घडलेय.. बिनसतेय!

विवेक मराठी    14-Jul-2021
Total Views |
@देविदास देशपांडे
नाना पटोले यांनी महाराष्ट्र विकास आघाडी नावाच्या एका भंपक युतीतील सहभागी पक्षांबाबत अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये केली. आपल्या हालचालींवर राज्य सरकार लक्ष ठेवत असून काँग्रेसच्या घोडदौडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना घाबरले आहेत, अशी टीका पटोले यांनी केली होती. त्यामुळे राज्य सरकारच्या स्थिरतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. ज्या दिवशी पटोले यांनी आपले हे वक्तव्याचे अस्त्र सोडले, त्याच दिवशी शरद पवार यांनी मोजक्या पत्रकारांशी संवाद साधला. त्यात "नाना पटोले यांच्यासारख्या छोट्या व्यक्तीच्या बोलण्यावर आपण प्रतिक्रिया देत नाही" असे त्यांनी सांगितले. पवार यांनी केलेली टिप्पणी तर वर्मी घाव घालणारी होती. याचे जे पडसाद उमटायचे ते उमटलेच.
political _1  H

ही गोष्ट साधारण सप्टेंबर २०१३मधली. त्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष युती करून राज्यात सत्तेत होते. केंद्रात डझनावारी पक्षांच्या कडबोळ्यातसुद्धा या दोघांचेच प्राबल्य होते. त्या वेळी काँग्रेसचे युवराज आणि तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी पुण्यात आले होते. आपल्या पक्षजनांना मार्गदर्शन करण्याच्या उदात्त हेतूने त्यांचे आगमन झाले होते. शिरस्त्याप्रमाणे काँग्रेसची तालेवार मंडळी आपापल्या समर्थकांना घेऊन त्यांना भेटून येत होती. ते बाहेर आल्यावर आम्हा पत्रकार मंडळींना आत काय घडलेय हे जाणून घेण्याची उत्सुकता असायची. मग पत्रकारांच्या मागणीवरून ते आतली वित्तंबातमी सांगायचे. त्यात हटकून एकच मुद्दा असायचा - राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी कशी करायची? वास्तविक त्या वेळी अवघा देश भ्रष्टाचारांच्या विविध प्रकरणांनी गांजला होता, महागाई आकाशाला भिडली होती. विरोधी पक्षाच्या वतीने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रूपाने एक समर्थ प्रतिस्पर्धी उभा राहत होता. मात्र काँग्रेसजनांना चिंता पडली होती ती आपला 'मित्रपक्ष' राष्ट्रवादी काँग्रेसला नामोहरम कसे करायचे, याची!
तिकडे राष्ट्रवादीच्या कंपूतही काही वेगळे घडत नव्हते. काँग्रेसजनांना कसे लोळवायचे, हे बेत आखण्यातच त्यांचीही बहुतांश ऊर्जा खर्च होत होती. तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातून विस्तवही जात नव्हता, हे उघड वास्तव होते. किंबहुना राष्ट्रवादीची मजल तर एवढी होती की निवडणूक जाहीर झाल्यावर कामचलाऊ सरकारमधून आपला पक्ष बाहेर पडत असल्याचे पक्षप्रमुख शरद पवारांनी जाहीर केले होते.
 
सांगायचा मुद्दा हा की ज्याला जोडीला घेतले, त्यालाच गारद करायचे ही काँग्रेसची संस्कृती आहे. काँग्रेस संस्कृतीतून आलेल्या शरद पवारांनी वेगळा पक्ष काढला, परंतु काँग्रेसची ही परंपरा काही सोडली नाही. म्हणूनच त्यांनी ज्यांना ज्यांना जवळ केले, त्या सर्व पक्षांचे अस्तित्व एकतर संपले आहे किंवा संपण्याच्या बेतात आहे. कोकणातील शेतकरी कामगार पक्ष असो किंवा रिपब्लिकन पक्ष असो, अशी अनेक उदाहरणे सापडतील.
 
 
सात वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी नावाच्या तुफानासमोर काँग्रेसची सत्ता पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, त्यापाठोपाठ सहा महिन्यांनी महाराष्ट्रातही काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता गेली. काँग्रेस संस्कृतीचा मागमूसही नसलेले एक सरकार संपूर्ण पाच वर्षे सत्तेत आले आणि विघ्नसंतोषी सहकारी पक्षाला जवळ बाळगत देवेंद्र फडणवीसांनी कार्यकाळ पूर्ण केला. या मधल्या वनवासाच्या काळात काँग्रेसला व तिच्या प्रभावळीतील पक्षांना शहाणपण आले असेल, अशी लोकांची अपेक्षा होती. पण जित्याची खोड मेल्याशिवाय कशी जाईल?
 
पाच वर्षांनी मिळालेली - खरे तर शिवसेनेच्या दगाबाजीमुळे पदरात पडलेली सत्ता या दोन पक्षांना आता सुखासुखी मानवत नाहीये. म्हणूनच एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे त्यांचे जुने राजकारण पुन्हा उफाळून वर आले आहे.
 
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासहित अन्य नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा हे याचे उत्तम उदाहरण आहे. नाना पटोले यांनी महाराष्ट्र विकास आघाडी नावाच्या एका भंपक युतीतील सहभागी पक्षांबाबत अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये केली. आपल्या हालचालींवर राज्य सरकार लक्ष ठेवत असून काँग्रेसच्या घोडदौडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना घाबरले आहेत, अशी टीका पटोले यांनी केली होती. त्यामुळे राज्य सरकारच्या स्थिरतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. ज्या दिवशी पटोले यांनी आपले हे वक्तव्याचे अस्त्र सोडले, त्याच दिवशी शरद पवार यांनी मोजक्या पत्रकारांशी संवाद साधला. त्यात "नाना पटोले यांच्यासारख्या छोट्या व्यक्तीच्या बोलण्यावर आपण प्रतिक्रिया देत नाही" असे त्यांनी सांगितले. पवार यांनी केलेली टिप्पणी तर वर्मी घाव घालणारी होती. याचे जे पडसाद उमटायचे ते उमटलेच.


political _2  H
खरे तर नाना पटोले यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच बातम्यांमध्ये हक्काची जागा मिळविली. बेफाम, बेछूट आणि बेलाग विधाने करणारी माणसे बातम्यांच्या जगात नेहमीच पुढे असतात. आवाज जेवढा टिपेला, तेवढे बातम्यांमध्ये टॉपला. संजय राऊतपासून राखी सावंतपर्यंत अशी अनेक नावे सापडतील. हेच सूत्र वापरून ते सातत्याने चर्चेत आले आहेत. दररोजच एक खळबळजनक विधान करण्याचा त्यांचा स्ट्राइक रेट राऊतांच्या तोडीस तो़ड आहे.
अशा या नाना पटोले यांनी पहिल्यापासूनच स्वबळाचा नारा देऊन चर्चेचा एकच धुरळा उडवून दिला आहे. केवळ मोदीद्वेष आणि भाजपाविरोध या एकमेव भांडवलावर पटोले यांना काँग्रेसने थारा दिला. अगदी पैज लावून ते निवडणूक हरले, हे वास्तवही त्यासाठी नजरेआड करण्यात आले. ते जोपर्यंत भाजपाच्या विरोधात अद्वातद्वा बोलत होते, तोपर्यंत कोणाला काही अडचण नव्हती. मात्र कानात वारे गेलेल्या वासराप्रमाणे त्यांचा रोख सहकाऱ्यांकडे वळला आणि एकच हलकल्लोळ उडाला. आतापर्यंत त्यांचे कोणी त्यांचे थेट समर्थन केले नव्हते. मात्र त्यांच्या भूमिकेला छेद जाईल असे मतही कोणी मांडले नव्हते.

विधानसभेत त्यांनी फडणवीस सरकारच्या काळात आपले फोन टॅप केले जात असल्याचे सांगितले आणि सरकारला अनपेक्षित लॉटरी लागली. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी थेट या आरोपाची चौकशी करण्याची घोषणा केली. मात्र त्याच पटोले यांनी "उद्धव ठाकरे यांचे सरकार आपल्यावर पाळत ठेवते आहे" असे वादग्रस्त आणि सत्ताधारी आघाडीला अडचणीत आणणारे विधान केले आणि चित्र एकदमच बदलून गेले. ठाकरे सरकारचे आपल्याकडे लक्ष आहे, रोज सकाळी ९ वाजता त्यांना आणि आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्याबाबत माहिती पोहोचते अशा आशयाचे विधान नानांनी लोणावळ्यात केले. त्यावरून गदारोळ उडाला.

साधारणत: विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप केले जातात अथवा त्यांच्या हालचालींची माहिती ठेवली जाते, असे मानले जाते. मात्र आपल्याच सत्ताधारी आघाडीतील प्रमुख नेत्यावर पाळत ठेवली जाण्याचा आरोप एखाद्या नेत्याने करणे हा प्रकार गंभीर आहे. पटोले यांच्या काँग्रेस पक्षाकडून त्यांचा बचावासाठी कोणीही पुढे आले नाही. अखेर त्यांनाच आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेल्याचा दावा करत वेळ मारून नेण्याची वेळ आली.

पटोले यांच्या वक्तव्यांच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना पवारांची भेट घ्यावी लागली. पटोले यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचा खुलासा पक्षाने केला. दुसरीकडे सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. जगभरातील अलम विषयांवर आपल्या भाष्याचा मुलामा चढविण्यात वाकबगार असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनीही यात उडी घेतली. सरकारमधील पक्षांमध्ये आपसात कोणतीही चढाओढ नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पटोलेंची टर उडविली. 'कोरोनाची भीती बाळगू नका, बाळासाहेब, आम्हीही स्वबळावर येऊ, स्वबळावर म्हणजे चालत येऊ' असे म्हणत त्यांची खिल्ली उडविली.

political _3  H

आता प्रश्न हा आहे की पटोले यांच्यावर पाळत ठेवण्याची वेळ शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसवर का आली? त्याची उत्तरे दोन आहेत - नोव्हेंबर २०१९मध्ये ठाकरे सरकारचा शपथविधी झाला, तेव्हापासून काँग्रेसचे मंत्री व नेते सातत्याने एकच तक्रार मांडत आहेत की या सरकारमध्ये आम्हाला कोणी विचारतच नाही. मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या मंत्र्यांचा व नेत्यांचा व्यवहारसुद्धा हेच दाखवितो. त्यातून आपला स्वाभिमान दाखविण्याची मोठी आस काँग्रेसजनांना लागली आहे. गेल्या महिन्यात लॉकडाउन उठविण्यावरून विजय वडेट्टीवार यांनी घातलेला गोंधळ हा याच तडफडीतून आला होता.
दुसरे उत्तर आहे लेखाच्या सुरुवातील उल्लेख केलेले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मूळचा पिंडच हा असा आहे - गुण्यागोविंदाने किंवा सुखासमाधानाने सत्तेचे सुख घ्यायचे, हे त्यांच्या रक्तातच नाही. एका धुलाई पावडरच्या जुन्या जाहिरातीतील वाक्याप्रमाणे, "माझ्या कपड्यापेक्षा त्याचा कपडा उजळ कसा?" हा प्रश्न कायम त्यांना पछाडत असतो. त्यामुळे एकमेकांच्या पावलात पावले अडकवायची आणि त्याला तोंडावर पाडायचे, हा त्यांच्या जीवनाचा स्थायिभाव!

शरद पवार यांची तर सगळी हयातच हा खेळ खेळण्यात गेलेली. असे कुरघोड्यांचे आणि धोका देण्याचे राजकारण शिकविणारे एखादे पुस्तक पुढे-मागे आले, तर त्यातील ८० टक्के भाग एकट्या पवारांवर असेल, एवढी त्यांची मातबरी! म्हणूनच "स्वबळावर लढण्याचा तुमचा निर्णय झाला असेल तर तसे स्पष्ट सांगा" या शब्दांत पवारांनी काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना सुनावल्याचे वृत्त आहे.

आता या सगळ्या गोंधळाचा अर्थ हे सरकार कमजोर झाले आहे आणि त्याचे तारू खडकावर आदळून तुटणार आहे, असा लावण्यात अर्थ नाही. याचा अर्थ एवढाच की काँग्रेस व राष्ट्रवादी यांचा जुना आवडता खेळ पुन्हा सुरू झाला आहे. सुंदोपसुंदी हा त्यांचा मुख्य व्यवसाय, बाकी सगळे नंतर. तेच ते आता सातत्याने करणार आहेत. मग यात जनता भरडली गेली तरी हरकत नाही, हाच त्यांचा विचार असेल. हे किती दिवस चालेल हे सांगता येत नाही, मात्र इतक्यात तरी तो आटपणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी घडली आणि बिनसलीचा वग १९९९पासून २००४पर्यंत चालू होता. तोच यापुढेही चालू राहील. त्यात शिवसेनेचा रूपाने आणखी एक ‘पार्टी’ सामील झाली, हाच त्याचा अर्थ.