व्हेनिस नावाचे अर्थसत्ताक

23 Jul 2021 15:41:11
व्हेनिसच्या अमाप समृद्धीचे आणि व्यापारी महासत्ता होण्यामागचे रहस्य भूमध्य सागरावर वर्चस्व गाजवायची अभिलाषा हे होते. उत्तम नाविक कौशल्ये आणि अत्यंत शिस्तबद्ध अशा व्यापार्यांच्या गिल्ड्स ही व्हेनिसची बलस्थाने होती. कालांतराने व्हेनिसचे स्थान जरी अन्य देशांनी बळकावले, तरीही नाविक सत्ता आणि पद्धतशीर व्यापार यांच्या जोरावर काय मजल मारता येते, याचा वस्तुपाठच जणू व्हेनिसने घालून दिला होता.

 economy_1  H x
 
ईशान्य इटलीमधील व्हेनिस नावाच्या शहराला सर्वसाधारणपणे कालव्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. पण हेच व्हेनिस एकेकाळी भूमध्य समुद्रातून होणार्या बहुतांश नाविक व्यापारावर हुकमत गाजवायचे. एक मर्चंट सिटी-स्टेट अथवा ‘अर्थसत्ताक’ सागरी वर्चस्वाच्या जोरावर ही करामत कशी काय करून दाखवू शकले? हे जाणण्याकरिता या व्हेनिसच्या कालव्यांतील पाण्यात काय मुरते आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.
2011 साली ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात सुलतान मिर्झा नावाचे प्रमुख पात्र अजय देवगण या अभिनेत्याने साकारले होते. या चित्रपटातील एका प्रसंगात, तस्कर असलेला सुलतान मिर्झा हा त्याच्या गुन्हेगारी जगतातील स्पर्धक म्होरक्यांबरोबर बसून मुंबईमधील त्यांची त्यांची वसुलीसाठीची हद्द ठरवून टाकतो. सर्वांना हद्द मान्य झाल्यावर कुणाच्या तरी लक्षात येते की मिर्झाबाबूने स्वत:साठी कोणताच इलाखा राखीव म्हणून ठेवला नाहीये. त्यावर हुकमाचा एक्का टाकावा अशा आविर्भावात सुलतान मिर्झा उत्तर देतो, “मला जमिनीवर नाही, तर या मुंबईला वेढणार्या समुद्रावर अधिकार हवा आहे!” बास! अगदी हाच प्रसंग आता मध्ययुगीन इटलीमध्ये घेऊन चला.

इ.स. 14वे शतक ते 16वे शतक! इटलीच्या मुख्य भूमीवर अनेक प्रादेशिक सत्ता, तसेच फ्रेंच व जर्मन राजे जास्तीत जास्त भूभागावर अधिकार गाजविण्यासाठी झगडत होते. या रणधुमाळीच्या लोटांमुळे बहुतांश उत्तर इटालियन क्षेत्र वेढले गेले असतानाही व्हेनिस नावाचे एक अत्यंत हुशार अर्थसत्ताक या सगळ्यापासून सुरक्षित होते. त्यांना भूभाग काबीज करण्यात स्वारस्य नव्हते. त्यांना सबंध भूमध्य सागरावर वर्चस्व गाजवायची अभिलाषा होती. व्हेनिसच्या अमाप समृद्धीचे आणि व्यापारी महासत्ता होण्यामागचे रहस्य हेच होते. उत्तम नाविक कौशल्ये आणि अत्यंत शिस्तबद्ध अशा व्यापार्यांच्या गिल्ड्स ही व्हेनिसची बलस्थाने होती.

व्हेनिसला राजेशाही नव्हती, इथे होती ‘डॉजेशाही!’ ‘डॉज’ म्हणजे व्हेनिशियन गिल्ड्स, नाविक व्यापारी आणि सामान्य प्रजाजन यांचा अधिपती. हा अधिपती सिनेट निवडत असे आणि एकदा निवडला गेला की आजीवन तो ‘डॉज’ पदावरच राहत असे. शहरातील अत्यंत प्रभावशाली व्यापारी हेच प्रामुख्याने सिनेटवर निवडून जात असत, कारण सिनेटवर निवडून जाण्याचा अधिकार सामान्य नागरिकांना नसे. इ.स.1172 ते 1297 या कालखंडात व्हेनिस शहराच्या जडणघडणीत ज्यांनी योगदान दिले, अशा व्यापारी उमरावांची यादी असलेले पुस्तक म्हणजे ‘लिब्रो दि ओरो.’ या पुस्तकात ज्यांची यादी आहे, केवळ त्यांचेच वंशज सिनेटवर निवडून जातील असा इथला शिरस्ता होता. असे असल्यामुळे सर्वात प्रभावी गिल्ड्समध्ये ज्याने अधिकाराचे स्थान भूषविले आहे, अशीच व्यक्ती ‘डॉज’ म्हणून निवडून येत असे.
 
असे असले, तरीही एकदा डॉज म्हणून निवडून आला की मात्र त्या व्यक्तीने अत्यंत कर्तव्यदक्षतेने सर्व कारभार पाहणे हे कायद्याने बंधनकारक असे. डॉजला वारंवार धारेवर धरून त्याच्याकडून उत्तम नेतृत्व वसूल करण्याचे काम सिनेट अत्यंत चोखपणे करत असे.

अमाप समृद्धी असल्यामुळे चोरांचा व खंडणीखोरांचा उपद्रव होण्याचा धोका व्हेनिसला नेहमीच होता. पण यावर सिनेटने एक नामी शक्कल लढविली होती, ती शक्कल म्हणजे सरळ सरळ कायदा हातात घेणे. इथे न्यायालये अथवा सार्वजनिक सुनावण्या असा प्रकारच नव्हता. न्यायदानाचे काम सिनेटचे काही सदस्य गुपचुप करून थेट शिक्षा देऊन टाकत आणि तेही रात्री-बेरात्री. समजा, एखादा गुन्हा घडल्यावर त्याविषयी फिर्यादी नागरिकाला अमुक एका व्यक्तीवर संशय असेल, तर तशा आशयाची पत्रे गुप्तपणे टाकण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी पेट्यांची व्यवस्था केलेली असे. अशा प्रकारची पत्रे मिळाल्यावर हे सिनेटचे कुणीही न देखले, न पाहिलेले न्यायमूर्ती आपापसात चर्चा करून गुन्ह्याचा तपास लावीत. जर पत्रांद्वारे संशय व्यक्त झालेल्या व्यक्तीच्या गुन्ह्यातील सहभागाबद्दल तथ्य वाटले, तर त्या आरोपीचा काटा परस्पर काढला जायची व्यवस्था केली जाई. अत्यंत तत्पर अशा या अतरंगी न्यायदानाचा गुन्हेगारांना भयंकर धाक वाटे आणि व्हेनिसमध्ये आपले नशीब आजमावण्याऐवजी ते अन्य इटालियन शहरांची वाट पकडू लागत.


 economy_2  H x
 
व्हेनिसचे एक वैशिष्ट्य म्हणजे तिथली सागरी वरात. समुद्राप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षात एकदा व्हेनिसमधील सर्व गिल्ड्सचे उमराव सुशोभित नौकांमधून मिरवणूक काढत. व्हेनिसमधील सर्वात मोठा व सोन्या-रत्नाने मढवलेला नौकारथ म्हणजे ‘बुचेंटाँर.’ हा नौकारथ व्हेनेशियन डॉजसाठी राखीव असे. त्यावरील आसनावर आरूढ होऊन विविध वाद्यांच्या गजरात हा सर्वसत्ताधीश असा डॉज समुद्राला सोन्याची अंगठी वाहत असे. या अंगठीस सागरी सत्ता व्हेनिस व भूमध्य सागर यामध्ये जणू जो विवाहच झाला आहे, त्याचे प्रतीक मानले जाई. ‘सागरा, व्हेनिस तुला वरत आहे’ अशा आशयाचे उच्चारण केले जात असे. सर्व व्हेनिशियन प्रजाजन व सिनेटर्स त्या दिवशी डॉजसमोर त्यांच्या निष्ठा समर्पित करत.
इ.स. 1490पासून पुढे मात्र स्पेन, पोर्तुगाल अशा प्रदेशांमधून नवनवीन जलमार्ग, तसेच प्रदेश शोधण्याच्या प्रयत्नांचा सपाटाच सुरू झाला. या चढाओढीत पुढे फ्रेंच, डच, तसेच इंग्रज दर्यावर्दी येऊन मिळाले. या देशांच्या तुलनेत इटलीचा विचार केला, तर एक देश म्हणून इटली हा राजकीयदृष्ट्या एकीकृत नव्हता. व्हेनिस कितीही समृद्ध असले व 200 वर्षे युरोपच्या सागरी व्यापारावर एकहाती वर्चस्व राखून असले, तरी या इतर देशांनी मारलेली मुसंडी व्हेनिसला एकट्याला पेलणे अशक्यच होते. तरीही इ.स. 1350 ते अगदी 1590पर्यंत युरोपमधील सर्वात प्रबळ नाविक-व्यापारी सत्ता म्हणून व्हेनिसचा लौकिक टिकून होता, मात्र त्यानंतर या सागरी सत्तेच्या सारिपटात उतरलेल्या साम्राज्यवादी देशांनी व्हेनिसला पार मागे टाकले. एलिझाबेथ प्रथम ही इंग्लंडची राज्ञी असताना इंग्लिश नौसेनेने स्पेनचा राजा फिलीप द्वितीय याने ब्रिटनवर पाठविलेल्या नौसेनेचा पराभव केला. भूमध्य सागराला वरणार्या व्हेनिसवर कडी करून आता इंग्लंडने ‘मिस्ट्रेस ऑफ द सीज’ म्हणजे ‘सातही समुद्रांची प्रेयसी’ हा किताब सार्थपणे मिरविण्यास सुरुवात केली.
 
व्हेनिसचे स्थान जरी अन्य देशांनी बळकावले, तरीही नाविक सत्ता आणि पद्धतशीर व्यापार यांच्या जोरावर काय मजल मारता येते, याचा वस्तुपाठच जणू व्हेनिसने घालून दिला होता. पुढेदेखील ‘ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने’ भारताच्या मुख्य भूमीवर चाललेल्या संघर्षापेक्षाही समुद्रकिनार्यावर सत्ता वाढविण्याकरिता तब्बल 150 वर्षे खर्च केली. नाविक ताकदीच्या जोरावर हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यातून चालणारा व्यापार ताब्यात आणला आणि मगच प्रादेशिक विस्तार करण्याकडे लक्ष वळविले. एक मर्चंट कंपनी उगाचच इतकी मोठी मजल मारू शकली नाही. आक्रमकांचीदेखील विविध राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रेरणास्थाने असतात. प्रवाहांची दिशा वर्तविताना अगोदर प्रवाहाखाली काय मुरतेय याची तड लावण्याकरिता इतिहासाचा अभ्यास हाच एक मार्ग, हेच खरे!
Powered By Sangraha 9.0