कार्ल पॉपर ते जॉर्ज सोरोस भरकटलेली विचारधारा आणि प्रसारमाध्यमे

विवेक मराठी    10-Aug-2021
Total Views |
@राजस वैशंपायन 8425084587
कार्ल पॉपरने तत्कालीन परिस्थितीचा प्रामाणिकपणे केलेला विचार आणि त्यातून त्याच्या पद्धतीने त्याने सुचवलेला मार्ग असे त्याच्या तत्त्वज्ञानाचे स्वरूप असल्याचे दिसून येते. त्याने सुचवलेला संवादी लोकशाहीचा, प्रयोगात्म लोकशाही विकासाचा मार्ग निवडायचा की त्याचा विचार हाच पुढचा आदर्श असे मानून वाट्टेल त्या मार्गाने पुढे जायचे, हे सर्वच प्रसारमाध्यमांनी आणि ओपन सोसायटी फाउंडेशनने ठरवायचे आहे.

PRESS_2  H x W:

गेल्या काही वर्षांत भारतीय लोकशाही आणि राष्ट्रीय विचार यांच्यासमोर नवे वैचारिक आव्हान उभे राहिले आहे. भारतीय सरकारची राष्ट्रीय धोरणे, निर्णय यांच्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात विरोधी आंदोलने उभी राहिली आहेत आणि या आव्हानाचे स्वरूप जितके आंदोलने किंवा संघटित विरोध असे आहे, तितकेच वैचारिक आहे. होणार्‍या विरोधाचा आक्रस्ताळेपणा वाढला आहे, आत्यंतिक किंवा टोकाचा हिंसक विरोध असे या आंदोलनाचे स्वरूप झाले आहे. या सर्वच आक्रमकतेच्या मागे एक सुस्पष्ट अजेंडा असल्याचे कोणत्याही सुज्ञ नागरिकाच्या लगेच लक्षात येऊ शकते.

भारतीय सरकारची धोरणे किंवा निर्णय हे कसे विशिष्ट धर्माच्या लोकांवर अन्याय करणारे आहेत, हे सरकारच कसे एकाधिकारशाहीकडे चालले आहे, तथाकथित लिबरल लोकशाहीचा कसा दिवसाढवळ्या गळा घोटला जात आहे अशा प्रकारचा कांगावा आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी आणि त्यांना अनुसरून भारतातील अनेक प्रसारमाध्यमांनी सुरू केला. एकुणात हे सरकार कसे विशिष्ट समाजाला वेठीस धरत आहे आणि या विघातक धोरणाची मुळे कशी राष्ट्रवादात किंवा सांविधानिक आणि सांस्कृतिक राष्ट्रवादात दडलेली आहेत, हे सातत्याने लोकांवर बिंबवण्याचा प्रयत्न अनेक प्रसारमाध्यमे खुल्या आणि छुप्या अशा दोन्ही पद्धतींनी करत आहेत.
 
या संपूर्णपणे नव्या आव्हानाचा नॅरेटिव्ह काय? त्यामागे कोणती विचारधारा कार्यरत आहे? हे शोधण्याचा प्रयत्न केला असता असे दिसते की हा नवा विचार माध्यमांतून दृढ करण्यामागे ‘ओपन सोसायटी फाउंडेशन’ नावाची एक आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्या संस्थेचा अब्जाधीश असा मालक जॉर्ज सोरोस आहेत. मोठ्या प्रमाणात पैसे लावून किंवा अनेक शोध, प्रकल्प, माध्यम कॅम्पेन अथवा वेगवेगळी आंदोलने, चळवळी यांना स्पॉन्सर करणे अशा स्वरूपाची कामे ही संस्था करते. त्यातून तथाकथित मानवी हक्कांची पायमल्ली करणारी सरकारे, सत्ता, जागतिक मानवतावादी विचाराचे शत्रू असलेल्या उजव्या, आत्यंतिक राष्ट्रवादी, संकुचित, प्रतिगामी आयडिऑलॉजी यांना उघडे पाडणे, त्यांवर आंतरराष्ट्रीय दडपण आणणे आणि या सत्तांच्या धोरणात बदल घडवून आणणे अशा प्रकारची वैचारिक, माध्यमकेंद्री, आंदोलनात्मक कामे ही संस्था करते.

आता प्रश्न पडतो की कोण आहे हा जॉर्ज सोरोस आणि मुळात ओपन सोसायटी म्हणजे काय? या तत्त्वाच्या मुळाशी जाऊ लागल्यावर, त्याचा इतिहास पाहू लागल्यावर आपण कार्ल पॉपर नावाच्या 20व्या शतकात 50च्या आणि 60च्या दशकात वैचारिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या विचारवंतापर्यंत जातो. ‘ओपन सोसायटी अँड इट्स एनेमीज’ नावाचा द्विखंडात्मक ग्रंथ या विचारवंताने लिहिला. त्या काळातील अतिशय प्रगल्भ असा सामाजिक आणि राजकीय विचार म्हणून आपण याकडे पाहू शकतो. नक्की काय होता हा विचार, हे पाहण्याचा प्रयत्न करू या.
 
दुसर्‍या महायुद्धातील संहार पाहून तर्कशुद्ध विचार, विज्ञान, मानवी मूल्ये यांची परंपरा लाभलेला पाश्चात्त्य माणूस इतका अवनत कसा होऊ शकतो? यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? आणि मुळात या सर्व सामाजिक आणि बौद्धिक प्रगतीच्या प्रवासात आपले नक्की काय चुकले? याची उत्तरे अनेक तत्कालीन विचारवंत शोधत होते. थिओडोर अडोर्नो, कार्ल पॉपर, एरिक फ्रॉम अशी काही विचारवंतांची उदाहरणे बघता येतात. या विचारवंतांनी निरनिराळी उत्तरे शोधली आणि तशाच वेगवेगळ्या ऐतिहासिक चुका त्यांना गवसल्या. कार्ल पॉपरने लिहिलेला ‘ओपन सोसायटी अँड इट्स एनेमीज’ हा ग्रंथ म्हणजे या प्रश्नाचा त्याने केलेला सांगोपांग ऊहापोह आहे.

इतिहासपरतावाद (Historicism) आणि नियतीवाद (Determinism) अशा दोन प्रमुख चुका त्याने उलगडून दाखवल्या आहेत. सातत्याने ऐतिहासिक संदर्भांतच पुढील मार्गक्रमण ठरवणे म्हणजे इतिहासपरतावाद आणि इतिहासकाळापासून एकाच आदर्शाचा पाठपुरावा आपण करत आहोत व ही आदर्श स्थिती हीच आपली नियती आहे असा विचार म्हणजे नियतीवाद. प्रत्येक सांस्कृतिक समूहात या गोष्टी असतातच, किंवा त्याशिवाय काळाच्या पटलावर सांस्कृतिक अस्तित्व टिकवून ठेवणे अशक्य असते. पण याच दोन घटकांचा अट्टाहास म्हणजे आत्यंतिकता मानवी प्रतिभेच्या नाशाला व संवाद संपुष्टात येण्यास कारणीभूत ठरते, असे कार्ल पॉपर सांगतो.


PRESS_1  H x W:
 
पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा गाभा म्हणजे प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल यांचा विचार. या दोन्ही ग्रीक विचारवंतांच्या समकालीन असलेल्या सामाजिक, राजकीय परिस्थितीची गूढ छाया त्यांच्या विचारांवर पडलेली कार्ल पॉपर पाहतो. आपला समाज अवनतीच्या प्रवासाला लागला आहे आणि असलेल्या परिस्थितीत होणारा प्रत्येक बदल म्हणजे पूर्ण विनाशाच्या दिशेने उचललेले एकेक पाऊल, अशी मांडणी प्लेटोमध्ये पॉपर बघतो. तर प्रत्येक गोष्टीची एक आदर्श स्थिती आधीच निर्धारित झालेली असते आणि त्याच दिशेने सर्व निसर्गाचा, मानवाचा आणि नियतीचा सर्व प्रवास सुरू असतो, अशी निर्धारणवादी किंवा नियतत्त्ववादी भूमिका अ‍ॅरिस्टॉटलच्या विचारांत कार्ल पॉपर पाहतो. अशा प्रकारे बदलांचा, वेगळेपणाचा अवरोध म्हणजे अवनतीला आळा आणि आधीच निर्धारित झालेल्या आदर्शांचा पाठपुरावा हेच व्यक्तिगत आणि समाजजीवनाचे कर्तव्य या दोन महत्त्वाच्या चुकांपासून पाश्चिमात्य विचारांचा प्रवास सुरू झाल्याचे तो दाखवतो.

इथून पुढे 19व्या शतकातील दोन प्रमुख विचारवंत हेगेल आणि कार्ल मार्क्स यांच्या तत्त्वज्ञानातील काही दोष तो दाखवतो. दोन्ही विचारवंत पुन्हा एका आदर्श स्थितीचा पाठपुरावा करतात. हेगेलसाठी ही आदर्श स्थिती म्हणजे प्रत्येक संस्कृतीने, समाजाने आणि राष्ट्राने आपल्या सामाजिक जाणिवांचा विकास उपलब्ध परिस्थिती आणि काळ यांनी निर्माण केलेल्या अवरोधांच्या पुढे जाऊन साध्य करणे होय. असे करताना आजवर केलेला ऐतिहासिक विकास हीच संस्कृतीची मोठी मिळकत असते. या मिळकतीवर पुढील विकासाची दिशा ठरते, त्यावरच त्या त्या विशिष्ट संस्कृतीचे किंवा राष्ट्राचे व्यक्तित्व अथवा आत्मा आकार घेत असतो. हा सातत्याने होणारा आत्मिक विकास प्रत्येक संस्कृती किंवा राष्ट्राला गवसलेल्या त्याच्या त्याच्या अंतिम साध्याकडे, आदर्शाकडे नेत असतो.
मार्क्ससाठी हीच आदर्श स्थिती म्हणजे संपूर्ण कामगारवर्गाचे उत्थान आणि निश्चितपणे भविष्यात अवतरणारा साम्यवादी समाज व सुवर्णकाळ. ज्या काळात कोणीच शोषक नसेल किंवा कोणाचेही शोषण होणार नाही, सर्व संपत्तीची आणि निर्मितीची साधने ही संपूर्ण समाजाची असतील, पूर्ण समाज नैतिक, विधायक आणि उत्पादनक्षम असेल आणि प्रत्येक मनुष्य आत्मिक उन्नतीचे शिखर गाठेल, असा आदर्शकाळ हे मार्क्सचे स्वप्न आहे आणि हे स्वप्न, हेगेल व मार्क्स दोघांचेही, आज ना उद्या भूतलावर अवतरणारच आहे हे इतिहासाने निर्धारित केलेले सत्य आहे, हीच आपली नियती आहे, यातही इतिहासपरता आणि नियतीवाद हेच दोन दोष कार्ल पॉपर निदर्शनास आणतो.

नियतीवाद किंवा निर्धारिततावाद आणि इतिहासपरतावाद यातूनच आक्रमक पवित्रा घेणारा राजकीय विचार, आत्यंतिक राष्ट्रवाद यांसारखे अवगुण निर्माण होतात. एखाद्या आदर्शाचे स्वप्न अख्ख्या समाजावर किंवा राष्ट्रावर आणि पुढे जाऊन तेच संपूर्ण जगावर लादले जाते. नाझी सत्ता, स्टॅलिनची हुकूमशाही, माओची हुकूमशाही, महायुद्धातील आत्यंतिक राष्ट्रवाद या सर्वांची मुळे निर्धारिततावाद आणि इतिहासपरतावाद यांत दडलेली आहेत, हे पॉपर निदर्शनास आणतो.


पॉपरच्या मते हा नियतीवाद पाश्चात्त्य समाजात प्राचीन काळापासून, विशेषतः सेमिटिक धर्मांच्या उगमापासून रुजला आहे. भविष्यात देवाचे राज्य पृथ्वीतलावर अवतरणार आहे आणि असे सुवर्ण भविष्य पाहू शकणारा प्रेषित, मसीहा आपल्या समाजाला मार्गदर्शन करून उत्तम भविष्याकडे घेऊन जाईल.. या प्रकारचा विचार पॉपरच्या मते समाजमनाला अति-आदर्शवादाकडे घेऊन जातो. एखाद्या स्वप्नाच्या मागे, ध्येयाच्या मागे पूर्ण समाजाला फरफटत नेणे हेच मुळात समाजाच्या अंगभूत विविधतेच्या, वैचारिक वैविध्याच्या विरुद्ध आहे. त्यातून संवादी, समन्वयी आणि साहचर्यावर आधारलेल्या लोकशाहीची स्थापना होऊ शकत नाही.
प्रबोधन पर्व, विज्ञानाचे युग यानंतर युरोपीय समाजमनावरील धर्माचे म्हणजेच चर्चचे गारूड उतरले. पण नियतीवाद आणि त्याबरोबर येणारी इतिहासपरता, जी धार्मिक विचारविश्वाचा मूलभूत घटक असते, ती कायम राहिली. याचाच परिणाम म्हणजे हेगेलचे तत्त्वज्ञान थिऑलॉजी किंवा धर्मविज्ञान प्रकारात येते, आणि मार्क्सवाद हाच मुळात सांप्रदायिक झाला.


अशा परिस्थितीत समाजमनावरचे अत्यंतिक आदर्शवादाचे गारूड उतरवण्यासाठी ओपन सोसायटी म्हणजेच सुसंवादी आणि कायम प्रयोगात्मक दृष्टीकोन ठेवणारी लोकशाही व्यवस्था कार्ल पॉपरला अभिप्रेत आहे. अशी लोकशाही एखाद्या वैज्ञानिक प्रयोगशाळेसारखी असावी, ज्यात सर्वच व्यक्तींच्या आत्मिक, भौतिक आणि आधिभौतिक कल्याणाचे, श्रेयस साध्य करण्याचे वैविध्यपूर्ण प्रयोग केले जातील. वैज्ञानिक संशोधनासारखीच विविध गृहितके केली जातील, तपासली जातील आणि त्यातील अधिकाधिक लागू होणारे, श्रेयस्कर ठरणारे गृहीतक किंवा दृष्टीकोन किंवा धोरण राबवले जाईल, पुन्हा त्याचे व्यवहारात खंडन झाल्यावर नवे गृहीतक येईल आणि त्यावर काम केले जाईल हा असा प्रयोगात्म वैज्ञानिक दृष्टीकोन पॉपरला अभिप्रेत आहे. त्याच्यासमोर असलेला राष्ट्रवाद हा आत्यंतिक आणि आक्रमक स्वरूपाचा राष्ट्रवाद होता, ज्यातून उद्भवलेल्या परिस्थितीत तो स्वत:देखील होरपळून निघाला होता.

कार्ल पॉपरचे सर्वांत महत्त्वाचे योगदान म्हणजे त्याने अभ्यासून विकसित केलेली सोशिऑलॉजी ऑफ नॉलेज ही ज्ञानशाखा. कोणताही विचारवंत अथवा तत्त्वज्ञ, राजकारणी अथवा समाजकारणी विचार करताना त्याच्या विचाराची मुळे त्याच्या तत्कालीन परिस्थितीत, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थितीत असतात. त्या त्या विचारवंतासमोर असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधताना त्याच्या विचारांचा आणि तत्त्वज्ञानाचा विकास घडून येतो. याच दृष्टीने माणसाच्या वैचारिक इतिहासाचा विचार करायला हवा. त्यामुळे खुद्द कार्ल पॉपरचे तत्त्वज्ञान आणि विचारदेखील तत्कालीन परिस्थितीचे आणि प्रश्नांचे फलित आहे. हे समजून न घेता कोणताही मागील विचार अट्टाहासाने प्राप्त स्थितीवर लादणे हे चुकीचे आहे.

जॉर्ज सोरोस कार्ल पॉपरचा विद्यार्थी होता. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये कार्ल पॉपर प्राध्यापक होता. पुढे तिथून सोरोस अमेरिकेत गेला आणि अतिशय यशस्वी इन्व्हेस्टर म्हणून उदयास आला. अब्जाधीश असा हा उद्योगपती पुढे ओपन सोसायटी फाउंडेशन नावाची संस्था आणि काम सुरू करतो. सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य, मानवाधिकार, संवादी लोकशाही राज्यव्यवस्था अशी या संस्थेची पायाभूत मूल्ये आहेत आणि त्यासाठी जगभरातील प्रसारमाध्यमे, पत्रकार यांना दर वर्षी आर्थिक साहाय्य दिले जाते. वरवर पाहता यात काही गैर दिसत नाही, मात्र अर्थसाहाय्य लाभलेल्या प्रसारमाध्यमांनी ओपन सोसायटीचा विचार पुढे रेटणे अपेक्षित असते.

मुळात राष्ट्र-राज्य ही संकल्पनाच कशी विघातक आहे, त्यातून वैश्विक मानवी समाज, खुला समाज उभा राहू शकत नाही, आज ना उद्या या संकल्पनेचा वैचारिक पराभव होऊन मानवी समाज पुढे जाणार आहे, अशा प्रकारच्या स्वप्नात सोरोस आणि ओपन सोसायटी फाउंडेशन अडकल्याचे दिसून येते.

जगभरात या भरकटलेल्या स्वप्नांचे भलतेच पडसाद उमटलेले दिसून येतात. उदाहरणार्थ, धर्मांध दहशतवादी कृत्यांकडे पाठ फिरवणे, मात्र एखाद्या राष्ट्राने दहशतवाद संपवण्यासाठी कठोर पावले उचलली की मानवतेचा बळी दिला जात आहे असा कांगावा करणे. चार्ली हेब्दो प्रकरण असेल किंवा नुकताच तालिबानने घेतलेला पत्रकाराचा बळी असेल, याविषयी ओपन सोसायटी मौन पाळते. मात्र राष्ट्रीय धोरणे आणि सरकारे कशी विशिष्ट समाजाच्या जिवावर उठली आहेत असा कांगावा मात्र जाणूनबुजून केला जातो.

मुळात कार्ल पॉपरने तत्कालीन परिस्थितीचा प्रामाणिकपणे केलेला विचार आणि त्यातून त्याच्या पद्धतीने त्याने सुचवलेला मार्ग असे त्याच्या तत्त्वज्ञानाचे स्वरूप असल्याचे दिसून येते. त्याने सुचवलेला संवादी लोकशाहीचा, प्रयोगात्म लोकशाही विकासाचा मार्ग निवडायचा की त्याचा विचार हाच पुढचा आदर्श असे मानून वाट्टेल त्या मार्गाने पुढे जायचे, हे सर्वच प्रसारमाध्यमांनी आणि ओपन सोसायटी फाउंडेशनने ठरवायचे आहे. पॉपरचा विचार अथवा मार्ग हीच आपली नियती आहे असे ठामपणे सांगणारे स्वत: त्याच्या विचारांचा पराभव करत आहेत.

एखाद्या राष्ट्रात निर्माण होणारे सरकार आणि नेतृत्व यांना त्या त्या संस्कृतीचे, सामाजिक स्थिती व गरजा, सांस्कृतिक परीघ आणि इतिहास यांचे संदर्भ असतात. हे सर्व संदर्भ समजून घेऊन प्रसारमाध्यमांनी निष्पक्षपणे काम करणे अपेक्षित असते. तसे झाल्यास पॉपरचा विचार अधिक यशस्वी झाला, असे म्हणता येईल.