'गप्पा निसर्गाच्या’ पुस्तकाचे ऑनलाइन प्रकाशन

विवेक मराठी    05-Jun-2021
Total Views |


environment_1  

"पर्यावरण ही एक जागतिक समस्या आहे, त्यामुळे त्यावर जागतिक उत्तरच शोधलं पाहिजे, असं नेहमी म्हटलं जातं. पण तसं नसून प्रत्येक जागतिक समस्येचं निरसन आपल्या स्वत:पासून झालं पाहिजे. आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण प्रत्येकाने हा निश्चय केला पाहिजे की भविष्यकाळात आनंदाने जगायचं असेल, तर पर्यावरण संवर्धनाची आणि संरक्षणाची सुरुवात आपण स्वत:पासून केली पाहिजे" असे मत पद्मश्री डॉ. अमिताव मलिक यांनी व्यक्त केले.

विवेक प्रकाशन निर्मित, हर्षद तुळपुळे लिखित गप्पा निसर्गाच्यापुस्तकाचे ऑनलाइन प्रकाशन ५ जून रोजी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. त्या वेळी डॉ. मलिक बोलत होते. पर्यावरण गतिविधी प्रांत टोळी सदस्य मा. नंदकिशोर जोशी आणि पुण्याच्या इकॉलॉजिकल सोसायटीचे विश्वस्त डॉ. गुरुदास नूलकर या प्रसंगी उपस्थित होते.


गप्पा निसर्गाच्या
पर्यावरणाशी निगडित 25 तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींच्या मुलाखतींचा संग्रह.

 

डॉ. मलिक पुढे म्हणाले की, "आज विकास फक्त जीडीपीपुरताच मर्यादित राहिला आहे. तो नंबर वाढला तरच आपण विकसित झालो, असं म्हटलं जातं. पण आता तसं राहिलेलं नाही, आता विकासाची व्याख्या बदलण्याची वेळ आलेली आहे, जी खर्‍या अर्थाने माणसाची प्रकृती आणि प्रगती यांचं दर्शन घडवणारी असेल. भूतानमध्ये हॅपिनेस इंडेक्समानला जातो. आपल्यालाही आता त्या दृष्टीने पावलं उचलली पाहिजेत.

तसंच मनुष्य आणि निसर्ग या दोघांनी एकत्र येण्याची वेळ आता आलेली आहे. आतापर्यंत आपण केवळ निसर्गाकडून घेतच आलो आहोत, त्याचे परिणामही आपण अनुभवत आहोत. वातावरणातील बदल, दुष्काळ, पूर परिस्थिती, बर्फ झपाट्याने वितळणं हे सगळे त्याचेच परिणाम आहेत." डॉ. मलिक यांनी पुढे सांगितले, " तापमान केवळ १ अंश सेंटिग्रेड वाढल्यामुळे हे सर्व झालं आहे आणि ही परिस्थिती जैसे थे राहिली, तर या शतकाच्या शेवटापर्यंत ही तापमानवाढ ४ अंश सेंटिग्रेडपर्यंत जाईल, त्या वेळी काय हाहाकार माजेल, याचा विचार न केलेलाच बरा."

ते पुढे म्हणाले, "पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे. हे जर मनुष्याकडून शक्य झालं नाही, तर पुढील १०-१२ वर्षांत सर्व परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेलेली असेल. ती जाऊ नये यासाठी हर्षद तुळपुळे लिखित गप्पा निसर्गाच्याहे पुस्तक आपण सर्वांनी अवश्य वाचावं."

 

या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने पर्यावरण क्षेत्रात कार्यरत व्यक्तींच्या २५ मुलाखतींचा संग्रह आपल्याला उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मनोगतात लेखकाने या सर्व व्यक्तींचा परिचय करून दिला. या सर्व व्यक्तींनी पर्यावरण विषयाकडे बघण्याचा एक नवीन आयाम आपल्यासमोर ठेवला आहे. तसेच चौकटीबाहेरचे पर्यावरण विज्ञान त्यांनी नव्या पिढीसमोर आणले आहे.

डॉ. गुरुदास नूलकर यांनी पद्मश्री डॉ. अमिताव मलिक यांचा विस्तृत परिचय करून दिला. सा. विवेकचे सहकार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर विवेक प्रकाशनच्या शीतल खोत यांनी आभारप्रदर्शन केले.