निधीकथा

विवेक मराठी    19-Jul-2021
Total Views |

nidhi_2  H x W:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाटचालीला 2021 सालात 96 वर्षे पूर्ण होत आहेत. आणखी चार वर्षांनी ही वाटचाल 100 वर्षांची होईल. 100 वर्षे हा व्यक्तिजीवनातला महत्त्वाचा टप्पा मानला जात असला, तरी समाजव्यापी बनू पाहत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाटचालीत हा महत्त्वाचा टप्पा आहे असे संघ मानत नाही आणि त्यामुळेच संघाचा शतकमहोत्सव साजरा करण्याचा विचार संघाच्या मानसिकतेत नाही आणि योजनेतही नाही.

संघाच्या या 96 वर्षांच्या वाटचालीत संघावर बंदी घालण्याचे एक-दोन नव्हे, तर तीन प्रयत्न झाले, पण त्या बंदीने संघ चिरडला न जाता उलट तसे प्रयत्न करणार्‍या व्यक्तींना व राजकीय शक्तींनाच तोंडघशी पडावे लागले. या शक्ती तोंडघशी पडत असतानाच संघाचे कार्य मात्र दाही दिशांनी देश-विदेशात पसरले आणि त्याचे पडसाद समाजजीवनावर उमटत राहिले.
संघाचे दैनंदिन संघशाखांचे, त्यातून संस्कारित माणूस घडवण्याचे मूलभूत काम आजही सुरूच आहे, परंतु समाजजीवनाची गरज म्हणून ज्या आणखी काही आयामांमध्ये संघाने आपल्या स्वयंसेवकांना उतरवले आहे, त्यातला एक महत्त्वाचा आयाम आहे सेवा कार्याचा.

निरनिराळ्या प्रांतांतील संघस्वयंसेवक व्यक्तिगत स्तरावर या क्षेत्रात सक्रिय होतेच, परंतु संघ म्हणून प्रत्यक्ष काम सुरू झाले ते वेगवेगळ्या कारणांमुळे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात त्याची सुरुवात झाली ती 1972च्या दुष्काळात. ‘रा.स्व. संघ दुष्काळ विमोचन समिती’ या नावाने जागोजागी कार्य सुरू झाले आणि 1989 साली संघसंस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षात तर संघाने सेवा कार्य हा आपल्या कामाचा एक अविभाज्य भाग बनवला. महाराष्ट्रातील सेवा कार्य सुरू झाल्याला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत.
 
संघस्वयंसेवकांनी सुरू केलेले वा संघानेच प्रत्यक्षात सुरू करून दिलेले सुमारे दीड लाखांहून अधिक लहान-मोठे सेवा उपक्रम आज देशभरात सुरू आहेत. अभिमानाची बाब अशी की संघाने सुरू केलेल्या व चालवलेल्या या उपक्रमांना उत्स्फूर्त अर्थसाहाय्य मिळते आहे आणि आपले समर्पण सत्पात्री पडते आहे या भावनेने नागरिक त्यामागे मोठ्या विश्वासाने उभेही राहत आहेत.

 
कार्यकर्ते नाहीत म्हणून समाजजीवनातील काही संस्था बंद पडण्याचा प्रकार एकीकडे, तर कार्यकर्तेच काय, पैसाही उभा राहत असल्याचा संघाला येत असलेला सुखद अनुभव दुसरीकडे, असे चित्र समाजात पाहायला मिळते आहे. या सेवा कार्यांसाठी निधी उभा करत असताना संघस्वयंसेवकांना आलेले अनुभव विलक्षण प्रेरणादायक आहेत, उत्साह वाढवणारे आहेत, संघावरचा विश्वास वाढत असल्याची प्रचिती देणारे आहेत, अंगावर रोमांच उभे करणारे आहेत.


nidhi_1  H x W:

प्रसंगा-प्रसंगाने निधीसंकलनाचे हे अनुभव सांगितले जातात, संघ अधिकार्‍यांच्या भाषणातून, बौद्धिकातून त्याची माहिती संघस्वयंसेवकांना मिळते. परंतु निधीसंकलनाच्या कार्यातले हे रोमांचक अनुभव अधिक व्यापक प्रमाणावर पोहोचावेत, ते पुस्तकरूपाने शब्दबद्ध व्हावेत, ते वाचून पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळावी आणि संघाने कमावलेल्या विश्वासार्हतेचे मर्म लोकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने साप्ताहिक विवेकने या अनुभवांचे संकलन करण्याचा विचार केला आहे.
 
 
सेवा कार्यासाठी दिल्या जात असलेल्या प्रत्येक रुपयाची पावती फाडली जात असल्याने त्यात गौप्य असे काहीही नाही, तरीही हे माझे कर्तव्य आहे असे म्हणून निधी देणार्‍या व्यक्तींना अनेकदा त्याची जाहीर वाच्यता करावी असे वाटत नाही आणि त्यात काही चुकीचेही नाही. परंतु हे अनुभव भविष्यातील दात्यांना आपापली दातृत्वशक्ती वृद्धिंगत करण्यासाठी उद्युक्त करतील, हा विश्वास साप्ताहिक विवेकला आहे.

 
‘संपूर्ण विश्वासार्हता’ हा संघाने जपलेला आणि पुढच्या पिढ्यांकडे हस्तांतरित केलेला महत्त्वाचा संघमंत्र आहे. आपल्याला आलेले या संघमंत्राचे अनुभव आपण शब्दमर्यादेची चिंता न करता शब्दबद्ध करावेत आणि साप्ताहिक विवेककडे पाठवावेत, अशी कल्पना आहे. हे अनुभव शक्यतो टाइप करावे, हाती लिहिलेच तर सुवाच्य अक्षरात कागदाच्या एकाच बाजूस लिहावे आणि 30 ऑगस्टपर्यंत विवेककडे पोस्टाने व ईमेलने vivekedit@gmail.com पाठवावेत, अशी विनंती आहे.


विवेक  कार्यालय 
5/12, कामत औद्योगिक वसाहत, 396 स्वा. वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-25.  2422 1440, 2422 5639.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 
प्रशासकीय कार्यालय : विवेक भवन (कृष्णा रिजन्सी), 12 वा मजला, प्लॉट क्र. 40, सेक्टर क्र. 30, सानपाडा (प.), नवी मुंबई-400 705. 
27810235/27810236.