'संघमंत्राचे उद्गाते डॉक्टर हेडगेवार' विशेषांकाचा प्रकाशन सोहळा

विवेक मराठी    10-Jul-2021
Total Views |

जालना: 'संघमंत्राचे उद्गाते डॉ. हेडगेवार' विशेषांक प्रकाशन सोहळा आज शुक्रवारी (दि. ९) जालना येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

RSS_1  H x W: 0

येथील देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित छोटेखानी कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक नितीन खंडेलवाल, प्रसिद्ध उद्योजक घनश्यामदास गोयल, प्रमुख वक्ते प्रांत सहकार्यवाह विलासअण्णा दहिभाते यांच्या हस्ते डॉ. हेडगेवार यांच्यावर आधारित विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

या वेळी बोलताना प्रमुख वक्ते विलासअण्णा दहिभाते म्हणाले की, "डॉ. हेडगेवार यांनी स्वतःसाठी काहीही केले नाही, त्यांनी फक्त हिंदू समाजासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन आपले जीवन या कार्यासाठीच समर्पित केले. त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायक आहे."

घनश्यामदास गोयल यांनी "या विशेषांकाच्या माध्यमातून डॉ. हेडगेवार आणि संघाचे कार्य सर्वांना प्रेरणादायक ठरणार आहे" असे सांगून या विशेषांकाला शुभेच्छा दिल्या.

जिल्हा संघचालक डॉ. नितीन खंडेलवाल यांनीही आपल्या मनोगतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची आणि राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन या विशेषांकाला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा प्रतिनिधी किरण देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि या विशेष अंकाबद्दल माहिती दिली.

या कार्यक्रमाला स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.