संस्कृती व धर्म भारतीय समाजमानसाची दुपेडी वीण!

विवेक मराठी    27-Jul-2021   
Total Views |
@प्रसाद देशपांडे  9028214605
  
‘प्यू रिसर्च सेंटर’ ने 7 नोव्हेंबर 2019 ते 23 मार्च 2020 या कालावधीत देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण 29 ठिकाणी हे सर्वेक्षण केलं गेलं. 17 भाषा बोलणार्‍या 30,000 भारतीय लोकांनी ह्या सर्वेक्षणात सहभाग नोंदविला.  तर आपण या सर्वेक्षणचा कालावधी बघितला, तर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कलम 370 हटवणं आणि नागरिकत्व सुधारणा कायदा असे दोन मोठे निर्णय घेऊन झाले होते, जे निर्णय अल्पसंख्याकविरोधी आणि प्रामुख्याने मुस्लीमविरोधी असल्याचं भासवण्यात आलं होतं. पण तसं असूनही या सर्वेक्षणातून समोर आलेले निष्कर्ष वेगळंच सांगतात. गेल्या महिन्यात हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालाचे विश्लेषण करणारा लेख...

recarch_3  H x
पूर्वी बातम्या ह्या लोकांसमोर सत्य मांडण्याचं एक माध्यम होत्या. कुठलेही हातवारे न करता, न ओरडता, न किंचाळता शांतपणे, कधीकधी तोंडावरची माशीही हलू न देणारे वृत्तनिवेदक तितक्याच शांत आणि संयमित चित्ताने बातम्या द्यायचे. तेव्हा एक किंवा फार फार तर दोन वाहिन्या होत्या, ब्रेकिंग न्यूजचं व्यसन माध्यमांना लागण्यापूर्वीच आणि मीडिया हाउस उभं राहण्यापूर्वीचे पत्रकारितेचे सुगीचे दिवस ते होते. आजकाल गेल्या 15 वर्षांत बातम्या आणि त्याआडून चालणारं नॅरेटिव्ह ट्रेंड सेट करायला लागलेत. आधी ट्रेंड एका विशिष्ट नेत्यांच्या समर्थनार्थ किंवा विरोधात सुरू होतो आणि शेवटी पोहोचतो तो राष्ट्राच्या विरुद्ध नॅरेटिव्ह सेट करण्यापर्यंत! आठवा दादरी, अखलाख, देवीस्थान, रेपिस्थानचा ट्रेंड, आठवा मॉब लिंचिंगचा ट्रेंड, घडलेल्या एका घटनेला अशा प्रकारे रंग देऊन नरेंद्र मोदींच्या व पर्यायाने उजव्या विचारसरणीच्या सत्तेतील भारतात बघा असहिष्णुता किती पसरलीय, हा प्रोपोगंडा वापरला गेला. भारत कसा असहिष्णू, कसा अल्पसंख्याकांवर, दलितांवर अत्याचार करणारा, महिलांची सुरक्षा न जपू शकणारा, एका हिंदू पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली पिसलेला असाहाय्य समाजाचे प्रतिनिधित्व करणारा देश आहे.. हा ह्याच प्रोपोगंडा पंडितांनी जगभरात चालवलेला नॅरेटिव्ह होता! हे सगळं परत उगाळण्याचे कारण म्हणजे, दोन आठवड्यांपूर्वी असं सर्वेक्षण आलंय, जो हे सगळे प्रोपोगंडा पंडित, त्यांच्या वाहिन्या कधीच दाखवणार नाही! बरं, सर्वेक्षण कुठल्याही कपोलकल्पित सुरस लिब्बू कथांवर आधारित नाहीये, बरं का! ते आहे फॅक्ट्स, फिगर्स आणि ग्राउंड रिपोर्टवर आधारित असलेला आकड्यांवर आधारित असलेला तथ्यांचा अहवाल!
 
‘प्यू रिसर्च सेंटर’ या अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधन संस्थेने ‘भारतातील धर्म - सहिष्णुता आणि विलगता’ नावाचा एक अहवाल प्रकाशित केला आहे. एकूण 233 पानांच्या या अहवालातून भारतातील नागरिकांच्या धर्मविषयक विचारांच्या आणि धारणांच्या संदर्भाने अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. ‘प्यू रिसर्च’ ही जगातल्या सगळ्यात मोठ्या थिंक टँकमधील एक संस्था समजली जाते. पब्लिक रिसर्च आणि जगाच्या आकलन बदलणार्‍या महत्त्वाच्या घटनांवर डेटा अ‍ॅनालिसिसचं काम ही संस्था करत असते. 2014पासून, म्हणजेच नरेंद्र मोदी भारतात सत्तेत आल्यापासून भारतात असहिष्णुता वाढली असा आरोप विरोधक, लेफ्टिस्ट, लिब्बू, इतकंच कशाला, देशाबाहेरील माध्यमं आणि तिथली लिब्बू लॉबी सातत्याने करत असते. पण एकूणच ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या ताज्या अहवालाने ह्या सगळ्या मंडळींच्या कानाखाली सणसणीत लगावली आहे, असं म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही. 17 नोव्हेंबर 2019 ते 23 मार्च 2020 या चार महिन्यांच्या कालावधीत देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण 29 ठिकाणी हे सर्वेक्षण केलं गेलं. 17 भाषा बोलणार्‍या 30,000 भारतीय लोकांनी ह्या सर्वेक्षणात सहभाग नोंदविला. म्हणजे काय, तर आपण या सर्वेक्षणचा कालावधी बघितला, तर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कलम 370 हटवणं आणि नागरिकत्व सुधारणा कायदा असे दोन मोठे निर्णय घेऊन झाले होते, जे निर्णय अल्पसंख्याकविरोधी आणि प्रामुख्याने मुस्लीमविरोधी असल्याचं भासवण्यात आलं होतं. पण तसं असूनही या सर्वेक्षणातून समोर आलेले निष्कर्ष वेगळंच सांगतात. गेल्या महिन्यात, म्हणजेच 29 जून 2021 रोजी हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

ह्या अहवालात भारतातील धार्मिक, सामाजिक सहिष्णुतेबद्दल काही मूलभूत प्रश्न विचारण्यात आले होते - उदा., आपापल्या धर्माचं आचरण करण्यास तुम्हाला भारतात मोकळीक आहे का? ह्या प्रश्नावर 91% हिंदू, 89% मुस्लीम आणि ख्रिश्चन, 82% शीख, 85% जैन आणि 93% बौद्ध धर्मीय लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे. म्हणजेच काय, तर दहा पैकी नऊ मुसलमानांना आणि ख्रिश्चनांना धार्मिक भेदभावाचा अनुभव येत नाही. भारतीय म्हणून तुम्हाला दुसर्‍या धर्माचा आदर करणं महत्त्वाचं आहे का? ह्या प्रश्नावर 85% हिंदू, 78% मुस्लीम आणि ख्रिश्चन, 81% शीख, 83% जैन आणि 84% बौद्ध धर्मीय लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर भारतातील जात व्यवस्थेसंदर्भातील एक प्रश्न स्वजातीतच विवाह करायला हवा का? ह्याला सगळ्या धर्मातील बहुतांश स्त्रियांनी आणि पुरुषांनी ‘होय’ असे उत्तर दिले आहे. ह्याचं प्रमाणदेखील जवळजवळ 73% आहे. खाण्याच्या पद्धती आपापल्या धर्माचरणाशी कितपत निगडित आहेत? हा प्रश्न समजून घ्यायला हिंदूंना ‘बीफ’ आणि मुस्लिमांना ‘पोर्क’ खाण्यासंदर्भात प्रश्न विचारले असता 72% हिंदूंनी बीफ खाणं आणि 77% मुस्लिमांनी पोर्क खाणं धर्माधिष्ठित ताज्य अन्न म्हटलं आहे, म्हणजेच खाणं ‘हराम’ म्हटलं आहे.

ह्या पलीकडे जाऊन जीवनपद्धती, राहणीमानाशी निगडित काही अत्यंत मूलभूत प्रश्न ह्या सर्वेक्षणात विचारण्यात आले आहेत. माझ्या दृष्टीने ते प्रश्न भारताची हजारो वर्षांची ‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पना दृढ करतात! हजारो वर्षांतील हिंदू परंपरांचा पगडा म्हणा किंवा शेकडो वर्षांपासून आजूबाजूला असलेला हिंदूचा मित्र, शेजारी, सहाध्यायी म्हणून असलेला वावर म्हणा, पण भारतातील अल्पसंख्याक वर्गाची जीवनपद्धती कुठेतरी हिंदू धर्माच्या राहणीमानाशी बर्‍यापैकी साधर्म्य असणारी आहे. भारतातील सर्वोच्च न्यायालयाने मागे ‘हिंदू ही एक जीवनपद्धती आहे’ ही जी टिप्पणी केली होती, त्याला सप्रमाण सिद्ध करणारी आकडेवारी ह्या सर्वेक्षणामुळे समोर येऊ शकली. उदाहरण द्यायचं झालं, तर कपाळावरील कुंकू किंवा बिंदी. कपाळावर बिंदी लावता का? ह्या प्रश्नाला 84% हिंदू, 18% मुस्लीम, 22% ख्रिश्चन, 29% शीख, आणि 78% बौद्ध धर्मीय स्त्रियांनी होकारार्थी उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर गंगा नदीच्या पाण्यात ‘पापक्षालन’ करण्याची क्षमता आहे का? ह्या प्रश्नावर 81% हिंदू, 26% मुस्लीम, 32% ख्रिश्चन, 32% शीख, 21% बौद्ध आणि 66% जैन धर्मीय लोकांनी होकारार्थी उत्तर दिलं आहे. त्याहून आश्चर्य म्हणजे कर्मसिद्धान्तावर विश्वास आहे का? ह्या प्रश्नावर 77% हिंदू, 77% मुस्लीम, 54% ख्रिश्चन, 62% शीख, 64% बौद्ध आणि 75% जैन धर्मीय लोकांनी होकारार्थी उत्तर दिलं आहे. आहे ना खरी गंमत? तसं बघायला गेलं तर हे प्रश्न पूर्णपणे हिंदूंच्या द्वैत किंवा अद्वैत सिद्धान्तावर, हिंदू संस्कारांवर आधारित असलेले प्रश्न, ज्यांचा रूढार्थाने इतर धर्मातील चालीरितींशी दूरान्वयेदेखील संबंध नसेल़; पण तरीही भारतात राहणार्‍या इतर धर्मीयांनी हिंदूंच्या ह्या परंपरांचा, जीवनपद्धतीचा अंगीकार कसा केला असेल? भारताबाहेर - विशेषत: अरब राष्ट्रांमध्ये भारतातील किंवा दक्षिण आशियातील मुस्लीम लोकांनादेखील हिंदी/हिंदू म्हणण्याची पद्धत आहे. कदाचित जी भावना आपल्याकडील काही लोकांना समजली नाहीये, ती त्यांना समजली असावी! ह्या सर्वेक्षणात तरी वेगळं काय म्हटलंय?
 

recarch_2  H x  
 
भारताच्या समाजमनाचा विचार केला, तर भारताचं सामाजिक स्वास्थ्य आणि त्यातली विविधता खूप क्लिष्ट आहे. जगाच्या संज्ञेत विचार केला, तर पाश्चात्त्य जगात एक रोमन कॅथलिक, आणि एक प्रोटेस्टंट ख्रिश्चन शेजारी शेजारी गुण्यागोविंदाने नांदणं खूप कठीण गोष्ट आहे. म्हटलं तर दोघेही ख्रिश्चन, पण तरीही उपासनापद्धती वेगळ्याच की! भारतात सगळ्या नागरिकांना संविधानाने घटनादत्त अधिकार आणि जबाबदारी दोन्ही दिल्या आहेत. भारतात जगातले सगळ्यात जास्त हिंदू, शीख आणि जैन धर्मीय लोक राहतात. भारतात जगातील दुसरे सगळ्यात मुस्लीम धर्मीय लोक राहतात. इतकी प्रचंड वैविध्यपूर्ण सामाजिक उतरण असतानादेखील शेजारी शेजारी, कचेरीत काम करणारे सहयोगी, शाळा-महाविद्यालयातील सहाध्यायी अशा अनेक स्तरांवर विविध धर्मीय, विविध जातीय लोक बर्‍यापैकी गुण्यागोविंदाने कसे राहू शकतात, हा खरं तर अध्यापनाचा विषय हवा, हो ना? ह्याच विषयावर प्यू रिसर्चनेदेखील विविध समाजांतील लोकांना काही प्रश्न विचारले. 66% हिंदू स्वत:ला मुस्लीम चालीरितींपासून वेगळे मानतात, 64% मुस्लीम स्वत:ला हिंदू चालीरितींपासून वेगळे मानतात. अगदी 3मधील एक हिंदू आणि तितक्याच मुस्लीम व्यक्तीला आपल्याच धर्मातील लोकांचा शेजार हवा असतो; काही प्रमाणात हे जैन, बौद्ध आणि शीख समुदायातही लागू होतं. आपण वर लेखात बघितलं, तसं परधर्मात लग्न न करण्याबाबतदेखील सगळ्याच धर्मातील भारतीय लोक खूप कर्मठ आहेत; पण तरीही दुसर्‍या धर्माचा आदर करणं, त्यांचं अस्तित्व, पूजा-उपासनापद्धती ह्यांचा आदर करणं, धार्मिक स्वातंत्र्य ह्याबाबत भारतीय लोक कमालीचे स्वीकृत आहेत! परधर्मच कशाला, अगदी परजातीत विवाह करण्याबाबतदेखील बहुतांश अगदी 85% भारतीय अनुत्सुक असतात. आणखी एक उदाहरण द्यायचं झालं, तर 82% हिंदू, हिंदू स्त्रियांच्या इतर धर्मातील लग्नाबाबत कमालीचे विरोधक आहेत. हिंदू स्त्रियांनी हिंदू धर्मातच विवाह करावा, हा एक हिंदू म्हणून त्यांचा कमालीचा आग्रह असतो, पण त्याच वेळी 85% हिंदू हे इतर धर्मीयांचं अस्तित्व, त्यांच्या पूजा-उपासनापद्धती ह्याबाबत स्वीकृत असतात की! खरं तर विरोधाभास म्हणायला हवा, पण किमान ह्या अध्यापनाचं प्यू रिसर्चच्या टीमला हे जाणवलं आणि त्यांनी त्यांच्या 233 पानी रिसर्चमधील तिसर्‍या प्रकरणात ह्यावर विस्तृत चर्चा केली आहे. धार्मिक किंवा सामाजिक भेदाभेद ह्या विषयाचा विचार केला, तरी ह्या संशोधनामधील माहिती कमालीची आश्चर्यकारक आहे. 53% भारतीयांना वाटतं की ह्या विविधतेतील एकतेमुळे भारताच्या सामाजिक स्वास्थ्यावर चांगला परिणाम झाला आहे. 95% टक्के मुस्लीम स्वत:ला अभिमानाने भारतीय म्हणतात, 85% मुस्लीम मानतात की भारतीय लोक परिपूर्ण नाहीत, परंतु भारतीय संस्कृती इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. फक्त 21% हिंदू आणि 24% मुस्लीम लोकांना वाटतं की त्यांच्या धर्म आणि उपासनापद्धतीमुळे त्यांच्यावर अन्याय होतो. पाचपैकी फक्त एका भारतीयाला असं वाटतं की दलित असल्यामुळे त्याच्यावर भारतात अन्याय होतो, 19% महादलित आणि 16% ओबीसी वर्गाला वाटतं की त्यांच्यावर त्यांच्या जातीमुळे अन्याय होतो. दलित ओबीसी वर्गातील 62% लोकांना स्वजातीत विवाह व्हावा असे वाटते. हे प्रमाण हिंदूंचे एकूण प्रमाण आणि इतर धर्मीयांचं प्रमाण ह्यांच्या प्रमाणाशी मिळतंजुळतं आहे. ह्या सगळ्या माहितीचा सर्वांगाने विचार केला, तर भारतीय घटनाकारांनी जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संविधानाची रचना केली होती, ते उद्दिष्ट गेल्या सात दशकांत बर्‍यापैकी सफल होतांना दिसतंय, असं म्हणणं मुळीच धाडसाचं नसेल, हो ना?
 
भारतीय समाज हा जगातील इतर कुठल्याही समाजापेक्षा नेमका वेगळा कसा, हा ह्या प्यू रिसर्चच्या अनुषंगाने विचार करायचा झालाच, तर इतर समाजात ‘अर्करूप’ होणं म्हणजे सामाजिक सौहार्द चांगले असणं असं मानतात. आता अर्करूप म्हणजे कसे, तर सगळ्या समाजाचं एकत्रीकरण करून त्याला एक दृश्य अर्करूपात आणणं म्हणजे सामाजिक सौहार्द! भारतात ह्याच गणित वेगळं आहे. भारतात धर्मसंज्ञा ह्या भरतकामातील पॅचवर्कसारख्या आहेत. प्रत्येक धर्माचं पॅच आणि त्याच्या सीमा ह्या फार स्पष्ट आहेत. त्या एकमेकांमध्ये मिसळत नाहीत की त्रांगड्यात त्रांगडं घालत नाही. त्यांना स्वत:ची ओळख आहे आणि कदाचित ह्याच विविधरंगी ओळखीमुळे भारतरूपी भरतकामाचं पॅचवर्क अधिक खुलून दिसतं. आता ह्या पॅचवर्कमध्ये कुणी त्रांगड्यात त्रांगडं घालून मध्येच नवीन पॅच द्यायचा प्रयत्न केला, तर इतकी शेकडो वर्षं मेहनतीने केलेलं धार्मिक आणि सामाजिक ‘भरतकाम’ बिघडेल, हो ना?
 
एक महत्त्वाचा मुद्दा चर्चा करण्याजोगा वाटतो, तो धर्मांतर विषयाचा. या अहवालात धर्मांतराचा त्या धर्मातील एकूण लोकसंख्येवर फारसा प्रभाव पडल्याचं दिसत नसल्याचं नमूद केलं आहे. त्याचबरोबर पूर्वी हिंदू असलेले आणि आता ख्रिस्ती झालेले बहुतांश पूर्वाश्रमीचे हिंदू हे अनुसूचित जाती (48%) अनुसूचित जमाती (14%) किंवा इतर मागासवर्गीय (26%) ह्या प्रमाणात आहे. ह्यातील बहुतांश धर्मपरिवर्तन ईशान्य आणि पूर्व भारतात झालं आहे. हा खरोखर गंभीर विषय आहे आणि सरकारने, समाजाने गांभीर्याने आपल्या मुख्य अजेंड्यावर घेणं अत्यावश्यक आहे.
तर एकूण आपल्या लेखाचा मथितार्थ असा आहे की प्रोपोगंडा नसलेलं प्रामाणिक सर्वेक्षण केलं की सत्य बाहेर येतं. अर्थात आपल्या ‘वसुधैव कुटुंबकम’ असो वा कुठल्याही धर्माला सामावून घेण्याचा उदारभाव बाळगणार्‍या ‘हिंदू जीवनपद्धतीचं’ आचरण करणार्‍या भारताला कुठल्याश्या सर्वेक्षणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाहीये़; पण खर्‍याचं खोटं आणि खोट्याचं खरं बेमालूमपणे करणार्‍या ह्या जगात कोणतं सर्वेक्षण नकळत प्रमाणपत्र देत असेल, तर ते का नाकारावं? उद्या भारतात असहिष्णुता वाढलीय नावाने गळे काढणार्‍याच्या तोंडावर फेकून मारायला हेच सर्वेक्षण कामात येईल, नाही का?