“संघकार्यातून माणसे जोडणारे भास्कर दांडेकर” - आबा देसाई

विवेक मराठी    04-Jun-2021
Total Views |

विक्रोळी भागाचे माजी भाग सहकार्यवाह भास्कर वासुदेव दांडेकर यांचे कोरोनामुळे कामोठे, पनवेल येथे दुःखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 20 मे रोजी ऑनलाइन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा हा संक्षिप्त आढावा.

RSS_1  H x W: 0 

आज भास्कर दांडेकर आपल्यात नाहीत. संघपरिवाराचे काम करीत असताना त्यांनी अनेक माणसे जोडली, जोपासली संघात आणली. संपर्कात आलेल्या प्रत्येक घराघरातल्या प्रत्येकाशी त्यांचे आत्मीय संबंध होतेअशा शब्दात आबा देसाई यांनी भास्कर दांडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. 20 मे 2021 रोजी भास्कर दांडेकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित आभासी (ऑनलाइन) श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विक्रोळी भागाचे माजी सहकार्यवाह असलेले, संघाचे तृतीय वर्ष शिक्षण पूर्ण केलेले भास्करराव यांचे वयाच्या 61व्या वर्षी कोरोनामुळे कामोठे, पनवेल येथे 26 एप्रिल 2021 या दिवशी दु:खद निधन झाले. दुर्दैवाने त्यांच्या दोन ज्येष्ठ बंधूंचेही कन्नमवार नगर, विक्रोळी येथे सहा महिन्यांपूर्वी एकाच वेळी कोरोनामुळे दुःखद निधन झाले होते.

आबा पुढे म्हणाले की, “विक्रोळीत वास्तव्य असताना ते जास्तीत जास्त वेळ संघकार्यासाठी देत असत. ठाणे आणि नंतर कामोठे येथे राहायला गेल्यानंतरही ते तसाच वेळ देत होते. कामोठे येथे त्यांनी नवीन शाखा सुरू करून गुणात्मक आणि संख्यात्मकदृष्ट्या स्थिर केली. शाखा आणि नियमित संपर्क यातून त्यांनी संघपरिवारासाठी नवीन कार्यकर्ते निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू केली. गेल्या तीन-चार वर्षांपासून ते भाजपाचे कामोठे मंडळ सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. त्या क्षेत्रातसुद्धा स्थानिक भाजपा आमदार मा. प्रशांत ठाकूर यांच्यावर त्यांनी आपल्या विशेष कार्यकर्तृत्वाचा प्रभाव पाडला.” आदर्श कार्यकर्ता कसा असावा या संदर्भात नेहमी प्रशांत ठाकूर भास्करराव यांचे उदाहरण देत असल्याची आठवण आबांनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितली. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत असताना भावुक झालेले आबा पुढे म्हणाले की, “भास्करराव ज्या गृहनिर्माण संस्थेत राहत होते, तेथील सर्वच रहिवासी त्यांना काका या नावाने संबोधीत असत. तेथे त्यांनी नव्याने गणेशोत्सव सुरू केला. या गणेशोत्सवात त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून कुटुंबप्रबोधनाचा कार्यक्रम घडवून आणला.” त्यांच्या शेवटच्या काळातील अनुभव सांगताना आबा म्हणाले की, “कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक ती मदत तत्परतेने मिळावी, यासाठी ते झटत होते. कोणाला बेड उपलब्ध करून देणे, कोरोनाबाधित रुग्णांच्या घरी जेवणाचे डबे पोहोचविणे यासारखी अनेक प्रकारची कामे करीत असतानाच त्यांनी स्वत:च्या जिवाचीही अजिबात पर्वा केली नाही. इथेच दुर्दैवाने ते, त्यांची पत्नी मुलगासुद्धा कोरोनाबाधित झाले. सुदैवाने पत्नी मुलगा ऋतुराज बरे झाले. परंतु भास्करराव यांचा आजार अधिकाधिक बळावत गेला. ज्या कार्यकर्त्याने इतर कोरोना रुग्णांना खउण बेड उपलब्ध करून दिले, त्या भास्कररावांना शर्थीचे प्रयत्न करूनही बेड उपलब्ध झाला नाही. अखेरीस त्यातच त्यांचे दु:खद निधन झाले.” आपल्या भावस्पर्शी भाषणाचा शेवट करताना ते म्हणाले, “काळ कोणासाठी थांबत नाही. दु: मागे सारून काळ आपल्याला पुढे जायला शिकवत असतो. आज दांडेकर परिवारावर दु:खाचा फार मोठा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या परिवारातील तिन्ही ज्येष्ठ असे कर्ते पुरुष निघून गेले आहेत. अशा परिस्थितीत रा.स्व. संघपरिवार कायमच त्यांच्या पाठीशी उभा राहील. या ठिकाणी मी त्यांना विनम्रपणे श्रद्धांजली अर्पण करतो.”

सुरुवातीला विक्रोळी भागाचे मा. भाग संघचालक विश्वनाथ सावंत यांनी प्रास्ताविक केले. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्याबरोबर काम करतानाच्या काही आठवणी सांगताना अखेरीस ते म्हणाले, “आज भास्करराव आत्म्याच्या रूपाने आपल्यातच आहेत.”

मोहन अत्रे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “संघाचा तृतीय वर्ष शिक्षित असलेला हा सत्त्वशील कार्यकर्ता, सतत बाल शाखेत रमणारा, अतिशय शिस्तप्रिय, स्पष्टवक्ता असणारा, तरीही बालांना हवाहवासा वाटणारा असा हा संघशाखेतील बालांचा आवडता शिक्षक होता. ज्या स्वयंसेवकांच्या, कार्यकर्त्यांच्या तो घरात जाई, त्या घरातील प्रत्येकाशी हसतमुखाने बोलून, आत्मीयतेने सहजतेने त्यांना तो आपलेसे करी. घरातील माउलीशी त्याने पुत्राचे नाते जपले, ताईशी भावाचे, तर वहिनीशी दिराचे नाते सहजपणे जपले आणि अकृत्रिमपणे वृद्धिंगत केले. अशा पद्धतीने भास्कर उपाख्य बाजीराव यांनी संघ त्या त्या घरातील चुलीपर्यंत पोहोचवला. दैनंदिन संघकार्य करीत असतानाच भास्कर वासुदेव दांडेकर यांनी बीएस्सीला सुवर्णपदक मिळवले होते. म्हणजेच संघकार्य करिअरच्या आड येत नाही, हेच त्यांनी सिद्ध केले.

विक्रोळी सोडून ठाणे नंतर कामोठे येथे राहायला गेल्यावरही विक्रोळीतील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांशी त्यांनी सतत संपर्क ठेवला. अखंड भारत व्यासपीठ स्थापनेत आणि प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. सांस्कृतिक भारत त्रैमासिक आणि अखंड भारत व्यासपीठ यांच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी विनम्र श्रद्धांजली समर्पित करतो.”

कोकण प्रांत सेवा प्रमुख विवेक भागवत आपल्या भावपूर्ण शब्दांत श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, “संघरचनेनुसार विक्रोळी भाग नवीन करण्यात आला. त्या भागाचा भाग कार्यवाह म्हणून माझ्यावर जबाबदारी देण्यात आली. भास्कररावांनी भाग सहकार्यवाह म्हणून जबाबदारी स्वीकारली. संघकार्याच्या निमित्ताने भागात होणारा त्यांच्याबरोबरचा सततचा प्रवास, बैठका, कार्यकर्त्यांशी संपर्क यातून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे अनेक पैलू लक्षात आले. ते बाल शाखा आणि शारीरिक विभाग याकडे विशेष लक्ष देत असत. ते मला नेहमी म्हणायचे - विवेकजी, शाखेत खांद्यावरचे काम तुमचे आणि खांद्याखालचे काम माझे.. म्हणजेच बौद्धिक विभाग तुमचा आणि शारीरिक विभाग माझा. अपेक्षित तिथे उपस्थित हे संघसूत्र त्यांनी नेहमी पाळले. त्यांच्या स्मृतीस मी श्रद्धांजली अर्पण करतो.”

याच कार्यक्रमात अण्णा काळे, नीता विजय शिंदे, विनय शौचे, प्रफुल्ल डोंगरे, नितीन राणे, गुरुराज कुलकर्णी या सर्वांनी कमीत कमी वेळेत आपले मनोगत व्यक्त करून भास्कररावांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, तसेच भास्कररावांचे पुतणे रवी दांडेकर यांनीदेखील भावुकपणे आपले मनोगत व्यक्त केले. सुहास पोतदार यांनी श्रद्धांजली सभेचे सूत्रसंचालन केले. विनय शौचे यांनी वैयक्तिक गीत म्हटले, तर सत्यवान भास्कर यांनी मागील वर्षभरात दु:खद निधन झालेल्या स्वयंसेवकांचा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा उल्लेख करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. श्रीनिवास तल्ला यांनी म्हटलेल्या शांती मंत्राने सभेची सांगता झाली. आभासी सभेला 84 जण उपस्थित होते.

शब्दांना शब्दांच्या मर्यादेत बांधून त्यांना पूर्णविराम देता येतो. परंतु आपल्या सर्वांच्या मन:पटलावर उमटल्या गेलेल्या त्यांच्या आठवणींचे काय? ज्याप्रमाणे सागरातील लाटा उचंबळून एकामागून एक येतच असतात, त्यांना पूर्णविराम कधीच नसतो, त्याचप्रमाणे सागररूपी मन:पटलातील आठवणींच्या लाटा एकामागोमाग एक येतच राहणार. त्यांना पूर्णविराम कधीच नसतो. भास्कर दांडेकर यांच्या स्मृतीला विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली आणि शतश: प्रणाम!

- मोहन दिगंबर अत्रे

9769556541