दहशतवाद आणि स्त्रिया

विवेक मराठी    13-Jul-2021   
Total Views |
दहशतवादी संघटनांचे यश प्रामुख्याने गोपनीयता आणि धक्का तंत्र यावर आधारित असते. ‘महिला दहशतवादी’ हा मोठा धक्का असतो, म्हणून दहशतवादी संघटना स्त्रियांचा गैरवापर करून घेतात. मुळात ‘आत्मघातकी दहशतवादी’ हा अतिशय ‘स्वस्तातले शस्त्र’ असतो. स्त्रियाही त्याला अपवाद नाहीत.

Terrorism _1  H

गेल्या काही वर्षांत दहशतवादी हल्ल्यांमध्ये स्त्रियांचा सक्रिय सहभाग जाणवतो आहे. अतिशय घातक, क्रूर दहशतवादी हल्ले केवळ पुरुष करतात असे नसून स्त्रियासुद्धा यात सहभागी होतात. मुळात स्त्रियांच्या बाबतीत समाजात प्रचलित असणार्‍या मान्यतेच्या पूर्णपणे हे विरोधात आहे, त्यामुळे समाजाला बसणारा धक्का मोठा असतो. एखादी स्त्री दहशतवादी हल्ला घडवते, तेव्हा त्या घटनेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा असतो. समाजात सहानुभूती, आश्चर्य, भीती आणि मानसिक धक्का अशा अनेक भावना निर्माण करण्यात महिला दहशतवादी जास्त यशस्वी होतात. अशा घटनांना प्रसारमाध्यमांमध्ये मिळणारी प्रसिद्धी खूप जास्त असते. या विषयीची चर्चा दीर्घकाळ चालणारी असते. दहशतवादी संघटनेला तेच हवे असते. इथेच त्यांची अर्धी लढाई जिंकलेली असते. त्यासाठीच महिलांना दहशतवादी आपल्या संघटनेत सहभागी करून घेतात. इ.स. 1985 ते 2006 या दरम्यान झालेल्या एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी 15 टक्के हल्ले घडवणार्‍या स्त्रिया होत्या. (संदर्भ - डेव्हिस जेसिका, इव्होल्युशन ऑफ ग्लोबल जिहाद - फीमेल सुसाइड बाँबर्स इन इराक.)

 
दहशतवादी संघटना स्त्रियांची भरती करण्यामागे महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे -
 
दहशतवादी संघटनांचे यश प्रामुख्याने गोपनीयता आणि धक्का तंत्र यावर आधारित असते. ‘महिला दहशतवादी’ हा मोठा धक्का असतो, म्हणून दहशतवादी संघटना स्त्रियांचा गैरवापर करून घेतात. मुळात ‘आत्मघातकी दहशतवादी’ हा अतिशय ‘स्वस्तातले शस्त्र’ असतो. स्त्रियाही त्याला अपवाद नाहीत. कोणत्याही मोठ्या तंत्रज्ञानाचा वापर येथे करायचा नसतो. प्रशिक्षण कालावधीपर्यंतच खर्च करावा लागतो. कारण नंतर त्या दहशतवाद्याचा मृत्यू होणार असतो. शिवाय फार मोठे प्रशिक्षणही द्यायचे नसते. महिलांवर संशय घेणे, त्यांची छाननी करणे ह्यावर सुरक्षा रक्षकांना मर्यादा येते. त्यामुळे काही ठिकाणी स्त्रिया अगदी सहज प्रवेश मिळवू शकतात. स्त्रिया कोणत्याही ठिकाणी सहज गर्दीत जाणे, लक्ष्याच्या जवळ जाणे, सुरक्षा रक्षकाच्या झडतीतून सूट घेणे हे करू शकतात. सामान्यपणे कुणाला त्यांचा संशय येत नाही. त्याचप्रमाणे समाजाला त्या मोठा धक्का देऊ शकतात. (संदर्भ - नोएल एलिझाबेथ, स्प्रिंग 2016, ‘फीमेल सुसाइड बाँबर्स - कोअर्स्डस ऑर कमिटेड, ग्लोबल सिक्युरिटी स्टडीज, 7.) काही संशोधकांच्या मते पुरुषांपेक्षा स्त्री-आत्मघातकी दहशतवाद्यांना प्रसारमाध्यमांद्वारे आठ पट जास्त प्रसिद्धी मिळते. (संदर्भ - वूमन अँड जिहाद. दि मोटिव्हेशन ऑफ फीमेल सुसाइड बाँबर्स, दि जेरुसलेम पोस्ट, जेपोस्ट.कॉम, रिट्रीव्ह, 2017.05.12.)
लिबरेशन टायगर्स ऑफ तामिल इलम - एलटीटीई ह्या संघटनेने मोठ्या प्रमाणात स्त्रियांची भरती केली होती. त्यापाठोपाठ बोको हराम ह्या नायजेरियातील इस्लामी दहशतवादी संघटनेने सगळ्यात जास्त महिला भरती केल्या आहेत. (संदर्भ - ‘व्हाय बोको हराम यूजेस फीमेल सुसाइड बाँबर्स, दि इकॉनॉमिस्ट, 23 ऑक्टोबर 2017.)
श्रीलंकेत काही तामिळ स्त्रियांवर अत्याचार केले गेले होते. काही स्त्रियांना विवाह तसेच अपत्यप्राप्ती यांना मुकावे लागत होते. अशा स्त्रियांना ‘तामिळ माता’ यासारखी संबोधने देऊन त्यांचा गौरव करून एलटीटीईने आत्मघातकी पथकासाठी त्यांचा वापर करून घेतला. काही लहान मुलामुलींना लहानपणापासून आश्रय देण्यात येई आणि त्यांच्यावर आपली विचारधारा बिंबवली जात असे. (संदर्भ - झेदालीस डेबरा, फीमेल सुसाइड बाँबर्स.)
एलटीटीईच्या बाबतीत शासनाच्या विरुद्धचा लढा तीव्र करणे हे ध्येय होते. तुलनेने चेचन्यामध्ये स्त्री-दहशतवादी या त्यांच्या पुरुष नातलगांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवादी कृत्यात सहभागी झाल्याचे आढळते. त्या ‘ब्लॅक विडो’ नावाने कुप्रसिद्ध आहेत. त्यांना ‘शाहेदा’ किंवा ‘शहिदका’ ह्या नावानेसुद्धा ओळखतात. दहशतवादी असणार्‍या व्यक्तीच्या आईने, पत्नीने, मुलीने आणि नात्यात असणार्‍या स्त्रियांनी शस्त्रे उचलली आहेत. महिलेने दहशतवादी हल्ला करणे हा समाजावर मोठा मानसिक आघात असतो.


Terrorism _3  H
स्त्रिया आत्मघातकी दहशतवादी का बनतात?
आत्मघातकी दहशतवादी स्त्रिया तयार होण्यामागे अनेक कारणे असतात. त्यात वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिक कारणे मोठ्या प्रमाणात आढळतात. दहशतवादी संघटना काही स्त्रिया हेरतात. पण स्त्रियांनी हा मार्ग स्वीकारण्यामागे काही ठोस कारणे आढळतात.
 
वैयक्तिक कारणांमध्ये स्त्रीच्या भावनिक अवस्थेचा प्रभाव जाणवतो. विशेषत: पॅलेस्टाइनसारख्या धार्मिक कट्टर पुरुषप्रधान रचनेत स्त्रियांवर बरीच बंधने असतात. कुटुंबाची प्रतिष्ठा ही स्त्रियांच्या प्रतिष्ठेशी आणि राष्ट्राच्या प्रतिष्ठेशी जोडलेली आहे. काही स्त्रिया कुटुंबातील जाचाला कंटाळतात. काही जणी जे स्वातंत्र्य उपभोगायचे असते ते मिळेल म्हणून घराबाहेर संघटनांचे सदस्यत्व पत्करतात. काही स्त्रिया धुळीस मिळालेली अब्रू पुन्हा सावरण्यासाठी, तर काही जणी सूड घेण्यासाठी आत्मघातकी दहशतवादी बनतात. काहींचे वडील, भाऊ, पती, प्रियकर, मुले सुरक्षा रक्षकांकडून ठार झालेले आहेत. त्याचा सूड घेण्यासाठी काही वेळा स्त्रिया दहशतवादाकडे वळल्या. काही वेळा अपत्यप्राप्ती होऊ न शकणारी स्त्री - समाजाने तिला कमी लेखले, ती स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मग हा मार्ग स्वीकारते. काही घटस्फोटित स्त्रिया, काही विधवा स्त्रिया आत्मनाश करण्यासाठी सिद्ध होतात. ह्यात मानसिक घटक महत्त्वाची भूमिका बजावतो. स्त्रियांसाठी ही कृती एक तीव्र ‘प्रतिक्रिया’ असते. वैयक्तिक नुकसान झाल्याचा बदला घेणे, प्रसिद्धी मिळवणे, पुरुषांची बरोबरी करून दाखवणे, आयुष्यात काही तरी धाडस करण्याची सुप्त इच्छा, कुटुंबाचे नाव अमर राहावे अशा कारणांसाठीसुद्धा स्त्रिया दहशतवाद घडवून आणतात.(संदर्भ - मिया ब्लूम, बाँबशेल, विमेन अँड टेरर, जेंडर इश्यू, 28.)
 
सामाजिक कारणात अनेक पैलू आहेत. पॅलेस्टाइनमध्ये स्त्रियांनी कुटुंबातील मोठ्यांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत, शिवाय त्यांच्याकडून असणार्‍या अपेक्षांची पूर्तता केली पाहिजे अशी परंपरा आहे. पॅलेस्टाइनमध्ये इ.स. 1987मध्ये पहिला आणि 2000मध्ये दुसरा उठाव म्हणजेच ‘इंतिफदा’ झाले. तेथील समाजात स्त्री ही हुतात्मा होणार्‍याची बहीण, शहीद होणार्‍याची आई, पत्नी वा मुलगी अशा भूमिकेत होती. पण नंतर ती स्वत: शहीद होऊ शकते हा विचार प्रबळ झाला. कारण सुरुवातीला ‘हमास’ (पॅलेस्टाइन सुन्नी इस्लामी धर्मांध लष्करी संघटना आणि नंतर राजकीय पक्ष झालेला आहे) स्त्रियांना कोणतेही ‘मिशन’ देण्यास अनुकूल नव्हता. पण नंतर मात्र त्यांनी स्त्रियांना आपल्या जिहादी कारवायांसाठी वापरले. स्त्रियांनी पारंपरिक कौटुंबिक भूमिका समर्थपणे पार पाडावी आणि प्रसंगी शहीद व्हावे, हा विचार प्रभावी ठरत गेला. त्यानंतर स्त्रियांच्या दहशतवादी कृत्यांमध्ये वाढ झाली. त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली. दहशतवादी संघटना ह्या स्त्रियांना ‘हुतात्मा’ ठरवू लागल्या. आपल्या वेबसाइटवर त्यांना गौरवू लागल्या. नव्या पिढीसाठी हे आदर्श ठरू लागले.


Terrorism _2  H

काश्मीरमध्ये महिलांची फुटीरतावादी संघटना उभारणारी असिया अंदराबी
धार्मिक कारणाचा विचार करता प्रामुख्याने इस्लामी दहशतवादी हे धार्मिक कारणांनी प्रेरित झाल्याचे इतिहासात आढळून येते. मरणोत्तर आयुष्यात मिळणार्‍या सुखांचे आमिष दाखवून इस्लामसाठी काही कृत्ये करवून घेतली जातात. उदाहरणार्थ, - कुराणच्या सूरह अततूर 52-21मध्ये म्हटले आहे की ‘ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आहे आणि त्यांच्या संततीनेदेखील एखाद्या श्रद्धा-श्रेणीत त्यांचे अनुकरण केले आहे, त्यांच्या त्या संततीलासुद्धा आम्ही स्वर्गामध्ये त्यांच्यात मिळवू आणि त्यांच्या कृत्यात कोणतीही घट त्यांना होऊ देणार नाही.’ (संदर्भ - दिव्य कुरआन, सटीप मराठी भाषांतर, सय्यद अबुल आला मौदूदी, इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट, भायखळा, पृष्ठ 855) हा कुराणमधील आधार घेऊन काही स्त्रियांना भरती करण्यात आले. ‘स्वर्गात जाऊन सुख उपभोगण्याची इच्छा’ ह्याला जिहादशी जोडून दहशतवादी संघटना दहशतवादी घडवतात. काहींना इंटरनेटवर गाठून त्यांना आपल्या जाळ्यात ओढले जाते. (संदर्भ - अनात बेर्को अँड इडना एरेज, विमेन इन टेररिझम - अ पॅलेस्टीनियन फेमिनिस्ट इव्होल्युशन ऑर जेंडर ऑपरेशन, रिसर्च गेट.)
हमासने तर संभाव्य स्त्री दहशतवाद्यांना वचने दिलेली होती की त्यांच्या ह्या त्यागासाठी त्यांना पारितोषिक म्हणून स्वर्गात त्यांच्या पतीबरोबर पुन्हा राहता येणार आहे. जर स्त्रिया अविवाहित असतील, तर त्यांचे विवाह हमासच्या कार्यकर्त्यांशी लावण्याचेही वचन दिले जात असे. (संदर्भ - मार्गोलीन, 2016, पृष्ठ 919-920, इंट्रोडक्शन - वूमन, जेंडर अँड टेररिझम - जेंडरिंग टेररिझम - सिंडी बँक्स.)
दहशतवादी संघटनेत स्त्रियांच्या सहभागाची सुरुवात

साधारणपणे 1970नंतर मोठ्या दहशतवादी कृत्यात स्त्रियांचा सक्रिय सहभाग आढळून येतो. ह्यात इतिहासात महत्त्वाचा उल्लेख येतो तो लैला खालेद ह्या स्त्रीचा. ही पॉप्युलर फ्रंट फॉर दी लिबरेशन ऑफ पॅलेस्टाइनची सदस्य होती. 1969मध्ये ती रोमहून (इटली) तेल अवीवला (इस्रायल) जाणार्‍या ट्रान्स वर्ल्ड एअरलाइन्स फ्लाइट 840चे अपहरण करण्यात सहभागी झाली होती. तसेच जर्मनीमध्ये ‘रेड आर्मी फॅक्शन बाडर-मेनहॉफ ग्रूप’ ही डावी विचारसरणी असणारी संघटना स्थापन झाली. त्यात अलरिक मेनहॉफ हिचा महत्त्वाचा वाटा होता. या संघटनेद्वारे बाँबस्फोट घडवणे, हत्या करणे, अपहरण करणे, बँकेवर दरोडा घालणे इत्यादी कारवाया केल्या जात. महिला विध्वंस घडवून आणू शकतात हे अजून जगाला स्वीकारणे कठीणच जात होते. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्या वादात इस्लामी दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढला. हमासने सुरुवातीला स्त्रियांना सहभागी करून घ्यायला नकार दिला होता. पण नंतर मात्र स्त्रियांना भरती करणे, प्रशिक्षण देणे आणि प्रत्यक्ष हल्ला करणे सुरू केले.
दहशतवादी स्त्रिया - काही केस स्टडीज
पॅलेस्टाइनमधील स्त्री-दहशतवाद्यांची काही उदाहरणे विचारात घेता येतील.

1. साना मेह्द्ली हिने 9 एप्रिल 1985 रोजी लेबेनॉनमध्ये इस्रायली सैनिकांच्या तुकडीवर स्वत:सह स्फोटकांच्या गाडीने हल्ला चढवला. त्याआधी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, “माझ्या मातृभूमीसाठी, माझ्या लोकांसाठी हे कर्तव्य पार पाडले.” पॅलेस्टिनी जनतेला आणि तिला स्वत:ला हलाखीत जगावे लागले, ह्याचे कारण इस्रायल आहे असे ती मानते.
2. मुरीयल डेगॉक ही बेल्जियमची कॅथलिक ख्रिश्चन स्त्री आपल्या मुस्लीम पतीसाठी धर्मांतर करून आधी मुस्लीम आणि नंतर आत्मघातकी दहशतवादी बनली. तिने बगदादमध्ये 2005मध्ये कार बाँबचा स्फोट घडवत मरण पत्करले.
 
3. झेर्मा मुझहाखोयेवा ही चेचन्याची दहशतवादी होती. तिच्याजवळचा बाँब वेळेवर फुटला नाही, त्यामुळे तिला पोलिसांनी अटक केली. तिचे वैयक्तिक आयुष्य खूप कष्टात गेले. पंधराव्या वर्षी गर्भारपण, रशियन सैन्याने प्रियकराला ठार करणे, सासरच्या लोकांकडून छळ इत्यादी. एका गटाकडून ती पैसे उसने घेऊ लागली. त्यांनी तिला सगळे कर्ज फेडण्यासाठी भरपूर रक्कम देऊ केली, त्याच्या मोबदल्यात तिला दहशतवादाला प्रवृत्त केले. (संदर्भ - ग्रोस्कोप-2004.) यात वैयक्तिक आणि आर्थिक कारणे आहेत.

4. वफा इद्रिस ही पॅलेस्टाइनच्या निर्वासित छावणीत लहानाची मोठी झाली. नंतर विवाह, मृत अर्भकाला जन्म, कधीही पुन्हा मातृत्व मिळणार नाही ह्यावर वैद्यकीय शिक्कामोर्तब, मग पतीने टाकून देणे, विवाहात अपयश, मग माहेरी परत ह्या पूर्णत: वैयक्तिक समस्यांचा तोडगा मानसिक स्तरावर काढता न आल्यामुळे तिची सतत वैफल्यग्रस्त अवस्था होती. नंतर स्वत:ला समाजात सिद्ध करण्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची मानसिक गरज तीव्र होत गेली. इस्रायलचा रागही तिच्या मनात होताच. अल अक्सा मार्तीयार ब्रिगेडने तिचा उपयोग करून घेतला. तिने 27 जानेवारी 2002 रोजी जेरुसलेममध्ये आत्मघातकी हल्ला चढवला.
5. आयात अखरास ही बेथलहेमजवळच्या देहैशे निर्वासितांच्या छावणीत वाढली होती. 1987मध्ये पहिला इंतिफदा सुरू झाला, तेव्हा तिच्या भावाला तुरुंगवास भोगावा लागला, कारण त्याने इस्रायली सैनिकांवर हल्ला केला होता. दुसर्‍या इंतिफदाच्या वेळी इस्रायली डिफेन्स फोर्सकडून तिच्या कुटुंबातील काही जण जखमी झाले, तर काही ठार झाले. तिच्यासमोर तिच्या शेजारचा मित्र ठार झाला. ह्यानंतर तिने सूडाच्या भावनेतून स्वत:ला स्फोटकांनी जेरुसलेम तेथे उडवून दिले. शिवाय, इस्रायली गुप्तचर अहवालाप्रमाणे आयात ही विवाहापूर्वी फताहच्या एका सदस्यापासून गर्भवती होती. परिणामी समाजाच्या भीतीमुळे तिने ‘आत्मघातकी दहशतवादी’ बनून पळवाट शोधली. (संदर्भ - इस्रायल मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स, ब्लॅकमेलिंग यंग वूमन एन टू सुसाइड टेररिझम.)
एकूणच स्त्रिया ह्या भावनिक कारणांमुळे दहशतवादाचा मार्ग स्वीकारतात. कुटुंबातील शोषण हेसुद्धा एक कारण आहे. पारंपरिक कुटुंबात पुरुषप्रधान व्यवस्थेचे, संस्कृतीचे अवास्तव स्तोम असणे (आर्मी ऑफ रोझेस - बार्बरा व्हिक्टर, 2003) तसेच कुटुंबातील पुरुषांकडून होणारी पिळवणूक ह्यामुळे स्त्रिया आत्मघाताला प्रवृत्त होतात, असे पॅलेस्टिनी स्त्रियांचा अभ्यास करताना आढळले. (बाँबशेल - विमेन अँड टेररिझम, मिया ब्लूम, 2011.)
भारताचा विचार केल्यास काश्मीरमध्ये असिया अंदराबी हिने ‘दुखतरान-इ-मिल्लत’ ही इस्लामी स्त्रियांची फुटीरतावादी संघटना सुरू केली होती. काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करणे हे त्यांचे ध्येय होते. त्यांच्या देशद्रोही कारवायांमुळे त्यावर भारत सरकारने 2018पासून बंदी घातलेली आहे. (संदर्भ - लिस्ट ऑफ बॅन्ड ऑर्गनायझेशन्स, मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स, गव्हर्मेंट ऑफ इंडिया.)
थोडक्यात, मोठी जीवितहानी करणे हा हेतू साध्य करण्यासाठी दहशतवादी संघटना अनेक साधने शोधतात. इथे ‘स्त्रिया’ ह्यासुद्धा एक साधनच बनून जातात.