सैनिकांच्या श्वासांसाठी

विवेक मराठी    06-Jun-2021   
Total Views |

 देशाच्या संरक्षणाकरता तळहातावर प्राण घेऊन उभे रहाणार्‍या या वीरांचा प्राणवायूअभावी मृत्यू व्हावा यासारखं दुर्दैव नाही. यापुढे जवानांचे असे मृत्यू होऊ नये म्हणून योगेशजी व सुमेधाताई चिथडे या दांपत्यने अॉक्सिजन प्लँट बसवण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांतून ४ अॉक्टोबर २०१९ रोजी सियाचेनमधल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये अॉक्सिजन प्लँटचं उद्घाटन होऊ शकलं आहे. 

 
oxygen generation plant f
 
गेल्या वर्षभरात कधी नाही इतकं अॉक्सिजनचं महत्त्व आपल्याला कळलं. कोविडशी झुंजताना वेळेत वा पुरेसा अॉक्सिजन न मिळाल्यामुळं माणसं मृत्युमुखी पडत असल्याचं भयावह चित्र आपण प्रथमच पाहिलं. मात्र अनेक वर्षं आपले सैनिक हिमालयातील अतिशय दुर्गम व अति उंचीवरच्या आपल्या सीमेवर अतिशय विरळ अॉक्सिजन व अति प्रचंड थंडी याला तोंड देत आपल्या सीमेचं रक्षण करत आहेत. सियाचेनचा प्रदेश भारतासाठी संरक्षणदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असला तरी तिथं काम करणं आपल्या कल्पनेपेक्षाही कितीतरी अवघड आहे.

समुद्रसपाटीपासून हजारो किमी उंचीवर, उणे पन्नास अंशापर्यंत घसरणार्‍या तापमानात आपले सैनिक काम देशाच्या सीमेचं रक्षण करत खडा पहारा देत असतात. नजर जाईल तिथवर बर्फाव्यतिरिक्त काहीही पहायला नाही, कसल्याही सोयी नाहीत, करमणूक तर दूरच... मूलभूत सोयींचा अभाव व सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवेत अॉक्सिजन अतिशय कमी असल्याने होणारे त्रास. म्हणूनच त्या ठिकाणी तीन महिन्यापेक्षा अधिक काळ पोस्टिंग केलं जात नाही. अति थंडी व प्राणवायूचा अभाव यामुळं स्मृतीभ्रंश, हिमदंश, वजन उतरणं असे अनेक त्रास या तीन महिन्यातही सैनिकांना सोसावे लागतात. देशाच्या संरक्षणाकरता तळहातावर प्राण घेऊन उभे रहाणार्‍या या वीरांचा प्राणवायूअभावी मृत्यू व्हावा यासारखं दुर्दैव नाही. ही वेदनाच ज्यांच्या कामाची प्रेरणा बनली ते ध्यासवेडं दांपत्य म्हणजे योगेशजी व सुमेधाताई चिथडे .


oxygen generation plant f
योगेशजी व सुमेधाताई चिथडे .

योगेशजी वायुदलातून निवृत्त झालेले एक सच्चे सैनिक आहेत. आणि सुमेधाताईंच्या मनावर वीर सावरकर व शिवाजीमहारांच्या चरित्रांचा फार प्रभाव आहे. सुमेधाताईंच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं
, 'सावरकर फक्त वाचायचे नाहीत तर, जगण्यात उतरवता आले पाहिजेत.' हे दांपत्य त्या सल्ल्याप्रमाणेच जगतं आहे. त्यांचा एकुलता एक मुलगाही सैन्यदलात अधिकारी म्हणून सेवा बजावत आहे आणि हे दोघे सैनिकांच्या कल्याणाकरता उभ्या केलेल्या 'सिर्फ'या संस्थेमार्फत गेली बावीस वर्षं अव्याहत काम करत आहेत. धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्याकरता, त्यांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्यासाठी पदरमोड करून अशा कुटुंबांना भेटतात, त्यांच्या सर्व प्रकारच्या अडचणी सोडवतात. त्यांच्या अडचणीला आणि सणासुदीलाही ते त्यांच्याच सोबत असतात. भारतीय सैनिक व त्यांचे परिवार हे या दोघांचं विस्तारित कुटुंबच बनलं आहे .


कारगिल युद्धावेळी ज्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सैनिकांनी काम केलं ते पाहून सुमेधाताईंना फार हळहळ वाटली. यांना निदान काही मूलभूत सुविधा मिळायला हव्यात असं वाटू लागलं. सैनिकांकरता दिवाळीला फराळ पाठवणं, राख्या पाठवणं हे त्या करतच होत्या. त्याचबरोबर एकीकडे तरुणांच्या मनात सैन्यदलाविषयी आकर्षण निर्माण करून त्यांना सैन्यात जाण्याकरता प्रेरित करण्याचं कामही सुरू होतं. पण याहून अधिक काही करायला हवं याची जाणीव होत होती. याच सुमारास परमवीरचक्राचे मानकरी आदरणीय कॅप्टन बानासिंग यांच्याशी त्यांची भेट झाली. पाकिस्तानच्या ताब्यात असणारी सियाचेन ग्लेशिअरमधील कैद पोस्ट ज्यांनी काबीज केली ते आदरणीय कॅप्टन बाना. आज त्यांच्या नावाने ती पोस्ट 'बाना पोस्ट' म्हणून अोळखली जाते .


सुमेधाताईंच्या या मिशनविषयी अधिक माहिती त्यांच्या sirf.org.in या वेबसाईटवरही मिळू शकेल .
त्यांच्याशी संपर्क करण्याकरता [email protected] किंवा सुमेधा योगेश ९७६४२९४२९२/९१ याचा वापर करावा.

80G खाली आयकरात सवलत मिळेल.
ट्रस्टचा पॅन नंबर AASTS4904R
NEFT / RTGS करण्यासाठी
Bank of Maharashtra Paud Phata Branch, Pune, India
A/C No. 60273878996
IFSC Code : MAHB 0000243

देणगीदारांनी ऑनलाईन देणगी दिल्यानंतर कृपया आपले नाव, पिनकोडसहित पूर्ण पत्ता, देणगीची रक्कम व तारीख तसेच आपला संपर्क क्रमांक व मेल आय.डी. योगेश चिथडे यांच्या 9764294291 या क्रमांकावर कळवावा.
कार्यालयाचा पत्ता- सुयोग 30/ A हनुमान नगर,
ऑफ सेनापती बापट मार्ग,
पुणे 411016

सियाचेनसारख्या प्रदेशात सैनिक कोणकोणत्या अडचणींना तोंड देत उभे असतात हे त्यांच्याकडून ऐकल्यावर सुमेधाताईंनी त्यांना विचारलं की,'मी यांच्याकरता काही करू शकते का?' तेव्हा ते म्हणाले की, 'बहनजी सचमुच कुछ करना चाहती हो तो, इनके साँसों के लिए कुछ कीजिए ' हे ऐकल्यावर सुमेधाताईंच्या अंगावर काटा आला आणि त्या दिशेने चिथडे दांपत्याचं विचारचक्र फिरू लागलं. त्यांनी ठरवलं की, सियाचेनमधल्या सैनिकांना आपण 'श्वास' कमी पडू द्यायचा नाही. सियाचेनमध्ये अॉक्सिजन प्लँट बसवण्याकरता खर्च येणार होता सुमारे दोन कोटी! सुमेधाताईंच्या चोख कामामुळं व पारदर्शी व्यवहारामुळं लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला व या प्रकल्पाचं शिवधनुष्यही या दोघांनी पेलून दाखवलं. त्यांच्या अथक प्रयत्नांतून ४ अॉक्टोबर २०१९ रोजी सियाचेनमधल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये अॉक्सिजन प्लँटचं उद्घाटन होऊ शकलं .

मिनिटाला जवळजवळ सव्वादोनशे लिटर इतका अॉक्सिजन निर्माण करण्याची क्षमता असलेल्या या प्लँटमुळे जवान, तिथले नागरिक, पर्यटक अशा जवळजवळ पस्तीस हजार लोकांना याचा फायदा होतो आहे.
(या प्रकल्पाची उपयुक्तता लक्षात आल्यानंतर असेच अजून दोन प्लँट बसवण्याची गरज समोर आली.
लष्करी पद्धतीप्रमाणे व सुरक्षेच्या कारणास्तव आधी याचे नेमके स्थान सांगितले जात नाही. प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्यानंतर सैन्याला तो प्रकल्प अर्पण केल्यावर भारतीय सेैन्य त्याची अधिकृत घोषणा करते.) सियाचेनसारख्याच अत्यंत दुर्गम ठिकाणी असेच अजून दोन अॉक्सिजन प्लँट बसवण्याचा ध्यास आता या दोघांनी घेतला आहे. सुमारे सहा कोटी रुपये या कामाकरता उभे करायचे आहेत. या उभयतांनी अक्षरशः तन-मन-धन या कामासाठी अर्पण केलं आहे.


oxygen generation plant f
पहिल्या प्रकल्पाच्या निधीसंकलनाचा अारंभ सुमेधाताईंनी स्वतः सव्वा लाख रुपये घालून केला. त्यासाठी त्यांनी आपले दागिने विकले. पहिला प्लँट बसवून तो कार्यान्वित करतानाही खूप अडचणी आल्या. खराब हवामानामुळे अनेकदा विमानात भरलेला कंटेनर परत उतरवावा लागे. योगेशजी या कामासाठी अविश्रांत राबत होते. सियाचेनच्या पराकोटीच्या थंडीत तहानभुकेची जाणीव हरपते. परिणामी वजन कमी होतं. याच धावपळीत योगेशजींना कावीळ झाली व आता लिव्हर ट्रान्सप्लांटशिवाय दुसरा इलाज नाही असे निदान झाले. मात्र प्रकृती अस्वास्थ्यातही हे काम पूर्णत्वाला नेण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे. सुमेधाताईंना विश्वास आहे की समाजानं मनावर घेतलं तर हा जगन्नाथाचा रथ सहजी अोढला जाऊ शकतो .
या प्रकल्पाकरता त्या त्यांच्या 'सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन' (सिर्फ ) या संस्थेमार्फत त्या 'सेवा परमो धर्मः' नावाचा कार्यक्रम करतात. अाता गेल्या दीड वर्षात कोविडमुळे व योगेशजींच्या गंभीर दुखण्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमांवर मर्यादा आल्या असल्या तरी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारा अॉनलाईन माध्यमातून त्यांचे कार्यक्रम, व्याख्याने सुरू आहेत. त्यांनी या कामाकरता रजिस्टर केलेल्या 'सिर्फ' या ट्रस्टला आयकर सवलत देखील आहे.
आपल्याला निर्धोक जगता यावं या करता बर्फात गाडून घेणार्‍या व शेवटच्या श्वासापर्यंत या भूमीचं संरक्षण करणार्‍या सैनिकांच्या श्वासाची काळजी समाजानं घ्यायलाच हवी. या करता सुमेधाताईंना अपेक्षा आहे ती, समाजातून हजारो हात पुढे येण्याची. प्रत्येकानं आपला छोटामोठा वाटा उचलला तर हे स्वप्न लवकरात लवकर सत्यात उतरेल.

- विनीता तेलंग