न्यूयॉर्क टाइम्सचा उन्माद

विवेक मराठी    12-Jul-2021   
Total Views |
न्यूयॉर्क टाइम्सचा भारताविषयी आणि पंतप्रधान मोदींविषयी द्वेष सर्वश्रुत आहे. ‘बिझनेस’ प्रतिनिधी नेमण्याच्या जाहिरातीतून ते अधिकच गडद होत आहे. तो प्रतिनिधी मोदींविरोधी हवा या मागणीने त्यांनी आपले उन्मादी स्वरूप स्पष्ट करून आजवरच्या सर्व संकेतांना डांबर फासले आहे.

times_4  H x W:
 
आम्ही पत्रकारितेच्या वर्गात शिकत असताना आम्हाला न्यूयॉर्क टाइम्सच्या बातम्यांची आणि मथळ्यांची खासियत शिकवली जात असे. तेव्हा आमच्या शिक्षकांनी सांगितलेली ही खरीखुरी गोष्ट आहे.
“एकदा काय झाले, तेव्हाचे पोप न्यूयॉर्कला भेट देण्यासाठी विमानतळावर उतरले असता पत्रकारांनी त्यांच्याभोवती गराडा घातला. एका पत्रकाराने पोपना प्रश्न विचारला की, “तुम्ही तुमच्या या भेटीत वेश्यागृहांना भेट देणार आहात का?” त्यावर पोप यांनी विचारले की, “काय, येथे वेश्यागृहे आहेत?” न्यूयॉर्क टाइम्सचा वार्ताहर अर्थात तिथे होताच. त्याचे काम झाले. त्याने पोपच्या आगमनाची बातमी तयार केली. तिचे शीर्षक दिले गेले, ‘पोप यांनी न्यूयॉर्कला उतरताच पहिला प्रश्न केला की, “न्यूयॉर्कमध्ये वेश्यागृहे कोठे आहेत?” बातमी अर्थातच त्याने त्याच पद्धतीने लिहिली, यात शंका नाही. सांगायचा मुद्दा असा की पन्नास वर्षांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्स जसा होता, तसाच तो आजही आहे - किंबहुना त्याची मस्ती आणखीनच वाढलेली आहे.

हे सर्व आठवायचे कारण असे की, न्यूयॉर्क टाइम्सला भारतात उद्योग प्रतिनिधी नियुक्त करायचा आहे. तो अर्थातच दक्षिण आशियाचे काम दिल्लीतून पाहणारा असेल. म्हणजेच थोडक्यात तो पाकिस्तान, बांगला देश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव, भारत या देशांचे काम येथून पाहणारा असला पाहिजे. अफगाणिस्तानच्या बातम्यांवर चांगले लक्ष पाकिस्तानमधूनच ठेवले जाऊ शकते, हे उघड आहे. तिथली व्यक्ती अफगाणिस्तानमध्ये जाऊन-येऊन असेल. तसे पाकिस्तानमध्ये तालिबान आणि त्यांचे प्रतिनिधी जात-येत असतातच आणि आता त्यांचा दोस्ताना अधिकच निर्वेध वाढणार आहे. त्यांच्याशी बोलले की त्यांची बाजू कळते आणि त्यांना सध्या तालिबानांची बाजू समजून घेण्याचेच काम आहे. आता अमेरिकेने तिथून काढता पाय घेतलेला असल्याने ‘गरज सरो आणि वैद्या मरो’ अशी अफगाणिस्तानची अवस्था आहे. तर या अशा जगप्रसिद्ध न्यूयॉर्क टाइम्सला नवी दिल्ली येथे व्यापार प्रतिनिधी म्हणजेच ‘बिझनेस कॉरस्पाँडंट’ नेमायचा आहे. तो कसा असावा, तर तो मोदींच्या धोरणाच्या विरोधात असला पाहिजे, ही त्यांची प्रमुख अट आहे. न्यूयॉर्क टाइम्सची बरोबरी करायची माझी इच्छा नाही, पण एक निश्चित की बातमीदार नेमताना तुम्ही कोणाच्या विरोधात लिहायला पाहिजे किंवा कोणाविरुद्ध नाही, असे चुकूनही आम्ही बजावलेले नाही. आमच्या दृष्टीने जी घडते ती बातमी असते. बातमी ही पवित्र असते आणि तिच्यावर करायची मल्लीनाथी किंवा तुमचा दृष्टीकोन हा कोणत्याही दडपणाखेरीज व्यक्त व्हावा, हेच आमचे धोरण तेव्हा असायचे. आता न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या जाहिरातीत काय म्हटले होते ते पाहू.times_3  H x W:
 
त्यांनी म्हटले होते की, ‘येत्या काही वर्षांत चीनवर लोकसंख्येच्या बाबतीत भारत मात करणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत हा आपल्या मताला अधिक किंमत लाभेल असे गृहीत धरतो आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चैतन्यदायक नेतृत्वाखाली भारत चीनच्या आशियाई आर्थिक आणि राजकीय ताकदीला आव्हान द्यायची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. चीनबरोबर लागून असणार्‍या तणावग्रस्त सरहद्दीवर आणि या प्रदेशात असणार्‍या राष्ट्रीय राजधान्यांमध्येही नाटक घडविण्यात येत आहे. नरेंद्र मोदी हे स्वयंपूर्णतेचे आणि देशाच्या हिंदू बहुसंख्येच्या जोरावर पिळदार राष्ट्रीयत्वाचे गुणगान नेहमीच गात असतात. त्यांचा हा दृष्टीकोन भारताच्या संस्थापकांनी घालून दिलेल्या आधुनिक भारताच्या परस्पर विश्वासाच्या आणि बहुसांस्कृतिकतेच्या मूल्यांना धक्का देणारा आहे. माध्यमांची गळचेपी आणि ‘ऑनलाइन’ लिखाण यांना बाधा आणली जात असून माध्यमांचे विचारस्वातंत्र्य यांच्यावर पोलिसांची करडी नजर राहात असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तंत्रज्ञानसुद्धा अडथळ्यांमध्ये अडकलेले आहे. अशा वेळी आम्हाला नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लिखाण करू शकणारा आणि तो लोकशाहीने निवडून आलेल्या सरकारविरोधात घणाघात करू शकणारा असावा.’ इथे त्यांनी या जाहिरातीत, ‘पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, बांगला देश यांच्या अतिशय समृद्ध अशा पारंपरिक इतिहासाबद्दल आणि या देशांच्या शेजारी असलेल्या प्रचंड अशा देशाशी (म्हणजेच भारताशी) असलेल्या त्यांच्या संबंधांबाबतही लिहावे लागेल’ अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. म्हणजे त्या त्या देशाचा इतिहास समृद्ध आहे आणि त्यांच्या तुलनेत भारत फक्त आकाराने प्रचंड आहे, एवढेच त्यांना म्हणायचे आहे. कदाचित भारत जर एवढा आकाराने केवळ मोठा असेल, तर त्याचे तुकडे कसे पडतील हेही त्याला किंवा तिला पाहावे लागण्याची शक्यता आहे. हे खूपच मोठे कारस्थान आहे आणि त्यासाठीही त्यांना चीनकडून आणि अमेरिकेकडून आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे; किंबहुना त्यांच्याच प्रेरणेने ही जाहिरात न्यूयॉर्क टाइम्सच्या ‘लिंक्डइन’ आणि ‘ट्विटर’ खात्यांवर दि. 1 जुलै रोजी प्रसिद्ध केली गेली आहे. 
म्हणजे त्यांना नरेंद्र मोदींच्या विरोधात आघाडी उघडायची आहे आणि त्यासाठी त्यांना दक्षिण आशियात प्रतिनिधी हवा आहे. थोडक्यात, आपण ‘सीआयए’ या अमेरिकन किंवा ‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करणार आहोत, असे त्या अर्जदाराला वाटले पाहिजे, अशीच त्यांची भावना दिसते आहे. आपल्याला कोणती व्यक्ती कोणत्या उद्देशाने हवी आहे हे अगदी सीआयएसारखी संस्थाही इतक्या उघडपणे सांगणार नाही. कामावर घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीला त्याच्याकडून अपेक्षा काय आहेत हे सांगताना त्या संबंधित संस्थेचे वरिष्ठ अधिकारी त्याला त्याचे ‘कार्यक्षेत्र’ समजावून देतील. हे तुला जमणार नसेल तर आताच सांग असेही सांगितले जाईल, पण नोकरीवर नियुक्त करण्यापूर्वी ‘तुला हे सरकार हादरवून सोडण्यासाठी किंवा पाडण्यासाठी आम्ही नेमणार आहोत’ असे कोणीही सागंणार नाही. म्हणजे ज्या न्यूयॉर्क टाइम्सला भारतात प्रतिनिधी नेमायचा आहे, तो किती कोडगा आणि निलाजरा असला पाहिजे, हेच या एका जाहिरातीने स्पष्ट केले आहे. हा प्रतिनिधी ‘बिझनेस कॉरस्पाँडंट’ असेल आणि तो बिझनेस कसला करणार आहे? तर तो सरकारविरोधीच केवळ लेखन करेल आणि तो या देशात जो समाज बहुसंख्येने आहे, त्याच्याविरोधात ‘बिझनेस’ म्हणजेच उद्योग करणार आहे. इंग्लिशमध्ये बिझनेस शब्दाचा अर्थ खरेदी-विक्री करणारी व्यक्ती, असाही होतो. थोडक्यात इथे नियुक्त केली जाणारी व्यक्ती खरेदी-विक्रीतही सहभागी होणारी असेल, हे सांगायची काही गरज आहे असे वाटत नाही.

ही खरेदी-विक्री कोणत्या पद्धतीची असेल, हे स्पष्ट झालेले नाही. ज्या न्यूयॉर्क टाइम्सने आपले घोषवाक्य एकेकाळी ‘छापण्यालायक असेल ती सर्व बातमी’ असे ठेवले होते, त्याने मधल्या काळात आपल्या घोषवाक्यात बदल करण्यासाठी एक स्पर्धा लावली होती. त्यात एक घोषवाक्य त्यांनी निवडले होते ते म्हणजे, ‘बातमी, मळमळ नव्हे.’ मग त्यांनी ‘पुरेशी बातमी गोंगाटाशिवाय’ अशा अर्थाचे घोषवाक्य निवडले. त्यांच्या स्पर्धेत एक घोषवाक्य आले, ते म्हणजे ‘सार्वजनिक वृत्तपत्र, सार्वजनिक विश्वास’ असे बनवले. पण तेही त्यांना पसंत पडेना. मग त्यांनी ‘सर्व जगाच्या बातम्या, पण भ्रष्टाचाराची पाठशाळा नव्हे’ असे काहीसे बोजड वाटणारे घोषवाक्य निवडले, पण ते स्वीकारले नाही आणि छापलेही नाही. त्यांनी ‘फक्त सत्य बोलू’ असे एक घोषवाक्य मधल्या काळात स्वीकारले, पण ते काही थोडेच दिवस. त्यांच्यातल्या त्या सत्यालाही लाज वाटली असायची शक्यता आहे. कारण ‘चायना डेली’ हे चीनचे इंग्लिश भाषेत प्रसिद्ध होणारे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र. त्याने न्यूयॉर्क टाइम्ससह काही अमेरिकन वृत्तपत्रांना 1 कोटी 90 लाख अमेरिकन डॉलर्सचा मलिदा चारला होता. त्यातला 50 हजार डॉलर्सचा चारा एकट्या न्यूयॉर्क टाइम्सचा होता. वॉल स्ट्रीट जर्नलला साठ लाख डॉलर्स देण्यात आले. 46 लाख डॉलर्स वॉशिंग्टन पोस्टला देण्यात आले. ते जाहिरातींच्या रूपाने किंवा जाहिराती छापण्याचा दर म्हणून देण्यात आले. जे नियतकालिक केवळ आंतरराष्ट्रीय धोरणाच्या विषयाला वाहिलेले आहे, अशा ‘फॉरिन पॉलिसी’ला 2 लाख 40 हजार डॉलर्स देण्यात आले. ट्विटरवर 2018मध्ये छापलेल्या जाहिरातींबद्दल 2 लाख 65 हजार 622 डॉलर्स चारण्यात आले. हे सर्व जाहिरातींसाठीचेच पैसे आहेत असे नाही. त्यांनी जाहिराती छापून दिल्या किंवा अमेरिकेत वाटण्यासाठी अंक छापून दिले, त्याबद्दलची ही किंमत आहे असे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही सारी आकडेवारी अमेरिकेच्या न्याय खात्याकडे चीनकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळेही असेल, त्यांनी पुन्हा एकदा आपले घोषवाक्य बदलून ‘छापण्यायोग्य असेल ती सर्व बातमी’ असे केले. म्हणजेच ‘जी पैशाने विकत घेता येण्याजोगी असेल, ती सर्व बातमी’ असाही त्याचा अर्थ आता लावता येऊ शकतो. (आपल्या वृत्तपत्रसृष्टीत काही वेगळे चाललेले बहुधा नसावे.) थोडक्यात, न्यूयॉर्क टाइम्सला चीनचे वकीलपत्र घेऊन भारतावर आणि विशेषत: नरेंद्र मोदी याच्यावर तुटून पडण्यासाठी एक प्रतिनिधी नियुक्त करायचा आहे. भारतात त्यांचा तुटवडा नाही, हेही तितकेच खरे.

‘चायना डेली’ हे चीनचे इंग्लिश भाषेत प्रसिद्ध होणारे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र. त्याने न्यूयॉर्क टाइम्ससह काही अमेरिकन वृत्तपत्रांना 1 कोटी 90 लाख अमेरिकन डॉलर्सचा मलिदा चारला होता.
times_2  H x W: 
  
न्यूयॉर्क टाइम्सची भारतविरोधी भूमिका आजचीच आहे असे नाही. मोदी सत्तेवर आहेत म्हणून ती असली, तरी ती यापूर्वीही प्रकट झालेली आहे. नरेंद्र मोदी यांचा 2014मध्ये घसघशीत विजय होण्यापूर्वी ती नव्हती असेही नाही. पण त्या वेळी त्या वृत्तपत्रात भारताला फारच कमी स्थान मिळत असे. भारत हा काही गुंतवणूक करण्याच्या लायकीचा देश आहे असे त्यांना वाटत नसावे. पंतप्रधानपद स्वीकारल्यावर नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेत पहिल्यांदा पोहोचले, तेव्हा त्यांनी केलेल्या आपल्या पहिल्यावहिल्या भाषणात या स्थितीचा उल्लेख केला होता. ‘भारत हा साप आणि गारुड्यांचा, तसेच काळी जादू करणार्‍यांचा देश आहे अशी अमेरिकेत समजूत प्रचलित होती, ती मोडून पडली असून आता भारत एका वेगळ्या क्रांतीकडे पोहोचलेला देश आहे, हे मान्य केले जात असल्याचे पाहायला मिळते आहे’ अशा अर्थाचे विधान मोदींनी तेव्हा केले होते. हे भाषण 28 सप्टेंबर 2014च्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झाले आहे.


times_6  H x W:
 photo credit to internet
 

त्यानंतर अक्षरश: दहा दिवसांनी त्याच वृत्तपत्राच्या संपादकीय पानावर भारताच्या ‘मंगळ मोहिमे’विषयी एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले आहे. त्यात एक भारतीय आपल्या गायीला घेऊन बड्या किंवा समृद्ध देशांच्या अंतराळ कार्यक्रमाच्या बैठकीचे दार ठोठावताना दिसतो आहे. दि. 7 ऑक्टोबर 2014च्या न्यूयॉर्क टाइम्सच्या अंकात हे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले आहे. त्यानंतर न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकीय पानाचे संपादक अँड्र्यू रोझेन्थाल यांच्या सहीने ‘या व्यंगचित्राने वाचकांच्या भावना दुखावल्या गेल्या’चे कबूल करून त्यांची माफी मागितली आहे. त्यात आपले व्यंगचित्रकार हेंग किम साँग हे सिंगापूरमध्ये असतात, त्यांना परिस्थितीची पुरेशी जाणीव नसल्याने ही चूक झाली, त्याबद्दल आम्ही माफी मागतो, असे त्यांनी म्हटले आहे. सिंगापूरच्या व्यंगचित्रकाराला कल्पना आली नसेल, पण जे संपादक तेव्हा होते ते काय झोपले होते का? त्यांनी दहाच दिवसांपूर्वी मोदी नावाच्या नवख्या (तेव्हाच्या) पंतप्रधानांचे न्यूयॉर्कच्याच मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये झालेले प्रचंड स्वागत अनुभवलेले असेलच, किमानपक्षी त्यांनी ते भाषण आपल्याच वृत्तपत्रात वाचले असेल, मग तरीही अशी चूक त्यांच्या हातून होत असेल तर ते एकतर अडाणी किंवा ठार वेडे असले पाहिजेत. असेच वेडे त्यांना हवे असतील, तर ते तिथे अमेरिकेत भरपूर असतील, त्यांनाच त्यांनी दक्षिण आशियाई प्रतिनिधी नेमायला हरकत नाही. याचा अर्थ भारतात ते नाहीत, असाही नाही.

times_5  H x W:
photo credit to internet
  
भारताने पूर्व पाकिस्तानला पाकिस्तानपासून तोडून बांगला देश निर्माण केल्यावर 9 डिसेंबर 1971च्या न्यूयॉर्क टाइम्सच्या अग्रलेखात संपादकांनी तोडलेले तारेही अपूर्व असे आहेत. त्यांनी ‘बांगला देश निर्माण झाल्याची फळे भारताला भोगावी लागतील’ असे त्यात धमकावले होते. इंदिरा गांधी यांच्यावर टीका करण्यात हे वृत्तपत्र अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यापुढे दोन पावले होते. संयुक्त राष्ट्रसंघाचे आवाहन ठोकरून लावणार्‍या भारताने सर्व तर्‍हेच्या नैतिक भाषेचे अधिकार गमावले आहेत, असेही त्यांनी म्हटले होते. पाकिस्तानी लष्कर आणि तिथले लष्करी राज्यकर्ते, तसेच झुल्फिकार अली भुट्टोंसारखे त्यांचे तोंडपुजे यांनी बंगाली अस्मितेवर जे अत्याचार, बलात्कार केले आणि असंख्यांना नरकयातना दिल्या, त्याबद्दल या अग्रलेखात अवाक्षरही काढण्यात आलेले नाही. ही त्यांची आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करण्याची अक्कल.
अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वाह्यात बरेच बोलायचे. त्यांच्या बोलण्यात इंग्लिशमधले चार अक्षरी आणि सहा अक्षरी अर्वाच्य शब्द असायचे. न्यूयॉर्क टाइम्सने तसे शब्द त्याआधीच्या त्यांच्या एकशे सदुसष्ट वर्षांच्या इतिहासात कधीही वापरलेले नाहीत, पण ट्रम्प वापरतात म्हणून ते शब्द वापरायला त्यांच्या संपादकीय बैठकीत परवानगी देण्यात आली. तेव्हापासून ते शब्द वापरण्यात येऊ लागले. (आपल्याकडे दाखवल्या जाणार्‍या हॉलिवूड चित्रपटांत हे शब्द गाळलेले असतात.)
सांगायचा मुद्दा हा की, भारताबाबत ते किती अज्ञानी आहेत ते अनेक बातम्यांमधून आपण वाचत असतो. त्यांची घसरगुंडी किती टोकाची आहे तेही अनेकदा दिसून आले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत गंगा नदीत वाहत आलेल्या प्रेतांचे मोठे छायाचित्र वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यूयॉर्क टाइम्स यांनी वापरले. सोबतच्या लेखात त्यांनी या प्रेतांची संख्या अगणित असल्याचे म्हटले. कोरोना झालेल्यांना त्यांच्या मृत्यूनंतर नातलगांनी नदीत सोडून दिले, असे त्यांनी छापले. या प्रेतांचे दहन करण्यात आले नाही हे तर उघड आहे, पण गंगार्पण करण्यात आली ती प्रेते कोरोनाबाधितांची होती किंवा काय, याविषयी कोणताही पुरावा नाही. (माझा एक मित्र तीस वर्षांपूर्वी एका वृत्तसंस्थेत काम करत असताना त्याची बदली वाराणसीला झाली आणि त्याचे कार्यालय गंगेकाठी होते. तेव्हा त्याला बर्‍याचदा अशा प्रेतांना ओलांडूनच कार्यालयात जावे लागे.) आपल्या आप्तेष्टाला गंगार्पण केले की त्याला सद्गती मिळते, अशी भावना आजही तिथे आहे. ती अंधश्रद्धा असली तरी तिच्यामागे कोरोनाचे कारण आहे असे म्हणता येत नाही. तीच गोष्ट कोरोना काळात आलेल्या कुंभमेळ्यातल्या गंगास्नानाची. त्या वेळी अनावश्यक गर्दी झाली ही गोष्ट सत्य आहे आणि तिच्यामुळे कोरोना अधिक प्रमाणात पसरला असेल, तर त्याचे आयोजन चुकीच्या मार्गाने झाले असा दावा करणे योग्य होईल. त्या काळात अशी अतिरेकी गर्दी केली जाणे हे कोणालाही मान्य होणारे नव्हते. ती गर्दी महाप्रसारक होती. मोदींनी सांगितल्यावर ती गर्दी थांबली. हे आधी व्हायला पाहिजे होते, असे म्हणणे निराळे आणि त्यासाठीही मोदींनाच जबाबदार धरून त्यांच्या विरोधात लिखाण करणे निराळे. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फार तर जबाबदार धरता आले असते, कारण ते त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, पण त्यांनी तो मुद्दा गृहीतात घेतलाच नाही. यामध्ये दिसते ते असे की, मोदी हे या सगळ्या कारस्थानाचे सूत्रधार आहेत असे दाखवण्यासाठी त्यांची चाललेली चढाओढ. याच वृत्तपत्राने मागे एकदा ‘साडी हे हिंदू राष्ट्रीयत्वाचे प्रतीक आहे’ असे तालिबानांच्या वरताण करून म्हटले होते. पाकिस्तानमध्ये, बांगला देशात, श्रीलंकेत महिला मोठ्या संख्येने साड्यांमध्ये दिसतात, त्या काही हिंदू राष्ट्रीयत्वाचे प्रतीक असतात का? पाकिस्तानात कराचीमध्ये तर उत्तमोत्तम साड्या नेसण्याची अहमहमिका चालू असते, हे मी पाहिलेले आहे.
 
न्यूयॉर्क टाइम्सचा खरा राग कोठे आहे, तेही तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. मोदी सरकारने असंख्य परकीय मदत संघटनांवर घातलेल्या बंदीने तर न्यूयॉर्क टाइम्सचा थयथयाट झाला. याचा साधा अर्थ असा की, केंद्र सरकारने या मदत संघटनांविषयी केलेला आरोप चुकीचा नव्हता. या मदत संघटना देशांतर्गत व्यवस्थेला धोक्यात आणत असतात, म्हणूनच त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. याच संघटना देशातल्या गोरगरिबांना धर्मांतराला आणि व्यवस्थेच्या विरोधात काम करायला उत्तेजन देत असतात, हेही तितकेच खरे आहे.
 
न्यूयॉर्क टाइम्सच्या पोटदुखीमागे एक कारण असेही असू शकते की, त्या वृत्तपत्राचा प्रतिस्पर्धी असणार्‍या ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये अ‍ॅमेझॉनची - म्हणजेच त्या कंपनीचे प्रमुख जेफ बेझॉस यांची गुंतवणूक आहे. अ‍ॅमेझॉनचा भारतातला व्याप गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर - म्हणजेच 200 टक्क्यांनी वाढलेला आहे. त्याबद्दल असणारा राग व्यक्त करण्यासाठी त्यांना हवा आहे ‘बिझनेस’ प्रतिनिधी. तो मोदींविरोधी हवा या मागणीने त्यांनी आपले उन्मादी स्वरूप स्पष्ट करून आजवरच्या सर्व संकेतांना डांबर फासले आहे.