स्मर्तृगामी श्री स्वामी समर्थ महाराज

विवेक मराठी    16-Jul-2021
Total Views |
@डॉ. हेरंबराज पाठक
स्मर्तृगामी या शब्दाचा अर्थ स्मरण करताक्षणी हजर असणारे. स्मरण या शब्दाचाही अर्थ आठवण काढणे असाच आहे. फक्त प्रासंगिक किंवा तेवढ्यापुरती असा अर्थ अभिप्रेत आहे. नामस्मरण या शब्दाचा उच्चार करतो, पण या शब्दाच्या अर्थाकडे फारसे लक्ष देत नाही. ज्याचे नाव जपायचे आहे, त्याच्या सगुण रूपाचेही स्मरण एकाच वेळी होणे यालाच नामस्मरण म्हणतात.

kirtan_3  H x W
दत्त महाराजांचे चौथे अवतार म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांची सर्वत्र ओळख आहे. स्वत: स्वामी समर्थ महाराजदेखील मूळ पुरुष, वडाचे झाड इत्यादी ओळख करून देत होते. ‘देणारा’ असाही दत्त या शब्दाचा एक अर्थ आहे. दत्त महाराज हे स्मर्तृगामी आहेत, तसेच अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज हेही स्मर्तृगामी आहेत असा सर्वच गुरुलीलामृत, स्वामी बखर, स्वामी चरित्र सारामृत, स्वामी कृपामृत, नित्याचे सांगाती यासारख्या सर्व ग्रंथांच्या स्वामी समर्थ चरित्रकारांनी उल्लेख केलेला आहे. अगदी स्वामी तारक मंत्राचे रचनाकार, स्वामी कृपांकित, महास्वामीभक्त वे.शा.सं. विश्वनाथ दामोदर वर्‍हाडपांडे (नागपूर) यांनी स्वामी तारक मंत्रातील पहिल्या कडव्याच्या दुसर्‍या ओळीत ‘अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी। अशक्यही शक्य करतील स्वामी॥’ (मूळ शब्द असाच आहे, परंतु सगळ्यांना म्हणण्यास सुलभ जावा, म्हणून ‘स्मरणगामी’ असा शब्द रूढ झालेला आहे. शिवाय तो म्हणतानाची लयदेखील बिघडत नाही) असा उल्लेख आहे, तो उचितच आहे. कारण महाराजांचे अभयवचन आहे - ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ किंवा ‘हम गया नही, जिंदा है।’

 
अर्थात स्मर्तृगामी या शब्दाचा अर्थ स्मरण करताक्षणी हजर असणारे. तुम्ही ज्या क्षणी महाराजांची आठवण कराल, ज्या क्षणी तुम्ही महाराजांचे स्मरण कराल, त्याक्षणी महाराज तुमच्या समोर हजर असतील. स्मर्तृगामी या शब्दाचे वैशिष्ट्य असे की, महाराज तुम्ही स्मरण करण्याआधीही तुमच्याबरोबर आहेत. ते वाटच पहातात तुम्ही कधी बोलावता त्याची. तुम्ही त्यांचे स्मरण केल्यावरही ते तुमच्या समोरच आहेत. काम संपल्यावरही ते कुठेच जात नाहीत. ते सतत तुमच्या समवेत आहेत. याला स्मर्तृगामी असे म्हणतात आणि स्मरणगामी या शब्दात फारसा फरक नाही. स्मरण याचाही अर्थ आठवण काढणे असाच आहे. फक्त प्रासंगिक किंवा तेवढ्यापुरती असा अर्थ अभिप्रेत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे स्वामी अवतारात कोणतीच बंधने पाळत नव्हते. अवलिया होते. दत्त अवतारात, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती अवतारात जेवढे कडक वैराग्य होते, तेवढे कडक, पराकोटीचे वैराग्य स्वामी अवतारात त्यांनी पाळले नाही. अगदी कुठेही बसत, कुठेही, कुणाबरोबरही जेवत, मनात आले तर आठ दिवसांचे शिळे, तर कधी गरम गरम अन्न स्वीकारत, कोणत्याच गोष्टीचा विधिनिषेध पाळत नव्हते, स्मशानातही हाडे, गोट्या खेळत, निवडुंगाच्या काट्यांच्या शय्येवर शांत झोपत. त्यांचा सगळीकडे मुक्त संचार होता. ते मनाला वाटेल तसे फिरत. परंतु महाराजांकडून सकल जडमूढांच्या कल्याणांचे काम अविरत चाललेले असे.

श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात दत्त अवतारी असल्याने श्री स्वामी समर्थ महाराजही स्मर्तृगामी आहेत. स्मर्तृगामी या शब्दाचा दुसरा अर्थ असा - ज्यांना त्रिकालज्ञान म्हणजे भूतकाळाचे, वर्तमानकाळाचे, भविष्यकाळाचे ज्ञान आहे, त्यांना त्रिकालज्ञानी किंवा स्मर्तृगामी असे म्हणतात. श्री स्वामी समर्थांनी वे.शा.सं. दशग्रंथी विद्वान माधवाचार्य रामचंद्र म्हैसलगीकर यांच्या वयाच्या 60व्या वर्षी डोक्यावर अक्षता टाकून विवाहाचे संकेत दिले. द्वारकापुरीला सूरदासांना डोळे देऊन सगुण रूपात कृष्णदर्शन दिले. कानफाट्या नावाचा एक बलाढ्य मल्ल मनातून महाराजांचे सतत स्मरण करीत असे. महाराजांनी त्याचाही उद्धार केला.

भक्ती म्हणजे काय? देवाशी विभक्त न राहणे यालाच भक्ती म्हणतात. भक्ती या शब्दाचा अध्यात्मातील दुसरा अर्थ स्वस्वरूपाची ओळख करून घेणे होय. श्रीनारद भक्तिसूत्राच्या 82व्या सूत्रात भक्तीचे 11 प्रकार सांगितले आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, पूजा, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन या नऊ पायर्‍या तर आहेतच; याशिवाय गुणभक्ती व कांताभक्ती या दोन नवीन भक्तींचा उल्लेख केला आहे. प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने चिंतन करावयाचे झाल्यास नवविधा भक्तीतील श्रवण, कीर्तन आणि स्मरण या भक्ती नामप्रधान आहेत. पादसेवन, पूजा, वंदन या तीन भक्ती या रूपप्रधान भक्ती आहेत, तर दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या तीन भक्ती भावप्रधान आहेत. श्रवणभक्तीमुळे राजा परीक्षित तरून गेला. कीर्तनामुळे महर्षी नारद, शुकाचार्य तरले, तर भक्त प्रल्हाद हा स्मरणाने तरला. माता लक्ष्मीही पादसेवनामुळे देवाचीच बनून गेली. सख्यभक्तीने अर्जुन, तर देवाच्या पूजनाने पृथू राजा मोक्षाचा धनी झाला. दास्यभक्तीमध्ये हनुमानांचा अग्रक्रम, तर आत्मनिवेदन भक्तीत राजा बळीचे प्रथम नाव घेतले जाते.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रातसुद्धा नवविधा भक्तीची असंख्य उदाहरणे भरलेली आहेत.. नव्हे नव्हे, स्वामीचरित्रच पूर्णपणे भक्तिप्रधान आहे. त्यातील स्मरणभक्ती ही स्वामी समर्थ महाराजांना अधिक प्रिय आहे, कारण स्वामी समर्थ महाराज नेहमी भगवद्गीतेतील 9व्या अध्यायातील 22वा श्लोक नेहमी उच्चारत -
अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना: पर्युपासते
तेषां नित्याभियुक्तांनां योगक्षेमं वहाम्यहम
- जे भक्त अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन, स्मरण करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो. त्यांच्याकडे जे आहे त्याचे संपूर्णपणे मी रक्षण करतो असे महाराज नेहमी सुचवत असत. मुंबईचे स्वमीसुत, देवमामलेदार, सुंदराबाई काटगावकर, सावकार भाऊ रसूल, श्रीसंत सीताराम महाराज खर्डीकर, श्री दाजीबा भोसले, द्वारकेचे भुर्‍याबाबा, ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य, मंगळवेढ्याचा बसप्पा तेली, कानफाट्या, चोळप्पा महाराजांची धर्मपत्नी येसूबाई, चिंतोपंत टोळ (ज्यांनी स्वामी समर्थ महाराजांना अक्कलकोटला आणले) अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.

स्मरण, नाम आणि रूप यांचे अद्वैत
 
अद्वैत म्हणजे एक असणे. स्वामी समर्थांचे स्मरण, नाम आणि स्वामींचे रूप हे ज्या वेळी आपल्या मनात एकवटतील, त्यांच्यातील अभिन्नत्व किंवा द्वैत संपेल, अद्वैत निर्माण होईल, त्याच वेळी याचे पुण्य प्राप्त होईल. अध्यात्मशास्त्रात किंवा भक्तीच्या प्रांगणात नामजपाचे महत्त्व काही वेगळेच आहे. स्वामींचे स्मरण, नामाचे चिंतन, संकीर्तन, नामयज्ञ, नामजप अशा वेगवेगळ्या मार्गांनी जरी गेलात, तरी स्वामीनामाचे महत्त्वच विशद होते. माउली ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात

काळ वेळ नाम उच्चारीता नाही।
दोन्ही पक्ष पाही उद्धरती॥

किंवा

एक तत्त्व नाम दृढ धरी मना।
हरीशी करुणा येईल तुझी॥
नामस्मरण हाच मोठा यज्ञ आहे. भजन, नामसंकीर्तन, चिंतन हे सर्व काही त्यातच आहे. पूर्णत्वास गेलेल्या एखाद्या भक्तास स्वर्गाची, मोक्षाची प्राप्ती होईल, परंतु नामस्मरणाच्या पूर्णत्वानंतर त्या भक्ताचेच शरीर स्वर्ग बनेल इतकी ताकद त्यात आहे. कारण नामस्मरण हाच सत्संगाच्या मंदिराचा पाया आणि कळसही आहे. नामस्मरणानेच स्वामींची प्राप्ती, त्यांच्या स्वरूपाचे ज्ञान आणि त्यांच्या चरणाची प्राप्ती होईल. या संसाररूपी भवसागरातील प्रत्येक भक्ताला त्या परब्रह्माशी एकरूप होता येईल. हे स्वत: महाराजांचे सांगणे आहे.

kirtan_2  H x W 

नाम आणि स्मरण

आपण नेहमी नामस्मरण या शब्दाचा उच्चार करतो, पण या शब्दाच्या अर्थाकडे फारसे लक्ष देत नाही. ज्या भगवंताचे नाव घेत आहोत, त्याचे जर स्मरण होत नसेल, तर त्या नामस्मरणाचा काय उपयोग? सध्याच्या धकाधकीच्या जीवनपद्धतीत मन एकाग्र होत नाही. ते सतत द्विधा अवस्थेत चंचल राहते. बर्‍याच वेळा तोंडाने नामोच्चार होत राहतो, पण मन त्या नावाशी एकरूप नसल्याने त्या देवतेचे स्मरण होत नाही. मनात संसारातील विषयच समोर येतात. हाताच्या बोटांनी माळेतील मणी वेगाने पुढे सरकतात, पण मनामध्ये चहाचा कप येतो. मुखात इष्टदेवतेचे नाव किंवा गुरुमंत्राचा जप चालू असतो, पण मनामध्ये शेजार्‍याने घेतलेल्या महागड्या वस्तूंचा विचार असतो. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंचा गोंधळ मनामध्ये सतत चालू असतो. फार काय, आपण साधे डोळे मिटून पाहा, काय काय डोळ्यासमोर येते ते.

अर्थात नामस्मरण या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. ज्याचे नाव जपायचे आहे, त्याच्या सगुण रूपाचेही स्मरण एकाच वेळी होणे यालाच नामस्मरण म्हणतात. विठ्ठलनामाचा जप चालू असेल, तर विठ्ठलमूर्ती समोर उभी राहिली पाहिजे. दत्त महाराजांच्या किंवा स्वामी समर्थ नामजपात त्यांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहणे यालाच नामस्मरण म्हणतात. अन्यथा नामस्मरणांची संख्या कोटीच्या घरात जरी असली, तरीसुद्धा त्याची फलश्रुती शून्य असते. त्याचा काहीही उपयोग होत नाही. जिथे नाम आणि स्मरण अनन्य भावाने चालते, तेथे फळदेखील लवकर मिळते, हा स्वामीभक्तांचा अनुभव आहे.
स्मरणभक्ती, उपासना
 
मुळात भक्ती म्हणजेच उपासना आहे. आपल्याला काय आवडते त्यापेक्षा देवाला काय आवडते? याचा विचार, भक्ती संज्ञेत केला गेला आहे. देवाला किंवा आपल्या उपास्य देवतेला काय आवडते? त्याप्रमाणे भक्ताने, साधकाने आपले वर्तन ठेवले पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतार समाप्तीच्या काही वर्षे आधीपासून निलेगावचे स्वामीभक्त प्रभाकर देशमुख हे महाराजांना निलेगावला येण्याविषयी आग्रह करीत होते. पण महाराजांची लीला अगाध आहे. देशमुख अखंड स्वामीनामस्मरण करीत असत. शेवटी इकडे महाराजांनी अवतार समाप्ती केली. समाधिस्थ झाले. त्यानंतर महाराज निलेगावला प्रकट झाले. देशमुखांना समाधीचे वृत्त माहीत नव्हते. पुढे तीन दिवस पंचपक्वान्नाचे भोजन घेतले व त्यांच्याकडून तीन दिवस शोभेचे दारूकाम करवून आनंदाचा महोत्सव साजरा केला. महाराज तिथे आहेत कळल्यावर अक्कलकोटचे भक्त निलेगावी गेले, तर तोपर्यंत महाराज गुप्त झाले होते. महाराजांची अवतार समाप्ती समाधीआधीच झाली आहे, असे समजल्यावर देशमुखांनी अक्कलकोटी येऊन 13 दिवस नामस्मरण अनुष्ठान केले. करुणा भाकली. त्या वेळी श्री महाराजांनी त्यांना ‘हम गया नही जिंदा है। आम्ही येथे बसूनच योगक्षेम चालवू’ असे अभयवचन दिले.

स्मरणभक्तीची आर्तता किती असावी? याबद्दल नारद भक्तिसूत्रातील 19व्या सूत्रात स्मरणभक्तीचे चिंतन आलेले आहे. ‘नारदस्तु तदर्पिताखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलतेति’ असा उल्लेख आलेला आहे. म्हणजे आपले रोजचे काम, आचार जो काही असेल, तो देवाचे स्मरण करून देवाला अर्पण करून श्रेय देवाला देणे. त्यातून यदाकदाचित देवाचे विस्मरण झाल्यास त्यासाठी देवाची क्षमा मागून व्याकूळ होणे. हीच खरी स्मरणभक्ती आहे. यासाठी त्यांनी गौळणींचे उदाहरण दिलेले आहे. गौळणी दररोज मथुरेला दही, दूध, ताक, लोणी विकायला नेत असत. पण आपल्या मालाची जाहिरात करताना ते दही आहे की दूध हे विसरून त्या “गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या, माधव घ्या, कृष्ण घ्या, कुणी कान्हा घ्या” अशी जाहिरात करत असत. म्हणजे आपला कामधंदा न सोडता सतत भगवान गोपालकृष्णाचे स्मरण करीत होत्या.
अगदी तशीच अवस्था झालेल्या स्वामीभक्ताचे वर्णन चरित्रात प्रत्येक अध्यायात आलेले आहे. कानफाट्या हा अत्यंत ताकदवान मल्ल, पण तो सतत स्वामीनामस्मरण करीत असे. महाराजांबद्दल कुणी काही चुकीचे बोलले, तर प्रसंगी तो त्या व्यक्तीला यमसदनी पाठवावयाला कमी करत नव्हता. इतका तो स्वामीनामस्मरणात सतत एकरूप झालेला होता.

9422066298