कृतज्ञतेचा उदात्त संस्कार अर्चनभक्ती

विवेक मराठी    19-Jul-2021
Total Views |
डॉ. अपर्णा कल्याणी 9823880789
आपल्या आराध्य दैवताला श्रद्धायुक्त अंत:करणाने, विधियुक्त केलेले षोेडशोपचार समर्पण म्हणजे ‘अर्चन’. या अर्चनात शुद्ध उच्चार, सुयोग्य कृती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पराकोटीचा ‘भाव’, ‘श्रद्धा’ असणे आवश्यक असते. बाह्यपूजा आणि मानसपूजा अशा दोन्ही प्रकारांनी अर्चनभक्ती करता येते.

bhakti_1  H x W
पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे, मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे, असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमृतत्वाकडे, द्वैताकडून अद्वैताकडे प्रत्येक मनुष्यमात्राचा किंबहुना प्रत्येक जीवमात्राचा प्रवास अनादि-अनंत काळापासून सुरू होता, सुरू आहे आणि तो सुरू असणारही आहे. या प्रवासात आत्मशोध घेऊन ईशदर्शनाचे, आत्मसाक्षात्काराचे ईप्सित साधणे हे प्रत्येक जिवाचे अंतिम उद्दिष्ट आहे, असायला हवे! केवळ परमेश्वराचे दर्शनच नव्हे, तर मी स्वत:च ईश आहे, सोऽहम्! याचा प्रत्यय घेणे म्हणजेच ‘आत्मज्ञान’ असे ज्ञानी, संत-सत्पुरुष सांगतात. आपल्याकडे पुष्कळ सद्भक्त दहा हजार पायर्‍यांचा गिरनार पर्वत चढून पर्वताच्या चरमसीमेवर पोहोचून श्रीदत्तप्रभूंचे दर्शन घेतात. अगदी त्याचप्रमाणे आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचण्यासाठीही आत्मपरीक्षण, दोषनिवृत्ती, क्षमाप्रार्थना, सद्वर्तन, नामस्मरण, प्राणायाम, ध्यानधारणा, संपूर्ण शरणागती, कर्मफलत्याग हे कर्मकठीण सोपान आपल्याला आयुष्यभर चढावे लागतात. त्या सोपानांपर्यंत पोहोचण्याआधीही बरेच खडतर टप्पे पार करावे लागतात. ते टप्पे म्हणजेच श्रीमद्भागवत पुराणाने मानवाला दिलेली महान देणगी - ‘नवविधा भक्ती’.

श्रवणं ङ् कीर्तनं व् विष्णो:, स्मरणं म् पादसेवनम् ।
अर्चनं व् वन्दनं न् दास्यं व्, सख्यम् आत्मनिवेदनम् ॥ (श्रीमद्भागवत 7.5.23)
परंपरा

या नऊ भक्तिप्रकारांमधील ‘अर्चनभक्ती’ हा पाचवा प्रकार आहे. अर्चन म्हणजे काय? तर, अर्चन म्हणजे पूजा. पूजा या शब्दातील ‘पूज्’ या धातूचा अर्थ ‘फुलांनी आराधना करणे’ असा आहे. मग फुले वाहण्यासाठी ‘मूर्ती’ हवी. ती मूर्ती कोणाची? कशी? तिची पूजा सर्वप्रथम कोणी केली असेल? मूर्तिपूजेची परंपरा कधीपासून सुरू झाली असेल? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. मानवाच्या अगदी प्राथमिक अवस्थेत निसर्गातील शक्तींना, पंचमहाभूतांना तो ‘देव’ मानत असे. आपल्याला उपयोगी पडणार्‍या वस्तू, प्राणी, वृक्ष, नद्या, समुद्र यांना देव मानून तो त्यांची पूजा करू लागला. सुमारे दहा हजार वर्षांपूर्वीचा हा वैदिक काळ होता. वैदिक काळात मूर्तिपूजा अस्तित्वात आलेली नव्हती. माणसाची बुद्धी पुढे विकसित होत गेली. निरनिराळ्या प्रयोगांमधून, ध्यानसाधनेच्या माध्यमातून ऋषी-मुनींच्या अंत:करणापुढे दैवी शक्तींसंबंधीच्या काही निश्चित कल्पना साकार होऊ लागल्या. त्या कल्पनांना मूर्त रूप देताना त्यांनी सर्वात उत्तम आकृतीची - म्हणजे मानवी शरीराची योजना केली. त्यातूनच ‘मूर्ती’ ही संकल्पना उदयास आली.
उदाहरणच द्यायचे झाले तर श्रीगणपती बाप्पांचे देता येईल. ‘ॐ’ हे निर्गुण, निराकार पण सत्य, चैतन्य, आनंदयुक्त म्हणजेच सच्चिदानंद परब्रह्माचे साकार प्रतीक आहे. पण माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला हे प्रतीकही समजत नाही, म्हणून मग सगुण-साकार अशा प्रतीकनिर्मितीकरिता ‘गणपती’ तयार झाला. ज्ञानेश्वरीत माउलींनीही श्रीगणेश वंदन करताना म्हटले आहे -

‘अकार चरणयुगुल। उकार उदर विशाल। मकार महामंडल। मस्तकाकारे॥
हे तिन्ही एकवटले। तेथ शब्दब्रह्म कवळले। ते मियाश्रीगुरुकृपा नमिले। आदिबीज॥ (ज्ञाने. 1-1-20)
अशाच प्रकारे पुढे मग अनेक देव-देवतांची निर्मिती होऊन या मूर्तींची पूजा प्राचीन काळापासून भारतात व जगातील अन्य देशांमधूनही विविध पद्धतींनी चालू आहे. ‘पूजा’ पद्धती सिंधुसंस्कृतीत सुरू झाली, असे संशोेधकांचे एकमत आहे.
सिंध व पंजाब या प्रदेशांतील उत्खननात सिंधुसंस्कृतीचे जे अवशेष सापडले आहेत, त्यांत विविध प्रकारच्या मूर्ती सापडल्या आहेत. इ.स.पू. 2500 हा सिंधुसंस्कृतीचा काल ठरवण्यात आला आहे. कालांतराने आपल्या भारत राष्ट्रात आर्य आणि द्रविड या दोन संस्कृतींचा समन्वय झाल्यानंतर जी भारतीय संस्कृती उत्क्रांत झाली, तिच्यात यज्ञसंस्कृती व मूर्तिपूजा यांचा एक सुंदर मिलाफ झाला. वेदांनंतरच्या उपनिषत्कालात ‘भक्ती’ संकल्पनेचा उगम झालेला आढळतो, आणि मग भक्तीतूनच देवार्चना सुरू झाली. वेदांनंतर संहिता, ब्राह्मणे, आरण्यके आणि उपनिषदे उदयास आली. त्यानंतर अठरा पुराणांची रचना झाली. त्या अठरा पुराणांमधील सर्वात मोठे, रसाळ आणि महत्त्वपूर्ण पुराण म्हणजे, ‘श्रीमद्भागवत’ महापुराण. या पुराणात अत्यंत मधुर असे श्रीकृष्णचरित्र आणि नवविधा भक्तीचे वर्णन आहे. त्या नवविधा भक्तींमधील ‘अर्चनभक्ती’ आपण समजून घेऊ या.

अर्चन कसे करतात?

आपल्या आराध्य दैवताला श्रद्धायुक्त अंत:करणाने, विधियुक्त केलेले षोेडशोपचार समर्पण म्हणजे ‘अर्चन’. या अर्चनात शुद्ध उच्चार, सुयोग्य कृती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पराकोटीचा ‘भाव’, ‘श्रद्धा’ असणे आवश्यक असते. आषाढी एकादशीनिमित्त प्रकाशित होणारा हा ‘नवविधा भक्ती विशेषांक’ असल्याने श्रीपांडुरंग-रुक्मिणीमाता यांचेच भावपूर्ण अर्चन करू या. तत्पूर्वी मनाच्या एकाग्रतेसाठी त्रिवार ॐकार म्हणू या.
1) आवाहन - चराचरातील कणाकणांत वसलेल्या हे सावळ्या परब्रह्मा रुक्मिणीकांता, गरुडावर रुक्मिणीमातेसह विराजमान होऊन मेघांनी भरलेल्या आभाळमार्गे तू माझ्या घरी येशीलच अशा दृढ विश्वासाने, नितांत श्रद्धेने मी तुला आवाहन करत आहे.


2) आसन - गुलाब, शेवंती, मोगरा, चमेली, झेंडू या विविध सुवासिक फुलांच्या पाकळ्यांचे घनदाट, भरगच्च आसन मी तुम्हां उभयतांना अतिशय प्रेमाने देत आहे. हेे श्रीनिवासा, या आसनावर तू सपत्निक विराजमान व्हावेस.


3) अर्घ्य-पाद्य-आचमनीय - हस्तपादोदक म्हणून गुलाबमिश्रित गंगाजल अर्पण करत आहे. हे रमारमणा, त्याचा स्वीकार व्हावा. माझ्या निमंत्रणाला प्रतिसाद देऊन इतक्या दुरून प्रवास करून आपण दोघे इथे आलात. आपल्या मुखकमलावर जाणवत असलेला थकवा दूर व्हावा म्हणून आपणांस शीतल, निर्मल, मधुर जल देतो, ते ग्रहण करावे.


4) ध्यान - हे कृष्णा, विष्णो, हृषीकेशा, अत्यंत एकाग्रतेने, तुमच्याशी एकचित्त होऊन ध्यान करतो/करते. काही क्षण आपणही विश्रांती घ्यावी.


5) स्नानाभिषेक - हे मधुसूदना, पुरुषसूक्त-विष्णुसूक्त-श्रीसूक्त-अघमर्षण सूक्तांनी गंगा-यमुना-गोदावरी-सरस्वती-नर्मदा-सिंधु-कावेरी या पवित्र अशा सप्तनद्यांच्या जलाची, दूध-दही-तूप-मध-साखर मिश्रित पंचामृताची, विविध फळांच्या रसांची संततधार धरतो. त्या संततधारेप्रमाणेच माझ्या मनाची धारही तुज परमात्म्याशी जोडली जाऊ दे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सारे तुझ्या रूपात विलीन होऊ दे. तुझ्या अस्तित्वाची साक्ष मला क्षणोक्षणी पटू दे. या अभिषेक स्नानाने माझ्या काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर या दोषांची मलीनता धुऊन जाऊ दे.


6) वस्त्र - हे प्रभुभक्तवत्सला, शुद्ध तेजाचा पीतांबर-उपरणे आणि माझ्या लक्ष्मीमातेला समृद्धीचे प्रतीक असलेला हिरव्या रंगाचा शालू-कंचुकी अर्पण करत आहे. कर्म-ज्ञान-भक्तीचे त्रिपदर आणि आत्मज्ञानाची ब्रह्मगाठ असलेले यज्ञोपवित, तसेच टपोर्‍या मण्यांचे शोभायमान शुभ्र कार्पास मालावस्त्र तुम्ही परिधान करावे, अशी विनंती करतो/करते.


7) चंदनगंध - हे यशोदा-नंदनंदना, तुझ्या भाळी गोपीचंदन गंध, बुक्का आणि रुक्मिणीमातेला चंदनगंध, हळद-कुंकू ही सौभाग्यद्रव्ये लावताना प्रार्थना करतो/करते की, तू माझ्यासाठी नेमून दिलेल्या कार्याकरिता ही काया चंदनासारखी झिजू दे आणि प्रत्येक जिवात विराजमान असलेल्या तुम्हां आदिनारायण-आदिशक्तीपर्यंत तो सुगंध आणि शीतलता पोहोचू दे.


8) अलंकार - हे लक्ष्मीरमणा भगवंता, मी रे तुला कोणते अलंकार अर्पण करणार? साक्षात लक्ष्मीचा धव तू! मकरकुंडले, सुवर्णमुकुट, सुवर्णफुलांचे हार अशा असंख्य दिव्य अलंकारांनी नटलेला! मी आपली, तुला अत्यंत प्रिय असलेली वैजयंतीमाला तुझ्या गळ्यात घालतो/घालते. हा संसार कंबरेइतकाच आहे हे सूचित करण्यासाठी तू तुझे दोन्ही कर कटीवर ठेवलेले आहेस, त्या कटीवर नाजूक फुलांची सुगंधी मेखला तुम्हां उभयतांना घालत आहे.
 

9) पुष्प - हे कृपार्णवा नारायणा, कोमलता, प्रसन्नता, शांती अशा गुणवैविध्यांची उधळण या फुलांच्या रूपाने करतो/करते.तसेच तुलसीचा समर्पण भाव माझ्यात यावा, यासाठी तुलसीहार घालतो. खरे तर, या अर्चनेतून माझे हृदयपुष्पच मी तुझ्या चरणी अर्पण करत आहे. ‘पत्रं पुष्पं फलं तोयं, यो मे भक्त्या प्रयच्छति।’ भक्त जे जे स्वेच्छापूर्वक, भक्तिभावाने अर्पण करतो, त्या सगळ्यांचा मी आनंदाने स्वीकार करतो, असे गीतेमध्ये तूच तर म्हणाला आहेस ना?


10) धूप - हे पंढरीनाथा, उदबत्ती जशी स्वत:ला जाळून घेऊन वातावरण सुगंधित करते, तसे उदबत्तीचे भाग्य मला लाभू दे, अशी प्रार्थना करतो/करते.


11) दीप - हे पद्मनाभा दामोदरा, सूर्य-चंद्र-ग्रह-नक्षत्रांनी विश्व उजळणार्‍या तुमच्या दिव्यस्वरूपाला माझ्या पंचप्राणांच्या पंचारतीने ओवाळतो/ओवाळते. माझे भारत राष्ट्र उज्ज्वल, तेजस्वी करण्यासाठी सूर्य नाही, तर निदान एक पणती होण्याची तरी संधी, बुद्धी, शक्ती दे. तिच्यामुळे भलेही जगभर प्रकाश पडणार नाही, पण एखादी अंधारी खोली तरी उजळेल.


12) नैवेद्य - हे हृदयवासिया रामा, मी तुम्हां उभयतांना माझ्या सत्कर्मांचा नैवेद्य अर्पण करते. हे सर्व त्या सत्यस्वरूप परमेश्वराचे म्हणजे तुझेच आहे, ‘माझे काहीही नाही’ हा निर्लेप भाव माझ्यात रुजू दे. तुझेच तुला हे अर्पण करत आहे.


13) मुखवास - दक्षिणा - हे पुराणपुरुषाश्रीहरे, अंतरीच्या जिव्हाळ्याने आणि ओलाव्याने हा मुखवास - दक्षिणा अर्पण करतो/करते.


14) नमस्कार - माझा सगळा अहंभाव तुझ्या चरणी अर्पण करून शरणागत भावाने लीनतेने तुम्हां दोघांना साष्टांग नमस्कार करतो/करते.


15) आरती व मंत्रपुष्प - हे दीनबंधो, आर्त मनोभावाने, अष्टसात्त्विक भाव जागृत करून मधुर स्वरात तुझी आरती गातो/गाते. तुला संतुष्ट करून तुझा कृपाप्रसाद मिळवणे हा जरी माझ्या या अर्चनाचा प्राथमिक उद्देश असला, तरी आता तो विरला आहे. तुझ्या अंतरंगात मला विलीन करून घे. माझ्या अंत:करणाचा गाभारा ज्ञान-भक्तीच्या प्रकाशाने भरून जाऊ दे. खरे तर हे तुझे-माझे सारेच एक होऊ दे, त्यातून मला समाधानाचा, आत्मशुद्धीचा, आत्मशांतीचा लाभ होऊ दे.

 
16) प्रदक्षिणा - हे निर्गुणा-निराकारा, तुला प्रदक्षिणा घालता घालता ‘आत्मज्ञान’प्राप्तीच्या जीवनध्येयाभोवती माझ्या प्रदक्षिणा अथक, अखंड पडू दे. पाषाणमूर्तीत स्थित असलेल्या तुझी अर्चना करता करता प्रत्येक सजीव-निर्जीव वस्तूत, पशु-पक्ष्यांत, वृक्ष-वेलींत, पाना-फुलांतही तुझे दर्शन घडू दे, ही अंतिम प्रार्थना!
 
अर्चनभक्ती माहात्म्य
बाह्यपूजा आणि मानसपूजा अशा दोन्ही प्रकारांनी अर्चनभक्ती करता येते. अर्चनभक्तीतून ‘कृतज्ञतेचा उदात्त संस्कार’ आपल्या मनावर होतो. मन:सामर्थ्य, सकारात्मकता, इच्छाशक्ती, आत्मविश्वास, निर्भयता, कार्यक्षमता, उत्साह, चित्ताची प्रसन्नता, दृढ निश्चय, निष्ठा, नम्रता ही ईश्वरी गुणसंपदा अर्चनभक्तीमुळे लाभते. आपल्या आराध्य दैवताचे चारित्र्य, सद्गुण, पराक्रम, बुद्धी, सामर्थ्य आपल्या अंगी प्रकटावे अशी प्रेरणा जागृत होते. जगाकडे पाहाण्याची आपली दृष्टी निर्मळ, शुद्ध होते. वं. विनोबाजी भावे म्हणतात, ‘एका लहानशा मूर्तीत संपूर्ण विश्व अनुभवण्यास शिकणे म्हणजे मूर्तीचे केलेले अर्चन!’ तर अशी ही श्रेष्ठ अर्चनभक्ती! सगुणातून निर्गुणाचा वेध लावणारी! अलौकिक! अद्भुत! तिच्या परीसस्पर्शाने भक्ताच्या जीवनाचे सोने करणारी!
 


संदर्भग्रंथ -
1) भारतीय संस्कृतिकोश - संपा. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
2) भारतीय संस्कृती - साने गुरुजी
3) गीता प्रवचने - विनोबा भावे
4) श्रीगणेश प्रतिष्ठापना पोथी - ज्ञान प्रबोधिनी संपादित