने, शेती करण्यामधील काही बदल किंवा अनिश्चित हवामान अशी याची तीन कारणे सांगितली जातात. उत्तर अमेरिकेतसुद्धा मधमाश्यांची संख्या एवढी कमी आतापर्यंत कधीच झालेली नव्हती. या प्रकारासकॉलनी कोलॅप्स डिसॉर्डरअसे नाव मिळालं. हा प्रकार नवा आहे की इतर बाह्य घटकामुळे झाला, याचा अभ्यास अजून अपूर्ण आहे. पण हे एक लक्षण (सिंड्रोम) असून आजार नाही असं दिसतं. त्याचप्रमाणे, मोबाइल टॉवर्समधून निघणार्या विद्युतचुंबकीय लहरी हे मधमाश्यांची संख्या कमी होण्यामागील प्रमुख कारण मानलं जातं. विद्युतचुंबकीय लहरी मधमाश्यांच्या शरीरात असलेल्याचुंबकीय रडारवर परिणाम करतात. त्यामुळे दिशाहीन झालेल्या माश्या गोंधळून जातात पोळ्यापर्यंत पोहोचत नाहीत.

जर मधमाश्या नष्ट झाल्या, तर माणूस जेमतेम चार वर्षं टिकाव धरू शकेल असं म्हटलं जातं, कारण झाडांमध्ये परागीकरणासाठी मधमाश्या प्रचंड काम करतात. शेतीचं उत्पन्न, फळफळावळ इत्यादीसाठी मधमाश्या असणं ही उत्पन्न वाढण्यासाठी अनिवार्य आहे. आपण पर्यावरणात करत असलेल्या अनेक बदलांमुळे, वापरत असलेल्या रसायनांमुळे मधमाश्या संकटात सापडत आहेत. त्याचा थेट परिणाम परागीकरणावर होत असल्याने शेतीवर आणि एकूणच वनस्पतिसृष्टीवर संकट ओढवलं आहे. दुर्दैवाने, अजूनही आपल्याला त्याची पुरेशी जाणीव झालेली नाही.

मधमाशी संरक्षण-संवर्धनाची गरज आणि त्याचा फायदा

मधमाशीपालन हे उत्तम साहचर्याचं उदाहरण आहे. मधमाश्या पाळल्यामुळे शेतकरी, आदिवासी हौशी मधुपालक (मधमाश्या पालन करणारे) यांना अनेक फायदे मिळतात. मधमाश्यांच्या पेट्या शेतात, बागेत ठेवण्याचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे पेटीतील मधमाश्यांमार्फत उत्कृष्ट परागीकरण घडतं. यामुळे झाडांवरील फळांची शेतातील पिकांची संख्या गुणवत्ता कितीतरी पटीने अधिक वाढते. अनेक ठिकाणी तर उत्पादनात 20-30% वाढ आढळून आली आहे. त्याचा फायदा थेट आर्थिक उत्पन्न वाढण्यात होतो. पेटीतील मधमाश्या भवतालच्या परिसरात फिरून मध गोळा करतात, त्यामुळे तिथेदेखील उत्तम परागीकरण घडून जीवविविधतेमध्ये आणि प्रजातींची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ झालेली आढळून येते. याशिवाय पेटीत पाळलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यांमधून मध, मेण इत्यादी अनेक उपयुक्त पदार्थ मिळतात. यामुळे मधपेट्या ठेवणार्यांना आर्थिक लाभही होतो. शेतकर्यांसाठी मधमाशीपालन हा उत्तम जोडधंदा ठरतो अलीकडे शेतकर्यांच्या असाहाय्यतेतून, निराशेतून घडणार्या आत्महत्या वगैरे प्रश्नांवर हा प्रभावी उपाय ठरू शकतो. मात्र यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काम व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन करायची गरज आहे, तर याचा फायदा मिळू शकतो आणि अर्धवट माहितीवर केल्यास नुकसानही होऊ शकतं.

नागरी भागातही लोकांनी मधमाशीविषयक माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरेचदा शहरात मधमाश्यांसंदर्भातील अज्ञानामुळे भीतीपोटी पोळी एकतर आग लावून पूर्णपणे जाळली जातात किंवा त्यांवर पेस्ट कंट्रोलचा उपाय करून ती नष्ट तरी केली जातात. पेस्ट कंट्रोल हा तर घातक उपाय असून माणसांच्या प्रकृतीवरसुद्धा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारे हजारोंच्या संख्येने मधमाश्या मारून नष्ट करणं म्हणजे आपल्याच भवितव्यावर आणि पुढच्या पिढ्यांवर संकट ओढवून घेण्याचा प्रकार आहे. जाणीवजागृतीमुळे शहरवासीयांचा मधमाशीकडे बघायचा दृष्टीकोन जेव्हा बदलेल, तेव्हा शहरातील जीवविविधता टिकून पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईल.

मी काय करू शकतो मधमाश्यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी?

वर उल्लेख केलेल्या उपाययोजना तर आपल्यापैकी अनेक लोक करू शकतात. मधमाश्यांचा नैसर्गिक अधिवास जपण्याकरता जंगल वाचवणं, एकांगी विकासामुळे होणारी अनियंत्रित आणि बेलगाम वृक्षतोड थांबवणं आणि नवीन जंगल तयार करणं, शक्य असेल तिथे मधमाश्यांना पोषक असलेली रासायनिक खतविरहित शेती किंवा नैसर्गिक शेती करणं, असे अनेक उपक्रम आपण प्रत्यक्ष कृतीत आणू शकतो. अशा गोष्टींतून मधमाशी वाचवणं शक्य आहे. मधमाशी वाचवण्याकरता सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न सुरू केल्यास मधमाशी संरक्षण संवर्धनात यश मिळून पर्यावरण समतोल राखण्यात आपल्याला यश मिळेल, अशी आशा ठेवायला काही हरकत नाही.