‘आनंदमठ’ कादंबरीचा बीजमंत्रच होता ‘वंदे मातरम्’. बंकिमचंद्रांनी वंदे मातरम्चा उपयोग युद्धगर्जनेच्या स्वरूपात केला व आपल्या कवितेस रणगर्जनेचे रूप दिले. 1931चे काँगे्रसचे अधिवेशन कराचीत झाले. त्या अधिवेशनात एक उपसमिती तयार केली गेली. यामध्ये हिंदू-मुसलमान सदस्य होते. भरपूर चर्चेच्या अंती या समितीने ‘वंदे मातरम्’चा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला.
सन 1872मध्ये बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘बंगदर्शन’ नामक नियतकालिकाचे संपादन सुरू केले. ते सरकारी नोकरी करत होते, त्यामुळे त्यांची बदली होत असे. बंगालच्या एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जाऊन त्यांना डेप्युटी मॅजिस्ट्रेटचे अथवा डेप्युटी कलेक्टरचे काम करावे लागे. एकदा हुगळीमध्ये डेप्युटी मॅजिस्ट्रेट या पदावर त्यांची अशीच बदली झाली. त्यामुळे त्यांना आता वारंवार घरी येणे-जाणे करता येऊ लागले.
दसर्याला केवळ दोन महिने राहिले होते. त्यांच्याकडे राधावल्लभ मंदिर होते. तरीही दशभुजाधारिणी दुर्गेची पूजादेखील मोठ्या धामधुमीत होत असे. त्याची पूर्वतयारी आणि बराचसा खर्च बंकीमचंद करीत असत. आजही ते बघून आले होते की साफसफाई आणि दुर्गादेवीच्या मूर्तीचा बांबूचा सांगाडा तयार झाला होता आणि आता त्यावर केवळ मातीचे मूर्तिकाम तेवढे व्हायचे होते.
बंकीमचंद्रांना तीन मुली होत्या. थोरलीचे लग्न झाले होते. जावयास त्यांनी आपल्या घरीच ठेवून घेतले होते. मुली जेव्हा ‘बाबा’ म्हणून हाका मारत, तेव्हा खूप छान वाटे. यामुळे काही कारण नसतानाही ते मुलींना हाका मारत, ते ‘काय बाबा’ हे शब्द ऐकण्यासाठी! मुली म्हणजेदेखील देवीच असतात. दशभुजा देवी! बंगालची हिरवीगार भूमीदेखील मातेसमानच आहे. अन्न देणारी, फळे देणारी. ‘वंदे मातरम्’ म्हणणे किती छान वाटते.
ते असा सारा विचार करत होते, एवढ्यात ‘बंकीमबाबू’ हाक ऐकून वर नजर टाकली, तर श्रीरामचंद्र बंदोपाध्याय समोर उभे होते. ते विद्वान होते व बंगदर्शनचे प्रूफ (मुद्रित) वाचत होते. त्यांनी सांगितले की, “बंगदर्शनाचा पुढचा अंक दोन-चार दिवसांत निघणार आहे. शेवटच्या पानावर थोडीशी जागा शिल्लक आहे. त्याचे काय करावे?” बंकीमचंद्रांनी विचारल्यावर त्यांनी सांगितले, “सुमारे अर्धे पान अथवा 10-15 ओळींची जागा आहे.”

बंकीमचंद्रांनी रिकाम्या जागेत लिहिले - ‘वंदे मातरम्’
बंकीम जेव्हा काही लिहू लागत, तेव्हा मध्ये न थांबता एकटाकी सगळा लेख पुरा करत, पण तत्पूर्वी काही दिवस त्या विषयावर त्यांचे चिंतन-मनन झालेले असे. या वेळी त्यांच्या मनात सस्यश्यामल भूमी, दशभुजादेवी, फुलांची बाग यातून परतून मुख्य दरवाज्यातून ते घरात आले होते. त्यामुळे हेच सारे दृश्य त्यांच्या मनात दिसत होते. त्यांनी लिहायला प्रारंभ केला -
सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्
शस्य श्यामलाम् मातरम्।
एवढ्यात आठवले की, आपल्या दुसर्या लग्नासाठी जेव्हा राजलक्ष्मीस पाहावयास गेलो होतो, तेव्हा आणि नंतरही जेव्हा जेव्हा दौरा असे व चांदणी रात्र असे, अशा प्रसंगीचे कसे सुंदर असे -
शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम्,
फुल्लकुसुमिता द्रुमदल शोभिनीम् सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम्।
सप्तकोटिकंठ कलकल निनाद कराले,
द्विसप्रकोटि भुजैप्रंत खरकर तालै
के बोले मां तुमी अबले,
बहुबल धारिणीम् । नमामि तारिणीम्
त्यांनी पंडितजींना बोलावून कविता दिली आणि विचारले, “वाचून पाहा कसं वाटतंय?” पंडितजी म्हणाले, “ठीक आहे, पण भाषा अशुद्ध आहे. बंगाली आणि संस्कृत दोन्हींचं मिश्रण आहे.”
बंकीमजी म्हणाले, “चांगलं आहे की वाईट हे नाही माहीत, पण आहे असंच छापा. मला विश्वास वाटतो की, लोकांना आवडेल.”
सन 1876पर्यंत बंगदर्शन सुमारे चार वर्षांत पुष्कळ लोकप्रिय झाले होते. पुष्कळ नवयुवक, कवी आणि लेखक त्यात योगदान करू लागले होते. तरीही त्यांना स्वत:लाही पुष्कळ काही लिहावे लागत असे. त्यात गोष्टी, कविता, लेख, इतकेच नव्हे, तर कादंबरी, लेखमाला इ.देखील छापण्यास आरंभ झाला होता. परंतु सरकारी चाकरीबरोबरीने इतके सारे करण्यात बरीच गैरसोयही होत होती. शेवटी त्यांनी ‘बंगदर्शन’ बंद करण्याचा विचार केला व तसे प्रकटही केले. या काळापर्यंत बंकीमचंद्राच्या कित्येक कादंबर्या लिहून झाल्या होत्या. आता त्यांना एका वेगळ्याच प्रकारची कादंंबरी लिहायची होती.
सर्वसामान्यपणे त्यांचे लेखन चालू असताना मनात नव्या कादंबरीचा आराखडा तयार होत होता. त्यामध्ये घरदार सोडून संन्यासी वनात राहून साधना करतील. सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे चालवण्यात निष्णात बनतील आणि याबरोबरीने ते देशावर प्रेम करणारेही असतील.
त्यांच्या या कादंबरीत पुष्कळ पात्रे असतील. संन्यासी, आततायी राजा, निरक्षर डाकू आणि सर्वसामान्य खेडूत. कुठे कुठे जातककथा, पंचतंत्राप्रमाणे पात्रे असतील. नायक-नायिका नाहीत. मुख्य विषयही देशभक्ती आणि नवजागृती असेल. त्यांना डेप्युटी मॅजिस्ट्रेट आणि डेप्युटी कलेक्टर राहूनही हे सारे करायचे होते. खुलना येथे नोकरी करतानाच्या काळात त्यांनी गरिबी आणि अत्याचार पाहिले होते. निळीच्या शेतीवरील कर आणि त्यातील गैरप्रकार त्यांनी ऐकले व पाहिलेही होते. लुटण्यासाठी गावच्या गाव जाळून टाकल्याचे दृश्यही पाहिले होते. काही खास स्वत:चे अनुभवही होते.
त्यांनी महाभारताचा अभ्यासही केला. त्यांचा अनुभव असा होता की, लोकांना, देशाला एका सूत्रात बांधले पाहिजे. परस्परांपासून तुटलेल्या, एकसूत्र नसलेल्या लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. आता आपल्या लेखणीस नवी दिशा द्यायला हवी. याचे पर्यवसान ‘आनंदमठ’ कादंबरीच्या रूपाने पाहायला मिळाले. तिचा बीजमंत्रच होता ‘वंदे मातरम्’. त्यांनी वंदे मातरम्चा उपयोग युद्धगर्जनेच्या स्वरूपात केला व आपल्या कवितेस रणगर्जनेचे रूप दिले. या सार्या प्रक्रियेस सुमारे 8 वर्षे लागली. अखेर 1882मध्ये ‘आनंदमठ’ कादंबरी छापली गेली व ती बंकीमचंद्रांची सर्वाधिक चर्चिली गेलेली कादंबरी ठरली.
जेव्हा जेव्हा बंकीम ‘वंदे मातरम्’ म्हणत, तेव्हा तेव्हा ते भान विसरून गात. एकदा त्यांनी आपल्या ज्येष्ठ कन्येला ‘शरत्’ला वंदेमातरम् कविता ऐकवली. ते इतके तल्लीन झाले की, मुलीने कित्येक वेळा बोलवूनही ते भानावर आले नाही. ते भानावर आले तेव्हा शरत् म्हणाली, “बाबा, अहो तुम्ही रडत होतात.”
बंकीम यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीच्या दोन प्रती मिळतात. चुंचडामधून प्रकाशित एक व कलकत्त्यातून प्रकाशित दुसरी! याशिवाय ‘बंगदर्शन’मधून प्रकाशित झालेली ती प्रथम प्रत तिच्यात मुसलमान व इंग्रज दोहोंची नावे येतात. पण कलकत्त्यातून प्रकाशित जी दुसरी प्रत आहे, तिच्यात इंग्रजांचा उल्लेख नाही. अन् येथूनच संशय सुरू होतो. तो सर्वत्र पसरलाही. त्यामुळेच आज बंकीमजींना ‘आनंदमठ’ आणि ‘वंदे मातरम्’चे कर्ते म्हणून ओळख प्राप्त झाली.
28 जून 1938 हा बंकीम यांचा जन्मदिन. कांटाळपाड्यातील उच्च ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. चट्टोपाध्याय यांचे एकत्र कुटुंब होते. उच्चशिक्षित आणि चांगले संपन्न कुटुंब! यादवचंद्र चट्टोपाध्याय हे त्यांचे वडील. केवळ इंग्रजी शिक्षणानेच भारताचा उद्धार होऊ शकेल असा त्यांचा विश्वास होता. इंग्रज हे अधिक शिकलेले व सुसंस्कृत, हे त्याचे कारण!
तत्कालीन बंगालमध्ये जनजागृतीचे आंदोलन सुरू झाले होते. एकीकडे राजा राममोहन राय यांचे अनुयायी व ब्राह्मोसमाज वेदांवर विश्वास ठेवणारा, पण मूर्तिपूजेवर विश्वास नसणारा. देवेंद्रनाथ ठाकूर यांचे कुटुंब ब्राह्मोसमाजी! दुसरीकडे पंडित लोक संस्कृतमध्ये शिक्षण देणारे आणि कर्मकांडावर भर ठेवणारे! तिसरा गट होता शिक्षितांचा. ते शिक्षणाचा प्रसार करू इच्छित होते. सामाजिक कुप्रथा दूर करण्याची त्यांची इच्छा होती. ईश्वरचंद्र शर्मा त्यांचे अध्वर्यू. त्यांच्या पांडित्यामुळे त्यांना ‘विद्यासागर’ असे संबोधले जाई.
या सार्यामध्ये बंकीमांमध्येही परिवर्तन होत होते. आता त्यांचा इंग्रजी कुटिल नीतीवरचा विश्वास कमी होऊ लागला होता. ते अशा निष्कर्षाप्रत पोहोचले होते की भारतावर अन्याय होतो आहे. त्याचे निव्वळ शोषण केले जात आहे. त्यांनी खूप अपेक्षा केली होती की, ब्रिटिश सरकार मुर्शिदाबादच्या नवाबांपासून व दुसर्या अन्यायी नवाबांपासून देशाची सुटका करेल, पण त्यांचा अपेक्षाभंग झाला होता आणि त्यांना मला वाटू लागले होते की, इंग्रजी अत्याचारातूनही देश मुक्त व्हायला हवा. पण डेप्युटी मॅजिस्ट्रेटची नोकरी करत असल्याने ते थेट इंग्रजांविरोधी ते बोलू शकत नव्हते. उलट त्यांना मात्र देशात जागृती करावी असे वाटत होते. लोकांना संघटित करणेही आवश्यक होते. यासाठी त्यांनी ‘आनंदमठा’ची मदत घेतली व नवाबांविरुद्ध लोकांना जातिभेद विसरून संघटित होण्यास सांगितले. इंग्रजांची याबाबत काही तक्रार नव्हती. कारण त्यांना वाटे, या दोन समाजगटांतील दरी वाढेल तितके बरे, फोडा व झोडा या नीतीच्या दृष्टीनेे तेच चांगले होते.

डिसेंबर 28 ते 31, 1885मधील काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईत झाले. याची खरी योजना ए.ओ. ह्यूमने केली होती. ह्यूम ब्रिटिश सरकारच्या नोकरीतून निवृत्त झाला होता. त्याचा विचार असा की, ज्यांनी इंग्रजी शिक्षण घेतले आहे, ते या काँग्रेसचे सदस्य होतील व कोणत्याही नवीन राजनीतीविषयी अथवा इतर प्रश्नांसंबंधी भारतीय लोकांचे प्रतिनिधित्व करतील. या काँग्रेसचेच 1896मधील अधिवेशन कलकत्ता येथे झाले होते. रवींद्रनाथांनी वंदे मातरम्ची पहिली दोन कडवी गायली, पण यापूर्वीच 8 जून 1894 रोजी बंकीमचंद्रांचे निधन झाले होते. सन 1937च्या अधिवेशनाचे अध्यक्षपद रहमानउल्लाह मुहंमद खा यांनी भूषवले होते. सहसमितीचे अध्यक्ष होते नेहरू. त्यांच्या सूचनेवरच्या वंदे मातरम्ला राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारण्यात आले.
बहुतांश भारतीय बुद्धिजीवींच्या आणि काही भ्रमित भारतीयांच्या दृष्टीने इंग्रजांनी शाळा, रुग्णालये सुरू करून भारतीयांच्या कल्याणाचे काम केले आहे. यायोगे देशाची उन्नती होईल, गरिबी दूर होईल. इतकेच नव्हे, तर बिपीनचंद्र पाल यांनीही बंगभंगापूर्वी इंग्रजांना कधी देशविरोधी मानले नव्हते. पण 1905मध्ये बंगालचे पश्चिम व पूर्व बंगाल या स्वरूपात तुकडे करण्याची इच्छा दाखवली, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला व त्यांच्यासह लोकही बंगभंगविरोधी आंदोलनार्थ रस्त्यावर उतरले. या लोक आंदोलनात रवींद्रनाथांनी वंदे मातरम्चे गायन केले. विद्यार्थ्यांनाही वंदे मातरम् म्हटले व घोषणा दिल्या.
इतके सारे असले, तरी ‘आनंदमठ’वर कधी बंदी आली नाही. मात्र वंदे मातरम् म्हणणार्यास कारावासात जावे लागे. गांधीजींचे ‘हिंद स्वराज’ (1909) एक वर्षानंतर निषिद्ध म्हणून घोषित करण्यात आले. बहुधा इंग्रजांना वाटत असावे की, ‘आनंदमठ’मुळे हिंदू-मुसलमानांत शत्रुत्व वाढेल व त्याचा त्यांना लाभ मिळेल.
‘वंदे मातरम्’च्या तिसर्या कडव्यापासून पुढे भारतमाता व दुर्गादेवी एकरूप होऊन जातात. त्यात म्हटले आहे ‘त्वम हि दुर्गा दशप्रहरण: धरिती, कमलादलविहारिणी वाणी विद्यादायिनी, नमामित्वम्’ या सर्वांमुळे भिन्नधर्मीयांची हरकत येऊ शकते़; पण वंदे मातरम् म्हणत म्हणून जे लोक फाशी गेले अथवा काळ्या पाण्यावर गेले, ते सारेच वीर भारतमातेच्या स्वातंत्र्याची अपेक्षा ठेवून होते. केवळ हिंदूंच्या नाही.
उच्चवर्गीय बंगाली मानत की, ते म्हणजेच देश आणि तेच देशाचे नेतृत्व करतील; परंतु बंगभंग आंदोलनामुळे त्यांनाही भारताची सारी सर्वसामान्य जनता भारतवासी असून त्यांची साथ आवश्यक आहे.
गोपाळ कृष्ण गोखल्यांच्या सांगण्यावरून सी.एफ. अॅन्ड्रूज यांनी गांधींना भारतात परतण्यास सांगितले. त्या वेळी गांधी दक्षिण आफ्रिकेत नाताळमध्ये आपले असहकर आंदोलन आणि धरणे, अहिंसा इ. आपले सुयोग्य अधिकार मानत होते, व त्यांचा अनुभव घेऊन बसले होते. त्यायोगे त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीही प्राप्त झाली होती. भारतात आल्यावर गोखल्यांच्या सल्ल्यावरून त्यांनी पूर्ण भारताचा प्रवास केला. त्यांना भारताचे खरेखुरे स्वरूप व लोकांच्या शोषणाच्या कुप्रथा, वर्णभेद, वेगवेगळे धर्म, भाषा यांच्या प्रश्नांची ओळख झाली. वंदे मातरमचा त्यांना पुरेपूर परिचय होता. सन 1920पर्यंत आपल्या पत्रांचा समारोप ते वंदे मातरम् मोहनदास लिहून करत असत. त्यांनी त्यांच्या प्रार्थनासभांमध्ये हिंदीत बोलण्यास प्रारंभ केला. ‘रामधून’च्या बरोबरीने त्यांनी ‘वंदे मातरम्’ही आपलेसे केले.
1906मध्ये अरविंद घोष यांनी वंदे मातरम नावाचे एक नियतकालिक संपादन करण्यास प्रारंभ केला. याच वंदे मातरम्मध्ये 1907 त्यांनी लिहिले - ‘आजच्या आधी 32 वर्षांपूर्वी बंकीमजींनी या महागीताची रचना केली होती.’ त्या काळी थोडेच लोक वंदे मातरम जाणत होते. पण त्यानंतर एका मंगल मुहूर्तावर बंगाली जनता प्रदीर्घ अशा घोर निद्रेतून जागी झाली आणि तिने सत्याच्या शोधार्थ चोहीकडे नजर टाकली अन् ईश्वरी संकेताने निर्धारित सुमुहूर्तावर कोणी गाऊ लागले. वंदे मातरम् मंत्र प्राप्त झाला होता.
येथे ही गोष्टही उल्लेखनीय आहे की, बंकीमचंद्रांनी केवळ 7 कोटी लोकांचा उल्लेख केला आहे. ‘सप्रकोटिकंठकलकल निनाद कराले।’ अर्थात, ही बहुधा तत्कालीन बंगालची इंग्रजांच्या गुलामीत असलेली लोकसंख्या असावी. जरी 1930च्या दशकातील घरी उपलब्ध असणार्या नोंदीप्रमाणे ‘32 कोटि जन कलकल निनाद कराले’ असा उल्लेख आहे.
1931चे काँग्रेसचे अधिवेशन कराचीत झाले. अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. हे फार महत्त्वाचे अधिवेशन होते, कारण भगतसिंहांसह दोन्ही जोडीदारांच्या फाशीच्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर ते भरले होते. याच अधिवेशनात जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती तयार केली गेली. तिच्यात हिंदू-मुसलमान असे सदस्य होते. भरपूर चर्चेच्या अंती या समितीने ‘वंदे मातरम्’चा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला. सुभाषचंद्रांचे म्हणणे होते की, वंदे मातरम्च्या केवळ पहिल्या दोन कडव्यांचाच स्वीकार करावा. यासाठी त्यांनी रवींद्रनाथ ठाकूर यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांनी सकारण संमतीपत्र लिहून धाडले. पुढच्या कडव्यात दुर्गामाता व भारतमाता एकरूप होऊन जातात. अशा प्रकारे ‘वंदे मातरम्’ भारताचे राष्ट्रगान होऊन गेले. 1906मधील काँग्रेस अधिवेशनात सरला घोषालने एक उद्बोधन गीत म्हणून हे गीत गायले होते.
स्वतंत्र भारतात 25 ऑगस्ट 1948च्या घटना समितीच्या सभेत रवींद्रनाथ ठाकूरांच्या जनगणमनची पहिली दोन कडवी राष्ट्रगीताच्या दर्जास पोहोचली. त्यातही सुभाषचंद्रांनी ‘जय हे’च्या जागी ‘जय हो’ घालून याआधीच पूर्व अन् आग्नेय आशियामध्ये हे रूढ केले. त्या काळी सर्व भारतातील भिन्नभिन्न भाषांमध्ये पुष्कळ राष्ट्रीय गीते लिहिली गेली. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांसाठीही कित्येक गीते लिहिली गेली. पण संस्कृतप्रचुर असल्याने व बहुतेक भारतीय भाषा जिच्यापासून उत्पन्न झाल्या, त्या संस्कृतप्राय वंदे मातरम् व जनगणमन या गीतांना अग्रक्रम देण्यात आला. मोहंमद इक्बालच्या ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा’, सुब्रह्मण्यम भारतींच्या तामिळमधील ‘देशगान’, पार्षदकृत ‘झंडा उंचा रहे हमारा’ सदा शक्ति बरसानेवाला, अयि भूषणमोहिनी, आझाद हिंद सेनेचे ‘कदम कदम बढाये जा’ आणि ‘जय हिंद हमारा नारा हम लाल किले की ओर चले’ इ. गीते देशाच्या कानाकोपर्यात गायली जात होती.
गांधीजी अखेरपर्यंत मानत होते की, वंदे मातरम् हे एक विशुद्ध राजनैतिक गीत आहे. स्वातंत्र्यदिनी गांधीजी नौखालीत होते, तिथे हिंदूंंना मारण्यात येत होते, तेथून ते कलकत्त्यात आले. तेथेही परिस्थिती अतिशय केविलवाणी होती. 18 ऑगस्ट 1947च्या ईदच्या दिवशी गांधींना दिसले की, रक्तपातानंतर एकमेकांची गळाभेट घेत आहेत. ईद मुबारक म्हणत आहेत. 21 ऑगस्टला त्यांच्या प्रार्थनासभेत हिंदू-मुसलमान एकत्र बसलेले त्यांना दिसले. 29 ऑगस्ट 1947च्या प्रार्थनासभेत ‘वंदे मातरम्’ गाण्यात आले, त्या वेळी सुर्हावर्दी आणि अन्य पुढारी व्यासपीठावर हजर होते. सर्वांनी उभे राहून आदर व्यक्त केला होता, पण गांधी बसूनच राहिले. त्यांचे म्हणणे होते, उभे राहणे ही पाश्चात्त्य पद्धत आहे.
24 जानेवारी 1950 या दिवशी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गीताची प्रतिष्ठा देण्यात आली. त्याच वेळी जनगणमनला राष्ट्रगीत गौरव देण्यात आला.
(भवन्स नवनीत : ऑगस्ट 2021मधून भाषांतर करून घेतले.)
अनुवादक : यशवंत लेले
20-2565-1690