ढगफुटींचे वाढते प्रमाण गरज ठोस उपायांची

विवेक मराठी    16-Jul-2021
Total Views |
@प्रा. किरणकुमार जोहरे
मराठवाड्याची व पश्चिम महाराष्ट्राचीही वाटचाल ‘ढगफुटीं’कडे होताना दिसत आहे. गेल्या वर्षी मराठवाड्यातील पाऊस सुमारे 200 टक्के वाढला आणि कन्नडसारख्या ठिकाणी 1000 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला. तसेच संपूर्ण मराठवाड्यात शेतीचे अतोनात नुकसान झाले. मराठवाड्यानंतर आता पूर्व विदर्भाबरोबरच पश्चिम विदर्भातील वाढलेल्या पावसाची व ढगफुटीची येत्या काळात वाढणारी संख्या हा शेती व शेतकर्‍यांसाठी चिंतेचा विषय आहे.

rain_1  H x W:

मान्सून, चक्रीवादळे यांच्यानंतर आता ढगफुटींचादेखील पॅटर्न बदलला आहे व येत्या काळात आणखी बदलेल. अशा वेळी कृषी क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून काही उपाययोजना व ठोस कृती आराखडा तयार करून तो राबविणे गरजेचे आहे.

26 जुलै 2005ची मुंबई येथील 950 मि.मी. पावसामुळे घडलेली ढगफुटी सर्वांच्या लक्षात आहे. या ढगफुटीमुळे भारताला  ढगफुटीची आगाऊ सूचना मिळावी, यासाठी किमान ३२ डॉप्लर रडारचे जाळे मिळाले. आज भारत हा आशिया खंडातील देशांना ६  तास अगोदर ढगफुटीची  आगाऊ सूचना  देणारी नोडल एजन्सी म्हणून  तीन वर्षपासून जागतिक हवामान संघटनेने अधिकृत मान्यता दिलेला भारत  देश आहे.   4 ऑक्टोबर 2010 रोजी पाषाण पुणे येथे झालेल्या ढगफुटीची आगाऊ सूचना  एक हवामान शास्त्रज्ञ म्हणून मला देता आली. व  हजारो लोकांचे जीव त्यावेळी वाचविता आले होते, ज्याची दखल जगभरातील देशांनी विविध प्रकारे घेतली. तसेच 2014च्या मार्च महिन्यात 29 जिल्ह्यांमध्ये झालेल्या गारपिटीची महाराष्ट्रातील नामांकित वृत्तपत्रात 'गारांच्या हिटलिस्टवर महाराष्ट्र' हा लेख लिहून मी शेती व अर्थव्यवस्थेचे नुकसान कमी करण्यासाठी दिली होती.  4 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या नवी मुंबई येथे झालेल्या ढगफुटीनंतर लगेचच 25 सप्टेंबर 2020 रोजी दक्षिण पुण्यात ढगफुटी झाली. या पुणे ढगफुटीत 26 जणांचे जीव गेले, 900पेक्षा जास्त जनावरे मृत्युमुखी पडली. अवघ्या एका तासात सुमारे 600 कोटीपेक्षा जास्त मालमत्तेचे नुकसान झाले. हजारो वाहने वाहून गेली. वास्तविक मुंबई येथील 500 किलोमीटर रेंजचे डॉप्लर रडार हवामान विभागाकडे कार्यान्वित असून अवघ्या 200 किलोमीटरवरील पुण्याला अ‍ॅलर्ट देता येणे शक्य होते, पण तो दिला गेला नाही व नागरिकांचे व जनावरांचे बळी गेले, तसेच शेतीचे व मालमत्तेचे नुकसान झाले, ही शोकांतिक वस्तुस्थिती म्हणावी लागेल.

19 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9 वाजता नाशिक जिल्ह्यात होणार्‍या ढगफुटीबाबत अ‍ॅलर्ट मला देता आला. तो अ‍ॅलर्ट मेसेज नाशिक जिल्ह्यात व संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला. त्याच दिवशी साडेदहाच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यांत - म्हणजे चांदवड, निफाड (शिवडी), नांदगाव (मनमाड) कळवण (वणी) या ठिकाणी ढगफुटी झाली. या ढगफुटीत असंख्य शेळ्या, मेंढ्या आदी जनावरे वाहून जात आर्थिक नुकसान झाले. मात्र अ‍ॅलर्टमुळे लोक नदीपात्रापासून दूर गेले व सुयोग्य काळजी घेतल्याने जीवितहानी झाली नाही. प्रशासनानेदेखील अ‍ॅलर्टची तातडीने दखल घेतली.

rain_3  H x W:

देशातील व महाराष्ट्रातील वाढलेल्या ढगफुटींची संख्या, तसेच ढगफुटींच्या घटनांतील वेळेतील बदल ही धोक्याची घंटा आहे, असे मला एक अभ्यासक म्हणून वाटते. अलीकडेच 3 जून 2021 रोजी वृत्तवाहिनीवरून पश्चिम महाराष्ट्रात व मराडवाड्यातदेखील ढगफुटीचा धोका असल्याचा हवामान अ‍ॅलर्ट देता आला. 5 जून 2021 रोजी सातारा जिल्ह्यातील मांडाव्यात ढगफुटी झाली व महापुरात 70 वर्षांची महिला वाहून गेली व लाखोंचे नुकसान झाले.

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात 7 जून 2021 रोजी भोकरदन तालुक्यात वाकडी-आसडी गावात दुपारी 3च्या सुमारास ढगफुटी झाली. जुई नदीवरील पूल वाहून गेला, तसेच शेकडो एकर जमीन व माती वाहून गेल्याने नापिकी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. 9 जून 2021 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात गोळेगाव येथे वाकडीपासून सुमारे 10 किलोमीटरवर दुपारी साडेतीनच्या सुमारास ढगफुटी झाली. यात जुई नदीवरील दुभाजक पूल वाहून गेला, शेतातील माती वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला. येथील वाहतूकही दुसर्‍या मार्गाने वळवावी लागली होती. 9 जून 2021पर्यंत किमान चार ढगफुटी होऊनदेखील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील झालेल्या अनेक ढगफुटी या अतिवृष्टी असल्याचे म्हणत हवामान खात्यातर्फे नाकारल्या गेल्या आहेत.

यानंतर महाराष्ट्रात उस्मानाबाद (9 जुलै), अमरावती (12 जुलै), परभणी (12 जुलै), जालना तालुक्यात (13 जुलै) अशा जुलै महिन्यात सलग पश्चिम विदर्भात व मराडवाड्यासारख्या दुष्काळी प्रदेशात ढगफुटी झाल्या आहेत आणि ही यादी वाढतेच आहे.

काय घडते आहे?

मराठवाड्यातील दुष्काळी प्रदेशदेखील ढगफुटींचा प्रदेश बनला आहे. तसेच मान्सून उशिरानेच सुरू होऊन उशिरा संपत आहे. 2020ला मान्सून पॅटर्नमध्ये पुन्हा अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. महाराष्ट्रात 2020 या वर्षी 15 ऑगस्टला मान्सून सुरू झाला व 15 डिसेंबरपर्यंत बरसला. ऑगस्ट महिन्यात गेल्या 44 वर्षांतील सर्वाधिक पाऊस अवघ्या काही दिवसांत पडला. श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस न होता ढगांचा गडगडाट-विजांचा चमचमाट यासह मुसळधार पाऊस पडला. यंदा 28 ऑगस्ट 2021नंतर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल आणि दिवाळी, दसरा, ख्रिसमसपर्यंत असा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असा तो चार महिने बरसेल, असे माझे व्यक्तिगत अभ्यास निष्कर्ष आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये, तसेच जानेवारीमध्ये महाराष्ट्राला गारपिटीचा सामना करावा लागेल आणि मान्सून परतताना वातावरणातील अस्थिरतेमुळे अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रीवादळे निर्माण होत पाऊस धुमाकूळ घालतानाचा अनुभव आपण घेऊ.

rain_1  H x W:

औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक आदी अनेक जिल्ह्यांत 2020मध्ये ढगफुटींनी शेती उद्ध्वस्त झाली, तसेच मराठवाड्याची व पश्चिम महाराष्ट्राचीही वाटचाल ‘ढगफुटीं’कडे होताना दिसत आहे. गेल्या वर्षी मराठवाड्यातील पाऊस सुमारे 200 टक्के वाढला आणि कन्नडसारख्या ठिकाणी 1000 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला. तसेच संपूर्ण मराठवाड्यात शेतीचे अतोनात नुकसान झाले. मराठवाड्यानंतर आता पूर्व विदर्भाबरोबरच पश्चिम विदर्भातील वाढलेल्या पावसाची व ढगफुटीची येत्या काळात वाढणारी संख्या हा शेती व शेतकर्‍यांसाठी चिंतेचा विषय आहे. राष्ट्रीय स्तरावरील पावसाची वार्षिक सरासरी 890 मि.मी. इतकी आहे. या तुलनेत अमरावतीसारख्या जिल्ह्यात, जिथे 350 मि.मी. वार्षिक पाऊस पडतो, अशा ठिकाणी मान्सूनपूर्व काळात ही ढगफुटी होत आहे.
 
उत्तर महाराष्ट्रातदेखील पावसाच्या वितरणातले बदल स्पष्ट जाणवत आहेत. केवळ नाशिक जिल्ह्याचे निरीक्षण केले, तर असे लक्षात येते की इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर येथील पाऊस घटून बागलाण, देवळा, नांदगाव या तालुक्यांत पावसाचे प्रमाण 2 ते 5 पट वाढले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कधीच होत नाही अशी अभूतपूर्व गारपीट यंदा कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुण्याच्या अनेक भागांत झाली आहे. इतकेच नव्हे, तर आशिया खंडातील मान्सून पॅटर्नबरोबरच अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या दोन्ही ठिकाणी चक्रीवादळांचा पॅटर्न बदलला आहे, असे माझे निरीक्षण तसेच वैज्ञानिक संशोधन निष्कर्ष आहेत.

 पंचसूत्री उपायांची!

यावर उपाय म्हणून धोरणात्मक निर्णय घेताना राष्ट्रीय हितासाठी व सुरक्षिततेसाठी मान्सून, चक्रीवादळे, ढगफुटी, गारपीट, दुष्काळ, जल व्यवस्थापन व पूर नियंत्रण यासाठी कृती आराखडा आदी मुद्दे प्राधान्यक्रमात असायला हवेत. कारण हवामान बदलामुळे शेतीला व परिणामी देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देत थेट वित्तीय फटका बसतो. पुढील उपायात्मक पंचसूत्री यासाठी राबविणे शक्य आहे, असे मला वाटते.
1. पॅटर्न बदलाची सखोल कारणमीमांसा

मान्सून, चक्रीवादळे यांच्यानंतर आता ढगफुटींचादेखील पॅटर्न बदलला आहे. पॅटर्न बदलाची सखोल कारणमीमांसा करणे अत्यावश्यक आहे. हवामान बदलाशी जुळवून घेत, आधुनिक व पारंपरिक तंत्रविज्ञान वापरत पीक निवड नियोजन करावे लागेल. कॉस्मिक रेज, सौर डाग, ग्लोबल इलेक्ट्रिक सर्किट (जीईसी), मॅग्नेटोस्फिअर, आयनोस्फेरिक सिंटिलेशन अशा नानाविध घटकांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष घडणार्‍या प्रक्रियांनी मान्सूनच्या पावसावर थेट परिणाम होतो आहे, हे मान्सून पॅटर्न बदलामागचे विज्ञान आहे. परिणामी याचा सखोल अभ्यास व संशोधन होणे गरजेचे आहे.

rain_2  H x W:
 
2. प्रयोगशाळा सर्वांसाठी खुली

प्रभावी उपाययोजना सुचविणार्‍या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या संशोधनाला प्रोत्साहन व आर्थिक तरतूद व्हायला हवी. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या मुलांमध्ये ही बुद्धिमत्ता आहे. ही राष्ट्रीय संपत्ती आहे. राष्ट्रीय सुरक्षेची आवश्यक खबरदारी घेतानाच देशातील बुद्धिमत्तेचा पुरेपूर वापर व्हावा, यासाठी भारतातील सर्व प्रयोगशाळांचे दरवाजे आम जनतेसाठी खुले होणे गरजेचे आहे.
  
3. अंदाज नव्हे, तर खरीखुरी माहिती यंत्रणा !
 
‘अंदाज नव्हे, तर खरीखुरी माहिती’ अहोरात्र देणार्‍या राष्ट्रीय इशारा यंत्रणेची देशाला गरज आहे. ही यंत्रणा राष्ट्रीय मुख्य केंद्राशी जोडलेली असली, तरी तिचे कामकाज विकेंद्रित पद्धतीने असावे, म्हणजे युद्धजन्य परिस्थितीत ती निकामी होणार नाही. मुख्य केंद्र राज्यातील केंद्राशी जोडलेले असावे. राज्यातील यंत्रणा जिल्ह्यांशी व जिल्हे त्यांच्या अंतर्गत येणार्‍या तालुक्यातील यंत्रंणाशी, तर तालुके त्यांच्या पंचक्रोशीतील गावांशी जोडलेले, अशी रचना असावी.

4. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हा मूलाधार

आपत्ती व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र राज्याला साधारणपणे 14 हजार कोटींपर्यंत निधी उपलब्ध आहे. आपत्ती आल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा आपण ‘प्री-डिझॅस्टर मॅनेजमेंट’वर भर देऊ शकतो. परिणामी जनावरे व मनुष्यहानी टाळणे, शेतीची व संपत्तीची हानी टाळणे शक्य आहे. महाराष्ट्रातील 43,722 गावांतील पर्जन्यमापके आणि हवामान घटकांची माहिती देणारी इतर यंत्रणा कार्यान्वित करणे, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग यासह पारंपरिक विज्ञानाची साथ अवश्य घ्यावी.

5. अक्षांश-रेखांशानुसार ‘कस्टमाइज्ड-रियल टाइम वेदर इन्फॉर्मेशन अँड वेदर अ‍ॅलर्ट’ची गरज

भारतातील 32 डॉप्लर रडार्सचे नेटवर्क, सॅटेलाइट यंत्रणा, ग्राउंड लेव्हल ऑब्जेक्शनेबल यांचा डाटा एकत्रित पृथक्करण सुपर कॉम्प्युटर (एचपीसी)वर प्रोसेस झाला पाहिजे. यातून उपलब्ध होणार्‍या निष्कर्षांच्या आधारे अक्षांश-रेखांशानुसार ‘कस्टमाइज्ड’, तसेच ‘रियल टाइम वेदर इन्फॉर्मेशन अँड वेदर अ‍ॅलर्ट’ प्रत्येक भारतीय नागरिकाला वेळोवेळी त्यांच्या मोबाइलवर देणे शक्य आहे. यासाठी राजकीय इच्छाशक्ती, जनतेचा दबाव व भरीव कृती कार्यक्रम तातडीने होणे आवश्यक आहे.
भारतातील हवामान शास्त्रज्ञ व कृषी शास्त्रज्ञ हेदेखील देशाचे सैन्य आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्था मजबुतीसाठी प्रत्येक शास्त्रज्ञाने आहे त्या परिस्थितीत, उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करीत, तसेच आपल्या मर्यादांवर मात करीत, सामूहिकरित्या उत्तरदायी राहत व जबाबदारी घेत जनहितासाठी अधिक भरीव कृती केली पाहिजे.
 
(लेखक गेल्या 12 वर्षांहून अधिक काळ विनाअनुदानित व विनामोबदला राष्ट्रीय पातळीवर चालविल्या जाणार्‍या ‘अंदाज नव्हे, माहिती!’ या हवामान अ‍ॅलर्ट सेवेचे प्रणेते असून पुणे येथील भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटियओरॉलॉजीचे - आयआयटीएमचे माजी शास्त्रज्ञ आहेत.)
 

kirtan_1  H x W

प्रा. किरणकुमार जोहरे
9168981939, 9970368009
Facebook Id: Kirankumar Kiku
Twitter: @kirankumarjohar
Instagram: Kirankumar Johare
YouTube: Kirankumar Johare