जयशंकर यांचा कृष्ण

विवेक मराठी    19-Aug-2021   
Total Views |
महाभारत ही नीतिमत्ता आणि सत्ता यांची कथा आहे. या दोघांमध्ये मेळ बसविण्याची श्रीकृष्णाची नीती आहे. भारताला विश्वात मोठे योगदान द्यायचे आहे. स्वार्थ शोधणार्‍या अशा जगात भारताला आपले स्थान निर्माण करायचे आहे. नीतिमत्ता सोडायची नाही, पण सत्ता संतुलनाच्या खेळात जगाचे डावपेच समजून घ्यायला पाहिजेत. या प्रवासात नैतिक शक्ती ही भारतीय मार्गाची एक ओळख आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही.’

book_1  H x W:
 
‘जागतिक सत्तासंघर्ष आणि भारत’ हे पुस्तक जेव्हा मी लिहायला घेतले, तेव्हा या विषयाची सखोल माहिती मिळविण्यासाठी अनेक पुस्तके वाचावी लागली. जागतिक सत्तासंघर्षाचा इतिहास इ.स.पूर्वीपासूनचा आहे. एखादा देश महासत्ता होतो आणि आपल्या लष्करी व आर्थिक शक्तीच्या बळावर तो त्याला ज्ञात असणार्‍या जगावर प्रभुत्व गाजवायला सुरुवात करतो, दुसर्‍या देशांना जिंकून घेतो, आपला धर्म आणि संस्कृती, राज्यव्यवस्था त्यांच्यावर लादतो.. अशा प्रकारच्या सत्तासंघर्षात इतिहासकाळापासून भारत कधी उतरला नाही. भारताची शक्ती असतानादेखील या मार्गापासून भारत दूर राहिलेला आहे. तलवारीच्या जोरावर राज्य करायचे नाही, तर माणसांची मने जिंकायची आणि त्यांना मानवधर्माची शिकवण द्यायची, ही भारताची थोर परंपरा राहिलेली आहे.

भारत पारतंत्र्यात गेला आणि जवळजवळ एक हजार वर्षांचे पारतंत्र्य त्याच्या नशिबी आले. 1947 साली तो स्वतंत्र झाला आणि जागतिक राष्ट्रसमूहामध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करण्याची त्याची वाटचाल सुरू झाली. एक हजार वर्षांच्या पारतंत्र्यामुळे आणि इंग्रजी शिक्षणपद्धतीमुळे आपले म्हणून काही राजकीय तत्त्वज्ञान आहे, आपली म्हणून विदेशनीतीची तत्त्वे आहेत, जागतिक सत्तासंघर्षाच्या संदर्भात आपला स्वत:चा काही विचार आहे, याचे म्हणावे तितके आकलन राज्यकर्त्यांनाही झाले नाही आणि विदेश विभागात काम करणार्‍या नोकरशहांनादेखील फारसे झाले नाही. हे नोकरशहा बहुतकरून कॉन्व्हेंन्ट स्कूलमध्ये शिकलेले, विदेशी तत्त्वज्ञानाचा अभ्यास असलेले, इंग्लिशबरोबर अनेक विदेशी भाषांवर प्रभुत्व असलेले असतात. यापैकी अनेकांची पुस्तके, माझ्या लेखनाच्या संदर्भात आवश्यक तेवढी वाचली.
 
 
एक आश्चर्य माझ्या लक्षात आले की, नरेंद्र मोदी सत्तेवर येण्यापूर्वी ज्या ज्या डिप्लोमॅट्सनी (विदेश विभागात उच्चायुक्त, राजदूत, इत्यादी पदावर काम करणार्‍यांनी) आपल्या अनुभवाची पुस्तके लिहिली, त्यापैकी एखाद-दुसरा अपवाद सोडला तर प्राचीन भारतीय राजनीतीचा उल्लेखही कोणाच्या लेखनात आला नाही. आर्य चाणक्य यांचा जाता जाता केलेला उल्लेख तेवढाच वाचायला मिळाला. परंतु 2014नंतर परिस्थितीत 1800 कोनाचा बदल झाला. त्यानंतर अनेक डिप्लोमॅट्सनी पुस्तके लिहिली आहेत आणि ते आपल्या मुळाचा शोध घेऊ लागले आहेत. इंडियाकडून भारताकडे जाण्याचा त्यांचा प्रवास जाणवल्याशिवाय राहत नाही. नमुन्यादाखल काही पुस्तकांची शीर्षके देतो - 1. How India Sees "Kautilya' to the The World 21st Century - Shyam Saran, 2. From Chanakya To Modi - Aparna Pande.भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे The India Way (Strategies For An Uncertain World) हे पुस्तक भारतीय राजनीतिशास्त्र आणि भारतीय परराष्ट्रनीती यावरच आधारित आहे. नरेंद्र मोदी यांच्या काळात एकेका गोष्टीचे भारतीयीकरण होत चालले आहे. परराष्ट्रनीतीचेदेखील भारतीयीकरण झाले, ही आपल्या सर्वांना आनंद देणारी गोष्ट आहे.
 
 
 
एस. जयशंकर यांच्या पुस्तकाची समीक्षा करण्याचा माझा हेतू नाही. या पुस्तकातील तिसर्‍या प्रकरणाचे शीर्षक आहे 'Krishna's Choice' हे संपूर्ण प्रकरण महाभारत आणि कृष्ण यावर आधारित आहे. पण एस. जयशंकर आपल्याला महाभारताची कथा सांगत बसले नाहीत. आजच्या जागतिक राजकारणाचे बहुतेक सगळे विषय महाभारतात कसे बघायला मिळतात, याचे त्यांनी फार सुंदर विवरण केले आहे. आजचे जग अनेकध्रुवीय आहे. मित्राचा मुखवटा घेणार्‍या, पण आतून शत्रुत्व करणार्‍या देशांचे आहे. सत्ता संतुलनाच्या खेळात सगळे देश गुंतलेले असतात, त्याचबरोबर मूल्यांचा संघर्षदेखील निरंतर चालू असतो. जागतिक राजकारणाचे हे सर्व महत्त्वाचे विषय आहेत. एस. जयशंकर म्हणतात की, हे सर्व विषय महाभारतकारांनी हाताळलेले आहेत. भारत जागतिक महासत्ता होऊ पाहत आहे. प्रश्न असा निर्माण होतो की, भारत कोणत्या प्रकारची महासत्ता असेल? भारताचा मोठा प्रतिस्पर्धी चीन आहे. चीनसारखा भारत असेल का? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला महाभारतात सापडते.
 
पाश्चात्त्यांची भारताकडे बघण्याची दृष्टी विकृत आहे. भारताला इतिहास नाही, संस्कृती नाही, राजकीय विचार नाही असे अनेक पाश्चात्त्य विद्वान लिहून गेले आहेत. त्यांची उष्टावळ चाटणारे आपले विद्वान त्याच गोष्टी आपल्याला सांगतात. महाभारतात सत्तासंघर्ष आहे. हा सत्तासंघर्ष कौरव आणि पांडव यांच्यात आहे. कौरवांकडे साधनसामग्री प्रचंड आहे, जशी आज अमेरिका आणि रशिया यांच्याकडे आहे. त्या तुलनेत पांडव दुर्बळ आहेत. सत्तासंघर्षामध्ये प्रतिस्पर्ध्याची फसवणूक करणे, मैत्रीचा चेहरा दाखवून त्याला गोत्यात आणणे असे अनेक प्रकार आंतरराष्ट्रीय राजकारणात चालतात. ब्रिटन, अमेरिका आणि रशिया, तसेच चीन या खेळातील तज्ज्ञ आहेत. महाभारतातील कौरव या खेळातील तज्ज्ञ होते. एस. जयशंकर यांनी तीन उदाहरणे दिली. (जी आपल्या सर्वांना माहीत आहेत.) प्रथम भीमाला विष घालून पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला, लाक्षागृहात पांडवांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आणि द्युतात पांडवांना फसवून हरविण्यात आले. याला इंग्लिशमध्ये ‘डिसेप्शन’ असे म्हणतात. दुसर्‍या महायुद्धापूर्वी हिटलरने स्टॅलिनशी अनाक्रमणाचा तह केला. पोलंडला गाफील ठेवले आणि प्रथम पोलंडवर हल्ला करून त्याचे दोन तुकडे केले. पर्ल हर्बरवर हल्ला करण्यापूर्वी जपानने अमेरिकेला वाटाघाटीत गुंतवून ठेवले आणि अचानक हल्ला केला. चीन भारताला पंचशीलाची गुटी पाजत बसला. भारत गाफील राहिला, 1962 साली चिनी फौजा भारतात घुसल्या. हे फसवणुकीचे राजकारण आहे.
 
आजच्या काळात गटनिरपेक्षता (Non Alignment) हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक शब्दप्रयोग आहे. महासत्तांच्या गटात जायचे नाही, वेगळे राहायचे हा गटनिरपेक्षतेचा सिद्धान्त पं. नेहरूंशी जोडला जातो. पण तो भारताला नवीन नाही. महाभारतीय युद्धापूर्वी कौरव आणि पांडव या दोन महासत्ता उभ्या राहिल्या, या दोघांच्या गटात जायचे नाही, असे बलराम, रुक्मी आणि कृष्ण ठरवितात. अर्जुन कृष्णाला मागून घेतो, दुर्योधन यादवांची सेना मागून घेतो. पण कृष्णाची अट अशी असते की, मी हातात शस्त्र घेणार नाही, म्हणजे युद्ध करणार नाही. शस्त्र घेऊन न लढणारा अशी त्याची महाभारतातील युद्धात भूमिका आहे.
 
 
कौरव आणि पांडव या दोन महासत्तांच्या गटात वेगवेगळे राजे सामील झाले. आज ज्याप्रमाणे जगाची विभागणी अमेरिका, रशिया, चीन यांच्या गटात होते, तशी ही विभागणी आहे. कुणी कुठल्या गटात जायचे याचे प्रत्येकाचे स्वार्थ आहेत. सिंधू देशाचा राजा, त्रिगर्त राजे कौरवांच्या गटात गेले, कारण पांडवांकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पांचाल देशाचा राजा पांडवांच्या गटात आला, कारण त्याचे द्रोणाचार्यांशी हाडवैर होते. देशादेशांची अशी गटबाजी फार पूर्वीपासून चालू आहे, असा याचा अर्थ होतो.
 
 
आजचे जग अनेकध्रुवीय आहे. दुसर्‍याचे कल्याण व्हावे, त्याची भरभराट व्हावी म्हणून आज जगातील कोणताही देश कोणतेही काम करीत नाही. प्रत्येक जण स्वार्थ बघत असतो. स्वार्थ शोधणार्‍या अशा जगात भारताला आपले स्थान निर्माण करायचे आहे. नीतिमत्ता सोडायची नाही, पण जग कसे चालते याकडे कानाडोळा करून चालणार नाही. कौरव-पांडवांच्या युद्धात पांडवांना तेरा वर्षे वनवास भोगावा लागला, राज्य गमवावे लागले, द्रोपदीचा अपमान सहन करावा लागला, तेव्हा कृष्णाने दिलेला सल्ला असा की, हे सर्व सहन केले पाहिजे, आजच कौरवांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची घाई करू नये. आपला नैतिक पक्ष अधिक सामर्थ्यवान केला पाहिजे. या नैतिक भूमिकेवर अढळ राहिल्यास त्यातून सामर्थ्य निर्माण होईल. कौरवांच्या पक्षात द्रोणाचार्य, भीष्माचार्य होते. परंतु हे दोघेही मनाने पांडववादी होते. दुर्योधनाचा पराभव व्हावा, असेच त्यांना मनापासून वाटत होते. याचे कारण पांडवांचे नैतिक अधिष्ठान.


ही उदाहरणे देऊन जयशंकर म्हणतात की, हे नैतिक अधिष्ठान आपल्याला सोडता येणार नाही. याचा अर्थ अर्जुनासारखी भूमिका आपल्याला घेऊन चालणार नाही. युद्ध कशासाठी करायचे? नातेवाइकांना मारून काय मिळणार आहे? युद्ध म्हणजे विध्वंस, त्याने असंख्य प्रकारचे प्रश्न निर्माण होतील.. असे अनेक प्रश्न युद्धाच्या पहिल्याच दिवशी अर्जुनासमोर उभे राहिले. गीतेच्या पहिल्या अध्यायात आपण ते सर्व वाचू शकतो. मोदी सत्तेवर येईपर्यंत पाकिस्तानच्या संदर्भात भारताची ही अर्जुनभूमिका होती. जयशंकर यांनी भारताचे तेव्हाचे वर्णन ‘सॉफ्ट पॉवर’ असे केले जात असे, असे सांगितले. येथे सॉफ्ट पॉवर याचा अर्थ पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यांना सतत झेलणारी राज्यसत्ता असा करावा लागतो. प्रतिकार केला तर युद्ध होईल आणि पाकिस्तान अधूनमधून अणुबाँब टाकण्याच्या धमक्या देतच असते. आपले राज्यकर्ते घाबरतात. सीमेवरील सैन्यदेखील बराकीत पाठवून देतात. युद्ध नको बुद्ध हवा, गांधी हवे याची एकदम कुणाला आठवण येते.


या अर्जुनसंभ्रमाचा वारसा आपण चालविला. कृष्णनीतीचा अवलंब केला नाही. जो कपटकारस्थान करून कारवाया करतो, त्याला संधी मिळताच त्याच मार्गाने ठार केले पाहिजे. जयशंकर यांनी द्रोणाचार्य, कर्ण आणि दुर्योधन यांच्या मृत्यूची उदाहरणे दिली आहेत. यापैकी एकही युद्धाच्या नियमात युद्ध होऊन ठार झाला नाही. नियमभंग करूनच त्यांना ठार करावे लागले आणि हे सर्व त्याच प्रकारच्या मरणाला लायक होते. कारण नियमभंगाचा त्यांचा इतिहास मोठा आहे. आंतरराष्ट्रीय राजकरणात आपल्याला या नीतीचा अवलंब करता आला पाहिजे, असे जयशंकर यांना सुचवायचे आहे.


भारत महासत्ता होणार म्हणजे काय? जयशंकर प्रकरणाचा शेवट करीत असताना जे म्हणतात, त्याचा भावार्थ येथे देतो. ‘महाभारत ही नीतिमत्ता आणि सत्ता यांची कथा आहे. या दोघांमध्ये मेळ बसविण्याची श्रीकृष्णाची नीती आहे. भारताला विश्वात मोठे योगदान द्यायचे आहे, अशा वेळी अस्ताव्यस्त जगाशी सामोरे जात असताना आपण भारतीयांनी आपल्या परंपरांवर अवलंबून रहिले पाहिजे आणि हे आता शक्य आहे, कारण आजचा इंडिया अधिक भारत होताना दिसतो आहे. जगासमोर आपला पर्याय ठेवत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की, जगाच्या रंगभूमीवर सर्वच एकमेकांच्या विरुद्ध आहेत, अशा वेळी आपल्याला आपले उत्तर घेऊन पुढे यावे लागेल. नैतिक शक्ती ही भारतीय मार्गाची एक ओळख आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही.’