शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ - यजुर्वेंद्र महाजन

विवेक मराठी    07-Jun-2021
Total Views |

@उत्तरा मोने

अनाथ, दुर्बल, दिव्यांग मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून सन्मानाने जगण्याचे बळ देण्याचे काम यजुर्वेंद्र महाजन यांची दीपस्तंभ फाउंडेशन ही संस्था करत आहे. निसर्गाविषयीच्या, समाजाविषयीच्या कृतज्ञतेच्या भावनेतून यजुर्वेंद्रजी यांना हे कार्य करण्याची प्रेरणा मिळत आहे.

seva_1  H x W:

महाराष्ट्राला संतांची, विचारवंतांची खूप मोठी परंपरा लाभली आहे, त्याचप्रमाणे समाजाच्या हितासाठी काम करणार्या समाजवंतांचीदेखील परंपरा आपल्याकडे आहे. आपल्याकडे असलेल्या गोष्टीचा एक भाग समाजातील गरजू, आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे काही कमी आहे अशा व्यक्तींना द्यावा ही शिकवण आपल्याला लहानपणापासून मिळते. अगदी संतांच्या काळापासून हा वारसा पिढ्यानपिढ्या चालत आला आहे. हाच वारसा शिक्षणाच्या मदतीने पुढे नेत आहेत दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन. दिव्यांग व्यक्ती, अनाथ मुलं, दुर्गम ठिकाणी असणारी मुलं या सगळ्यांना शिक्षणाच्या साथीने एक वेगळा दृष्टीकोन देण्याचं काम यजुर्वेंद्रजी गेली अनेक वर्षं करत आहेत. या मुलांच्या अंधारलेल्या प्रवासात एक दीपस्तंभ बनून ते त्यांना योग्य दिशा दाखवत आहेत.

जळगाव इथल्या एरंडोल या गावात यजुर्वेंद्रजींचं बालपण गेलं. खरं तर इतरांसाठी काही करण्याचं बाळकडू त्यांना लहानपणीच त्यांच्या वडिलांकडून मिळालं. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि समाजातील गरजू व्यक्तींसाठी ते मोफत दवाखाना चालवायचे. पुढे महाविद्यालयात असताना स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे थोर समाजसुधारक त्यांच्या वाचनात आले आणि त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. खरंच आहे, आपल्या देशात होऊन गेलेल्या या थोर व्यक्तींकडून शिकण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत. त्यांच्या विचारांची श्रीमंती आपल्या समाजातील अनेक पिढ्यांचं आयुष्य समृद्ध करत आहे.


seva_1  H x W:  

खरं तर गांधीजी, विवेकानंद ही मंडळी आपल्या वाचनातही येतात, त्यांच्या कामाचा अभिमान आपल्यालादेखील वाटतो. पण त्यातून प्रेरणा घेऊन स्वत: काहीतरी करणं हे फार महत्त्वाचं असतं. नेमकं हेच यजुर्वेंद्रजींनी करून दाखवलं. पुण्याला उच्च शिक्षण घेत असताना त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, शिक्षणाच्या ज्या संधी शहरातल्या मुलांकडे आहेत, त्या खेड्यातल्या मुलांकडे नाहीत आणि म्हणूनच खेड्यातल्या मुलांचा उत्कर्ष म्हणावा तितका होताना दिसत नाही. या विचाराने अस्वस्थ होऊन, आपण याविषयी काही केलं पाहिजे या विचाराने पेटून उठत त्यांनी वयाच्या 25व्या वर्षी शहरातली नोकरी सोडली आणि संपूर्ण वेळ समाजसेवेचं व्रत हाती घेतलं. यातूनच 2005 साली स्थापन झालीदीपस्तंभही संस्था.

यजुर्वेंद्रजी स्वत: स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याने त्यांना शिक्षणाविषयी मनापासून आस्था आहे. म्हणूनच त्यांचा कल कायम शैक्षणिक आणि सामाजिक कामांकडे आहे.

ते म्हणतात की, “जर एखाद्या व्यक्तीची परिस्थिती बदलायची असेल, त्याचा उत्कर्ष साधायचा असेल, तर त्यासाठी योग्य शिक्षण हा एकमेव मार्ग आहे. कारण शिक्षण आणि प्रशिक्षण या गोष्टी आपल्याला कायम स्वत:च्या पायावर उभं राहून सन्मानाने आयुष्य जगायला मदत करतात. गुणवत्तेच्या शिक्षणातून संस्कारक्षम, चांगला माणूस घडवणं हे माझं ब्रीद आहे. आणि हीच भावना मनात घेऊन आज जवळजवळ 15 वर्षं दीपस्तंभ ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेअंतर्गत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.”

आपल्याकडे गुरुकुलात राहून, गुरूकडून विद्या घेण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. हीच परंपरा उत्तम रितीने पुढे नेत आहे, दीपस्तंभ या संस्थेचा गुरुकुल प्रकल्प. समाजातल्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यात कुठलाही अडथळा येऊ नये, त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांच्या क्षमतांवर मर्यादा येऊ नयेत या हेतूने हा प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पात असणार्या मुलांच्या घराची परिस्थिती अगदी बिकट. काहींचे पालक कामगार आहेत, काहींचे व्यसनाधीन आहेत, काही देवदासींची मुलं आहेत तर काही दुर्गम भागातली मुलं आहेत. या प्रकल्पात मुलांच्या राहण्याची, खाण्याची, शिक्षणाची विनामूल्य सोय केली जाते. परिस्थिती कशीही असो, ती बदलण्याची ताकद दीपस्तंभने या मुलांना दिली आहे. त्यांनादेखील मोठी स्वप्न बघण्याचा, स्वत:च्या पायावर उभं राहण्याचा हक्क आहे याची जाणीव त्यांना करून दिली आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून, त्यांना उंच भरारी घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम यजुर्वेंद्रजी आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

 

seva_2  H x W:  

परिस्थिती कशीही असो, प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या हितासाठी कष्ट घेत असतात. पण ज्या मुलांचे पालकच अस्तित्वात नाहीत, कुटुंबातली कोणतीच व्यक्ती सोबत नाही अशा मुलांची काळजी कोण घेणार? या विचाराने अस्वस्थ होऊन, यजुर्वेंद्रजींनी अशा मुलांचीदेखील जबाबदारी स्वीकारली. ज्यांचं या जगात कोणीच नाही अशा अनाथ मुलांना आपल्या स्वत:च्या मुलांप्रमाणे वाढवण्याचा वसा त्यांनी घेतला आणि आज ते मायेने या मुलांचं संगोपन करत आहेत. समाजातल्या अशा अनाथ मुलांसाठी त्यांनी संजीवन प्रकल्पाची सुरुवात केली. जी मुलं जन्मत: अनाथ आहेत किंवा अगदी लहानपणीच अनाथ झाली आहेत, अशा मुलांची काळजी अनाथाश्रमात घेतली जाते. पण वयाची 18 वर्षं पूर्ण झाल्यानंतर या मुलांना कायद्यानुसार आश्रमात राहता येत नाही. 18 वर्षांनंतर त्यांना स्वतःच्या जगण्याचे मार्ग स्वत: शोधावे लागतात. अशा वेळी या मुलांना योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, तर ही मुलं कुवत असूनही मागे राहतात, वाईट मार्गालादेखील लागतात. म्हणूनच अशा मुलांची जबाबदारी घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन एका नव्या आयुष्याची संजीवनी देण्याचं काम दीपस्तंभ संस्था करत आहे. आज या प्रकल्पात 51 मुलं आहेत आणि त्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि शिक्षणाची संपूर्ण सोय इथे केलेली आहे. इतकंच नव्हे, तर आई-वडिलांचं छत्र अगदी लहानपणीच हरवलेल्या या मुलांना योग्य संस्कार देण्याचं मोलाचं कामसुद्धा या प्रकल्पात केलं जातं. खरंच आहे, या मुलांसमोर समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या दृष्टीने अनेक प्रश्न असतात. समाज त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. त्यांना सहज नोकर्या मिळत नाहीत. राहण्याची सोय होत नाही. पण जेव्हा दीपस्तंभसारखी संस्था त्यांना आपलंसं करते आणि समाजात ही मुलं अशा संस्थेचा भाग म्हणून वावरतात, तेव्हा त्यांच्याविषयीचा दृष्टीकोन नक्कीच बदलतो. या संस्थेच्या माध्यमातून या मुलांना योग्य शिक्षण दिलं जातं, नोकरी मिळवून दिली जाते, त्यांची लग्नदेखील लावली जातात. त्यांच्या आयुष्याला एक समृद्धी येते आणि म्हणूनच प्रत्येक अनाथ मुलाला ही संधी मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

शिक्षणाच्या, करिअरच्या समान संधी मिळणं हा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. पण जेव्हा निसर्गानेच एखाद्या व्यक्तीला खूप मोठी आव्हानं दिलेली असतात, तेव्हा या संधींपर्यंत पोहोचणं त्या व्यक्तीसाठी कठीण होतं. म्हणूनच दीपस्तंभ संस्थेनेमनोबलहा प्रकल्प सुरू केला आणि दिव्यांग व्यक्तींना योग्य शिक्षण, प्रशिक्षण दिलं. 18 वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींसमोर स्वावलंबी होऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचं खूप मोठं आव्हान असतं. अशा वेळी त्यांना योग्य दिशा मिळणं, त्याच्यातल्या क्षमतांची जाणीव करून देणं आणि त्यांचं मनोबल वाढवणं खूप महत्त्वाचं असतं, हे लक्षात घेऊन या प्रकल्पाची सुरुवात झाली. महाराष्ट्रभरातून 50 दिव्यांग व्यक्तींसह हा प्रकल्प सुरू झाला आणि आज या प्रकल्पात शिकलेली 11 मुलं पीएच.डी. करत आहेत, काही मुलं यू.पी.एस.सी.ची तयारी करत आहेत, जवळपास 70 मुलं प्रथम किंवा द्वितीय श्रेणीतील अधिकारी झाले आहेत. इतकंच नव्हे, तर सध्या ऑनलाइन साधनांच्या मदतीने देशातील 18 राज्यातली मुलं जळगावच्या या ग्रामीण भागातल्या संस्थेत शिक्षण घेत आहेत आणि दीपस्तंभ ही भारतातली अशी एकमेव संस्था आहे, जिथे सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण मोफत दिलं जातं.

या प्रकल्पांबरोबरच ग्रामीण, आदिवासी भागातल्या मुलांसाठीदेखील संस्था काम करते आहे. तसंच शिक्षक आणि पालक यांच्यासाठीसुद्धा प्रशिक्षणाचे अनेक उपक्रम इथे राबवले जातात. भविष्यात हे काम देशपातळीवर नेऊन संस्थेचं मोठं स्वरूप म्हणजेच नॅशनल मॉडेल प्रोजेक्ट जळगावला उभारण्याचा यजुर्वेंद्रजींचा मानस आहे. यासाठी त्यांना अनेक व्यक्तींचं सहकार्यदेखील मिळालं आहे. 300 दिव्यांग, अनाथ, आदिवासी तरुण मुला-मुलींसाठी हा निवासी प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दर वर्षी भारतातील 300 मुलं आपलं आयुष्य समृद्ध करतील आणि परिस्थितीने त्यांच्यापासून हिरावून घेतलेल्या संधी हक्काने मिळवतील.

खरंच, हे इतकं मोठं शिवधनुष्य पेलणं ही अजिबात सोप्पी गोष्ट नाही. या संपूर्ण प्रवासाविषयी बोलताना यजुर्वेंद्रजी म्हणतात, “मी आज जे काही केलं, ती खरी म्हणजे समाजसेवा नाहीच. ही तर मी एका प्रकारे कृतज्ञता व्यक्त करतो आहे. निसर्गाने मला इतक्या गोष्टी अगदी भरभरून दिल्या, पण काही व्यक्तींना मात्र या गोष्टी दिल्याच नाहीत. त्यांना आधार देऊन मी निसर्गाला फक्त थँक्यू म्हणतोय, एवढंच.”

 

खरंच, अनेक चांगल्या-वाईट अनुभवातून जात, स्वत:च्या हिमतीच्या बळावर आणि या सर्व मुलांच्या आयुष्यातून प्रेरणा घेत यजुर्वेंद्रजींनी हा संपूर्ण डोलारा आज उभा केला आहे. अगदी स्वत:चं घर-दार, जमीन-जुमला विकून त्यातून निधी उभारून त्यांनी या सगळ्याची सुरुवात केली. या सगळ्यांच्या मनात असणारी एकोप्याची भावना आणि त्याला मिळणारा समाजातल्या संवेदनशील व्यक्तींचा आधार यामुळेच भारताची संस्कारक्षम नवी पिढी तयार होते आहे. प्रत्येकाच्या मनातली कृतज्ञतेची भावना आपल्यालादेखील बरंच काही शिकवून जाते आणि आपलं रोजचं आयुष्य जगताना एक प्रेरणा, नवी उमेद देऊन जाते.


आज
समाजातील प्रत्येक घटकाने आपला खारीचा वाटा उचलण्याची गरज आहे आणि म्हणूनच जर कुणाला दीपस्तंभ संस्थेला मदत करायची असेल, तर 8380076545 या क्रमांकावर संपर्क करा किंवा www.deepastambhfoundation.org या संकेतस्थळाला भेट द्या.