ढगफुटीने दिलाय इशारा

विवेक मराठी    30-Jul-2021
Total Views |
@मधुबाला आडनाईक 
या वेळी पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांची पाणी पातळी पाहिली, तर ती धडकी भरवणारी आहे. सरासरी 60 फुटांपर्यंत महापुराने पाण्याची पातळी गाठली आहे. कृष्णा, पंचगंगा आणि वारणा यासारख्या मोठ्या नद्यांच्या महापुराची पातळी प्रथमच पन्नास ते साठ फुटांपर्यंत गेली आहे. यातूनच माणसाला भविष्याचा इशारा दिलेला आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे.
kokan_4  H x W:
यंदा पश्चिम महाराष्ट्रात आक्रीत घडलं. जूनमधील मोठ्या पावसानंतर पुन्हा 21 ते 24 जुलै या चारच दिवसांत राज्यात 102 ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांचाही समावेश आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या परिसरात ढगफुटीचा सर्वाधिक परिणाम जाणवला. या काळात पडलेल्या पावसाची आकडेवारी पाहिली, तर आश्चर्यच वाटेल. राधानगरी येथे एका दिवसात 597 मि.मी., तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 897 मि.मी. पाऊस झाला. या प्रचंड पावसाने सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. कोकणात जाणारे सर्वच घाटरस्ते दरडी कोसळल्याने आणि काही ठिकाणी प्रचंड पाण्यामुळे बंद झाले.
चोवीस तासांत सातारा जिल्ह्यातील माण, म्हसवड, फलटण आणि सांगली जिल्ह्यातील जत या तालुक्यांत पाच ते दहा मि.मी. पाऊस झाला आहे. या परिसरात दरडी कोसळून आणि महापूर येऊन 875 गावे बाधित झाली आहेत. एकूण 164 जणांचे बळी गेलेले आहेत. आंबेघरसारख्या छोट्या गावातही 18 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण गंभीर जखमी आहेत. अजूनही काही ठिकाणी लोक बेपत्ता आहेत. जनावरांची तर मोजदादच नाही. सुमारे 3248 जनावरे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे. दक्षिण महाराष्ट्रातील 24हून अधिक नद्यांना महापूर आले आहेत. सुमारे 2 लाख 30 हजार लोकांना या महापुराचा फटका बसला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सरासरी पाच ते सहा हजार मि.मी. पाऊस पडतो आहे. 2019मधील नोंदी पाहिल्या, तर सरासरीपेक्षा दीडपट पाऊस झाला. तेव्हा महाबळेश्वरमध्ये साडेआठ हजार मि.मी. पाऊस झाला होता, पण तेव्हाही ढगफुटीसारखे प्रकार घडले नव्हते. 2019मध्येही महापूर आला, पण मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचे प्रकार घडले नाहीत. पण यंदा मात्र हे अघटित घडले आहे. अनेक गावे ढिगार्‍याखाली गेली आहेत. म्हणायला गेलो तर ही नैसर्गिक आपत्ती आहे, पण जास्तकरून ती मानवनिर्मित आहे, याचा शोध घेतला गेला पाहिजे. माणसाचा हव्यास यामागे आहे. जंगलतोड, स्वत:ला राहण्यासाठी बांधलेले सिमेंटचे जंगल, भरमसाठ रस्ते प्रकल्प, त्यासाठी तोडलेली झाडे, नैसर्गिक डोंगरांची विल्हेवाट, पोखरून टाकलेले डोंगर, चोरटी वृक्षतोड, खाणकामे या सगळ्याच्या मुळाशी आहेत, हे विसरून चालणार नाही.

पन्हाळ्यासारख्या रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सिंमेटचे भराव टाकून नैसर्गिक पाण्याचे अडवलेले स्रोत, त्यांच्या अडवलेल्या वाटा यातून वेगळे काय होणार?
या वेळी पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांची पाणी पातळी पाहिली, तर ती धडकी भरवणारी आहे. सरासरी 60 फुटापर्यंत महापुराने पाण्याची पातळी गाठली आहे. कृष्णा, पंचगंगा आणि वारणा यासारख्या मोठ्या नद्यांच्या महापुराची पातळी प्रथमच पन्नास ते साठ फुटांपर्यंत गेली आहे. यातूनच माणसाला भविष्याचा इशारा दिलेला आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे.

kokan_3  H x W: 
कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनली. 2019मध्ये आलेल्या महापुरात पाणीपातळी 55.06 फूट इतकी होती, मात्र या चार दिवसांत महापुराची पाणीपातळी 56.02पर्यंत पोहोचली होती. 2019मध्ये 7 ऑगस्टला दुपारी 12 वाजता राजाराम बंधार्‍याची पाणीपातळी 55.7 फूट होती. ती धोका पातळीवर - म्हणजे 43 फुटांवर येण्यासाठी 14 ऑगस्ट उजाडला. म्हणजेच 12 फूट पाणीपातळी उतरण्यासाठी तब्बल सात दिवस लागले. या काळात जिल्ह्यातील धरणांमधून पाणी बाहेर पडत होते. यंदा मात्र 24 जुलैला पहाटे 3 वाजता सर्वाधिक पातळी 56.3 फूट होती, जी पाचव्या दिवशी - म्हणजे 28 जुलैला सकाळी 44 फुटांवर आली. म्हणजेच पाच दिवसांत ही पातळी झपाट्याने कमी झाली. कारण या वेळी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत नव्हता. याचा परिणाम म्हणूनच कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य ठिकाणचे पाणी झपाट्याने ओसरण्यास सुरुवात झाली.
नेहमी अलमट्टीच्या नावावर खापर फोडणार्‍या नेत्यांना आणि अभ्यासकांना या वेळी कोणावर पावसाचे खापर फोडायचे हेच समजेनासे झाले. कारण या काळात अलमट्टी अजून भरलेलेच नव्हते. राधानगरीचे धरणही भरलेले नव्हते. असे असतानाही कोल्हापूरमध्ये, सांगलीत इतका पाऊस कसा झाला, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
या चार दिवसांत तुळशी धरणक्षेत्रात वार्षिक सरासरी पावसाच्या 81 टक्के, राधानगरी धरणक्षेत्रात 30 टक्के, वारणा धरणक्षेत्रात 40 टक्के, तर दूधगंगा धरणक्षेत्रात 31 टक्के पाऊस झाला. परंतु या पावसाचे सर्व पाणी त्या त्या धरणांमध्येच साठत होते. ते बाहेर सोडावेच लागले नाही. या चार धरणांमध्ये साडेसात टीएमसी पाणी साठलेले होते. हे पाणी आणि आधीच्यातील न सोडलेले आठ ते नऊ टीएमसी पाणी जर याच चार दिवसांत सोडले असते, तर मात्र कोल्हापुरातील पाण्याची पातळी थेट 65 फुटांपर्यंत गेली असती. या चार दिवसांच्या पुरात प्रशासनाने एनडीआरएफची पथके येण्यापूर्वीच पोलिसांनी शिरोळ तालुक्यात वाहनांतून रेस्क्यू करून नागरिकांचे व साहित्याचे स्थलांतर करण्यास मदत केली. जिल्ह्यातील धरणे भरली नसतानाही मुसळधार पावसामुळे महापुराची गंभीर स्थिती बनली, त्यामुळे महापुराची तीव्रता वाढली होती. या चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील बहुतांशी गावे महापुरात पाण्याखाली होती. राष्ट्रीय महामार्गही बंद झाल्याने जिल्ह्याची दळणवळण यंत्रणा बंद होती. महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. त्यामुळे महामार्गावर सुमारे पाच हजारांवर वाहने तीन दिवस थांबून होती. जिल्ह्यातील कुरुंदवाड, कळे व कोल्हापूर शहर वाहतूक शाखा ही तीन पोलीस स्थानके महापुरात पाण्यात बुडाली होती.



kokan_2  H x W:

शेतीचे 66 कोटींचे नुकसान
जिल्ह्यातील पंचगंगा, भोगावतीसह इतर नद्यांना व ओढ्यांना आलेल्या पुराने 58 हजार 500 हेक्टरमधील पिके बाधित झाली आहेत. यामुळे साधारणत: 66 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिवारातील पाणी कमी झाल्यानंतर नुकसानाचे पंचनामे केले जाणार आहेत. शिरोळ, हातकणंगले आणि करवीर तालुक्यांतील पिकांचे जास्त नुकसान झाले आहे. महापुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पंचगंगा, भोगावती, कुंभी, कासारी, वारणासह इतर नद्यांच्या व ओढ्यांच्या परिसरातील भात, सोयाबीन, भुईमूग ही पिके अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहेत. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक 20 हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापाठोपाठ करवीर, हातकणंगले, चंदगड तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.
k_1  H x W: 0 x
शाहूवाडीत 20 ठिकाणी डोंगर घसरले. शाहूवाडी तालुक्यात 20 ठिकाणी डोंगर-दरड घसरून पिकांचे व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांची नुकसानभरपाई देताना जमीन खागलून जे नुकसान झाले त्याचाही विचार करावा लागेल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर महानगरपालिकेला 40 कोटींचा फटका
कोल्हापूर महानगरपालिकेला या महापुरामुळे तब्बल 40 कोटींचा फटका बसला. शहरातील नुकसानीचे अद्याप पंचनामे झाले नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक यांचे किती नुकसान झाले, यांचा अंदाज अजून आलेला नाही. अतिवृष्टी व महापुरामुळे कोल्हापूर शहरवासीयांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. महापुराचे पाणी जलदगतीने वाढत गेल्यामुळे नागरिकांना आपले नुकसान टाळण्याससुद्धा वेळ मिळाला नाही. अनेक कुटुंबे अंगावरील कपड्यानिशी घरातून बाहेर पडली होती.
महापुरात 3914 मिळकतींचे नुकसान

महापुरात शहरातील 3914 मिळकतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे न झाल्यामुळे त्यांच्या नुकसानीचा अंदाज आलेला नाही. मात्र, 2019 साली आलेल्या महापुरात ज्यांचे नुकसान झाले होते, अशा पूरग्रस्तांना जाहीर केलेल्या मदतीनुसार 43 कोटी 60 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले होते.
गणेश मूर्तिकारांना फटका
महापुरात दर वर्षी गणेश मूर्तिकारांना फटका बसतो. शाहूपुरी कुंभारगल्ली, बापट कँप हे भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. तेथील तयार झालेल्या गणेशमूर्ती ठेवण्यासाठी मार्केट यार्डमधील गुळाची गोदामे, शाहू सांस्कृतिक भवन उपलब्ध झाले होते. त्यामुळे महापुराचे सावट दिसताच सुमारे 15 ट्रक्सच्या व डंपर्सच्या साहाय्याने तयार गणेशमूर्ती स्थलांतरित करता आल्या.
74 बंधारे होते पाण्याखाली
पुराच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बंधार्‍यावर 47 फूट, सुर्वे बंधार्‍यावर 45 फूट, रुई बंधार्‍यावर 77 फूट, इचलकरंजी बंधार्‍यावर 75, तेरवाड बंधार्‍यावर 74 फूट, शिरोळ बंधार्‍यावर 74 फूट, तर नृसिंहवाडी बंधार्‍यावर 74 फूट पाणी होते. याशिवाय पंचगंगा नदीवर शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव, तुळशी नदीवरील बीड व आरे, कासारी नदीवरील यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपण, बाजार -भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण व वालोली, कुंभी नदीवरील शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली, धामणी नदीवरील पनोरे, सुळे व आंबर्डे, वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी, कडवी नदीवरील वाळूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिगांव, सवते सावर्डे व सरुडपाटणे, दूधगंगा नदीवरील सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, दत्तवाड, सुळंबी, व कसबा वाळवे, वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, जरळी व हरळी, घटप्रभा नदीवरील कानडे सावर्डे, हिंडगाव, तारेवाडी, अडकूर व कानडेवाडी, ताम्रपर्णी नदीवरील कोवाड, चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी व माणगाव असे सुमारे 74 बंधारे पाण्याखाली होते.
पाटबंधारे विभागाचे अचूक नियोजन
यंदा जर पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे अचूक नियोजन केले नसते, तर कोल्हापूरच्या राजाराम बंधार्‍याजवळची पाणीपातळी किमान 65 फुटांपर्यंत गेली असती. गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापूर पाटबंधारे उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवेडकर आणि त्यांचे सहकारी पंचगंगा खोर्‍यातील पाऊस, धरणे, विसर्ग याचा अभ्यास करत आहेत. यातून त्यांनी काही निष्कर्ष काढले आणि यंदा जोरदार पाऊस सुरू होण्याआधीच वारणा, दूधगंगा, राधानगरी, कुंभी, कासारी, तुळशी, कडवी या धरणांमधून सुमारे 16 टीएमसी पाणी आधीच सोडले. 1 जून 2021पासून हे पाणी सोडण्यास सुरुवात केली. याचा परिणाम म्हणजे 16 टीएमसी पाणी धरणात साठण्यासाठी आधी जागा तयार करण्यात आली.