DNS बँकेत वेतनवाढीचा करार संपन्न

विवेक मराठी    24-Jul-2021
Total Views |


dns_1  H x W: 0

डोंबिवली :
कोरोनाच्या संकटकाळातही बँकेच्या कर्मचाऱ्यांचे हित साधणारा वेतन करार, ठाणे जिल्हा सहकारी बँक कर्मचारी महासंघ व डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या व्यवस्थापनात नुकताच संपन्न झाला. एप्रिल, २०२१ ते मार्च, २०२४ या तीन वर्षांसाठी हा वेतन करार करण्यात आला असून, या करारामुळे कर्मचाऱ्यांना ११% वेतनवाढ मिळाली आहे. या वेतनवाढीबरोबरच कर्मचाऱ्यांना सवलतीच्या व्याजदरात दीर्घ मुदतीचे गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तीक कर्ज उपलब्ध होणार आहे.

" ठाणे जिल्हा कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या करारासंबंधात जी प्रगल्भता दाखवली ती निश्चितच कौतुकास पात्र आहे. आता उद्योगविश्वात व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटना ह्यांनी एकमेकांशी लढण्याची मनःस्थिती सोडून, दोघांनी मिळून आव्हानात्मक अशा परिस्थितीला एकत्रित ताकदीने व एकदिलाने सामोरे जाणे आवश्यक आहे. ते डोंबिवली बँकेत प्रत्यक्षात घडत आहे. कोरोनाच्या कठीण काळातही उभयपक्षी अत्यंत सकारात्मक व सामंजस्याची भूमिका घेत, अत्यंत कमी कालावधीत व सौहार्दपूर्ण चर्चेने हा करार संपन्न झाला आहे" अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सी.ए. उदय कर्वे यांनी दिली.
 

dns_2  H x W: 0 
 
" करोनामुळे निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता , उद्योग व्यवसायांवर आलेली संकटे, करोनाकाळात अनेकांना गमवावे लागलेले रोजगार या पार्श्वभूमीवर बँक व्यवस्थापनाने वेतनातील वाढीचा करार करणे, व ते ही तत्परतेने करणे, हेच मुळात अभिनंदनीय असून, वेतनवाढीबाबत संचालक मंडळाबरोबर झालेल्या एकाच बैठकीत हा वेतन करार संपन्न झाला ही कर्मचारी संघटन क्षेत्रासाठीही अत्यंत ऐतिहासिक घटना आहे." असे प्रतिपादन ठाणे जिल्हा सहकारी बँक कर्मचारी महासंघाचे  अध्यक्ष अॅड. अनिल ढुमणे यांनी केले.
 
या प्रसंगी बँकेचे मान्यवर संचालक, व्यवस्थापकीय अधिकारी व ठाणे जिल्हा सहकारी बँक कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

तत्परतेने झालेल्या या वेतनवाढीच्या करारामुळे डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या कर्मचारी वर्गात अत्यंत आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.