दहशतवाद आणि मुलांचा गैरवापर

विवेक मराठी    27-Jul-2021   
Total Views |
लहान मुलांना या वाईट कृत्यासाठी पैशांचा मोबदला द्यावा लागत नाही. त्यांना प्रलोभन दाखवले की ते स्वत:होऊन भरती होतात. त्यांच्या गरजा कमी असतात. स्वस्तात मनुष्यबळ उपलब्ध होते. मुले संवेदनशील असल्यामुळे ते आपला प्रामाणिकपणा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. दहशतवादी संघटनांसाठी ही मुले ‘भविष्यातील’ गुंतवणूक असतात. दुर्दैवाने एक शस्त्र म्हणून मुलांचा वापर केला जातो आणि त्यांची निरागसता कायमची बळी पडते.

Terrorism _1  H

जागतिक दहशतवादाच्या अभ्यासात असे दिसून येते की लहान मुलांच्या निरागसतेचा गैरफायदा घेऊन दहशतवादी संघटना आपली उद्दिष्टे पूर्ण करत आहेत. लहान बालकांना भावी काळात दहशतवादी बनवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम, अल कैदा, बोको हराम यांनी मुलांचा गैरवापर केलेला आहे. इंडोनेशियात जेम्माह-अंशौरत दौलाह ह्या गटाने स्त्रियांना आणि मुलांना दहशतवादाला प्रवृत्त केलेले आहे. इंडोनेशियात 13 मे 2018 रोजी सुरबाया येथे तीन चर्चेसवर आत्मघातकी हल्ले केले गेले. हल्लेखोर होते एक कुटुंब... त्यात आई-वडील, त्यांची चार मुले - 18 आणि 16 वर्षांची मुले आणि 12 आणि 9 वर्षांच्या मुली - ह्यांचा समावेश होता. ह्या हल्ल्यामुळे जग हादरले. कुटुंब एक ‘युनिट’ बनून दहशतवादी हल्ला घडवू शकते, हे वास्तव पचवणे जगाला खूप कठीण गेले. दहशतवादी किती क्रूरपणे कुटुंबच्या कुटुंब आपल्या ध्येयपूर्तीसाठी ‘वापरतात’, हे सिद्ध होते. (संदर्भ - सुरबाया ब्लास्ट - फॅमिली ऑफ फाइव्ह कॅरीड आउट बॉम्ब अ‍ॅटॅक ऑन इंडोनेशिया पोलीस स्टेशन, दी गार्डियन, 14 मे 2018.)
दहशतवादी संघटनांचे नियोजन

अल कैदाने तर लहान मुलांना भरती करण्यासाठी, तसेच त्यांच्यात आपली जहाल विचारसरणी निर्माण करण्यासाठीही ‘स्पेशल मीडिया प्लॅन’ तयार केलेला आहे. लहान मुलांपासून किशोरावस्थेतील मुलांपर्यंत जिहादी साहित्य, तसे गेम्स, कार्टून, गाणी इत्यादी इंटरनेटवर उपलब्ध केले जाते. दहशतवादी मुलांना ‘कब ऑफ खलीफत’ ह्यासारखी संबोधने देऊन बाकीच्या मुलांनाही तसे बनण्यासाठी आग्रह केला जातो. ‘बर्ड ऑफ पॅरेडाइज’ नावाचे एक प्रॉडक्शन हाऊस आहे. यातून जिहादविषयक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. इस्लाममध्ये अशी मान्यता आहे की जी मुले वयात येण्यापूर्वी स्वर्गवासी होतात, ती थेट स्वर्गात जातात. त्यांचे रूपांतर पक्ष्यात होते. ते अमरत्वाची गाणी गातात. या संस्थेच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे की मुलांचे रूपांतर शत्रूच्या मारेकर्‍यांमध्ये होते. जिहाद हे त्यांचे उद्दिष्ट असते. मुले ह्या गोष्टींचे अनुकरण करतात. ‘बर्ड ऑफ पॅरेडाइज’चे साहित्य अरब राष्ट्रे, कॅनडा तसेच ग्रेट ब्रिटन येथे उपलब्ध आहे. तसेच यूट्यूबवरही लहान मुलांचे दहशतवादी हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ दहशतवादी संघटना अपलोड करतात आणि यामुळे त्यांना अल्लाहकडून पारितोषिक मिळणार, असे संदेश दिले जातात. (संदर्भ - अल कैदा ऑन लाइन रॅडिकलायझेशन अँड दि क्रिएशन ऑफ चिल्ड्रेन टेररिस्ट - अनिता पेरेसीन)

साधारणपणे 2014मध्ये इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया - इसीस ह्या दहशतवादी संघटनेने सीरियामधील ‘अल बुकामल’ या भागावर कब्जा केला. तेथील शाळांवर ताबा मिळवला. परिणामी लहान मुलांना पूर्णपणे इस्लामी क़ट्टरतावादाचे धडे मिळू लागले. अबू शहेद हे त्या भागातील रहिवासी होते. त्यांनी त्यांचा अनुभव कथन केला आहे. जेव्हापासून इसीसने त्या भागाचा आणि शाळेचा ताबा घेतला, तेव्हापासून त्यांचा अकरा वर्षांचा मुलगा पूर्णत: बदलला. त्याचे वागणे बदलले. त्याच्या पुस्तकात शस्त्रास्त्रांची चित्रे आणि काळे झेंडे दिसू लागले. आपल्या घरात जणू छोटा हेरच वावरत आहे असे त्यांना जाणवू लागले. त्यांची पत्नी उम शाहेद म्हणते की या मुलाच्या सहवासात त्यांना असह्य वाटे. त्या मुलावर विश्वास ठेवणे कठीण होते. म्हणजे आईला मुलाच्या सहवासात राहणे असह्य वाटत होते.. तिच्यावर जणू लहानसा हेर पाळत ठेवतोय असे तिला वाटत होते. इसीसच्या सक्तीमुळे त्यांची मुले या शाळेत जातात. गणिताच्या पुस्तकात बेरजा-वजाबाक्या शिकवताना बंदुका-रणगाड्यांची चित्रे वापरलेली आहेत. पेन, पक्षी आणि फळे याऐवजी थेट रणगाडे, चाकू, बंदुका ह्यांची चित्रे वापरलेली आहेत. घड्याळ शिकवताना टाइमबाँबच्या चित्रावरचे घड्याळ आहे. शिक्षकही मान्य करतात की मुलांना जणू दहशतवादी बनवण्याचे प्रशिक्षण द्यावे लागत आहे. इसीसच्या सक्तीमुळे कोणी काहीही विरोध करू शकले नाही. युनिसेफच्या प्रवक्त्या तमारा कुम्मर म्हणतात की, “सीरियाच्या सर्व मुलांना आता शिक्षणक्रमासाठी आणखी मदतीची गरज आहे. त्यांनी जे भयंकर अनुभवले आहे, त्या धक्क्यातून त्यांना बाहेर पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली पाहिजेत.” (संदर्भ - हँडबुक ऑन चिल्ड्रेन रिक्रूटेड अँड एक्स्प्लॉयटेड बाय टेररिस्ट अँड व्हॉयलन्स एक्स्ट्रीमिस्ट ग्रूप्स, युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राइम, युनायटेड नेशन्स, 2017.)
नायजेरियामध्ये 2009 साली बोको हराम या संघटनेने 8000 मुलांना आपल्या दहशतवादी संघटनेत भरती करून घेतलेले आहे. काही लहान मुलांना संघटनेशी असणारी बांधिलकी सिद्ध करण्यासाठी स्वत:च्या कुटुंबाला ठार मारणे/उद्ध्वस्त करणे ह्यासारख्या अटी ठेवल्या. मग ह्या मुलांनी आपल्याच कुटुंबावर हल्ला चढवला. मुलींना सक्तीने दहशतवाद्यांशी विवाह करायला भाग पाडलेले आहे. संघटनेसाठी साफसफाईची कामे, स्वयंपाकाची कामे ह्यासाठी मुलींना सक्ती केली जाते. शिवाय, लहान मुलामुलींना ‘ह्युमन शील्ड’ - मानवी ढाल म्हणून वापरले जाते. तसेच मे 2015मध्ये 12 वर्षांच्या मुलीने नायजेरियातील योबे स्टेट येथील राजधानी दमतुरा तेथे बस स्टँडवर बाँबस्फोट घडवून आणला होता. 2015मध्ये इसीसने 274 मुलांची सीरियामधून भरती केली होती. आलेप्पो आणि राक्का येथे इसीसची लष्करी प्रशिक्षण केंद्रे होती. त्यात 10 ते 15 वर्षांच्या 124 मुलांना प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच यात 18 केसेसमध्ये तर मुले केवळ सात वर्षांची होती. जून आणि सप्टेंबर 2015मध्ये 1000 मुलांना इसीसने इराकच्या मोसुलमधून ताब्यात घेतलेले होते. त्यांचा वापर करून हल्ले करणे, स्फोटकांचे वहन करणे, निगराणी करणे, चेकपोस्टवर थांबवणे या कारणांसाठी त्यांचा वापर केला. (संदर्भ - रिपोर्ट ऑफ युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर ह्युमन राइट्स ऑन व्हॉयलेशन अँड अ‍ॅब्यूजेस कमिटेड बाय बोको हराम अँड दी इंपॅक्ट ऑन ह्युमन राइट्स इन अ‍ॅफेक्टेड कंट्रीज - एच.आर.सी./30/67 पॅरा-44.) केनिया आणि सोमालिया या ठिकाणी सक्रिय असणार्‍या ‘अल-शबाब’ ह्या दहशतवादी संघटनेनेसुद्धा मुलांची भारती केलेली आहे. (संदर्भ - रिपोर्ट ऑफ सेक्रेटरी जनरल ऑन चिल्ड्रेन अँड आर्म कॉन्फ्लिक्ट इन नायजेरिया - 2017/304 पॅरा 29-30.)


Terrorism _2  H
जसजसा एखाद्या भागात दहशतवादी संघटनेचा प्रभाव वाढतो, तसतशी दहशतवादी कृत्यात मुलांची संख्या वाढलेली दिसते. इसीसच्या बाबतीत तर मुलांची माहिती त्यांच्या मृत्यूनंतरच उजेडात येते. जेव्हा इसीसद्वारे ही मुले ‘अजरामर’ ‘हुतात्मा’ म्हणून घोषित केली जातात आणि त्यांच्या देशाचे नावही घोषित केले जाते, तेव्हाच त्यांची माहिती मिळते. (संदर्भ - मिया ब्युम, जॉन हॉरगन अँड चार्ली विंटर, डिपीक्शन ऑफ चिल्ड्रेन अँड यूथ इन दी इस्लामिक स्टेटस मार्टिरडम प्रपोगंडा, 2015-2016)

लहान मुलांना संघटनेत भरती करण्यामागील कारणे

दहशतवादी संघटनेमध्ये लहान मुलांना भरती करून घेण्यामागे बरीच कारणे आहेत. इसीस आणि बोको हराम ह्या संघटना सदस्यसंख्या वाढवण्यासाठी मुलांची भरती करतात. संघटनेची व्याप्ती वाढवणे, तसेच समाजावर आपला प्रभाव वाढवणे ही मुख्य कारणे असतात. मुलांवर कुणी फारसा संशय घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्याद्वारे हल्ला चढवणे सोपे असते. मुलांनी भरती करताना त्यांना प्रलोभने दाखवली जातात. ज्या देशात गरिबी मोठ्या प्रमाणात आहे, तेथे मुलांना खेळणी, खाऊ आणि जे त्यांचे पालक देऊ शकत नाहीत त्यांचे प्रलोभन दाखवले जाते. किशोरवयीन मुलांना शस्त्रे चालवणे, त्याचा संबंध पराक्रमाशी जोडणे, अमर होण्याचे आश्वासन देणे, याबरोबरच काही वेळा तर पैशाचे आमिषसुद्धा दाखवले जाते. मरणोत्तर स्वर्गात 72 कुमारिका मिळतील असे आश्वासन दिले जाते. उदाहरणार्थ - 24 मार्च 2004 रोजी हुसाम अब्डो ह्या सोळा वर्षांच्या पॅलेस्टिनी मुलाला नाबालास ह्या जेरुसलेमजवळच्या ठिकाणाहून अटक केली गेली. त्याच्याजवळ आठ किलो स्फोटकांचा पट्टा होता. त्याला फताहची अल अक्सा मार्तीर ब्रिगेडने चेकपोस्टवर येऊन स्वत:ला उडवून देण्यासाठी शंभर इस्रायली शेकेल आणि 72 हुरी - इस्लामी मान्यतेनुसार मरणोत्तर स्वर्गात मिळणारी तरुण मुलगी - ह्यांचे आमिष दाखवलेले होते. पण इस्रायली सैनिकांना आधीच संशय आल्यामुळे त्याला वाचवण्यात आले. (संदर्भ - ‘लिटल बाँबर फॅसिनेटस इस्रायली मीडिया, जेरुसलेम पोस्ट अ‍ॅज रिपोर्टटेड बाय बीबीसी, 25 मार्च 2004.)

मुलांना कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. त्यांना प्रलोभन दाखवले की ते स्वत:होऊन भरती होतात. त्यांच्या गरजा कमी असतात. स्वस्तात मनुष्यबळ उपलब्ध होते. मुलांचा वापर हेरगिरीसाठीही केला जातो. निरोप पोहोचवणे, सामान-स्फोटके पोहोचवणे ह्यासाठीही मुलांचा उपयोग केला जातो. मुलांवर बौद्धिकदृष्ट्या नियंत्रण ठेवणे सोपे असते. मुले संवेदनशील असल्यामुळे ते आपला प्रामाणिकपणा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. दहशतवादी संघटनांसाठी ही मुले ‘भविष्यातील’ गुंतवणूक असतात. (संदर्भ - चिल्ड्रेन ऑफ आर्म्ड कॉन्फ्लिक्ट - रिपोर्ट ऑफ सेक्रेटरी जनरल, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, 70/836/ड/2016/360.)
 
मुले संघटनेत भरती झाल्यानंतर त्यांना वेगवेगळी कामे करावी लागतात. थेट संघर्षात सहभागी होणे, काही वेळा आत्मघातकी हल्ला चढवणे, एखाद्या व्यक्तीची हत्या करणे, निरोपांची देवाण-घेवाण करणे, संघटनेतील दहशतवाद्यांच्या लैंगिक गरजांची पूर्तता करणे, सेवक म्हणून कामे करणे.. मुलामुलींना ही कामे करावी लागतात. मुलींनी दहशतवादी हल्ला केल्यास संघटनेला जास्त प्रसिद्धी मिळते. शिवाय, मुलींच्या सदस्यत्वामुळे गटाची आकर्षणशक्ती वाढते. परिणामी त्यात भरती होणार्‍या भावी सदस्यांची संख्याही वाढते. काही वेळा संघटनेतील सदस्य एखाद्या मुलीला स्वत:च्या प्रेमात अडकवून तिला संघटनेसाठी वापरतात. दहशतवाद्याच्या प्रेमात पडल्यावर घरातून होणारा विरोध संपवण्यासाठी मुली घर सोडतात. इसीससारखी संघटना तर ‘जिहादी-पत्नी’ किंवा ‘इसीस-पत्नी’ याप्रमाणे संबोधने वापरून स्त्रियांना थेट भरतीचे आवाहनसुद्धा करतात. (संदर्भ - एरीन सॉल्तमन अँड मेलानी स्मिथ, ‘टिल मार्तीरडम डू अस पार्ट’, जेन्डर अँड दी आयएसआयएस फेनॉमेना, लंडन इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक डायलॉग.)

एकूणच संघटनेच्या अंतर्गत मुले वॉचमन, पोस्टमन, हेर, स्वीपर्स, भरती करणारे, सेक्स स्लेव्ह्ज आणि ह्युमन शील्ड्स म्हणजेच मानवी ढाल आणि आत्मघातकी दहशतवादी म्हणून कार्यरत असतात. लिंग आणि वयानुसार या कामांमध्ये फरक जाणवतो. पण मुली या मोठ्या प्रमाणात लैंगिक गरजांसाठी वापरल्या जातात. बर्‍याचदा मुलांना माहीतसुद्धा नसते की जे सामान पोहोचवायला सांगितले आहे त्यात स्फोटके आहेत. श्रीलंकेच्या एलटीटीईनेसुद्धा मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा गैरवापर केला होता. युनिसेफच्या 2013च्या अहवालानुसार 25 देशांमध्ये 16 वर्षे वयापेक्षा लहान असणारी हजारो मुले युद्धात सहभागी झालेली आहेत.


सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीचा प्रभाव

बर्‍याच वेळा धक्कादायक अनुभव, जवळच्या नातलगाचा मृत्यू पहाणे, घरे उद्ध्वस्त होताना पाहणे, बेघर होणे यामुळे मुलांच्या मनावर मोठे आघात होतात. वैयक्तिक कारणे, कौटुंबिक अडचणी, आर्थिक गरजा ह्यामुळे लहान मुले तसेच किशोरवयीन मुले दहशतवादी संघटनांना बळी पडतात. सामाजिक परिस्थितीचा प्रभावही मोठ्या प्रमाणात पडतो.
पॅलेस्टाइनमध्ये तर लहानपणापासूनच दहशतवाद माहीत असतो. तिथे आत्मघातकी दहशतवादाचा स्वीकार आणि समर्थन आढळते. लहान मुलांना खेळण्यातले आत्मघातकी बाँब बेल्ट दिले जातात. तिथे हमासद्वारे चालवली जाणारी जी बालवाडी आहे, तिथे भिंतीवर लिहिले आहे - ‘बालवाडीतील मुले ही उद्याचे शहीद आहेत.’ तिथे दहा-अकरा वर्षांची मुलेही आत्मघातकी बाँबर बनून इस्रायलच्या जनतेचा जीव घेण्याची स्वप्ने पाहतात. ही वस्तुस्थिती आहे. वेस्ट बँकमधील अल नाझहा आणि गाझामधील इस्लामिक युनिव्हर्सिटी येथील वर्गांमध्ये लिहिलेले आहे की, ‘इस्रायलकडे अणुबाँब आहेत, आमच्याकडे मानवीबाँब’. बालवाडीपासून हिजबोल्लाहच्या शाळांमध्ये इस्रायलद्वेष शिकवला जातो. (संदर्भ - लेसन इन हेट, हिजबोल्लाह स्कूल बुन्स टीच अँटी-सेमिटिझम, टेरर सपोर्ट, दी टाइम्स ऑफ इस्रायल, 18 जून 2020.)

काही मुले इंटरनेटवरील इस्लामी धार्मिक प्रचाराला बळी पडतात. ईमेल, फेसबुक, यूट्यूब, तसेच अनेक ऑनलाइन/व्हर्च्युअल गट यातून किशोरवयीन मुले दहशतवादी संघटनेला बळी पडतात. हा ‘ई-जिहाद’ आहे. ह्यावर विचारांची देवाणघेवाण, साहित्य ह्या माध्यमातून हा ‘लीडरलेस जिहाद’ चालवला जातो. (संदर्भ - अल कैदा ऑन लाईन रॅडिकलायझेशन अँड दि क्रिएशन ऑफ चिल्ड्रेन टेररिस्ट - अनिता पेरेसीन.)
 
हमासने 8 डिसेंबर 2016 रोजी एका लहान मुलाचा लष्करी पोषाखातील मोठ्या रायफलसह फोटो ट्विटर अपलोड करून म्हटले की पिढ्यानपिढ्या हमास त्याची प्रतिष्ठा आणि ताकद वाढवत आहे. (संदर्भ - आयडीएफ, इस्रायल वेबसाइट.) असे अनेक फोटो, लहान मुलांच्या लष्करी प्रशिक्षणाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत.
 
एखादी पूर्ण पिढी कशी नासवली जाते, त्याचे हे उदाहरण आहे. दहशतवादी संघटना आपल्या स्वार्थाच्या पटलावर या मुलांचा वापर प्याद्यांप्रमाणे करतात. जेव्हा जेव्हा ही मुले ठार होतात, तेव्हा तेव्हा दहशतवादी ‘आपल्या मिशनसाठी ठार झालेले हुतात्मे’ म्हणून गौरवतात. ह्या हौतात्म्याचे मार्केटिंग करून आपले ‘वैचारिक उत्पादन’ खपवण्याची ही युक्ती आहे. दुर्दैवाने एक शस्त्र म्हणून मुलांचा वापर केला जातो आणि त्यांची निरागसता कायमची बळी पडते.