पावसाळी रानभाज्या महोत्सव

विवेक मराठी    05-Jul-2021
Total Views |

@स्वानंद श्रीनिवास जोशी

पहिल्या पावसाच्या एक-दोन सरी बरसल्या की, चाहूल लागते ती पावसाळ्यात मिळणार्या पौष्टिक रानभाज्यांची. औषधी गुणांमुळे पावसाळी रानभाज्या हा नक्कीच संशोधनाचा विषय आहे. निसर्ग मुक्तहस्ते हा अनमोल ठेवा आपल्याला देतोय. या रानभाज्यांचा आस्वाद नाक मुरडता सर्वांनी घेणं आपल्या हिताचं तर आहेच, परंतु त्याच जोडीने त्याचं जतन करणं आपल्या हातात आहे.


vegetable_1  H

उन्हाळ्यात आंबा सीझन संपत आला आणि मळभामुळे पावसाची चाहूल लागली की सारं रानोमाळ सज्ज होतं नव्या सर्जनसोहळ्यासाठी. नासक्या वळवाच्या पावसापासूनच जमिनीतून काहीबाही उगवून वर येतं आणि मान्सूनचा खरा पाऊस मुक्कामी येईपर्यंत अनेक रानभाज्यांनी हजेरी पटावर आपापली हजेरी मांडलेली असते. वर्षभर या भाज्यांचे कंद किंवा बियाणी धरित्रीच्या कुशीत लपलेली असतात. पावसाला सुरुवात झाली की जादू झाल्यासारखी सगळी मंडळी डोकी वर काढतात. यात उगवणार्या अनेकविध प्रकारच्या वनस्पती, रानफुलं, गवत इत्यादीबरोबरच सार्यांचं लक्ष वेधून घेतात त्या रानभाज्या. यातील अनेक भाज्या चवीला कडवट, तुरट असतात, पण त्यांचे औषधी गुण बघून त्या खाल्ल्या जातात. ज्यांना आवडत नाही, त्यांनी औषध म्हणून तरी नक्की या भाज्या खाव्या. आपल्याला हवे ते पदार्थ खाऊन वर्षभर आपण आपल्या शरीरावर एक प्रकारचा अन्यायच करत असतो. त्याचं प्रायश्चित्त म्हणा किंवा शरीराला खरं जे हवंय ते देऊन लाड पुरवणं म्हणा, पण या रानभाज्यांचा जेवणात समावेश व्हायलाच हवा. चला तर मग, काही पावसाळी रानभाज्यांची ओळख करून घेऊ या.

1. रानहळद

भारतीय हवामान खात्याचे अंदाज कधी बरोबर येतात तर कधी चुकतात. पण निसर्गाचं हवामान खातं कधी चुकत नाही. पावसाला सुरुवात झाली की लगेच रानहळदीचे कंद रुजून आधी फूल जमिनीवर येतं आणि मग हळूहळू पानं येतात. अनेकविध विकारांवर या रानहळदीचा उपयोग करता येतो. अगदी कर्करोगासारख्या दुर्धर आजारावरही ही रानहळद गुणकारी आहे. शिंदळवान, वेडीहळद ही या रानहळदीची आणखी काही नावं.


vegetable_1  H  

भारतीय antibiotic म्हणून ओळख असलेली ही रानहळद जखमेवर औषध, कोलेस्टेरॉलची लेव्हल कमी करण्यासाठी, सौंदर्यवृद्धीसाठी, त्वचाविकारांवर, अन्नपचन, यकृत संरक्षण अशा विविध कामी उपयोगी येते. जरा डोकावून बघितलं की या रानहळदीच्या फुलात गोमुख दिसतं. निसर्गाचा चमत्कारच हा!

2. भारंगी - clerodendrum serratum - ब्राह्मिका, स्वरूपा, हञ्जिका, पद्मा, अङ्गारवल्ली, भार्गवा, भृंगजा... संस्कृत नावं.

पावसाळा सुरू झाला की किती नी काय काय उगवून येतं.. काही खाण्यालायक, काही विषारी, काही कडू, काही खाजरं, काहींना फक्त फुलायचं असतं, काहींना पाऊस सरता सरता वार्यावर फक्त डोलायचं असतं.


vegetable_1  H

रंगरूप, उपयोग, गुणधर्म .वरून जुन्या काळात या वनस्पतींची नावं ठेवली गेली. या वैविध्यपूर्ण वनस्पतीमध्येभारंगीहे नाव मला पहिल्यापासूनच आवडतं. इकडे तर सुंदर वाटतं, इकडे तर उच्चारताना भारदस्त वाटतं. हिरवीगार पानं, निळसर वांगी रंगाची फुलं नि काळपट जांभळट रंगाची फळं ही भारंगीची ओळख.

ग्रंथीयुक्त असलेली भारंगीची मुळं श्वसनविकारांवर उपयोगी आहेत. कफवातशामक, पाचन, रक्तदोषनाशक, श्वासहर आणि कृमिनिवारण ही भारंगीला निसर्गाने नेमून दिलेली कामं ती चोख बजावते. जलोदर, संधिवात या आजारांवर औषध म्हणून भारंगीची पानं वापरतात. चवीला कडू असलेली ही भाजी प्रकृतीने उष्ण आहे.


vegetable_1  H
 

भाजणी पेरून, बेसन पेरून, भिजवलेली डाळ घालून, पाण्यात शिजवून ओली, ताकात कढीसारखी.. अशा कुठल्याही पद्धतीने ही भारंगीची भाजी करता येते. थोडक्यात काय, तर भारंगीचं कशावरच ऑब्जेक्शन नसतं.

आजी म्हणायची, “वर्षातनं एकदा तरी भारंगी पोटात गेलीच पाहिजे, राखण असते ती वर्षभराची.”


vegetable_1  H

लहानपणी कडू म्हणून नको वाटत असली, तरी मोठेपणी पन्नास औषधं खाण्यापेक्षा हे भारंगीच्या भाजीचं एकच जालीम औषध कधीही चांगलं.

 

3. शेवळ/आधेलेफोक

पावसाला सुरुवात झाली की मागल्या दारी, नारळीच्या पोणात, रस्त्याच्या बाजूला, अळूच्या बेटात मध्येच कुठेतरी हे खोटे खोटे नागोबा दिसायला लागतात. ही खरी आदिवासींची भाजी. भयंकर खाज असल्यामुळे बोंडग्याचा पाला किंवा कारिंदा घालून याची भाजी करतात. पोटाला चांगली असली तरी अतिखाज आणि खवखव यामुळे ही तशी कनिष्ठ मध्यमवर्गातलीच भाजी. पण दिसण्यात जरा वेगळेपण असल्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

vegetable_1  H

4. काकय/फोडशी

फोडशी ही अनेकांची आवडती भाजी आहे. ही भाजी चिरून कांदा नि बेसन किंवा भाजणीवर परतून फोडशीची खमंग भाजी होते. औषधी गुणांनी युक्त असलेली ही भाजी बाजारातही विकत मिळते. फोडशीची नाजूक सुंदर पांढरी फुलं येतात. त्यामुळे ओळखायलाही सोपी जाते.


vegetable_1  H

5. टाकळा

पावसाळी रानभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसणारी भाजी म्हणजे टाकळा. पावसाळ्यात अत्र तत्र सर्वत्र टाकळ्याचं राज्य असतं. टाकळ्याला येणारा उग्र वास आणि हलकी तुरट चव (यात विरेचन द्रव्य आणि एमोडिन ग्लुकोसाइड असतं) यामुळे गाईगुरं या भाजीकडे ढुंकूनही बघत नाहीत. बाकीचं आलेलं रान हे प्राणी केव्हाच फस्त करतात, पण टाकळा मात्र दुर्लक्षिलेला राहतो. पण तो गुणकारी असल्यामुळे काही माणसं मात्र त्याचा जेवणात भाजीसाठी उपयोग करतात.

कोकणात टाकळा/टायकळा आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात तरोटा/तरवटा या नावाने प्रचलित. टाकळा एक दोन फुटांपर्यंत वाढतो. पानं संयुक्त असून सूर्यास्तानंतर जी मिटतात, ती परत सकाळी उकलतात. याला पिवळसर रंगाची नाजूक फुलं येतात. याची पानं लांबट गोल/अंडाकृती आणि क्वचित आयताकृती असतात. शेंगा करड्या रंगाच्या नि कठीण आवरणाच्या असतात, ज्या मधूनच कापल्यासारख्या वाटतात.


vegetable_1  H

सर्व प्रकारच्या त्वचाविकारांवर ही भाजी उपयोगी आहे. यात असलेल्या कायझोजेनिक द्रव्यामुळे भाजी वाटलेल्या बियांचा लेप त्वचाविकारांवर वापरतात, तसंच लिंबाच्या रसात याची मुळं उगाळून तो लेप गजकर्णावर औषध म्हणून वापरतात. पानांची भाजी करून खाल्ल्यास पोटातील कृमी नष्ट होतात. दात येणार्या लहान मुलांना ताप येत असेल तर त्यावर टाकळ्याचा काढा हे रामबाण औषध आहे. ताप नियंत्रणात राहून मुलांची किरकिर कमी होते, फक्त तो काढा लहानग्यांच्या चोचीतून घशात उतरवण्याचं कसब जमलं पाहिजे.

पित्त, हृदयविकार, खोकला आणि श्वसनाच्या आजारांवर टाकळ्याचा काढा मधातून घ्यावा. टाकळा उष्ण असल्यामुळे वात आणि कफ प्रकृतीच्या लोकांनी मुद्दाम खावा, औषध म्हणून. मलसारक आणि पचायला हलकी हे टाकळा भाजीचे महत्त्वाचे गुण.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरचेवर सेवन केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त मेद कमी होतो आणि वजन नियंत्रणात ठेवायला मदत होते. त्यामुळे काय खावं? हे डाएट करणार्या ज्यांना ठाऊक असतं, त्यांच्यासाठी टाकळा हा देव आहे.

6. कुडा

कुडा हा रानभाज्यांमधला कल्पवृक्ष म्हणावा लागेल.

याची पानं ग्रामीण भागात न्याहारीसाठी, गरम पातेली उचलायला . कामांना येतात. कुड्याचं पाळ (मूळ) आजीच्या बटव्यात असतंच. एखाद्याला भूक लागत नसेल, पोटाचे विकार असतील, लहान मुलं जेवायला नको म्हणत किरकिर करत असतील तर कुड्याचं पाळ उगाळून ताकातून प्यायला देतात.. रामबाण औषध.

 

vegetable_1  H  

याला पांढरी फुलं येतात, या फुलांचीही भाजी करतात आणि मग हिरवट, किडमिड्या शेंगा धरल्या की त्या शेंगांचीही भाजी करतात. भयंकर कडू असल्यामुळे आधी या शेंगा चिरून उकळत्या पाण्यात शिजवून निथळून घेतात. कडवटपणा जरा कमी होतो. मग मोहरी-हिंग-हळदीची खमंग फोडणी करून त्यावर कांदा परतायचा नि कांदा वरमला की या चिरलेल्या शिजलेल्या शेंगा घालायच्या. चवीला मीठ. वाफ आली की भाजी तयार. वरून बेसन पेरल्यामुळे भाजी आणखी छान लागते, पण पेरता नुसतीही करतात.

पोटात षड्र्स जाणं गरजेचं असतं. कडू चव तशी कारल्यापुरतीच मर्यादित राहते, त्यामुळे अशा कडवट रानभाज्या पावसाळी दिवसांत जेवणात समाविष्ट करायलाच हव्या.

7. काटलं/कर्टुलं/कंटोळं

एखादी गोष्ट सीझनमध्ये पहिल्यांदा खाणं याला कोकणात म्हणतातनवं करणं’. जसं उन्हाळ्यात आंबा-काजू-फणस-जांभूळ . फळांचं नवं केलं जातं, तसं पाऊस सुरू झाला की या काटलांचं नवं केलं जातं. शहरी भागात विकत मिळत असली, तरी कोकणी ग्रामीण भागासाठी हा आजही रानमेवा आहे.

काटलाच्या काचर्या, रस्साभाजी, भरली काटली असं बरंच काही होतं. अनेकांची ही आवडती पावसाळी रानभाजी आहे.



vegetable_1  H  

याचं एक वैशिष्ट्य म्हणजे बरेचदा काटलाचे वेल सगळीकडे आढळतात, ज्यांना पिवळी फुलं येतात; पण नर जातीचा वेल असेल, तर त्याला फळ धरत नाही. केवळ मादी जातीचा वेल असेल तरच त्यावर काटलं धरतात. परिसरात पंचवीसेक मादी वेल असतील आणि एक नर जातीचा वेल असेल तरी चालतो. भरपूर काटलं मिळतात.

फळांचे शेकडो प्रकार असले, तरी आंबाच जसा राजा.. तसंच या रानभाज्यांचा राजा म्हणजे काटलं.

8. कुटणी

तपकिरी रंगाच्या मोठ्या पानांचा वेल ही कुटणीची ओळख. सध्या ही कुटणी दुर्मीळ होत चालली आहे. अळूची किंवा रानअळवाची जशी अळवडी केली जाते, त्याच पद्धतीने कुटणीच्या पानांचीही वडी शिजवतात. अत्यंत गुणकारी असलेली ही कुटणी चविष्ट वडीच्या रूपात अनेकांना आवडते.

9. रानअळू

पाऊस सुरू झाला की आठवडाभरात अनेक ठिकाणी रानअळवाचे कांदे डोकं वर काढतात. पुढच्या आठवडाभरात अळवाचं रानच माजतं सगळीकडे. यात दोन-चार प्रकार आहेत. पण एक वेगळेपण हे की घरगुती अळू जे मुद्दाम कंद लावून वाढवलं जातं, त्याची बाहेरची पानं वापरली जातात नि मधला सुवरा (कोवळं पान) तसाच ठेवला जातो. पण रानअळवाच्या बाबतीत बरोब्बर उलट केलं जातं. चोथापाणी होता अळू नीट शिजावं, म्हणून मधली कोवळी पानं वापरली जातात नि बाजूची जून पानं तशीच ठेवतात. मधला सुवरा खुटला तरी काहीच दिवसांत नवीन सुवरा येतो नि अळू वाढीस लागतं. आषाढापासून ते अगदी पक्षपंधरवडा होऊन दिवाळी होईपर्यंत हे रानअळू टिकून असतं. मग पाणवठ्याजवळचं रानअळू जिवंत राहतं, बाकी अळवाचे कांदे पावसाची वाट बघत परत जमिनीच्या खाली झोपायला मोकळे.


vegetable_1  H

जेवणात अळू असलं की दुसरं काही नकोच वाटतं. अळूभात जिंदाबाद. शिवाय अळूवडी, देटी असं बरंच काय काय वेगवेगळ्या पद्धतींनी होतंच.

अळूची भाजी हा अनेकांचा जीव की प्राण आहे.


vegetable_2  H

10. अबय

पावसाळ्यात तग धरून, पावसाळा संपला तरी थंडीतल्या दवावर टिकून राहणारी वेलवर्गीय रानभाजी म्हणजे अबय. ही भाजी फरसबीच्या कुटुंबातील आहे. कोवळ्या शेंगांची भाजी करतात. गुलमोहोराच्या शेंगेसारखी दणकट असली, तरी अबयची भाजी लोण्यासारखी शिजते.

11. अकुर

पावसाळा सुरू झाला की हिरवट, काळपट, तपकिरी रंगाच्या वेली दिसू लागतात. यात नीट बघितल्यास अकुरच्या वेली दिसतात.अनेक पावसाळी रानभाज्यांपैकी अकुर ही एक रानभाजी. याला स्वतःची अशी मोठी चव नाही, मुळात ही भाजी कडू नाही. नाजूकशा पानांच्या या वेली बारीक चिरून फोडणीवर कांद्याबरोबर परतल्या नि चवीला तिखटमीठ घातलं की चुरचुरीत भाजी तयार. आवड असल्यास पीठ पेरून, भिजवलेली डाळ घालूनही भाजी होते.पाण्याचा अंश असल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही.


vegetable_1  H

पोटविकारांवर औषध म्हणून एकदातरी ही भाजी खावी.

अशा या अकरा प्रमुख रानभाज्या. शेकडो प्रकार आणि चवी असल्यामुळे आणि औषधी गुणांमुळे पावसाळी रानभाज्या हा नक्कीच संशोधनाचा विषय आहे. निसर्ग मुक्तहस्ते हा अनमोल ठेवा आपल्याला देतोय. त्याचं जतन करणं आपल्या हातात आहे.

8830903329