आत्मनिवेदन भक्ती

विवेक मराठी    15-Jul-2021
Total Views |
@डॉ. पूर्णिमा भा. नाफडे


नवविधा भक्तीमध्ये आत्मनिवेदन ही नववी सर्वात शेवटची पायरी, भक्तीचा परमोच्च बिंदू. यात भक्त आपल्या अंतर मनातले सर्व गुह्य गुप्त भगवंताला सांगतो. मी ‘श्रीकृष्णम् शरणम मम’ हे केवळ बाह्योपचार न राहता अंत:करणापासून शरण जाणे, तरच ते आत्मनिवेदन होते.


bhakti_1  H x W
वैदिक काळापासून भारतवर्षात परमेश्वरप्राप्तीचे वेगवेगळे मार्ग सांगितले गेले आहेत. प्रत्येकाच्या अधिकाराप्रमाणे आणि वकूबाप्रमाणे प्रत्येकाने त्याला हवा तो मार्ग स्वीकारून त्याची प्राप्ती करून घेता येते. कोणत्याही एका मताचा किंवा एकाच मार्गाचा आग्रह भारतीय संस्कृतीत कधी धरला गेला नाही. वेदांचीच रचना त्रिकांडात्मक आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान ही तीन कांडे वैदिक संस्कृतीची अभिन्न अंगे आहेत. प्रत्येक ग्रंथाची रचना त्रिकांडात्मक असावी, हा कटाक्ष शक्यतो पाळण्याचा प्रत्येक ग्रंथकार प्रयत्न करीत असतो, म्हणूनच वैदिक धर्माच्या मूळ तत्त्वांमध्ये ‘साधना नाम अनेकता’ हे सूत्र आले आणि वैदिक धर्माचे हे अनन्यसाधारण वैशिष्ट्य ठरले.

वेदकाळात यज्ञसंस्था प्रमुख असल्यामुळे त्याच्या संबंधित पूर्वमीमांसा यांचे प्राबल्य देशात अस्तित्वात येणे हे साहजिकच होते. परंतु जसजसा एकंदरीत समाजाचा र्‍हास होऊन यज्ञसंस्थेला आवश्यक असणारे द्रव्यादीबल आणि शारीरिक क्षमता घसरायला लागली, तसतशी समाजाला भक्तिमार्गाची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आणि तेव्हापासून भक्तिमार्गाचा प्रसार वाढायला लागला, याचा अर्थ पाश्चात्त्य काढतात तसा कर्ममार्ग पहिला, तर त्याचा काल इ.स.पूर्व दोन हजार वर्षे, पुढे भक्तिमार्ग अशा प्रकारचा नसून, हे सर्व मार्ग एकाच वेळी अस्तित्वात होते. प्रत्येकाच्या अधिकारानुरूप त्यांच्या वापरण्यात कमी-अधिक होऊ शकत होते. परंतु याचा अर्थ तो मागाहून उत्पन्न झाला असे नाही. आत्मनिवेदन हा भक्तिप्रकाराचे प्रमुख उदाहरण म्हणून बळीराजाचे दिले जाते, जे श्रीरामाच्याही आधी होऊन गेलेले, ऐन वैदिक काळाच्या भरभराटीच्या वेळी बळीराजा होता. विश्वजितासारखे महायज्ञ त्याने संपन्न केले होते. तेव्हा आधुनिक संशोधनाप्रमाणे हा वैदिक काळातीलच ठरायला पाहिजे. परंतु भक्तिमार्गातील शिरोभूत असणारी ‘आत्मनिवेदन भक्ती’ ही त्याच्या नावाने प्रसिद्ध आहे.


महाभारत कालानंतर भक्तिमार्गाचा जोर विशेषत्वाने वाढलेला दिसतो. भगवद्गीतेनंतर या मार्गाचा अनेकांगांनी विस्तार झाला. भगवद्गीतेतील भगवंतांच्या उद्घोषानंतर भागवत धर्माचा उदय झाला. लोकांना कोणत्याही बाह्य परिस्थितीत व बाह्य समृद्धीत अडकून न पडता सामान्य माणसाला झेपेल, पचेल असे पाथेय देऊन मोक्ष मिळवून देण्याची हमी या मार्गात दिसते. अधिकार म्हटल्यावर लागणारी विशेष योग्यतादेखील या मार्गाकरिता आवश्यक अट नव्हती. सामान्यातील अतिसामान्य मनुष्यदेखील या मार्गाने जाऊन परमेश्वरप्राप्ती करून घेऊ शकत असे.

नवविधा भक्तीमध्ये कीर्तन, भजन, पूजन ही वारकरी संप्रदायामुळे सर्व समाजात सहज पसरली, याचा अर्थ नऊ प्रकारचे कायमचे कप्पे आहेत, असा होत नाही. एकाच प्रकारचा एकच मार्ग घेऊन दुसर्‍या मार्गाला तो हातही लावणार नाही, हे व्यवहार आणि तत्त्व या दोन्ही दृष्टींनी अशक्यच आहे. कीर्तनभक्ती करीत असताना घरची पूजाअर्चना कोणीही करतच असतो. दुसर्‍याची कीर्तन अथवा प्रवचन ऐकणे याने श्रवणभक्तीही अनायसेच घडते. म्हणजे कोणताही एक मार्ग हा एकांगी अथवा एकांड न राहता सर्व मार्गांचा समन्वय साधणारा असतो.
 
ही पूर्वपीठिका लक्षात घेतल्यास नवविधा भक्तीचे यथार्थ स्वरूप आपल्या लक्षात येते. भक्ती म्हणजेच देवाशी एकरूप होणे. समर्थ रामदासांनी दासबोधात सांगितलेली - ‘जो विभक्त नाही तो भक्त’ हीच व्याख्या परिपूर्ण आणि यथार्थ आहे. भक्ताची देवाशी अभिन्न अनुसंधान असणे म्हणजे भक्ती. अडीचशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या श्री सच्चिदानंद स्वामींनी आपल्या गोपाळकाल्यात याचे सुंदर विवेचन केले आहे -

पाहता दुर्लभ जे का मुक्ती
ज्ञानी म्हणती ही चवथी
आम्ही म्हणे ईश्वरभक्ती
ऐक नृपती, सुजाणा
म्हणजे अतिशय दुर्लभ असणारी चौथी म्हणजे सायुज्य मुक्ती, तिलाच आम्ही ईश्वरभक्ती म्हणतो. म्हणजेच मुक्ती हे साध्य व भक्ती हे साधन ही वेगळी न राहता या त्रिपुटीचा नाश होऊन ईश्वराशी होणारी एकरूपता म्हणजेच भक्ती. सच्चिदानंद स्वामींनी अतिशय मोजक्या शब्दात ही व्याख्या दिली आहे. नदी जशी समुद्राकडे वाहतच असते, तशी जिवंतपणी कर्मवृत्ती ईश्वराकडे लागल्या की, बाह्यत: जरी तो भक्त शरीरधारी म्हणून वेगळा दिसत असला, तरी आतल्या आत त्या चैतन्याशी वृत्तिरूपाने जोडलेलाच असतो. त्यामुळे सर्व बंधरहित अंतिम चैतन्याशी एकरूप होण्याची अवस्था म्हणजे सायुज्य मुक्ती हा जिवंतपणीच अनुभवीत असतो. या प्रकारची भक्ती साधण्याचे वेगवेगळे प्रकार म्हणजे नवविधा भक्ती.

भगवंताशी सारखे अनुसंधान कसे राहील याची युक्ती वेगवेगळ्या स्तरांवर आणि वेगवेगळ्या परिस्थितीत साधण्याचे चातुर्य ज्याला गुरुकृपेने अवगत होते, त्यालाच अनायसे ईश्वरप्राप्ती घडून येते. ‘श्रीकृष्ण शरणम मम’ हा अष्टाक्षरी मंत्र सतत जपत राहिल्यास ही अनुभूती येऊ शकते. श्रीकृष्णाने गीतेच्या बाराव्या अध्यायात सांगितलेल्या सूत्रांचा ज्ञानेश्वर माउलींनी केलेला विस्तार पाहिल्यास ही गोष्ट मनात चांगली ठसते. परंतु हा मार्ग शक्तिगम्य नसून युक्तिगम्य आहे. वेगवेगळ्या संतांच्या उक्ती याबद्दल साक्ष आहेत.

भक्ती आणि मुक्ती दोन्ही तुझे पायी
ठाव मज देई तुका म्हणे॥
श्री नामदेव महाराजांनी केलेल्या माउलींच्या वर्णनाच्या अभंगात ‘श्रवणाचेनी मिसें बैसावें येऊनि। साम्राज्य भोगूनि सुखी व्हावे।’ यामध्येही हाच भाव आहे.
नवविधा भक्तीत सांगितल्याप्रमाणे श्रवणम, कीर्तनम, स्मरणम या पहिल्या तीन प्रकारांत परमेश्वराच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न करण्यास उपयोगी असतात; पादसेवनम, अर्चनं, वंदनम हे भगवंताच्या सगुण रूपाशी संबंधित आहे व दास्यम, सख्यम व आत्मनिवेन हे शेवटचे तीन भक्तीतील आंतरिक भाव आहेत. या नऊ पायर्‍या आहेत. नवविधा भक्तीमध्ये आत्मनिवेदन ही नववी सर्वात शेवटची पायरी, भक्तीचा परमोच्च बिंदू. यात भक्त आपल्या अंतर मनातले सर्व गुह्य गुप्त भगवंताला सांगतो. मी ‘श्रीकृष्णम् शरणम मम’ हे केवळ बाह्योपचार न राहता अंत:करणापासून शरण जाणे, तरच ते आत्मनिवेदन होते. इथे शारीरिक नग्नतेपेक्षा अंत:कर्णाची नग्नता कठीण असून पूर्ण शरणागती साधल्याशिवाय ती शक्य नाही. म्हणून हा भक्तीच्या सर्व प्रकारांत आत्मनिवेदन भक्ती ही श्रेष्ठ व परमोच्च मानली गेली आहे.

एकदा महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांना अप्रबुद्धांनी विचारले की, “देवाला काय मागावे?” अण्णासाहेबांनीदेखील सद्बुद्धी, धर्मवृद्धी मागावी असे न सांगता म्हणाले, “देवाला वाट्टेल ते मागावे, फक्त एवढेच म्हणावे की त्या गोष्टीसाठी मी प्रयत्न करणार नाही. हे तूच मला दे. असे झाल्यास देव आपल्या इच्छा पूर्ण करून त्यातून निभावूनही नेतो, ‘साध्या वासनांच्या सुवासना करणे’ हे केवळ भगवंताच्याच हाती आहे.”म आत्मनिवेदनाची ही एवढी व्याप्ती आहे. ‘श्रीकृष्णम शरणं मम’ या मंत्राचा सतत जप केल्यास ती आपणहून साधली जाते.

श्री सच्चिदानंद स्वामींच्या परंपरेत होणार्‍या गोपाळकाल्यात श्री एकनाथ महाराजांचे एक पद येते. भगवंताच्या दशम स्कंधातील कात्यायनी व्रताच्या वर्णनाच वेळी गोपी स्नानासाठी नदीवर गेल्या असता श्रीकृष्ण गोपींची वस्त्रे घेऊन कदंबाच्या झाडावर बसतो. त्या वेळी गोपी कृष्णाला वस्त्रे परत देण्याची प्रार्थना करतात. स्वत: त्या नग्न असल्याने कृष्णासमोर यायला लाजत असतात. हा लाजेचा पडदाच देहात्मभाव दृढ धरून ठेवणारा अडथळा असतो. हा दूर झाल्याशिवाय पूर्ण चैतन्याची एकरूपता येऊ शकत नाही, कारण, लाज केव्हा उत्पन्न होते? जेव्हा दुसरा कोणी पाहत असतो तेव्हा. एकांतात असताना उघडे होण्याची आपल्याला आपल्या शरीराची लाज वाटत नाही. पण दुसरा पाहतोय म्हटल्यावर लज्जा उत्पन्न होते. पण मीच सर्वांभूती भरलेला आहे, जगात माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही ही प्रगाढ अनुभूती आल्यावर लज्जेचे कारणच उरत नाही. त्यामुळे हा लाजेचा पडदा दूर करून सूक्ष्म ‘मी’चादेखील नाश करण्याचा श्रीकृष्णाचा हेतू त्यामागे होता. गोपींना याच जन्मी परमात्मा स्वरूपात मिळवून देणे हेच कृष्णाचे कार्य आहे. एकनाथ महाराजांनी आपल्या पदात हीच गोष्ट अचूकपणे सांगितली आहे. हे पद आत्मनिवेदनाचे मूर्तिमंत उदाहरण आहे -

अंतरीचे बा निजगुज। निवेदिलें कृष्णा तुज ॥1॥
निज सुखाचा एकांत। नाही केला म्या लोकांत ॥2॥
निज सुखाशी जे आले। जणी मनी एकचि झाले ॥3॥
विश्वव्यापका मुरारी। नाही केली म्या तुझी चोरी ॥4॥
एका एकी एकपण। निजगुज जनार्दन ॥5॥


bhakti_4  H x W
या पदात गोपी म्हणतात, ‘आमच्या अंतरीचे जे काही गुह्य होते, ते आम्ही तुला सांगितले. आम्ही आमच्या आत्मसुखाचा एकांतातील अनुभव लोकांमध्ये सांगितला नाही. मला एकांतात परमोच्च सुखाचा कोणता आनंद आला की जनात आणि वनात चैतन्यरूपाने व्यापलेला, मी एकच एक आहे. दुसरे कुणी नाही. कृष्णा, तू विश्वव्यापक आहेस. परंतु हा आनंदाचा आलेला अनुभव माझा स्वत:चा आहे. मी तो कुणाचा चोरला नाही.” एकनाथ महाराज म्हणतात, ‘हे एकलेपण हे एकाएकीच मिळाले आहे. कारण आमचे गुह्य म्हणजे जनार्दन श्रीकृष्ण आहे.’ श्रीकृष्णाशी झालेली एकरूपता अशा तर्‍हेने एकनाथ महाराजांनी सांगितली, हे आत्मनिवेदन भक्तीचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. आत्मनिवेदनाचे इतले सुंदर समर्पक विवरण दुसरे कुठे आढळत नाही.
श्रीकृष्णम शरणं मम।