टोकियो ऑलिंपिक्स आणि संभाव्य भारतीय विजेते

23 Jul 2021 13:49:39
@केदार लेले (लंडन)

Tokyo Olympics_1 &nb

तब्बल अठरा क्रीडाप्रकारांत देशातील 228 भारतीय ऑलिंपियन्स, भारताला ऑलिंपिक पदक मिळेल यासाठी टोकियो ऑलिंपिक्स येथे जिवाचे रान करतील, हे निश्चित! या सर्व भारतीय खेळांडूसाठी प्रत्येक भारतीयाच्या मनात एकच विश्वास असला पाहिजे - ‘हम होंगे कामयाब!’
 
क्रीडाविश्वातली सर्वोच्च स्पर्धा म्हणजेच ऑलिंपिक्स 23 जुलैपासून सुरू होत आहे. यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी तब्बल 228 भारतीय खेळाडू पात्र ठरले आहेत! तर जाणून घेऊ या, या स्पर्धेविषयी आणि काही संभाव्य भारतीय विजेत्यांविषयी!
टोकियोमध्ये दुसर्‍यांदा रंगणार ऑलिंपिक्स!

 
दुसर्‍या महायुद्धामुळे 1940मध्ये टोकियो येथे स्पर्धा रद्द करण्यात आली होती. दुसर्‍या महायुद्धात बेचिराख झालेल्या जपानने फिनिक्सभरारी घेत, तब्ब्ल 24 वर्षांनी - म्हणजेच सन 1964मध्ये टोकियो येथे ऑलिंपिक्स स्पर्धा भरवली आणि ती यशस्वीदेखील करून दाखवली. 2008 बीजिंग (चीन)नंतर, म्हणजेच जवळजवळ एका तपानंतर यंदा पुन्हा एकदा आशिया खंडात ही स्पर्धा होत आहे.


Tokyo Olympics_1 &nb 
 
टोकियो ऑलिंपिक्स 2021 - एक शापित स्पर्धा

कोरोनामुळे ही स्पर्धा काहीशी लांबणीवर पडली. असे होऊनसुद्धा, कोरोना नियमावलीचे कठोर पालन करून जपानची राजधानी टोकियो येथे ही स्पर्धा होत आहे, हे विशेष! कोरोनामुळे एक वर्ष लांबणीवर पडल्यामुळे यंदाच्या स्पर्धेला शापित स्पर्धा म्हटले जात आहे!
काही खास भारतीय खेळाडूंकडून पदाकची आस

क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणार्‍या भारतात क्रिकेटला तर धर्म मानण्यात येते. पण गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलताना दिसत आहे. 2016 रियो ऑलिंपिक्स येथे बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू अंतिम फेरीत हरली आणि समस्त भारतीय मनांना एक चुटपुट लागून राहिली. पी.व्ही. सिंधू (बॅडमिंटन), विनेश फोगट (कुस्ती), बजरंग पुनिया (कुस्ती), दीपिका कुमारी (तिरंदाजी), मेरी कोम (बॉक्सिंग), विकास कृष्णा (बॉक्सिंग), मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग) यांसारख्या खेळाडूंकडून भारताला सुवर्णपदकाची आशा आहे. तसेच यंदा पुरुष आणि महिला हॉकी टीमकडूनही भारतीयांना पदाकाची आस आहे.
भारत यंदा 18 क्रीडाप्रकारांत सहभागी

या स्पर्धेत भारताकडून एकूण 18 क्रीडाप्रकारांत तब्बल 228 खेळाडू सहभागी झाले आहेत. भारत ज्या 18 क्रीडाप्रकारांत सहभागी झाला आहे, ते म्हणजे तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, अश्वशर्यती, तलवारबाजी (फेन्सिंग), गोल्फ, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युदो, रोइंग, सेलिंग, नेमबाजी (शूटिंग), जलतरण, टेबल टेनिस, टेनिस, वेटलिफ्टिंग आणि कुस्ती.
टोकियो ऑलिंपिक्स - संभाव्य भारतीय विजेते
कोरोनाचे सावट असूनसुद्धा भारताचे खेळाडूही या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. अधिकाधिक पदके मिळवण्यासाठी भारताचे खेळाडू कसून सराव करत आहेत.
नेमबाजी (शूटिंग) - यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी 15 भारतीय नेमबाज पात्र ठरले आहेत. ऑलिंपिक स्पर्धेच्या कोणत्याही प्रकारात स्थान मिळवणारी ही भारतातील सर्वात मोठी तुकडी आहे.
 
19 वर्षीय सौरभ चौधरी गेल्या दोन वर्षांपासून अविश्वसनीय आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. केवळ एक स्पर्धा वगळता त्याने इतर सर्व स्पर्धांमध्ये भारतासाठी पदक मिळवले आहे. तसेच मिश्र दुहेरी प्रकारात मनू भाकरबरोबर त्याची जोडी प्रभावशाली दिसून येत आहे! या जोडीने भाग घेतलेल्या सर्वच स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली आहे, हे विशेष!
दिव्यांश पन्वर आणि अभिषेक वर्मा हे दोघे दहा मीटर एअर रायफल प्रकारात सर्वोत्कृष्ट नेमबाज आहेत. दिव्यांश पन्वरच्या दांडग्या अनुभवाच्या जोरावरच या जोडगोळीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.
 
गेल्या तीन विश्वचषकांत शूटिंगच्या मिश्र स्पर्धेत यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्मा या जोडीने रौप्य आणि कास्यपदके जिंकून ऑलिंपिक पदक मिळवण्यासाठी आपण खरेखुरे दावेदार आहोत, हे सिद्ध केले आहे.
तूर्तास तरी शूटिंग हा क्रीडाप्रकार भारताचा मुख्य आधारस्तंभ मानला जात आहे! शूटिंग ह्या क्रीडाप्रकारात भारतला चार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पदके मिळवायची नामी संधी आहे.
सौरभ चौधरी (10 मि. पिस्तूल), सौरभ चौधरी आणि मनू भाकर (10 मि. पिस्तूल - मिश्र दुहेरी), दिव्यांश पन्वर आणि अभिषेक वर्मा (10 मि. रायफल - मिश्र दुहेरी) आणि यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्मा (10 मि. पिस्तूल - मिश्र दुहेरी) यांना पदक मिळण्यासाठी दावेदार मानले जात आहे.


Tokyo Olympics_3 &nb

 
कुस्ती
तांत्रिकदृष्ट्या रवी दहिया हा त्याच्या श्रेणीत एक प्रतिभावान कुस्तीपटू आहे. बहुविध मार्गांनी जिंकू शकण्याच्या हातोटीमुळेच, पदक मिळण्यासाठी तो एक प्रबळ दावेदार गणला जात आहे. तसेच बजरंग पुनिया हा जागतिक स्तरावर एक यशस्वी कुस्तीपटू आहे. दबाव आणि तग धरण्याची क्षमता हे गुण, कोणत्याही प्रतिस्पर्ध्यासाठी डोकेदुखी बनू शकतात. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला टोकियोमध्ये द्वितीय मानांकन प्राप्त झाले आहे. सर्व विनासायास घडले, तर त्याला अंतिम फेरीत पोहोचता येईल, ज्यामुळे भारताचे पदक निश्चित होईल.
गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीने विनेश फोगट हिने सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे. टोकियोमध्ये तिला अव्वल मानांकन दिले गेले आहे. अव्वल मानांकित असल्यामुळे विनेशला अंतिम फेरी गाठणे विशेष अवघड जाणार नाही!

Tokyo Olympics_2 &nb 
टोकियो ऑलिंपिकच्या कुस्ती स्पर्धेत भारताकडून सात खेळाडू सहभागी होतील. रवी दहिया, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांचा चढता आलेख बघता, पदके मिळण्यासाठी नेमबाजीनंतर कुस्ती हा दुसरा क्रीडाप्रकार भारताचा मुख्य आधारस्तंभ मानला जात आहे.
अ‍ॅथलेटिक्स - या क्रीडाप्रकारात भारताची कामगिरी तशी चांगली झालेली नाही. धावपटू द्युती चंद (100 मीटर्स आणि 200 मीटर्स शर्यत) हिच्याकडून अनेक आशा आहेत. तसेच थाळीफेकीमध्ये सीमा पुनियाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. 2019मध्ये झालेल्या दुखापतीतून बाहेर येत नीरज चोप्रा याने लढाऊ वृत्तीचे प्रमाण दिले आहे. 85 मि. ते 88 मि. भालाफेक करीत जागतिक क्रमवारीत त्याने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. भालाफेक या प्रकारामध्ये अनेक वेळेस काहीच इंच आणि से.मी.मुळे पदक मिळते किंवा निसटते! सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास नीरज चोप्रामुळे जगभरातील रसिक प्रेक्षकांना एक उत्कृष्ट चौरंगी चुरस दिसून येईल. म्हणूनच भालाफेक या प्रकारामध्ये शिवपाल सिंग आणि नीरज चोप्रा यांनी भारताच्या आशा पल्लवित केल्या आहेत, हे मात्र निश्चित!
बॅडमिंटन - कोविडच्या साथीमुळे बॅडमिंटनचा हंगाम विस्कळीत झाला होता. पण या वर्षी काही स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 2021मध्ये पी.व्ही. सिंधूने तिला फॉर्म सापडल्याची चांगली चिन्हे दाखवली आहेत. पी.व्ही. सिंधूने सन 2016मध्ये रिओ ऑलिंपिक येथे रौप्यपदक मिळवले होते. या वर्षी पुन्हा एकदा सर्व भारतीयांना तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे!


बॉक्सिंग -
टोकियो ऑलिंपिकच्या बॉक्सिंग स्पर्धेत अमित पंघाल याला अव्वल मानांकन दिले गेले आहे. उपांत्यपूर्व फेरीपर्यंत अव्वल आठ मानांकित खेळाडू भिडणार नसल्यामुळे भारताची पदक मिळण्याची शक्यता वाढली आहे. अमित पंघाल त्याच्या वजनाच्या वर्गात सर्वात वेगवान बॉक्सर आहे. वेगवान असल्यामुळे तो कोंडीत सहसा अडकत नाही आणि पटापट गुण मिळवतो. जागतिक व ऑलिंपिक चॅम्पियन झोइरोवकडून अंतिम सामन्यात त्याला निसटता पराभव स्वीकारावा लागला होता, ऑलिंपिक अंतिम फेरीमध्ये पोहोचल्यास झालेल्या पराभवाची परतफेड करायला अमित पंघाल नक्कीच उत्सुक असेल!
मेरी कोम, विकास कृष्णा आणि अमित पंघाल सोडल्यास बॉक्सिंगमध्ये भारतीयांना कोणाकडूनच पदाकाची आस दिसत नाही!
हॉकी - भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही हॉकी संघांनी या वेळी ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळवला आहे. पुरुष संघ जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असल्याने भारत किमान उपांत्य फेरीत पोहोचेल, अशी आशा बाळगली जात आहे. तसेच महिला संघसुद्धा उत्तम कामगिरी बजावेल, यात काही शंका नाही!
टेबल टेनिस - चार खेळाडू टेबल टेनिसमध्ये भारताकडून पात्र ठरले आहेत. शरथ कमल आणि मनिका बत्रा यांच्याकडून पदकाची भारताला आशा आहे.


Tokyo Olympics_4 &nb
वेटलिफ्टिंग - मीराबाई चानू ही टोकियो ऑलिंपिकच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेणारी भारतातील एकमेव खेळाडू आहे. जागतिक क्रमवारीत मीराबाई चानू दुसर्‍या क्रमांकावर असून तिला सुवर्णपदकासाठी दावेदार मानले जात आहे.
 
 
फेन्सिंग - ऑलिंपिकमधील फेन्सिंग स्पर्धेत भारत प्रथमच सहभागी होणार आहे. भवानी देवी ही या स्पर्धेत भाग घेणारी पहिली भारतीय ठरणार आहे.
गोल्फ - टोकियो ऑलिंपिक 2020मध्ये भारताने गोल्फमध्ये चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत भारत गोल्फमध्ये भाग घेईल.
जिम्नॅस्टिक्स - प्रणती नायक ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली भारताची केवळ दुसरी जिम्नॅस्ट आहे.
ज्युदो - सुशीला देवी ही ज्युदोमध्ये भाग घेणारी भारतातील एकमेव खेळाडू आहे. सुशीला देवीने 48 किलो गटात स्थान मिळवले.
रोइंग आणि सेलिंग - अर्जुन आणि अरविंदसिंग हे भारतासाठी पात्र ठरण्यात यशस्वी ठरले आहेत.
जलतरण - साजन प्रकाश हा जलतरण स्पर्धेत भाग घेणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. साजन कुमारने 200 मीटर बटरफ्लाय स्पर्धेसाठी पात्रता दर्शवली आहे.
ऑलिंपिक्स - भारताची तयारी

कित्येक खेळांमध्ये भारतीयांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत आपला आलेख चढता ठेवला आणि कित्येक क्रीडापटूंना अग्र मानांकन दिले गेले आहे. एकंदर अठरा क्रीडाप्रकारांत भाग घेत भारताने मोठी क्रांती केली आहे.
ऑलिंपिक्स - अठरापगड जाती आणि भारत
अमर्त्य सेन म्हणाले आहेत, भारतात अठरापगड जातीचे लोक, पंथ, धर्म अनेक शतके एकत्र नांदत आहेत, हे एक आश्चर्य आहे. पण इतिहास साक्षी आहे, शिवाजी महारांजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य उभे केले!
भारतातील आरक्षण संस्था मोडून काढण्याचे आव्हान देत, तब्बल अठरा क्रीडाप्रकारांत देशातील 228 भारतीय ऑलिंपियन्स, भारताला ऑलिंपिक पदक मिळेल यासाठी टोकियो ऑलिंपिक्स येथे जिवाचे रान करतील, हे निश्चित!
अठरापगड जाती, आरक्षण अशा अनेक क्षुद्र आणि दळिद्री विचारांना मागे टाकून सर्व ऑलिंपियन्स आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात एकच विश्वास असला पाहिजे - ‘हम होंगे कामयाब!’
lele.kedar @gmail.com
Powered By Sangraha 9.0