@उत्तरा मोने
दिव्यांग मुलींना फक्त निवासी व्यवस्था द्यायची नाही, तर स्वतःच्या घराप्रमाणे प्रेम, आत्मीयता, जिव्हाळा, सुरक्षितता, विश्वास देणारं दुसरं घरच द्यायचं. या मुलींसाठी एक ‘होम अवे फ्रॉम होम’ तयार करायचं. काही समविचारी व्यक्तींच्या सहकार्याने विद्याताईंनी आपलं हे स्वप्न सत्यात उतरवलं आणि 2016 साली नाशिक येथे घरकुल परिवार संस्थेची स्थापना झाली.
प्रत्येक जोडप्याने एका हसर्या, गुटगुटीत आणि सुदृढ बाळाचं स्वप्न बघितलेलं असतं. पण जेव्हा बाळात काहीतरी कमतरता किंवा व्यंग आढळून येतं, तेव्हा या स्वप्नांना एक गालबोट लागतं आणि सुरू होते संपूर्ण कुटुंबाची संघर्षयात्रा. दिव्यांगत्व कुठल्याही प्रकारचं असलं, तरी त्या मुलाच्या आणि पालकांच्या आयुष्यात अडचणी या असतातच. पण त्यातूनही मानसिक अपंगत्व असेल आणि बाळ जर मुलगी असेल, तर हा प्रवास अधिकच खडतर होतो. या पालकांसमोर सतत एकच प्रश्न पिंगा घालत असतो, तो म्हणजे आमच्यानंतर आमच्या मुलीचं काय? अशाच परिस्थितीशी झुंज देणार्या पालकांना दिलासा देत त्यांच्या मुलींसाठी एक हक्काचं घरकुल उभारलं विद्या फडके यांनी.
मानसिकरित्या दिव्यांग असणार्या मुलांच्या विकासासाठी आणि पुनर्वसनासाठी विद्याताई आज साधारण 42 वर्षं काम करत आहेत. साधारण 32 वर्षं एका संस्थेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्या काम करत होत्या. तिथे येणार्या मुलींच्या पालकांचे प्रश्न पाहून त्यांना विद्याताईंप्रती वाटणारा विश्वास आणि आग्रह यांचा मान राखत, त्यांना त्यांच्या विवंचनेतून सोडवण्यासाठी विद्याताईंनी घरकुलची स्थापना केली. संस्थेच्या स्थापनेआधीची एक आठवण त्या सांगतात की, “मी आजूबाजूला जेव्हा बघत होते तेव्हा लक्षात आलं, आज एक चाळिशीची मतिमंद मुलगी आहे आणि तिचे सत्तरीचे पालक आहेत, तर तिला अंघोळ घालण्यापासून त्यांना सगळं करावं लागत होतं. त्यामुळे त्यांच्या या सगळ्या समस्येने मीसुद्धा हलले, व्यथित झाले.”
विद्याताईंचं मत होतं की या मुलींना फक्त निवासी व्यवस्था द्यायची नाही, तर स्वतःच्या घराप्रमाणे प्रेम, आत्मीयता, जिव्हाळा, सुरक्षितता, विश्वास देणारं दुसरं घरच द्यायचं. या मुलींसाठी एक ‘होम अवे फ्रॉम होम’ तयार करायचं. काही समविचारी व्यक्तींच्या सहकार्याने विद्याताईंनी आपलं हे स्वप्न सत्यात उतरवलं आणि 2016 साली नाशिक येथे घरकुल परिवार संस्थेची स्थापना झाली. 
संस्थेची स्थापना करणं, मानसिकदृष्ट्या अपंग असणार्या मुलींचा आणि महिलांचा सांभाळ करणं ही काही सोप्पी गोष्ट नव्हती. याच पार्श्वभूमीवर संस्था सुरू करण्यापूर्वी विद्याताईंनी एका महिन्याचं एक शिबिर घेतलं. या मुलींना सांभाळताना कुठल्या अडचणी येऊ शकतात, कुठले प्रश्न उभे राहू शकतात या सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी एक यशस्वी शिबिर घेतलं आणि मग संस्था सुरू करण्याचा निर्णय अधिक पक्का झाला. संस्था सुरू करायची म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं असतं ते आर्थिक पाठबळ आणि सुयोग्य जागा. विद्याताईंनी जेव्हा हा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्याकडे ना पैसा होता ना जागा. पण होती प्रचंड इच्छाशक्ती आणि वाट्टेल तेवढे कष्ट करण्याची तयारी. त्यांच्या या प्रयत्नांना समाजातल्या संवेदनशील आणि सामाजिक दायित्व जाणणार्या काही व्यक्तींची जोड मिळाली आणि त्यांचा जागेचा, वास्तूचा प्रश्न सुटला, थोडी आर्थिक पुंजी मिळाली आणि हे घरकुल आकाराला आलं.
संस्थेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त दिव्यांग मुलींसाठी आणि महिलांसाठी काम करणारी ही महाराष्ट्रातली एकमेव संस्था आहे, जिथे एकही पुरुष नाही. अगदी सिक्युरिटीपासून ते ड्रायव्हरपर्यंत सगळा कर्मचारिवर्ग महिलाच आहे. खरं तर आपल्या 42 वर्षांच्या अनुभवात विद्याताईंना हे जाणवलं की अशा मानसिक दिव्यांग असणार्या मुलींवर सातत्याने अत्याचार होत असतात. त्यामुळे जेव्हा त्यांनी हे सुरक्षित घरकुल बांधण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच त्यांनी ठरवलं की हे धोके आपण टाळले पाहिजेत आणि म्हणून मुलामुलींसाठी एकत्र संस्था न उभारता मुलींच्या पालकांचे प्रश्न समोर ठेवून मुलींच्या आणि महिलांच्या हितासाठी ही संस्था उभारली गेली. विद्याताई मोठ्या अभिमानाने म्हणतात की, “आज आमच्याकडे काम करणार्या सगळ्या महिला आहेत आणि आमचं पुरुषांवाचून काहीही अडत नाही. एकदा आमच्या संस्थेत एक लोखंडी कपाट वरच्या मजल्यावरून खाली न्यायचं होतं. माझ्या 4 महिलांनी ते कपाट वरून खाली आणलं. त्यामुळे शारीरिक अथवा मानसिक कुठलंही काम करण्यासाठी घरकुलच्या महिला सक्षम आहेत.”
अशा या घरकुलची सुरुवात 4 मुलींपासून झाली आणि आज 18 ते 62 वयोगटातल्या पुणे, मुंबई, जळगाव, लातूर, गडचिरोली, चंद्रपूरपासून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या 58 मुली आणि महिला आहेत.
या मुलींना सांभाळताना येणार्या अडचणींविषयी बोलताना विद्याताई म्हणाल्या की, “नक्कीच अडचणी येतात आणि कधीतरी येतात असं नाही, तर रोजच आमच्यासमोर एक नवीन आव्हान असतं. कधी कोणाचा मूडच जातो, कधी आवडीचं जेवण नाही म्हणून भरलेलं ताट भिरकावलं जातं. अशा वेळी त्यांचा मूड सांभाळावा लागतो. त्यामुळे आमच्या शिक्षकांना कायमच तारेवरची कसरत आणि संयमाची कसोटी ठेवूनच काम करावं लागतं. कारण या मुलींना प्रेमाचीच भाषा समजते. धाक दाखवून किंवा रागावून चालत नाही. घरकुलमध्ये अशा पद्धतीने मुलींच्या कलाकलाने त्यांच्यावर माया करत त्यांचा सांभाळ केला जातो.
याव्यतिरिक्त संस्थेत मुलींना नृत्य, संगीत, योगासनं अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात. त्यांच्यासाठी वेगवेगळी वर्कशॉप्स घेतली जातात, त्यांना सहलीला नेलं जातं, तसंच सामान्य व्यक्तींशी त्यांचा संपर्क कसा येईल, त्यांना त्यातून शिकायची संधी कशी मिळेल याकडेदेखील संस्थेचं लक्ष असतं.
या सगळ्या प्रयत्नातून या मुलींची प्रगती व्हावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हाच संस्थेचा हेतू असतो. नुकतंच संस्थेतल्या एका विद्यार्थिनीने सातासमुद्रापार सिंगापूरला जाऊन नृत्याच्या एका स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं. तिला या स्पर्धेसाठी तयार करणं, तिच्याकडून नृत्याचे धडे गिरवून घेणं आणि सिंगापूरला जाण्यसाठी पैशाची जमवाजमव करणं हे सगळे कष्ट संस्थेने घेतले आणि तिला मिळालेल्या सुवर्णपदकामुळे या सर्व गोष्टींचं चीज झालं. आणखी एक उदाहरण म्हणजे एक विद्यार्थिनी जिची दृष्टी अधू आहे, वर्तनसमस्या आहेत, तब्येत कमकुवत आहे, पण तिचं वक्तृत्व उत्तम आहे. त्यामुळे संस्थेने या तिच्या गुणाला खतपाणी घातलं आणि आज ती वि.वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर, गुरू ठाकूर यांच्या अनेक कविता तोंडपाठ म्हणून दाखवते. या मुलींचे गुण, त्यांची कौशल्य यावर भर देऊन त्यांना जर आपण योग्य ट्रेनिंग दिलं, तर या मुलीदेखील खूप यश मिळवू शकतात, हेच घरकुलने दाखवून दिलं आहे.
मुळात या मुलींना त्यांच्या पालकांनी आपलंसं करणं, त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळवून देणं, त्यांच्याशी संयमाने आणि प्रेमाने वागणं हे महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे समाजाने यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवणं हेदेखील महत्त्वाचं असतं. म्हणूनच समाजाने पुढे येऊन सढळ हातांनी घरकुलसारख्या संस्थांना मदत केली पाहिजे. या मुलींनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करून, त्यांच्या हातांना काम मिळवून देऊन त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम आज प्रत्येक व्यक्तीने करण्याची गरज आहे. म्हणूनच घरकुल संस्थेशी आपण संपर्क साधायला हवा आणि आपल्याला जमेल तेवढी मदत करायला हवी.
मानसिकदृष्ट्या दिव्यांग असणार्या अशा मुला-मुलींसाठी हक्काची, प्रेमाची अनेक घरकुलं उभी राहावी आणि या प्रत्येक घरकुलात या मुलांचं व्यक्तिमत्त्व बहरावं, हीच सदिच्छा.