नाना नवले चिंता करितो कार्यक्षेत्राची

विवेक मराठी    02-Jul-2021   
Total Views |

सुखदेव उर्फ नाना नवले यांच्या 50 वर्षांच्या संघजीवन कार्याचा आढावा घेणारी आशयसंपन्न पुस्तिका येत्या 10 जुलै रोजी त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त प्रकाशित होत आहेपुस्तिकेतील काही भाग खास आमच्या वाचकांसाठी...


nana_1  H x W:
संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्या उपक्रमात रममाण झाले.

 

संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या कार्यशैलीचा सुखदेव उर्फ नाना नवले यांनी फार सूक्ष्म अभ्यास केल्याचे जाणवते. ‘डॉ. हेडगेवार प्रवास करीत आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्तीची संघचालक म्हणून नेमणूक करीत. प्रतिष्ठित व्यक्ती संघाची प्रमुख झाल्यामुळे संघाला समाजात त्या क्षेत्रात प्रतिष्ठा प्राप्त होत असे. प्रतिष्ठित याचा अर्थ जे उद्योग-व्यवसाय करतात, ज्यांचा स्वत:चा दवाखाना आहे किंवा हॉस्पिटल आहे, अशा व्यक्ती उभ्या केल्या पाहिजेत.

नानांनीदेखील अशा व्यक्ती उभ्या केल्या. काही तरुणांना नोकर्या सोडायला लावल्या आणि व्यवसाय करायला लावले. देव म्हणून एमएससीबीचे डायरेक्टर होते. नाना त्यांना म्हणाले, “आमच्या हेमंत जोशीला तुम्ही एक कॉन्ट्रॅक्ट द्या.” देव हसून म्हणाले की, “नवले, जोशी नावाची माणसे कुठे धंदा करतात काय?” परंतु नानांनी त्यांना आग्रह केला आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिले. व्यवसाय सुरू झाला. जयंत जोशी यांना, पैठणला नोकरी सोडून दवाखाना घालायला सांगितला. आज तिथे चाणक्य विद्यालयदेखील आहे. अशी व्यवसायाला प्रवृत्त करणार्यांची यादी खूप मोठी आहे. त्यामागची दृष्टी अशी की, संघाचे काम रुजायचे असेल आणि त्याला प्रतिष्ठा प्राप्त व्हायची असेल, तर समाजातील व्यावसायिक मंडळी संघात असली पाहिजेत. व्यावसायिकांना समाजात आपोआप प्रतिष्ठा प्राप्त होत असते.

जे काही करायचे ते संघासाठी, ही नानांच्या जीवन जगण्याची प्रेरणा आहे. संघाचे गीत आहे - ‘तू संघ संघ मंत्र जप निजांतरात’. हा मंत्र नाना निरंतर जपत आलेले आहेत. प्रचारक म्हणून ते थांबले, पण प्रचारकासारखेच काम करीत राहिले. प्रचारकाची भोजनाची व्यवस्था कुठे ना कुठे तरी होते; परंतु प्रचारकासारखे काम करणार्या कार्यकर्त्याची व्यवस्था होतेच असे नाही. पोटात अन्न नसल्यामुळे एका कार्यकर्त्याच्या घरी गेले असता, तेथेच ते घेरी येऊन पडले. भूक भागविण्यासाठी ते भजी खात. त्यावरूननाना म्हणजे भजीअसेही काही लोकांनी समीकरण ठरविले. डॉ. हेडगेवार स्वत: उपाशी राहून घरी आलेल्या स्वयंसेवकाला आपल्या वाट्याचे जेवण देत. त्यांचे हे उदाहरण सर्वांना माहीत आहे. संघकाम करीत असताना पोटाची चिंता करायची नाही, हा डॉक्टरांचा जीवनसंदेश नाना आपल्या कृतीने व्यवहारात आणीत होते. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे एक नैतिक सामर्थ्य त्यांच्या कार्यक्षेत्रात आपोआप निर्माण झाले. त्यांनी सांगितलेले काम करायचे किंवा त्यांना विचारल्याशिवाय कुठलेही काम सुरू करायचे नाही, असा अलिखित नियम झाला. पद प्राप्त झाल्याने ही शक्ती निर्माण होत नाही, त्यामागे तपस्या उभी करावी लागते. नानांनी ती केली.

संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्या उपक्रमात रममाण झाले.


खरे
तर हे काम म्हणावे तितके सोपे नसते, पण अगदी अलगदपणे मीपणा सोडून अलिप्त राहून नाना संस्थाकाम करीत राहिले. सहजपणे ते धुळ्याच्या अनुसूचित जातीजमाती सेवा प्रकल्पात - म्हणजे जनजातीतील तरुणांच्या नेतृत्व प्रकल्पात सामील झाले आणि पूजनीय डॉक्टरांचा आणखी एक मंत्र त्यांनी जगून दाखविला, तो मंत्र असा - ‘कुठल्याही समाजात खोल प्रवेश केल्याशिवाय त्या समाजातले मर्म कळत नाही यशाची गुरुकिल्ली हाती लागत नाही, पण थोडा आत प्रवेश केला म्हणजे डोळ्यासमोर स्वच्छ प्रकाश पडून आतील सर्व खाचखळगे खाचाखोचा स्पष्ट दिसायला लागतात आपला मार्ग नीट चोखाळता येतो.’

 

पूजनीय डॉक्टरांची अतिशय सुंदर मंत्रवाक्ये आहेत, ती अशी - प्रवृत्ती निवृत्ती या दोेन्ही वृत्ती एकाच मनुष्यात पाहिजेत. मन निवृत्तिपर कार्य प्रवृत्तिपर पाहिजे. निवृत्ती म्हणजे त्यागभावना. प्रत्येक सार्वजनिक कार्यकर्त्याचे मन निवृत्तिप्रधान म्हणजे त्यागप्रधान पाहिजे. त्यागबुद्धीने केलेले कार्य स्वार्थबुद्धीने केलेले कार्य हे बाह्यत: जरी एकच दिसले, तरी दोन्ही कार्यांच्या हेतूत फरक असतो. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनया वाक्यात निवृत्ती प्रवृत्ती यांची सुंदर सांगड घातली आहे. यातील पहिलेच वाक्य - ‘प्रवृत्ती निवृत्ती या दोेन्ही वृत्ती एकाच मनुष्यात पाहिजेत, असा माणूस मला दाखवाल का?’ असे जर कुणी मला विचारले तर मी नानांकडे बोट दाखवीन.

 

त्यांचे कार्य प्रवृत्तिपर आहे, पण मन मात्र त्यापासून निवृत्त असते. डॉक्टरांना हे सांगायचे आहे की, असंख्य कामे करीत राहावीत; परंतु कोणत्याही कामात गुंतू नये, त्याची आसक्ती ठेवू नये. त्याच्याविषयी ममत्व निर्माण होऊ देऊ नये. उद्या जर असे सांगितले की, आता हे काम पुरे झाले, दुसरे काम करा, तर त्या क्षणी दुसरे काम सुरू करता आले पाहिजे. मी नसेन तर कामाचे काय होईल, हा विचार मनात येता कामा नये. म्हणजे एकाच वेळी प्रवृत्तीदेखील आहे आणि निवृत्तीदेखील आहे.

ज्याला डॉ. हेडगेवारांचा दिव्यस्पर्श झाला, तो फक्त समाजाला काय मिळणार, आपण सुरू केलेल्या संस्थांना काय मिळणार, याचाच विचार करीत राहतो. प्रवृत्तिपर राहून मन निवृत्तिपर ठेवतो. प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा सुंदर संगम म्हणजे नाना नवले.