नराचा नारायण बनविणारी भक्ती - दास्यभक्ती!

विवेक मराठी    17-Jul-2021
Total Views |
@कुमुद धर्माधिकारी 9881601918

निष्ठापूर्वक समर्पण म्हणजे दास्यभक्ती!! दास असणे म्हणजे गुलामगिरी नाही, तर श्रद्धायुक्त अंत:करणाने आणि निरपेक्ष भक्तीने ईश्वरसेवेचे हे सेवा व्रत आहे. भक्तांसाठी हे सेवा व्रत स्वीकारणे म्हणजे दास्यभक्ती.


bhakti_1  H x W

नवविधा भक्ती म्हणताच भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग दिसू लागतो. पण नवविधा भक्ती मनात आणली आणि भगवंत भेटले असे होत नाही. उंच पर्वतावर सुंदर मंदिर आहे, आत रामराय भक्ताची वाट पाहत आहेत आणि भक्ताला अत्यंत तळमळ लागली आहे, पण एक एक पायरी चढल्याशिवाय मंदिर आणि आतील गाभारा व त्यातील श्रीराम कसे भेटतील? अगदी तसेच आपल्या हृदयातील भगवंत पाहण्यासाठी नवविधा भक्तीच्या पायर्‍या चढल्याशिवाय भगवंताचे दर्शन शक्य नाही आणि या पायर्‍या माणसाचे परिवर्तन घडविणार्‍या आहेत. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चना, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या पायर्‍या चढून आणि माणूस घडत घडत स्वरूपाची ओळख करून घेतो, तेव्हा हृदयातील प्रभू श्रीरामाची मूर्ती बाहू पसरून भक्ताला कवेत घेते, आपल्यात सामावून घेते आणि तीच सायुज्य मुक्ती ठरते. त्यासाठी प्रथम भगवंत कसे आहेत हे ऐकायला पाहिजे, मग भगवंताला पाहायला पाहिजे, नंतर कीर्तनातून समजते भगवंताचे कर्तृत्व! हे सर्व पाहून भगवंताला हाक मारावीशी वाटते, म्हणजे त्याचे सत्नाम घ्यावेसे वाटते, मग नामात रंगत चढू लागली की निर्लेपपण वाढू लागते. हा देह सद्गुरूंच्या किंवा भगवंतांच्या सेवेत गुंतवावा असे वाटू लागते, मन त्यांच्या सूचनांचे ग्रहण करते आणि कृती होऊ लागते, हीच पादसेवन भक्ती होय. ही सेवा करताना भगवंत किंवा सद्गुरू यांचा सत्कार करावा, त्यांची पूजा करावी, त्यांचा गौरव करावा असे वाटते आणि हे केल्याशिवाय चैन पडत नाही, म्हणजे आता अर्चनभक्तीत पाऊल टाकले.

आपण आपल्या आराध्यासमोर आपोआपच नतमस्तक होतो, कारण आपण आपले मीपण विसरू लागतो आणि त्याशिवाय कोणीही नाही याची खात्री पटून शरणागत भाव वृद्धिंगत होतो, म्हणून वंदनभक्ती आली आणि येथून सर्वांगाने भगवंत माझाच आहे आणि मी त्याचा आहे हा भाव पुरेपूर होतो आणि या प्रेमामुळे दास्यत्व भाव जागृत होतो. आता येथे दास होणे म्हणजे नोकर होणे, गुलाम होणे असा नसून सर्वतोपरी फक्त तू माझा आहेस हा भाव पक्का होतो. आपपरभावाला येथे थाराच राहत नाही. माउली संत ज्ञानेश्वर यासंबंधी स्वत:ला ‘निवृत्ती दास’ म्हणवून घेतात.

‘राम हमारा जप करे, हम बैठे आराम!’ असे म्हणणारे संत कबीरदास ‘मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम। तू साहेब मेरा।’ असे बजावून सांगतात, तर संतशिरोमणी तुकोबाराय ‘तरीच जन्मा यावे। दास विठ्ठलाचे व्हावे।’ असे ठासून सांगतात. आणि श्री समर्थ स्वत:ला रामदास म्हणवितात. मी रामाचा दास आहे याचे त्यांना भूषण आहे आणि नवविधा भक्तीतील दास्यभक्तीचा शिरोमणी हनुमंत म्हणजे दास्यभक्तीचा मेरुमणी आहे. शक्ती, बुद्धी, प्रीतीचे हे आदर्श उदाहरण आहे.

श्रीराम + हनुमंत = उत्कृष्ट सेवा सेव्य भाव होय. येथे दास्यभक्तीत आपल्या सेवेचे फळ काय मिळेल, मिळाले किंवा मिळते याचा विचारदेखील येत नाही. आपले काहीही होवो, आपला स्वामी प्रसन्न असायला हवा, हाच भक्तांचा स्वार्थ असतो.
‘खुद भूका मरे, मगर माशूकको राजी रखे’ (अर्थ - आपण उपाशी मरावे, पण आपले प्रेमपात्र प्रसन्न राहावे) या सूफी वचनामध्ये दास्यभक्तीचे खरे मर्म साठले आहे.
 
 
भगवंताचा दास जसा जसा सेवाप्रणीत होत जातो, तसा तसा त्याचा स्वामी सर्व चराचर व्यापून आहे अशी प्रचिती दासाला येऊ लागते आणि तो सर्व प्राणिमात्राची मनोभावे सेवा करणे, सगळ्यांमध्ये भगवंत पाहणे ही दृष्टी घेऊन त्याला दास्याचे स्वरूप प्राप्त होते. भगवंताचा दास होणे भक्तासाठी अतिशय आनंददायक अनुभव आहे. दास्य करणे म्हणजे पूर्णपणे भगवंत आपला करणे होय. यासाठी मनात अहंकार राहतच नाही आणि देवाचे वैभव कसे घडते वाढते करावे यासाठी दास जनामध्ये हलकी कामेही सेवाभावाने करू लागतो आणि तेथेच भगवंताची प्रचिती घेऊ लागतो. सद्गुरूचा किंवा भगवंताचा दास होणे ही भक्तासाठी फार मोठी प्रतिष्ठेची गोष्ट आहे. निष्ठापूर्वक समर्पण म्हणजे दास्यभक्ती!!

ही गुलामगिरी नाही, तर श्रद्धायुक्त अंत:करणाने आणि निरपेक्ष भक्तीने ईश्वरसेवेचे हे सेवा व्रत आहे. भक्तांसाठी हे सेवा व्रत स्वीकारणे म्हणजे दास्यभक्ती. येथे अहंकाराचा, क्रोधाचा नाश होऊन स्वेच्छेने भगवंत सान्निध्यात सतत असणे हे भक्तीचे स्वरूप कळते. मारुतीरायाचे श्रीरामांसाठी असलेले समर्पण सर्वश्रुत आहे. समर्थ स्वत:ला रामदास म्हणवून घेतात. दास्यभक्ती व्यक्तीच्या आध्यात्मिक वैभवाशी निगडित आहे, ऐहिक सुखाशी नाही.

दास्यभक्तीत भक्तांचे फार फायदे होतात. शुद्ध हेतू, सतत अनुसंधान, विकारांचा नाश, सत्संगती, गरजेपुरता प्रपंच यामुळे भक्ताची वृत्ती स्थिर होते आणि देह देवाच्या प्राप्तीकरता आहे याची पूर्ण जाणीव होते, त्यामुळे आसक्तीरहित सेवा होते. हे दास्यभक्तीचे मोठे मर्म आहे. दास्यभक्ती आणि भाव दृढ झाल्याने सुखदु:खाचे कारणच राहत नाही. भगवंताशी अलौकिक नाते जोडले जाते आणि अनन्यता, कृतज्ञता, सेवा यामुळे गाभार्‍यात जाण्यासाठी पुढे मैत्रीची भावना निर्माण होऊन सख्यत्वाकडे वाटचाल होऊ लागते. सख्य आणि तेही भगवंताशी म्हटल्यावर दास्यामध्ये भक्त आपले सर्वस्व देवाला देतो. त्यामुळे देवापासून त्याचे काहीच लपत नाही.
 
आपले गुणदोष भगवंताला जसेच्या तसे विदित होतात आणि दोघांमध्ये कुठलाही आडपडदा राहत नाही. सेवेशिवाय चित्त व्याकूळ होऊ लागते आणि हीच दास्यभक्तीची परिसीमा आहे. देवाची किंवा सद्गुरूंची कीर्ती वाढावी, म्हणून खरा भक्त अहोरात्र खटपट करतो आणि असे दास्य करता करता भगवंताचा भक्ताशी जवळचा परिचय होतो. त्यातून भगवंताची अवज्ञा निर्माण होण्याऐवजी भक्त अधिक लीन, निष्काम आणि प्रेमळ बनतो आणि मित्रत्व म्हणजेच सख्यत्व गाढ बनत जाते. भगवंत सर्व जीवनाचा मित्र आहे, म्हणून दास्याचा विकास झाल्यावर दास आपले दासपण विसरत नाही, पण भगवंत आपले स्वामीपण विसरून दास्य करणार्‍या दासाला मित्र मानू लागतो. दोघे समसमान होऊ लागतात. परकेपणा, भीती, संकोच तेथे उरत नाही. मग भगवंताचे निरंतर नामस्मरण, चिंतन, पादसेवन, अर्चन, वंदन आणि दास्य स्वीकारून सेवन करीत राहिल्याने भक्ताचे मन भगवंताला सोडून अन्यत्र जाण्यास तयार होत नाही. येथील दोघेही राहता एकमेकात गुंतून जातात. दास्यत्वाचा सेवाभाव भक्ताला भगवंतापर्यंत सहज पोहोचवितो, सख्यत्व करून देतो आणि नंतर सेवाभावातून ज्ञानाचा आणि ज्ञानातून भक्तीचा जन्म होतो.अशा नवविधा भक्तीच्या पायर्‍या चढत भक्त गाभार्‍यापर्यंत पोहोचतो आणि त्या अलौकिकाशी एकरूपता साधतो. या सर्वात आत्मप्रकाशात हृदयातील आत्मस्वरूप दिसून आत्मनिवेदन भक्ती म्हणजे सायुज्य पदाला पोहोचतो.

नवविधा भक्तीच्या या पायर्‍या चढून भगवंत मिठीमध्ये भक्त सामावून जातो, पण दास्यत्वभाव तो विसरत नाही. पण या दास्यभक्तीत भक्त खूप काहीं शिकतोसुद्धा - कष्टाला कंटाळून तो आळसाला थारा देत नाही, शब्द जपून वापरतो, तसेच सतत सावधानता, दक्षता, जागरूकता या अलौकिक गुणांचा लाभ होतो. तसेच शारीरिक पातळीवर सुखापेक्षा या भगवंताच्या दास्यत्वात स्वर्गसुख आहे, याची जाणीव होते. दास्य स्वीकारल्यावर तो अखंडपणे भगवंतनामच घेत राहतो, म्हणून प्रपंच उपाधी, सुखदु:ख यांची कुठलीच बाधा दासाला होत नाही. यामुळे बाहेर चर्मचक्षूंनी देवाचे रूप पाहतो आणि अंतश्चक्षूंनी अंत:करणातील आत्मस्वरूपाचा साक्षात्कार घेतो, त्यामुळे तो शांत, प्रसन्न व समाधानी राहतो. या सर्व गुणांमुळे दास्यभक्ती करताना नराचा नारायण बनतो. दास्यभक्तीचा महिमा फारच थोर आहे, म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात की “अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, कारण अनन्यतेतच भक्ती जन्म पावते व दास्यत्वाने भगवंत भेट होते.” अशी ही नवविधा भक्तीतील दास्यभक्ती धन्य आहे आणि दासाला धन्य करते.