विज्ञान संस्काराचे - 2

28 Jul 2021 18:14:29
@डॉ. सुवर्णा रावळ

हिंदू जीवनपद्धतीमध्ये व्यक्तीच्या जन्मापासून (बीजनिर्माणापासून) ते मृत्यूपर्यंतच्या कालखंडात या संस्काराच्या पायर्‍या निर्माण करून ठेवल्या आहेत. मूळात ‘हिंदू’ या जीवनपद्धतीची ओळख सोळा संस्कारांमुळे आहे. जो या सोळा संस्कारातून आपले जीवन व्यतीत करते, तो हिंदू अशी एक दृढ अलिखित व्याख्याच झाली आहे.


raval_1  H x W: 
असे म्हणतात की प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना आपल्याबरोबर काही पूर्वाश्रमीचे (पूर्वजन्माचे) स्वगुण घेऊनच जन्माला येते. येथे पूर्वाश्रम किंवा पूर्वजन्म हे शब्द मी गुणसूत्रांच्या संदर्भात लिहिले आहेत. गुणसूत्रांचा पूर्वाश्रम म्हणजे त्याची माता-पितास्थित गुणसूत्रे, जी त्यास बीजरूपात या जन्मात मिळालेली असतात. या बीजाचे रूपांतर संपूर्ण मानव शरीरामध्ये होते. एक बीजपेशीपासून कोट्यवधी पेशींची निर्मिती व त्यापासून संपूर्ण शरीर-मन-बुद्धियुक्त मानवनिर्मिती ही विधात्याची किमया आहे. प्रत्येक मानव एकमेवद्वितीय आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ शरीरानेच एकमेवद्वितीय आहे असे नाही, तर बुद्धी, मन, गुण यांनीही संपूर्ण वेगळी आहे. गुणसूत्रांची संख्या, प्रकार, लांबी-रुंदी मात्र सारखीच आहे. या गुणसूत्रांचे प्रकटीकरण मात्र वेगवेगळे व युनिक आहे. भूतलावर दोन व्यक्ती एकसारख्या मिळणारच नाहीत.

आपण जाणतोच की सारी सृष्टी पाच तत्त्वांनी बनली आहे. या पाच तत्त्वांची विभागणी तीन गुणांत केली जाते. सतोगुण, रजोगुण आणि तमोगुण. हे तीन गुणांच्या परीघातच मानव स्वभाव प्रकट होत असतो. हेच तीन गुण आपल्या चेतना प्रज्वलित ठेवत असतात. जागृत अवस्था, सुप्त अवस्था आणि स्वप्नावस्था यांच्याशीही यांचा संबंध आहे.

‘सतोगुण’ची लक्षणे जागृत होतात किंवा दिसतात, तेव्हा ती व्यक्ती प्रफुल्लित, आनंदी, हलकी-फुलकी, टेन्शन-फ्री, सजग आणि बोधपूर्ण अवस्थेची अनुभूती घेत असते. या लक्षणांमध्ये उत्तेजना, विचार, इच्छा आणि वासनांचा उच्च स्तर प्रकटतोे. या व्यक्तींमध्ये खूप काही करण्याची उत्कट इच्छा या रजोगुणामुळे निर्माण होते. व्यक्ती खूप आनंदी किंवा खूप निराश-उदास अशी दोन टोकाची लक्षणेही रजोगुणी व्यक्तीमध्ये दिसून येतात.

‘तमोगुणी’ व्यक्तीमध्ये सुस्ती, आळस, भ्रम, टोकाचा विचार, राग अशी लक्षणे दिसून येतात.
कोणत्याही एका व्यक्तीमध्ये एकाच वेळी हे तिन्ही गुण एकत्रित आढळत नाहीत. नैसर्गिक, सामाजिक, सभोवतालच्या वातावरणाचा प्रभावही व्यक्तीच्या कोणत्या ना कोणत्या गुणात प्रकट होण्यास बाध्य करतात. याचाच अर्थ असा आहे की, सभोवतालचे वातावरण व्यक्तीच्या गुणवत्तेला, स्वभाव, गुण, प्रवृत्ती यांना कारणीभूत असते. इथेच ‘संस्कार’ या प्रक्रियेला परिभाषित करण्याची गरज भासते. ‘संस्कार’ हा शास्त्रशुद्ध प्रयोग आहे, जो व्यक्तीला प्रभावित करतो. म्हणजे व्यक्तीतील गुणसूत्रांना (डीएनएला) सभोवतालच्या वातावरणानुसार विशिष्ट प्रकारची प्रथिने निर्माण करण्यास बाध्य करतो. कोणताही जीव, प्राणी, मानव आतून बाहेरून जो काही आहे, तो विशिष्ट प्रकारच्या प्रथिनांच्या निर्मितीमुळे. प्रथिने निर्मिती ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये प्रथिने निर्माण करण्याची अतिशय क्लिष्ट अशी यंत्रणा आहे. कोणते प्रथिने कधी उत्पादन करायचे? किती उत्पन्न करायचे? किती काळ उत्पन्न करायचे? याचे मार्गदर्शन आणि कंट्रोल हा त्या त्या पेशीतील डीएनए करीत असतो आणि म्हणूनच डीएनएला ‘पेशीचा इंजीनिअर’ म्हणतात. मेंदू म्हणतात. असे शेकडो हजारो इंजीनिअर्स मानवी शरीर पेशींमध्ये अत्यंत काटेकोर-शिस्तबद्ध पद्धतीने कार्यरत असतात. या डीएनएला कार्यरत राहण्यासाठी पोषण (अन्न), पोषक वातावरण (भौतिक) आणि कायिक, वाचिक-मानसिक वातावरण असणे आवश्यक आहे. ही अत्यंत गुुंतागुंतीची रासायनिक प्रक्रिया आहे.

संस्कारामध्ये हीच गुुंतागुंत सुलभ, जीवहितैषी करण्याची ताकद आहे. ‘संस्कार’ या प्रक्रियेचा प्रयोगात्मक संशोधन अभ्यास, जाणिवा पुरातन काळापासून ऋषिमुनींनी हजारो वर्षांपूर्वी नमूद करून ठेवल्या आहेत. सनातन जीवनपद्धती-हिंदू जीवनपद्धतीमध्ये व्यक्तीच्या जन्मापासून (बीजनिर्माणापासून) ते मृत्यूपर्यंतच्या कालखंडात या संस्काराच्या पायर्‍या निर्माण करून ठेवल्या आहेत. मूळात ‘हिंदू’ या जीवनपद्धतीची ओळख सोळा संस्कारांमुळे आहे. जो या सोळा संस्कारातून आपले जीवन व्यतीत करते, तो हिंदू अशी एक दृढ अलिखित व्याख्याच झाली आहे.

या सोळा संस्कारांसंदर्भात आपण थोडक्यात पाहू या. महर्षी वेद व्यास यांनी मानवाच्या जीवन व्यतीत करण्याच्या पायर्‍यांना संस्कारामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीचे विवेचन केले आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत सोळा संस्कारांच्या माध्यमातून मनुष्य आपले जीवन संपन्न करीत असतो.
1) गर्भाधान - गर्भधारणा संस्कार : विवाहोत्तर स्त्री-पुरुष पती-पत्नी होतात आणि पुढील पिढी निर्माणाचे दायित्व व नैसर्गिक भावना ही क्रमप्राप्त बाब आहे. महर्षी चरक यांनी गर्भधारणा संस्कारासंदर्भात म्हटले आहे की, गर्भधारणेसाठी स्त्री आणि पुरुष दोघेही सुदृढ असणे व मनाची प्रसन्नता आवश्यक आहे. गर्भधारणेपूर्वी संस्कारामध्ये स्त्री-पुरुष (पती-पत्नी) यांचे मन उत्साही, प्रसन्न आणि स्वस्थ-सुदृढ असणे आवश्यक. उत्तम संततीसाठी गर्भधारणा संस्कार करणे गरजेचे आहे. माता-पित्याच्या शारीरिक मिलनाला गर्भधारणा संस्कार म्हटले आहे. पुरुषबीज (शुक्राणू) आणि स्त्रीबीज (अंडे) यांचे यशस्वी संयुग गर्भस्थापनेसाठी कारणीभूत असते. गर्भस्थापनेनंतर या द्विबीजावर अनेक प्रकारच्या नैसर्गिक दोषांचे आक्रमण होण्याची शक्यता असते. या आक्रमणापासून होणार्‍या दोषापासून हे द्विबीज वाचविण्यासाठी हा संस्कार केला जातो, ज्यामध्ये गर्भ सुरक्षित राहतो. विधिपूर्वक हा संस्कार केला, तर चांगली सुयोग्य संतती निर्माण होते, असे म्हटले आहे.
2) गर्भसंस्कार - पुंसवन अथवा पुणसवन संस्कार : गर्भधारणेच्या किंवा गर्भस्थापनेच्या तीन महिन्यानंतर ‘गर्भसंस्कार’ केला जातो. कारण तीन महिन्यांंनंतर गर्भाचा मेंदू विकास होण्यास सुुरुवात होत असते. याच वेळी गर्भसंस्काराच्या माध्यमातून गर्भात वाढणार्‍या बालकावर संस्काराची पायाभरणी केली जाते. याच कालावधीपासून गर्भातले बालक श्रवणयोग्य होऊन शिकण्यास सुरुवात करते, अशी मान्यता आहे. आधुनिक विज्ञानानेही ते सिद्ध झाले आहे. गर्भाच्या सर्व हालचाली, संवेदना मातेच्या माध्यमातूनच होत असतात. त्यामुळे मातेचे मन, बुद्धी, शरीर क्रिया-प्रतिक्रियाच गर्भातील बालकाच्या संस्काराला किंवा प्रशिक्षणाला कारणीभूत असतात. मातेवर अंतर्बाह्य स्वरूपावर होणारे संस्कार गर्भातील बालकाच्या जन्मजात संस्काराला कारणीभूत ठरते आणि म्हणूनच गर्भसंस्काराला हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्व आहे. मातेने शुद्ध-सकारात्मक विचार, बुद्धिवर्धक व्यवहार, मन-आत्मा यांच्या शुद्धीसाठीचे प्रयत्न हे त्या त्या प्रकारची प्रथिने तिच्या शरीरात उत्पन्न करण्यास कारणीभूत असतात. याच प्रथिनांच्या व अन्य रसायनांच्या आधारावर गर्भातील बालकांचे संगोपन, वाढ होत असल्याने ज्या संस्काराने आता वेष्ठित तोच संस्कार, बालकावर (गर्भातील) होतो. हाच तो बालकाचा जन्मजात संस्कार, जो ते बालक गर्भाच्या आल्यानंतरही आयुष्यभर राहतो. म्हणूनच गर्भसंस्कार हा व्यक्तीच्या जीवनाचा पाया रचण्याचा संस्कार आहे.

3) सीमंतोनयन संस्कार : हा तिसरा संस्कार पुणसवन संस्काराचा विस्तार आहे, जो गर्भवाढीदरम्यान केला जातो. सीमंतोनयन संस्कार गर्भधारणेच्या चौथ्या, सहाव्या आणि आठव्या महिन्यात केला जातो. कारण या काळात गर्भात वाढणारे बाळ सर्व शिकण्यायोग्य बनते. त्यामध्ये चांगले गुण, स्वभाव आणि कर्मज्ञान यावे म्हणून माता आचारविचार-व्यवहार व राहणीमान याकडे काटेकोरपणे लक्ष देते. या संस्कारात गर्भवती महिलेमध्ये मानसिक शक्ती देण्याचा, सकारात्मक विचार निर्माणासाठी सभोवतालचे वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. याच काळात आईच्या मनात निर्माण होणार्‍या इच्छांचा, विचारांचा प्रभाव गर्भावर होत असतो. आईच्या प्रत्येक सुख-दु:खात, आनंदात बाळ सहभागी होत असते, म्हणून चौथ्या, सहाव्या किंवा आठव्या महिन्यात हा संस्कार करण्याची प्रथा आहे. आईच्या सर्व इच्छा (डोहाळे) पूर्तता करण्याचा मानस त्यात आहे.

गर्भपात रोखण्यासाठीही या संस्काराचे महत्त्व आहे. याचे विज्ञान हे आहे की या काळात गुणसूत्रांचा विस्तार व त्यानुसार पेशींची संख्यावाढ, अवयवनिर्मिती आणि वाढ हे गर्भात गतीने चालू असते. त्या संपूर्ण कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांवर माता अनेक भाव-भावनांच्या प्रभावाने उत्तेजित होत असते. या कालावधीत सुयोग्य वातावरण, शुद्ध विचार, भावना, व्यवहारांच्या माध्यमातून गर्भावर संस्कार होत असतो. याच संस्काराला उत्सव, उपक्रमाची जोड देऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने संस्कार व्हावा, हा यामागील हेतू.

4) जातकर्म संस्कार : हा चौथा संस्कार आहे. जातकर्म संस्कार बाळाचा जन्म होताच केला जातो. यामुळे नवजात शिशूमधील अनेक प्रकारचे दोष दूर होतात. या संस्काराअंतर्गत नवजात बालकाला मध आणि शुद्ध तूप चाटविले जाते. हा विधी वैदिक मंत्राच्या उच्चाराने केला जातो, जेणेकरून बाळ निरोगी आणि दीर्घायुषी होते. मध आणि गायीचे शुद्ध तूप हे आयुर्वेदामध्ये तयार होणार्‍या औषधांमध्ये माध्यम घटक तर आहेतच, तसेच स्वतंत्रपणेही अनेक औषधी गुणांनी युक्त आहे.


5) नामकरण संस्कार : ‘जातकर्म’ संस्कारानंतर ‘नामकरण’ संस्कार केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार जन्मवेळेच्या जन्मदिनानुसार त्याची जन्मपत्रिका काढण्याची पद्धतही आपल्यात आहे. या वेळी नावाचे अद्याक्षर निघते, त्यावरून जन्मनाव ठेवण्याची प्रथाही प्रचलित आहे. त्यालाच बारसे म्हटले जाते. कारण अकराव्या व बाराव्या दिवसाच्या मध्यावर हा विधी केला जातो. आजकाल लोक आपल्या बाळाचे नाव काहीही ठेवतात, जे विसंगतीपूर्ण असते. नावामुळे व्यक्तीच्या मानसिकतेवर व आयुष्यावर खूप परिणाम होत असतो. चांगले व अर्थपूर्ण नाव असण्याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडतो. एक गोष्ट पालकांनी लक्षात ठेवली पाहिजे की, बाळाचे असे नाव असावे, जे घरी व बाहेरही त्याच पद्धतीने उच्चारले जाईल. नावाच्या अपभ्रंशाचाही व्यक्तिमत्त्वावर परिणाम होत असतो. नामकरण संस्काराचे स्वरूप बाळाची आत्या (वडिलांची बहीण) बाळाच्या कानात ते नाव तीन वेळात पुकारते. बाळाच्या मेंदूत फिट्ट होते. पुढे त्याच नावाच्या सततच्या संस्काराने अगदी झोपेत, धुंदीत, स्वप्नातही व्यक्ती आपले नाव विसरत नाही. नावात खूप काही असते.


6) निष्क्रमण संस्कार : ‘निष्क्रमण’चा अर्थ आहे बाहेर काढणे. जन्मानंतर चौथ्या महिन्यात हा संस्कार केला जातो. यामध्ये आपले शरीर हे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनले आहे. या पाच तत्त्वांना हिंदू संस्कृतीत देवतांचे स्थान दिले गेले आहे. त्यामुळे बाळाचा पिता या देवतांकडे बाळाच्या कल्याणाची, दीर्घायुषी व निरोगी राहण्यासाठीची प्रार्थना करतो. बाळाला घराच्या बाहेर काढून या पंचतत्त्वाशी समरस होऊन करून देण्याचा हा संस्कार आहे.
 
 
7) अन्नप्राशन किंवा घास भरणी संस्कार : साधारणत: बाळाच्या 6-7 महिन्यांत दुधाचे दात येण्याचा किंवा दाढा घट्ट होण्याचा कालावधी असतो. या वेळी आईच्या दुधाव्यतिरिक्त दुसरे अन्न खाऊ घालण्याचा हा संस्कार. मऊ अन्न खाऊ घालून हा संस्कार केला जातो.
 
 
8) जावळ काढणे किंवा मुंडण करणे : बाळाच्या जन्मत: असलेल्या केसांना उतरविण्याचा-काढण्याचा हा संस्कार आहे, जो विधिवत करण्याची प्रथा आहे. बाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर जावळाचे केस काढले जातात. मुलींच्या बाबतीत काही जणांमध्ये तिसर्‍या, पाचव्या किंवा सातव्या वर्षीही केस उतरविण्याची प्रथा असते. या संस्कारामुळे बाळाचे डोके (डोक्याची कवटी) मजबूत होते, बुद्धी तेज होते. जावळाचे केस पातळ असतात, विशिष्ट चिकटपणा असतो. त्यामुळे त्यामध्ये अनेक विषाणू चिकटलेले असण्याची शक्यता असते. अनेक वेळा केसांची जट बनलेली असते. जावळ काढल्याने ती नष्ट होते. हा केस शुद्धीकरणाचा विधी आहे.
 
 
9) कान टोचणी किंवा कर्णविध संस्कार : हा संस्कार कानाच्या पाळीला छिद्र पाडण्याचा संस्कार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कानाच्या पाळीच्या मध्यभागी राहू-केतू या अनिष्ट ग्रहांचे प्रभावकेंद्र असल्याने तिथे छिद्र पाडल्याने तो प्रभाव नष्ट होतो. अ‍ॅक्युपंक्चर होण्यास मदत होते. कर्णविधामुळे बाळाची श्रवणशक्ती वाढते, अनेक रोगांसाठी प्रतिरोधक कामही यामुळे होते. कर्णवेधामुळे यौन इंद्रिये पुष्ट होतात आणि म्हणूनच विधिपूर्वक कर्णविध संस्कार केला जातो.
 
 
10) यज्ञोपवित किंवा जानवे धारण संस्कार : या संस्कारासाठी ‘उपनयन’ संस्कार हा प्रचलित शब्द आहे. ‘उप’ म्हणजे जवळ आणि ‘नयन’ म्हणजे ‘जाणे’. जवळ जाणे म्हणजे गुरूच्या जवळ जाण्याचा हा संस्कार आहे. जानवे हे तीन सूत्रांचे (धाग्यांचे) असते. हे धारण करण्याचा हा विधी आहे. जानव्यातील ही ती सूत्रे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची प्रतीक स्वरूप आहेत. या संस्कारामुळे बालकाला बळ, ऊर्जा आणि तेज प्राप्त होते आणि बालकात आध्यात्मिक भाव जागृत होतो.

 
11) केशांत संस्कार किंवा मुंज : केसाचा अंत करणे म्हणजेच मुंडण करणे याचा हा विधिवत होणारा संस्कार आहे. विद्या अध्ययनास सुरुवात करण्यापूर्वी मुुंज करण्याची पद्धती आहे. शिक्षण प्रारंभ करण्यापूर्वीची हा शुद्धीकरण विधी आहे. या संस्कारामुळे अनिष्ट शिक्षणपद्धतीने योग्य दिशेने काम करेल हा भाव आहे. आपली शिक्षणपद्धती गुरुगृही (गुरुकुल) शिक्षण प्राप्त करण्यासाठी पाठवण्याचा हा संस्कार आहे, ज्यामध्ये आपले सख्खे आई-वडील, भाऊबंद यांच्यापासून दूर जाताना कोणाच्याही मोहात न राहता मुक्त, शुद्ध मनाने ज्ञानप्राप्तीसाठी गुरुकुलात रवानगी (पाठवणी) या संस्कारानंतर केली जाते.

13) समावर्तन संस्कार : गुरुकुल आश्रमातून ज्ञानप्राप्तीनंतर, शिक्षणानंतर व्यक्ती पुन्हा समाजामध्ये परत आणण्याचा, येण्याचा हा संस्कार विधी केला जातो. अर्थात, गुरुकुलात ब्रह्मचर्य स्थित बालकाचे ब्रह्मचारी युवकात रूपांतर झालेले असते. (साधारण 12 वर्षे तपाचा काळ) या संस्कारामुळे या युवकाच्या मनोवैज्ञानिक स्तरावर जीवन संघर्षाला मानसिक तयारीसाठीचा हा संस्कार आहे.

14) विवाह संस्कार : योग्य वय झाले की, विवाह संस्कारातून व्यक्तीला जावे लागते. त्यासाठीचा हा संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण संस्कार मानला जातो. यामध्ये वर आणि वधू एकत्रित राहून धर्मपालन करण्याचा संकल्प, बंधन, प्रतिज्ञा या विधीत-संस्कारात घेतली जाते. विवाहामुळे केवळ सृष्टीचा विकास होत नाही, तर व्यक्तीच्या आध्यात्मिक आणि मानसिक विकासाला बळ मिळते. पितृऋणातून मुक्त होण्याचा संस्कार मानला गेला आहे.

15) गृहस्थाश्रम संस्कार, आवसश्याधाम संस्कार किंवा वेदारंभ संस्कार : प्रत्येक व्यक्ती गृहस्थाश्रमात काही काळ रममाण होते. जीवनाच्या एका टप्प्यावर तिला स्वजीवनाचे रहस्य जाणून घेण्याची ओढ लागते. तोच त्याचा प्रवास वेदारंभ संस्काराकडे म्हणजेच ज्ञानप्राप्तीसाठी होतच असतो. हा संस्कार जीवनाच्या विविध टप्प्यांवर व्यक्ती घेतच असते.

16) अंत्येष्टी संस्कार : अंत्येष्टी संस्कार हा अटळ आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी तो बाध्य आहे; परंतु तो स्वत:च्या अंत्येष्टी संस्काराचा साक्षीदार शरीररूपाने राहत नसून आत्मरूपाने राहतो. याच आत्म्याला बंधनातून मुक्त करण्याचा हा संस्कार आहे.
वरील 16 संस्कार सर्वच्या सर्व विधिवत होणारे संस्कार आहेत. संस्काराच्या प्रत्येक टप्प्यावर होम-हवन, मंत्रोच्चारण, अर्पण, समर्पण, दान, त्याग, स्वीकार, वचनबद्धता, अभिवचन केंद्रित आहेत. हे सर्व व्यक्तीच्या अंतर्बाह्य शुद्धीकरणाचे आहेत आणि म्हणूनच संस्काराचा पर्यायी अर्थ ‘शुद्धीकरण’ आहे.



डॉ. सुवर्णा रावळ
9225104312
Powered By Sangraha 9.0