एक कृतार्थ जीवन

विवेक मराठी    16-Jul-2021
Total Views |
@मोहन ढवळीकर 9223227965
एखादा माणूस आपल्या कर्तृत्वाने किती मोठा होऊ शकतो, त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अविनाश तांबे. चेंबूर हायस्कूल किंवा चेंबूर एज्युकेशन सोसायटीची शाळा याहीपेक्षा तांब्यांची शाळा म्हणून त्या शाळेकडे पाहिले जायचे.. किंबहुना तशीच ओळख निर्माण झाली होती. तब्बल चाळीस वर्षे चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आणि त्यानंतर त्याच संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करणार्‍या अविनाश तांबेंचे दि. 8 जुलै रोजी दु:खद निधन झाले आणि मुंबईतल्या - विशेषत: पूर्व उपनगरातील शैक्षणिक क्षेत्रातील एक देदीप्यमान तारा निखळून पडला.
RSS_1  H x W: 0
चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे काम पाहायला अनेक शिक्षण संस्थाशीही त्यांचा अत्यंत जवळचा संबंध होता. नुसता संबंधच नव्हता, तर ते अशा अनेक संस्थांत कार्यरत होते, त्यांचा सक्रिय सहभाग होता. शिक्षण क्षेत्राचा त्यांचा अनुभवच इतका प्रचंड होता की, अनेक संस्थाचालक त्यांच्या संस्थेतील अडचणी घेऊन तांबेंकडे सल्ला घेण्यासाठी येत असत.

समाजाच्या गरजेपोटी एखादी शाळा सुरू होते, त्या वेळी शाळेच्या कामकाजाकडे अधिक लक्ष देऊन शाळेची सर्वांगीण प्रगती समाजाला दाखवता आली पाहिजे, या सामाजिक जाणिवेतून शाळा चालवणे हे काहीसे कठीण काम असते. पण असा दृष्टीकोन असलेले कार्यकर्ते संस्थेत असतील, तर त्या संस्थेची प्रगतीही निश्चितपणे होत असते. अशा कार्यकर्त्यांपैकी एक म्हणजे अविनाश तांबे काका. आपल्या जीवनात त्यांनी आपल्या घरापेक्षाही शाळेला प्राधान्य दिले. त्यांचे कुटुंबीय ज्या चार भिंतीत राहत होते, ते घर मोठे की, समाजाचे आपण काही देणे लागतो या जाणिवेतून शाळारूपी घर मोठे.. हा अनेकांच्या मनात प्रश्न उभा राहावा इतके त्यांनी शाळेसाठी केले. शैक्षणिक क्षेत्रातील कामाचा अनुभव लक्षात घेऊन शालान्त परीक्षा महामंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करून सरकारने त्यांच्या कार्याची पावतीच दिली, असे म्हणता येईल.

प्रचंड जनसंपर्क ही त्यांची मोठी जमेची बाजू. या संपर्काचा उपयोग आपल्या शाळेसाठी किंवा संस्थेसाठीच होईल याकडे त्यांचे लक्ष असायचे. शिक्षण विभागाच्या कार्यालयात शाळेचे किंवा संस्थेचे काम घेऊन कुणी गेले, तर त्या कार्यालयातील अधिकार्‍यांचे किंवा कर्मचार्‍यांचे मिळणारे सहकार्य पाहता त्यांच्या संपर्काचा अनुभव यायचा. चेंबूर एज्युकेशन सोसायटीपेक्षा तांबेंच्या शाळेचे काम आहे म्हटल्यानंतर त्याच्याकडे अधिक लक्ष दिले जायचे. संस्थेच्या एखाद्या शिक्षकाची नेमणूक असेल किंवा अगदी एखाद्या शिपायाच्या कायमस्वरूपी नोकरीचे असेल, तांबे त्याच्या कार्यालयात स्वत: जायचे. सगळ्यांशी गोड बोलून आपले काम करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता. पण हे सर्व नियमांच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच. या सर्वांचा परिणाम म्हणजे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनाच ते आपलेसे वाटायचे. यातील अनेक जण आपल्या कामासंबंधी असलेल्या अडचणींतून किंवा अगदी वैयक्तिक अडचणींतूनही मार्ग काढण्यासाठी अगदी विश्वासाने तांबेंकडे यायचे. तांबे हे या सर्वांसाठीच एक विश्वासाचे ठिकाण होते. संस्थेचे प्रधान कार्यवाह म्हणून अनेकांचे ते तांबे सर होते. वयाने आणि अनुभवाने मोठे असण्याबरोबरच आपले मन मोकळे करण्यासाठी संस्थेतील एक हक्काचे माणूस म्हणून ते अनेकांचे तांबे काका, तर अनेकांच्या अडीअडचणीत मदत करणारे ते तांबे साहेब होते.
 
तांबे तसे बरेचसे प्रेमळ स्वभावाचेच होते, पण ते खूप रागीटही होते. कदाचित हे विधान कुणाला पटणार नाही. पण त्यांच्या रागाचा अनुभव काही जणांना निश्चितच आलेला आहे. अगदी त्यांच्या घरचच उदाहरण आहे. त्यांच्या एका पायाला खूप सूज यायची. चालणेही कठीण व्हायचे. डॉक्टरांचे उपचार चालू होतेच. पण अनेकदा त्या दुखर्‍या पायाला एखादे औषध लावायचे नाही म्हणून सांगितले असतानासुद्धा तेच औषध पायाला लावून घेण्याचा त्यांचा हट्ट असायचा. मुलांनी विरोध केला की त्यांच्यावर रागवायचे, चिडायचे.

त्यांच्या रागाचा मीही एकदा अनुभव घेतला आहे. ही घटना काही वर्षांपूर्वीची आहे. तो दिवस 15 ऑगस्टचा होता. शाळेचा स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम झाला. अगदी ठरल्याप्रमाणे. दरम्यान, संस्थेच्या कार्यकारिणीतील एका सदस्याबरोबर त्यांचा काही वाद झाला. त्या सदस्याचाही आवाज चढला होता. वाद खूप विकोपाला गेला होता. तसे शाळेत अन्य कुणी फारसे नव्हते. तरीही असा वाद होणे बरोबर नव्हते. आम्ही एक-दोन जण शाळेच्या मैदानावर होतो. तांबे तावातावाने कार्यालयाबाहेर आले आणि मला हाक मारून बोलावून घेतले आणि म्हणाले, “या शाळेच्या चाव्या घे. मी उद्यापासून शाळेत येणार नाही. असा कुणाकडूनही अपमान मला करून घ्यायचा नाही.” एकूण परिस्थिती खूपच गंभीर आहे, हे लक्षात घेऊन शांतपणे त्या चाव्या मी माझ्याकडे घेतल्या. काही बोललो नाही कुणालाच. ठीक आहे म्हणून शांतपणे बाजूला झालो. नाही म्हटले तरी थोडीशी काळजी वाटत होतीच. कारण ते शाळेत आले नाहीत तर? काहीशी चिंता मनात ठेवून घरी आलो. दुसर्‍या दिवशी सकाळी शाळेत गेलो. काहीशा दडपणाखाली. तांबे शाळेत येतील की नाही? नाही आले तर काय करायचे? कसे समजावयाचे त्यांना? असे अनेक प्रश्न घेऊन शाळेत गेलो, तर तांबे काल जणू काही काहीच झाले नाही अशा भावनेने, अशा मन:स्थितीत शांतपणे काम करीत बसले होते. खूप बरे वाटले होते. कालचा विषय काढायचा नाही असे ठरवून त्यांच्यासमोर बसलो. त्यांनीही तो विषय काढला नाही. मनावरचे एक मोठे दडपण दूर झाले होते.

त्यांच्या तीन-चार मानसकन्या होत्या - म्हणजे आहेत. त्यातल्याच एक ज्येष्ठ साहित्यिका प्रतिभा सराफ. त्यांचा एक साहित्यिक कार्यक्रम ठाण्याला होता. त्यांनी त्या कार्यक्रमाची माहिती तांबेंना दिली. त्या कार्यक्रमस्थानी पोहोचल्या आणि समोर तांबेंना बघून त्या आश्चर्यचकित झाल्या. त्यांना होणारा शारीरिक त्रास, परत कार्यक्रम इतका दूर ठाण्याला, असे सगळे असताना तांबे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. प्रतिभाताईंच्या चेहर्‍यावरील प्रश्नचिन्ह पाहून तांबेंनीच उत्तर दिले. ते म्हणाले, “अगं, माझ्या मुलीचा कार्यक्रम आहे! मी येणार नाही असं कसं शक्य आहे?” आपण ठाण्याला जातोय हे त्यांनी घरी कुणालाच सांगितले नव्हते. सांगितले असते तर कदाचित आपल्याला कुणीच परवानगी देणार नाही, हे लक्षात घेऊन ते ठाण्याला पोहोचले होते. बराच वेळ झाला तरी बाबा घरी आले नाहीत, म्हणून मुलांनी ते कुठे आणि कुणाकडे जातील याचा अंदाज घेऊन फोनवर चौकशी केली. पण सगळीकडे ‘नकारघंटाच’. सर्व जण काळजी करत वाट पाहत बसलेले. इतक्यात तांब्यांच्या स्वारीने घरात प्रवेश केला. घरातले एकूण वातावरण पाहून त्यांनी काहीशा अपराधी भावनेने आपण कुठे गेलो होतो ते सांगितले आणि पुन्हा असे होणार नाही असे सांगून ती वेळ मारून नेली.
 
तांबेंनी अशी अनेक माणसं जोडली होती. अगदी शाळेतील शिपायापासून ते मंत्र्यांपर्यंत. शाळेतील साफसफाईच्या कामासाठी शिपायांना ते चांगलेच फैलावर घ्यायचे. अगदी अर्वाच्च भाषेत ते त्यांना रागवायचे. पण कुणीही त्यांना उलट बोललेले मला आठवत नाही. कारण त्या सर्वांना माहीत होते की, सर किंवा साहेब आता खूप चिडले आहेत. काही वेळाने शांत होतील. आणि व्हायचेही तसेच. काही वेळात त्यांचा राग शांत झाल्यानंतर त्याच शिपायांशी ते इतक्या आत्मीयतेने, प्रेमाने बोलत की जणू काही झालेच नाही.
 
अविनाश तांबे 1955मध्ये चेंबूरला आले. 2-3 वर्षे ते वरळीला राहत होते. त्यानंतर ते चेंबूरला आले. सुरुवातीला काही दिवस टिळकनगरम्दयि, नंतर देऊळवाडीमध्ये ते राहायचे आणि त्यानंतर सांडूवाडीत ते राहत असत. खरे तर ती जागा तशी अत्यंत लहान. पण त्या जागेतही ते समाधानाने राहत होते. काही वर्षे त्यांनी व्होल्टास या कंपनीत नोकरी केली. त्यानंतर एअरकंडिशन दुरुस्तीचा व्यवसायही केला. 1961 साली मुंबईतल्या प्रसिद्ध सरदारगृहात त्यांचा विवाह झाला.

रा.स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि लेखक चं.प. भिशीकर यांच्याशी अत्यंत जवळच संबंध. अर्थातच त्यांच्या मैत्रीचा दुवा हा संघच होता. ते चेंबूरला आले, तेव्हापासून चेंबूर येथील गांधी मैदान प्रभात शाखेवर ते नियमितपणे जायचे. गणोजी काहाडकर, नवरे, वसंतराव उपाळे असे काही ज्येष्ठ स्वयंसेवक याबरोबर नियमितपणे उपस्थित असायचे. म्हातार्‍यांची शाखा म्हणूनही संघविरोधक हिणवत असत. पण या पाच-सहा ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या मागे शेकडो स्वंयसेवकांची शक्ती उभी आहे, हे अनेक दिसून यायचे. त्यामुळे खरे तर हे पाच-सहा म्हातारे या शाखेच्या आजूबाजूच्या वस्तीला आधारच होते.

2012 साली चेंबूर हायस्कूलमध्ये समसरता साहित्य संमेलन घ्यावे, अशी इच्छा शाळा आयोजकांनी व्यक्त केली. मोठ्या आनंदाने त्यांनी होकार दिला. या साहित्य संमेलनाची सर्व जबाबदारी जणू काही आपल्याच खांद्यावर आहे अशा उत्साहाने ते तयारीलाही लागले. संस्थेच्या कार्यकारिणीसमोर हा विषय मांडून या साहित्य संमेलनाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी कार्यकारिणीची मान्यताही मिळवली. या साहित्य संमेलनाच्या आधी शाळेच्या मैदानावर बंगाली समाजाच्या दुर्गापूजेचा महोत्सव होता. मैदानावर या निमित्ताने एक भव्य आणि सुशोभित असा मंडप उभा केला होता. दसर्‍यानंतर तीन-चार दिवसांनी साहित्य संमेलन होते. या मंडपाचा साहित्य संमेलनासाठी उपयोग करून घेता येईल का, या दृष्टीने विचार सुरू झाला. पण दुर्गापूजा आणि साहित्य संमेलन यात तीन-चार दिवसांचे अंतर होते. चार दिवस हा मंडप असाच ठेवायचा आणि संमेलनाचे आणखी दोन दिवस.. म्हणजे या पाच-सहा दिवसांचा खर्च करावा लागणार होता. दुर्गापूजा आयोजकांशी बोलून हा खर्च त्यांनी करावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. सर्वांसमोर हे एक आव्हानच होते. तांबेजींनी हे आव्हान स्वीकारले आणि त्या आयोजकांशी बोलून त्यांचा होकारही मिळवला. पुढे साहित्य संमेलन त्याच मंडपात झाले. संमेलन यशस्वी होण्यासाठी कुठे काही कमी पडू नये यासाठी त्यांचे बारीक लक्ष असे. संमेलनाच्या यशाचे दावेदार तांबेजी आणि त्यांचे सहकारी होते. तांबेजींना एखादा विषय मनापासन पटला की, त्यासाठी ते सर्व काही विसरून तो विषय कसा मार्गी लागेल, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असायचे.

 
अनेक राजकारण्यांशी त्यांचा अत्यंत जवळचा संबंध होता. वैयक्तिक मतभेद असूनही असा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी संबंध ठेवण्याची कला त्यांच्याजवळ होती. सा. ‘विवेक’साठी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या मुलाखती घेणे चालू होते. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरेंची मुलाखत मला घ्यायची होती. माझी त्यांच्याशी ओळख ना पाळख. पण तांबेंच्या एका फोनने माझे काम झाले होते. हंडोरेंनी मला मुलाखतीसाठी वेळ दिला. मनमोकळ्या गप्पांतून एक चांगली मुलाखत घेण्याचा आनंद मला मिळाला.

खरे तर राजकारण हा त्यांचा पिंड नव्हताच. तरीपण राजकारणाविषयी ते बोलायचे. टीका करायचे. त्यांनी 1985 साली महापालिकेची निवडणूक लढवून त्याचाही त्यांनी अनुभव घेतला होता. त्यात त्यांना यश मिळाले नाही हा भाग वेगळा. एका अर्थी त्यांनी आपली ही इच्छाही पूर्ण करून घेतली होती. समाजाच्या विविध क्षेत्रांशी स्पर्शित असूनही शिक्षण क्षेत्रात त्यांना विशेष रुची होती. त्या क्षेत्रात काम करता करता त्या क्षेत्राचा प्रचंड अनुभ त्यांच्य गाठीशी होता. आपल्या संसारापेक्षा किंवा घरापेक्षा शाळा हेच त्यांचे आयुष्य होते. संस्थेच्या कार्यकारिणीत अनेक विषयांवर खूप गरमगरम चर्चा व्हायची. वाद व्हायचा. तांबेंच्या कार्यपद्धतीवर टीकाही व्हायची. तांबे अस्वस्थ व्हायचे. पण शाळेचे काम सोडायची भाषा कधीही त्यांच्या तोंडी नसायची. उलट गेल्या आठ-दहा वर्षांत तांबेच्या जागेवर आणखी कुणालातरी आणले पाहिजे अशी चर्चा त्यांच्या कानावर आली, तेव्हा तर ते प्रचंड अस्वस्थ व्हायचे. या अस्वस्थेतेमागे सत्ता हे कारण नव्हते, तर संस्थेविषयीची आत्मीयता होेती. शाळेसाठी रोज आठ-दहा-बारा तास वेळ देणारे तांबे रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असो, ते शाळेत येणारच. ते संस्थेचे घटनेप्रमाणे कार्यवाह होते. पण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कार्यवाहपदाला त्यांनी मान मिळवून दिला आणि म्हणूनच शाळा चेंबूर एज्युकेशन सोसायटीची असूनही लोकांना ती तांबेंची शाळा म्हणूनच जास्त परिचित होती.

आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य त्यांनी शाळेसाठी दिले. आयुष्यातील शेवटची दोन-तीन वर्षे ते आता थकल्याची जाणीव होत होती. चालताना होणारा त्रास त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव लक्षात घेऊन कार्यवाह म्हणून ते निवृत्त झाले, तरी त्यांच्या अनुभवाचा लाभ संस्थेला मिळावा, यासाठी त्यांनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करावे अशी त्यांना गळ घातली. पण लवकरात लवकर या पदावरूनही मला मुक्त करावे या अटीवर त्यांनी अध्यक्षपदासाठी मान्यता दिली.

असे तांबे होणे नाही, इतकेच त्यांच्याविषयी म्हणता येईल. घरात एखादी वयस्क व्यक्ती अगदी अंथरुणाला खिळलेली असते. पण कुटुंबात त्याही अवस्थेत त्या व्यक्तीचा आधार वाटत असतो. ती व्यक्ती त्या कुटुंबाची शक्ती असते. अशा व्यक्तीचा आधार कायमचा नाहीसा होणे याचे दु:ख काय आणि किती असते, याचे वर्णन करताच येत नाही.

 
काहीसे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असूनही अत्यंत प्रेमळ स्वभावाचे तांबे सर, विद्यार्थी-पालक, शिक्षक किंवा शिपाई असो, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे तांबे काका आणि अनेकांचे तांबेसाहेब पुन्हा होणे नाही, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरेल पण त्यांच्या कर्तृत्वाविषयीची वस्तुस्थिती बदलणार नाही, हेही तितकेच खरे आहे.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते याची प्रचिती देणार्‍या तांबे काकू हे एक ज्वलंत उदाहरण आहे. तांबेंच्या निधनानंतर त्यांच्यामागे तांबे काकू, त्यांची दोन मुले - देवाशिष आणि रोहित, दोन सुना आणि नात असा मोठा परिवार आहे.
तांबेजींच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
तांबेजींना भावपूर्ण श्रद्धांजली.