दहशतवादाचे भयानक स्वरूप

विवेक मराठी    02-Aug-2021
Total Views |
@मंगेश कुलकर्णी 9822173447
दहशतवाद हा शब्द ऐकला तरी अंगावर काटा उभा राहतो. हे पुस्तक वाचल्यावर हा दहशतवाद आता आपल्या उंबरठ्यापाशी कसा येऊन ठेपला आहे आणि तरी आपण भारतीय त्या बाबतीत कसे अनभिज्ञ आहोत, हे समजते. दहशतवादाचे नेमके स्वरूप काय आहे, तो कोणत्या कोणत्या स्वरूपात आपल्या आजूबाजूला वावरतो आहे, त्यापासून आपण आपले कसे संरक्षण करू शकतो याची उत्तम माहिती रुपाली भुसारी लिखित ‘आत्मघातकी दहशतवाद’ या पुस्तकातून मिळते.

book_1  H x W:
 
‘आत्मघातकी दहशतवाद’ (मानवी बॉम्ब), हे लेखिका रुपाली भुसारी’ यांचे पुस्तक मी काही दिवसांपूर्वीच वाचून काढले आणि सुन्न झालो. अतिशय वेगळा विषय, ज्याचा आपण विचारही करीत नाही.
भारतात असे कितीतरी दहशतवादी हल्ले झाले आहेत आणि त्यात हजारो निरपराध लोक, तसेच आपले सैनिक/ पोलीस मृत्युमुखी पडले आहेत. हा दहशतवाद आता आपल्या उंबरठ्यापाशी येऊन ठेपला आहे, तरी आपण भारतीय त्या बाबतीत पूर्णपणे बेफिकीर आहोत. हे पुस्तक वाचून आपले संरक्षण आपण कसे करू शकतो/दैनंदिन जीवनात आपण सजग राहून दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी आपल्या सैनिकांना/पोलिसांना कशी मदत करू शकतो, या विचाराला चालना मिळते. जागतिक पातळीवर दहशतवादी हल्ल्यांचा इतिहास फारच दाहक आहे. अनेक निरपराध लोक ह्यात ठार झाले आहेत. ‘आत्मघातकी दहशतवाद’ तर जास्त भयंकर आहे, कारण यात स्वत:चा जीव देऊन दुसर्‍याचा जीव घेण्याची विकृत कृती समाविष्ट असते.

पुस्तकात सुरुवातीलाच इंडोनेशियातील हल्ल्याचे वर्णन आहे. पुस्तक वाचकाला खिळवून ठेवण्यात यशस्वी होते. इंडोनेशियातील तीन चर्चेसवर एका मुस्लीम कुटुंबाने केलेला दहशतवादी हल्ला.. या हल्ल्यात त्या कुटुंबातील 9, 12, 16 व 18 वर्षांची मुलेसुद्धा सहभागी झाली होती. एक कुटुंबच्या कुटुंब एक युनिट बनून आत्मघातकी हल्ला करू शकते, हे वाचून अस्वस्थ व्हायला होते. 14-15 वर्षांची मुले कशी दहशतवादी कृत्ये करतात? त्यामागे कट्टर धार्मिक संस्कार, गरिबी, अपुरे शिक्षण आणि त्यातून हीरो होण्याची मानसिकता त्याना अधोगतीला घेऊन जातात. शेकडो लोकांची हत्या करताना त्यांची मानसिकता कशी असेल?
धार्मिक पगडा, त्याचप्रमाणे सामाजिक आणि मानसिक कारणे ह्यांचा सखोल अभ्यास ह्यात जाणवतो. जागतिक दहशतवादाचा प्राचीन काळापासूनचा ऐतिहासिक आढावा ह्यात संदर्भांसह दिलेला आहे. ‘मानवाला शस्त्र म्हणून वापरणे’ ह्या संकल्पनेचा आढावा अतिशय वाचनीय आहे. धार्मिक कट्टरतावाद, धार्मिक मूल्यांचा गैरवापर ह्याचे विवेचनही उत्तम आहे.
 
स्त्रियाही यात मागे नाहीत. पहिली स्त्री दहशतवादी, भोगवस्तू म्हणून तयार होणार्‍या स्त्रिया हे सगळे आपल्या दृष्टीने नवीनच. मुख्यत: पॅलेस्टाइन येथील महिला आत्मघातकी दहशतवाद्यांचे केस स्टडी ह्या पुस्तकात वाचायला मिळतात. शिवाय, चेचन्या येथील दहशतवादी स्त्रिया - ज्यांना शहीदका किंवा ब्लॅक विडो म्हणून ओळखले जाते. माजी पंतप्रधान राजीव गांधी ह्यांची हत्या करणारी एल.टी.टी.ई.ची धानू हिची माहिती ह्यात आहे. स्त्रियांच्या दहशतवादामागे कारणे काय असतात, ह्याचा वेध ह्यात घेतला आहे.
दहशतवादी संघटना, त्यांचे पशीुेींज्ञ, त्यांची धार्मिक आणि राजकीय उद्दिष्टे, धार्मिक पगडा, कट्टरता, आपण आणि ते ही मानसिकता याचे अतिशय माहितीपूर्ण विवेचन वाचायला मिळते.
जगातील दहशतवादी संघटना आणि त्यांनी केलेले हल्ले याची माहिती वाचून आपण हादरून जातो. इराण-इराक युद्धात पेरलेले भूसुरुंग निकामी करण्यास 10-12 वर्षांची मुले तयार झाली.
 
शिया-सुन्नी संघर्ष, जिहाद कल्पना, तालिबान, अल कायदा, इसीस आणि त्यांची भयानकता, लादेनची तारणहार होण्याची महत्त्वाकांक्षा, मुंबई हल्ला आणि बरेच काही. लेखिकेने ह्या हल्ल्यांचे चिकित्सक विश्लेषण केले आहे. मुंबईवरचा 26/11चा हल्ला, त्याचे वेगळेपण, त्याची दाहकता ह्याचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला आहे. तसेच अमेरिकेवरचा 9/11चा हल्ला. त्याच्या स्वरूपाबरोबरच त्यातील दहशतवाद्यांविषयीची माहिती यात आहे. केवळ हल्ला कसा झाला ह्याचे वर्णन नाही, तर त्यामागची कारणे, त्याचे विश्लेषण ओघवत्या भाषेत केलेले आहे. तसेच स्पेनच्या माद्रिद येथील हल्ल्याचे विवेचनही ह्यात आहे.
 
मोसादने दहशतवादाला प्रत्युत्तर कसे दिले, 25 डॉलर्ससाठी पॅलेस्टिनी दहशतवादी तयार होतात हे वाचून मन चक्रावून जाते. सर्वाधिक दहशतवादी स्त्रिया ह्या पॅलेस्टिनी आहेत आणि आता नायजेरियातील बोको हरामसारखी संघटनासुद्धा दहशतवादासाठी स्त्रियांचा वापर करून घेते.
 
 
या पुस्तकात जगातील सर्व दहशतवादी संघटना, त्यांचे कार्य कायम चालू राहण्यासाठी त्यांना मिळणारा पैसा (अनेक देश यात सामिल आहेत), मुले, स्त्रिया, तरुण यांचे कायम चालू असणारे ब्रेनवॉशिंग, क्रूरपणा ही सर्व माहिती लेखिकेने परिश्रमपूर्वक मिळवलेली आहे.
सीरियाच्या अल बुकामल ह्या गावावर जेव्हा इसीसने ताबा मिळवला, तेव्हा त्या गावातील लहान मुलांना कसे जाणीवपूर्वक दहशतवादी बनवण्याचे प्रशिक्षण दिले हे वाचून धक्का बसतो. लहान मुलांचे शिक्षण, अभ्यासक्रम सगळा बदलला जातो. बंदुकी आणि बॉम्ब ह्यांची चित्रे अभ्यासक्रमात येतात. हे सगळे वास्तव ह्या पुस्तकात वाचायला मिळते.
एकूणच ‘आत्मघातकी दहशतवाद’ ह्यामागे कोणती कारणे असतात? राजकीय, धार्मिक, मानसिक, सामाजिक, तसेच आर्थिक ह्या सगळ्या पैलूंचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे. आत्मघातकी दहशतवादी (मानवी बॉम्ब) कसा बनवला जातो? तसेच जागतिक दहशतवादी हल्ल्यांचे विश्लेषण आणि संशोधन करून लिहिलेले मराठीतील हे पहिले पुस्तक आहे, म्हणूनच ते सुजाण वाचकांनी नक्कीच वाचावे.
 
आपल्याकडे ह्या विषयावर फारशी जनजागृती नाही. दहशतवादाविरुद्ध जनमत निर्माण होणे गरजेचे आहे. ह्या पुस्तकात भारतातील दहशतवादाचे विवेचनही केलेले आहे. उरीवरचा हल्ला, पुलवामावरचा हल्ला, भारतात इसीसचा प्रवेश, केरळ आणि काश्मीर येथील इसीसचा प्रभाव ह्यावरही यात सप्रमाण विवेचन आहे. भारतापुढे काय आव्हाने असणार आहेत ह्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
संभाव्य दहशतवादी हल्ला टाळण्यासाठी सामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यावी हे ह्यात आहे. संशयास्पद व्यक्ती कशी ओळखावी, सामान्य नागरिकांनी जागरूकता दाखवल्यास हल्ले टळू शकतात, सुरक्षा रक्षकांसह सामान्य नागरिकांची मदत महत्त्वाची ठरते हे लेखिका स्पष्ट करते.
सध्याच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत ह्या विषयाला खूप महत्त्व आहे. जागतिक स्तरावरच्या ह्या विषयाला मराठी वाचकांसाठी सोप्या भाषेत विशद केलेले आहे. ह्याचा लाभ घेतला पाहिजे. हे पुस्तक नेहमीच्या पुस्तकांसारखे निश्चितच नाही. हे संदर्भांसह केलेले सखोल विश्लेषण आहे. संशोधनात्मक पद्धतीने लिहिलेले आहे. पण तरीही सामान्य वाचकाची उत्कंठा वाढवून ठेवण्यात लेखिकेला यश मिळाले आहे. विषय अतिशय सुलभ शैलीत मांडलेला आहे. हेच ह्या पुस्तकाचे यश आहे.
 
इस्रायलसारख्या देशात तर नागरिकांना सतत सावध सजग राहावे लागेत. भारतात जरी मुंबईच्या हल्ल्यानंतर मोठा दहशतवादी हल्ला झाला नसला, तरीही सजगता नेहमीच महत्त्वाची आहे. भारत सरकारच्या अनेक निर्णयांनंतर बर्‍याचदा इसीसने हल्ल्याची धमकी दिली आहे. जागतिक स्तरावर तर दहशतवादी हल्ले चालूच आहेत. त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन ह्या पुस्तकामुळे व्यापक होतो.
 
अतिशय किचकट आणि संवेदनशील विषय असूनही लेखिका अतिशय ओघवत्या शैलीत त्याची मांडणी सहज करते. हे पुस्तक लिहिण्यासाठी लेखिकेने केलेला विचार, घेतलेले संदर्भ, त्यासाठी घेतलेली मेहनत स्पष्टपणे दिसून येते. ज्यांना काही तरी वास्तव वाचायला, अभ्यासपूर्ण वाचायला आवडते, त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे. एकूणच आत्मघातकी दहशतवाद ह्याविषयी सर्व काही ह्यात आहे. नागरिक म्हणून आपल्या जाणिवेच्या कक्षा रुंदावतात.
 
एक चांगले पुस्तक वाचल्याचे समाधान नक्कीच मिळते.
 
• पुस्तकाचे नाव : आत्मघातकी दहशतवाद
• लेखिका : रुपाली भुसारी
• प्रकाशक : वरदा प्रकाशन
• पृष्ठसंख्या : 235
• मूल्य : 300 रु.