आभाळभर दुःख, ऐकणार कोण?

विवेक मराठी    30-Jul-2021
Total Views |
@स्मिता कुलकर्णी

कोणत्याही आपत्तीत सर्वात जास्त नुकसान अथवा आपत्तीचा थेट दुष्परिणाम होतो तो, महिला व लहान मुले यांच्यावर. त्यामुळे या दोन घटकांचे मानसिक स्तरावरील प्रश्नही अधिक, किंबहुना गंभीर व क्लिष्ट असतात. मुख्य म्हणजे योग्य वेळेत सेवा/उपचार न मिळाल्यास ही मानसिक अस्वस्थता कालांतराने मानसिक आजारात रूपांतरित होऊ शकते.


RSS_1  H x W: 0


मागच्या आठवड्याभराच्या मुसळधार पावसामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत व कोकणात आर्थिक हानीसह मृत्यूचे तांडवही आपल्याला पाहायला मिळाले. पुरात वाहून जाणार्‍या, भूस्खलनामुळे व दरडी कोसळून मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या शासकीय आकडेवारीनुसार २५०च्या घरात आहे. मात्र या पुराचे रौद्र रूप पाहता हा आकडा नक्कीच वाढणार. तळीये गावात माळीण गावाची पुनरावृत्ती झाली व क्षणात गाव व गावातील माणसे दिसेनाशी झाली. या सगळ्या घटनेचा परिणाम म्हणून, या बातम्या पाहताना आपण प्रत्येक जण मानसिक स्तरावर कमी-अधिक प्रमाणात अस्वस्थ आहोत. यामुळे आपल्यादेखील झोपेवर, आहारावर व मन:स्थितीवर विपरीत परिणाम होत आहे.

आपत्ती नैसर्गिक असो अथवा मानवनिर्मित, त्याचा परिणाम आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक, मानसिक व शारीरिक अशा अनेक स्तरांवर होत असतो. खरे तर कोणत्याही आपत्तीनंतर आपत्तीग्रस्त लोकांच्या मेंदूवर या घटनेचा प्रचंड ताण येत असतो व त्यातूच मानसिक स्तरावरील लोकांचे प्रश्न गंभीर होत असतात. सुरळीत चाललेले आयुष्य, दिनक्रम क्षणात थांबतो व आयुष्याचा तालच (rhythm) क्षणात बिघडतो. अचानक, कोणतीही पूर्वसूचना नसताना, पूर्वतयारीची संधी न मिळाल्यामुळे घडलेल्या अशा घटना अनेकांकरिता मानसिक स्तरावरील एक जबरदस्त धक्का देणारी अथवा मेंदूवर अचानक खूप ताण निर्माण करणारी घटना असते.

लोकांमध्ये दिसणारी मानसिक स्तरावरील अस्वस्थतेची तीव्रता (intensity), कालावधी (duration) व वारंवारता (frequency) मात्र आपत्तीमुळे होणार्‍या नुकसानाच्या प्रमाणावरही काही अंशी अवलंबून असते. आपल्या कुटुंबीयांचे/नातेवाइकांचे मृत्यू, आर्थिक नुकसान, घर, पशुधनाचे व शेतीचे नुकसान इ.चा थेट संबंध संबंधितांच्या मानसिक अस्वस्थतेशी निगडित असतो.

आपत्तीपश्चात समाजातील मूल्ये, समाजाची परीटघडी व सवयीच्या अनेक व्यवस्थादेखील कोलमडुन पडतात व यामुळेही लोकांमधील मानसिक स्तरावरील अस्वस्थता वाढीस लागत असते. नेहमीच्या सवयीच्या व्यवस्था कार्यान्वित नसल्यामुळे लोकांमध्ये अनेकदा चिडचिड, राग अथवा अगतिकता ठळकपणे दिसून येते.


RSS_2  H x W: 0 

कोणत्याही आपत्तीत सर्वात जास्त नुकसान अथवा आपत्तीचा थेट दुष्परिणाम होतो तो, महिला व लहान मुले यांच्यावर. त्यामुळे या दोन घटकांचे मानसिक स्तरावरील प्रश्नही अधिक, किंबहुना गंभीर व क्लिष्ट असतात. मुख्य म्हणजे योग्य वेळेत सेवा/उपचार न मिळाल्यास ही मानसिक अस्वस्थता कालांतराने मानसिक आजारात रूपांतरित होऊ शकते.

मानसिक आरोग्य बाधित झाल्यास संबंधितांच्या कौटुंबिक (नातेसंबंध), व्यावसायिक व सामाजिक आयुष्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो.

दुदैवाने, आपल्याकडे 'मानसिक आरोग्य' या विषयाकडे पाहण्याची दृष्टी अत्यंत दूषित आहे. तसेच आपले मानसिक प्रश्न मांडायचे असतात व त्यावर उपचार/सल्ला घ्यायचा असतो, ही मानसिक आरोग्यविषयक साक्षरता अगदी सुशिक्षित समाजातही नाही. आपत्तीग्रस्तांना मानसिक आरोग्यविषयकही सेवा द्याव्या लागतात, याबाबत आजही फारसा गांभीर्याने विचार होत नाही; किंबहुना आपल्या शासकीय आरोग्ययंत्रणेत तशा सक्षम व्यवस्थाही उपलब्ध नाहीत.

आपत्तीनंतर Relief, rehabilitation and development या क्रमाने आपत्ती निवारण कामास सुरुवात होते. तिन्ही टप्प्यांत मानसिक आरोग्यविषयक सेवा महत्त्वाच्या असतात व संबंधितांना पुन्हा एकदा जगण्याची ऊर्मी निर्माण करून देणार्‍या ठरत असतात.

आपत्तीग्रस्त लोकांमध्ये प्रामुख्याने भीती, नैराश्य, चिंता, दोषी असल्याची भावना, राग, एकटेपण, तर काही लोकांना post stress traumatic disorder अशा प्रकारच्या मानसिक आरोग्यविषयक तक्रारी दिसून येतात. याचा परिणाम म्हणून अनेक लोकांना झोप न येणे, भूक मंदावणे, वाईट स्वप्न पडणे, शून्यात बघत बसणे, दूर/लांब जाऊन बसणे, कोणाशीही न बोलणे, झोपेतून दचकून उठणे, खूप घाम येणे, सतत अथवा अजिबात न रडणे, हृदयाची घडघड वाढणे, असंबद्ध बडबड, योग्य दिनक्रम नसणे इ. लक्षणेही दिसून येतात.

अर्थातच ज्या लोकांचे मानसिक आरोग्य उत्तम असते किंवा भावनांक उत्तम असतो, तसेच जे स्वत:तील सजगता (mindfulness) कायम जपतात, ते लोक या नुकसानाचा/आघाताचा स्वीकार (acceptance) करून पुन्हा एकदा नव्याने आपले विखुरलेले घरटे, काडी-काडी वेचून बांधतात व त्याच पूर्वीच्या ऊर्मीने पुन्हा एकदा आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहू लागतात. आहे त्या क्षणात, आहे त्या परिस्थितीत, विनातक्रार आपले जगणे सुरू करतात. या लोकांना दुःख, झालेल्या नुकसानामुळे काळजी, आपल्या माणसांना गमवण्याचा वियोग नसतो असे अजिबात नसते, परंतु त्यांच्याकडे ability to bounce back चांगली असते किंवा ते out of box विचार करू शकतात, किंवा आपल्या समस्यांकडे एक 'प्रश्न' म्हणून न पाहता 'संधी' म्हणून पाहतात व मार्ग शोधतात अथवा त्यांच्या विचारात सकारात्मकता (positivity) असते. त्यामुळे ते मागे राहिलेल्या लोकांचे प्रश्न सोडविण्यात पुढाकार घेताना दिसतात. हे लोक स्वत:तील काटकता (resilience) जपत असतात व ती वाढविणारेही असतात. मुख्य म्हणजे त्यांच्या विचारात लवचीकता (flexibility) व स्वभावात समायोजन (adjustment) करण्याची वृत्ती असते.

आज या सर्व जिल्ह्यांमधील लोकांना मानसिक आरोग्यविषयक सेवांची प्राधान्यक्रमाने गरज आहे. त्यांचे दुःख, प्रश्न, समस्या, म्हणणे ऐकून घेणे, त्यांच्या भावनांचा निचरा होणे गरजेचे आहे. तसेच त्यांना त्वरित मानसिक आरोग्यविषयक सेवा/मदत करणाऱ्या तज्ज्ञांचीही गरज आहे. ही मानसिक अस्वस्थता नियंत्रित करण्याची कौशल्ये व गरजेप्रमाणे औषधोपचार त्यांना आज प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
ही गरज, वेळेत व पुरेशा प्रमाणात न उपलब्ध झाल्यास या लोकांना इतर समस्यांसह मानसिक आरोग्यविषयक तक्रारींच्या पुरासही सामोरे जावे लागेल, हे नक्की!


स्मिता कुलकर्णी
ज्येष्ठ समुपदेशक
९८२२७५२०५६
प्रांत समुपदेशन आयाम प्रमुख - कुटुंब प्रबोधन गतिविधी