भारताच्या राष्ट्रीयत्वाचा अनंत प्रवाह उलगडणारा

विवेक मराठी    12-Jul-2021
Total Views |
@रतन शारदा
भारत राष्ट्राचे मूळ समजून घ्यायचे असेल, तर ‘भारत के राष्ट्रीयत्व का अनंत प्रवाह’ या पुस्तकाइतका उत्तम स्रोत कोणताही नसेल. खरे तर या पुस्तकाचे लेखक इतके प्रगल्भ आहेत की या लेखाला समीक्षा म्हणण्याचे धारिष्ट्य मी करणार नाही. म्हणूनच याला पुस्तक परिचय म्हटले आहे. या पुस्तकात हिंदुत्वाचे आयाम, राष्ट्रासमोरील आव्हाने, हिंदुत्वाचे समग्र चिंतन या विषयांवर अनुक्रमे मा. मनमोहन वैद्य, मिलिंद ओक आणि प्राचार्य डॉ. भगवती प्रकाश यांचे अत्यंत प्रभावी विवेचन आहे.

RSS_1  H x W: 0

‘भारत के राष्ट्रीयत्व का अनंत प्रवाह’ हे केवळ पुस्तक नसून भारताच्या राष्ट्रवादाचा बीजमंत्र आहे. राष्ट्रीयत्वाची व्याख्या आणि तत्त्वज्ञान यांचे पारंपरिक भारतीय ग्रंथाच्या संदर्भात विवेचन करणारे हे पहिलेच पुस्तक असेल. भारताची हजारो वर्षांची परंपरा असलेले राष्ट्रीयत्व हे स्वयंसिद्ध आहे, आधुनिक काळात उदयाला आलेल्या कोणत्याही पाश्चात्त्य व्याख्येची त्यासाठी गरज नाही. राष्ट्रीयत्वाची इतकी स्पष्ट व्याख्या आजपर्यंत कोणत्याही विचारवंताने केलेली नाही, हे सांगायला मला अजिबात संकोच वाटत नाही. भारताच्या राष्ट्रीयत्वाची मुळे त्याच्या हजारो वर्षांच्या इतिहासातच आहेत.

या पुस्तकाचे लेखक माननीय रंगा हरीजी यांचे स्थान रा.स्व. संघाच्या मुख्य विचारवंतांच्या पहिल्या रांगेत आहे. हरीजींनी उज्जैन व हैदराबाद येथे जेव्हा हा विषय मांडला होता, तेव्हा माझ्या सुदैवाने मी त्या कार्यक्रमांना उपस्थित होतो. हे पुस्तक त्याच एक तासाच्या विषयमांडणीचे बृहद्रूप आहे. हा विषयप्रवाह लेखकाने 19 अध्यायांत विभाजित केला आहे अणि त्याला ‘तरंग’ असे म्हटले आहे. राष्ट्र, राष्ट्रीयत्व, राष्ट्रीय, राष्ट्रीयता आणि या विषयाशी संबंधित जवळजवळ प्रत्येक शब्दाचे मूळ (etymology) आणि मूलभूत विचार यात अतिशय सखोलपणे मांडण्यात आले आहेत.
 
मा. हरीजी यांचे वैशिष्ट्य असे की क्लिष्ट विषयही ते अतिशय सुलभ शैलीत मांडू शकतात. परंतु हे सांगावे लागेल की या पुस्तकाचे सुरुवातीचे अध्याय, त्यांचे पारंपरिक संदर्भ आणि त्यांच्या व्याख्या समजूून घेणे वाचकांना थोडे कठीण वाटू शकते. संस्कृत आणि वेद यांच्याविषयीचे आपले अपुरे ज्ञान लक्षात घेता किमान सुरुवातीचे 9 तरंग किंवा अध्याय संयमाने आणि एक एक करून वाचायला हवेत, अन्यथा आपण त्याचे मर्म समजू शकत नाही. या ज्ञानगंगेत उतरण्याचा आनंदही तेव्हाच मिळेल, जेव्हा तुम्ही यात संयमाने एक एक डुबकी घ्याल.
 
वेदकाळापासून यास सुरुवात होते. पं. सातवळेकर महाराज (ज्यांना हे पुस्तक अर्पण करण्यात आले आहे) यांचा आणि कित्येक स्रोतांचे संदर्भ यात देण्यात आले आहेत. समाज, समिती, राष्ट्राचा उगम, त्याची वेगवेगळ्या युगातील बदललेली संकल्पना आणि राष्ट्राचा विकास हे मुद्दे वाचकांना सर्व बाजूंनी समजावत भारताच्या इतिहासाशी त्यांना जोडत आधुनिक भारतापर्यंतचा सुमारे 6000 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास लेखक वाचकाला सहज करवून आणतात.
 
 
रंगा हरीजी अथर्ववेदाचा उल्लेख करतात, या भूभागात राहणार्‍या माणसाने सर्वप्रथम स्वत:ला पृथ्वीचा पुत्र व तिला आपली माता मानले. (माता भूमी: पृथ्वी पुत्रो अहम् पृथिव्या:). ते त्यापुढे असेही मानतात की, मानव, पशु-पक्षी सर्वांचेच ही माता पालनपोषण करते. अशा प्रकारे त्याने या भूमीला आदर आणि प्रेम दिले. त्यांच्या मते हे नाते लक्षात घेतले, तर भारतीय देशप्रेमालाpatriotism न म्हणता  matriotism म्हणावे लागेल. पुढे जाऊन या द्रष्ट्यांनी असेही म्हटले आहे की पृथ्वीवर विविध भाषा बोलणारे, विविध रितीरिवाज पाळणारे सहवासी आहेत. पृथ्वी या सगळ्यांचे मातेप्रमाणे आदराने, ममतेने आणि प्रेमाने पालन करते.
राजा ही संस्था स्थापन होण्यापूर्वीपासूनच येथील दूरदर्शी ऋषींनी राष्ट्राची संकल्पना केली होती, ज्यात समुद्रापासून हिमालयापर्यंत भारतभूमीचा आणि त्यात राहणार्‍या मानव, विविध पशू-पक्षी यांचा विचार आहे. भारत म्हणजे भा - प्रकाश, त्यात राहणारी तिची संतती म्हणजे ‘भारती’, असे वर्णन वैदिक ऋषींनी केले आहे. हे सर्व हरीजी वेदांतील वेगवेगळ्या सूूक्तांचा संदर्भ देऊन सांगतात आणि म्हणतात - ‘वेदकाळात उदयास आलेल्या भारत राष्ट्राच्या हजारो वर्षांनंतर उदयास आलेल्या युरोपात निर्माण झालेली राष्ट्र ही संकल्पना अगदी वेगळी आहे. भारत हे शांतिप्रिय राष्ट्र आहे, तर पाश्चात्त्य राष्ट्रे हिंसेने व स्वार्थभावाने निर्माण झाली आहेत.’
पुढे लेखक राजाविहीन राष्ट्र ते राजायुक्त राज्य या उत्क्रांतीवर प्रकाश टाकतात. महाभारतात भीष्म आपला नातू युधिष्ठिर याला या उत्क्रांतीविषयी सांगतो. त्यापुढील उत्पत्तीचे ऐतिहासिक सिंहावलोकन पुढील अध्यायांत आहे. या उत्क्रांतीला कित्येक हजारो वर्षं लागल्याचे आपल्या शास्त्रांतूून कळते. तसेच किती प्रकारची राज्ये आणि राजे अशी कार्यप्रणाली होती, त्याचे संदर्भ आपल्या वेद-पुराणांत मिळतात. या राजायुक्त राज्यांच्या चढ-उतारांचा इतिहास रामायण काळ ते महाभारत काळापर्यंतचा प्रवास, त्यानंतर आर्य चाणक्यांचे भारत राष्ट्रसंकल्पनेतील योगदान याची चर्चा या पुस्तकात करण्यात आली आहे. आधुनिक इतिहासात उल्लेखलेल्या काळात भारताला एक राष्ट्र व एकतेचा बोध सांगण्यात, तसेच अर्थशास्त्रात आर्य चाणक्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे.
नंतरच्या काळातील परकीय आक्रमकांचे भारतीय संस्कृतीवरील आणि लोकांवरील अत्याचार, त्याकारणाने राष्ट्रप्रवाह भूमीच्या पोटात लुप्त होणे, भक्ती काळातील जागृती, ब्रिटिशांचा साम्राज्यवाद, त्यात भारताच्या आत्म्यालाच जखमा करण्याचा आणि त्याच्या संस्कृतीची मुळेच छाटून टाकण्याचा झालेला प्रयत्न यांचाही उल्लेख यात आहे. स्वामी विवेकानंद, बंकिमचंद्र यांसारख्या एकोणिसाव्या शतकातील महापुरुषांनी भारताच्या आत्म्याला पुन्हा जागृत करण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख हरीजी अतिशय सुंदर प्रकारे करतात. महिलांचे महत्त्वपूर्ण योगदानही ते अधोरेखित करतात.
 
उत्तरपाडा येथील आपल्या प्रसिद्ध भाषणात महर्षी अरविंद यांनी भारत राष्ट्राची भूमिका विश्व राष्ट्रात काय असेल आणि त्याच्या जन्माचे लक्ष्य काय आहे याचा उल्लेख केला होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्या वेळचे नेते भारताचे योगदान विसरले नव्हते. त्यामुळे आपल्या संविधानात, लोकसभा कक्ष, न्यायालय यात कोरलेली आपल्या विविध ग्रंथांतील महावाक्ये त्याचेच द्योतक आहेत. या वैचारिक स्पष्टतेला पुढे जाऊन ग्रहण लागले.

 
आपल्या लेखनाला पूर्णविराम देताना हरीजी भारताची वर्तमान काळात काय भूमिका असायला हवी याविषयी लिहितात.
भारत राष्ट्राचे मूळ समजून घ्यायचे असेल, तर या पुस्तकाइतका उत्तम स्रोत कोणताही नसेल. खरे तर या पुस्तकाचे लेखक इतके प्रगल्भ आहेत की या लेखाला समीक्षा म्हणण्याचे धारिष्ट्य मी करणार नाही. म्हणूनच याला पुस्तक परिचय म्हटले आहे. या पुस्तकात हिंदुत्वाचे आयाम, राष्ट्रासमोरील आव्हाने, हिंदुत्वाचे समग्र चिंतन या विषयांवर अनुक्रमे मा. मनमोहन वैद्य, मिलिंद ओक आणि प्राचार्य डॉ. भगवती प्रकाश यांचे अत्यंत प्रभावी विवेचन आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, रंगा हरीजी यांनी राष्ट्र, राष्ट्रीयत्व इत्यादींच्या व्याख्या, इतिहास आणि तत्त्वमान मांडताना कोणत्याही पाश्चात्त्य ग्रंंथांचा संदर्भ घेतलेला नाही. यातून हेही स्पष्ट होते की, भारतीय तत्त्वज्ञान, भारताची राष्ट्र ही संकल्पना समृद्ध आणि परिपूर्ण आहे. हे पुस्तक कोणत्याही राष्ट्राला भारतीय तत्त्वज्ञानातून समजू इच्छिणार्‍या अभ्यासक वा जिज्ञासू याच्या ग्रंथसंग्रहात असलेच पाहिजे. मी तर असेही म्हणेन की हे पुस्तक सर्व मान्यवर विद्वानांना आणि तथाकथित विद्वानांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे भेट देण्यात आले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर बसलेली धूळ स्वच्छ होईल.
 
(हे पुस्तक hindueshop.com वर उपलब्ध आहे आणि तुम्ही ते ऑनलाइनही मागवू शकता.)

अनुवाद - सपना कदम-आचरेकर