सलाम जपानच्या जिद्दीला!

विवेक मराठी    02-Aug-2021
Total Views |
@संदीप चव्हाण
ऑलिम्पिक संयोजनात करता येण्यासारखं जपानने सगळं केलंय. पण उसना उत्साह कुठून आणणार? चेहर्‍यावरील प्रत्येक हास्यामागे एक खिन्नता चटकन नजरेत भरते. अणुबाँब हल्ला असो किंवा हे कोरोना काळातील ऑलिम्पिकचं संयोजन.. जपानच्याच वाट्याला हे दु:ख का? कदाचित येथील मातीचं फिनिक्स पक्ष्याशी नातं असावं. असंही फिनिक्स पक्षी ग्रीसचा की इजिप्तचा यावर पुराण काळापासून इतिहासतज्ज्ञांत मतभेद आहेत. पण जपानी माणूस राखेतून उभं राहतो हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिलंय. टोकियोतील ऑलिम्पिक क्रीडास्पर्धांचं खास वार्तांकन...
olyampic_1  H x

वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे...
गजलकार इलाही जमादारांची ही आर्तता, ऑलिम्पिकसाठी जपानच्या टोकियो विमानतळावर उतरल्यापासून माझी सोबत करतेय. ऑलिम्पिक म्हणजे खेळाचा महाकुंभ. जगभरातील खेळाडू आपलं कौशल्य या स्पर्धेत पणास लावतात आणि या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अवघं जग ऑलिम्पिकच्या यजमान शहरात लोटतं. देश, धर्म, भाषा, जात, पंथ, रंग या सगळ्याचे अडथळे दूर करत अवघं जग येथे एक होतं. पण यंदा कोरोनामुळे अवघं जग बदललंय.. आणि हो, ऑलिम्पिकही. ओसाड रस्ते आणि रिकामं स्टेडियम ही या ऑलिम्पिकची व्यथा आहे. जपानचं वेदनेशी जणू नातंच जडलंय. ऑलिम्पिक 8 ऑगस्टला संपतंय आणि दुसर्‍याच दिवशी 9 ऑगस्टला नागासाकीवर अमेरिकेने टाकलेल्या अणुबाँबला 76 वर्षं पूर्ण होतील. जपानच्या माथ्यावरील अश्वत्थाम्यासारखी भळभळणारी ही जखम जपानच्या नसानसात भिनली आहे आणि म्हणूनच त्यांच्या धमन्यांत संघर्षावर मात करण्याचे संस्कार जन्मजात आहेत. अणुबाँबला पुरून उरलेला जपान कोरोनालाही पुरून उरलाय, एवढं नक्की. ऑलिम्पिक सुरू आहे आणि ते यशस्वी करण्यासाठी येथील प्रत्येक जपानी झटतोय.
काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली,
डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा...
अशीच काहीशी जपान्यांची अवस्था आहे. टोकियोतील निळ्याशार सुमीधा नदीच्या काठाकाठावर ऑलिम्पिकची अनेक स्टेडियम वसवली आहेत. संथ वाहणार्‍या नदीसोबत ऑलिम्पिकचा जोशही काहीसा संथ झालाय. जपान्यांच्या डोळ्यातील ही वेदना जागोजागी अनुभवता येतेय. पण दु:ख लपवण्यात हे जपानी वाकबगार आहेत. आता हेच पाहा ना - जपानच्या हनेडा विमानतळावर मी उतरलो, तेव्हा जगभरातील फक्त ऑलिम्पिकचा परवाना असणार्‍यांना ऑलिम्पिकमध्ये प्रवेश होता. थोडक्यात, तुम्ही कितीही करोडपती असाल, पण ऑलिम्पिक संपेपर्यंत तुम्ही जपानमध्ये दाखल होऊ शकत नाही. अवघं विमानतळ ओकंबोकं होतं. जणू मिलिटरीची छावणीच. माझ्याकडे परवाना असूनही मला विमानतळाचा अडथळा ओलांडायला 8 तास लागले. तेही जपानाला येण्याआधी त्यांच्या निकषानुसार सलग सात दिवस कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर. इतकं केल्यानंतरही विमानतळावर पुन्हा कोरोना टेस्ट घेतली गेली. ती निगेटिव्ह आल्यावर थेट टॅक्सीत कोंबून हॉटेलवर तीन दिवस क्वारंन्टाइन. म्हणजे सलग 11 दिवस टेस्ट. यापैकी कोणतीही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास सामान आवरून थेट परतीचं तिकीट. अथेन्स (ग्रीस), बीजिंग (चीन), लंडन (ब्रिटन) आणि रिओ (ब्राझिल) यांच्यानंतर आता हे माझं पाचवं ऑलिम्पिक आहे. पण एवढी अनिश्चितता मी पहिल्यांदाच अनुभवतोय. ऑलिम्पिकच्या निमित्ताने पर्यटनाला चालना मिळते. पण या वेळी पर्यटन व्यवसायाचा बाजार उठलाय. मी जे हॉटेल प्रतिदिवस 14 हजार जपानी येनला बुक केलं होतं, ते आता येथे आल्यावर निम्म्या - म्हणजे अवघ्या सात हजार जपानी येनमध्ये मिळतंय. आणि हो, 70 टक्के हॉटेल रिकामं आहे. आणि तरीही आपल्या झालेल्या नुकसानाचा चेहर्‍यावर लवलेश न दाखवता हे जपानी आमची सरबराई करण्यात मग्न आहेत आणि तेही चेहर्‍यावर हसू कायम ठेवत.
ऑलिम्पिकचं वैशिष्ट्य म्हणजे यजमान शहरात खास वाहतुकीसाठी एक ऑलिम्पिक लेन समर्पित असते. रस्त्यावर कितीही ट्रॅफिक असला, तरी ही लेन फक्त ऑलिम्पिकसाठी प्रवास करणार्‍यांसाठी राखीव असते. अशा राखीव लेनमधून मिरवताना अंगावर जरा मूठभर मांस चढायचं. पण या वेळी टोकियोत उलट परिस्थिती आहे. ऑलिम्पिकदरम्यान येथे कर्फ्यू असल्याने फक्त अत्यावश्यक वाहतूकच सुरू आहे. त्यामुळे टोकियोतील अवघे रस्ते तसे ओस पडलेत.
 

olyampic_4  H x

कौतुक आणि फक्त कौतुकच!
जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. आणि उग

वत्या सूर्याला नमस्कार करायचा, ही जगरहाटी. अगदी ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणार्‍या मीराबाईलाही ती चुकलेली नाही. आज अवघा भारत मीरबाईचं कौतुक करण्यात मग्न आहे. पण चार वर्षांपूर्वी याच मीराबाईची आपण किती थट्टा उडवली होती, याचा सगळ्यांना विसर पडतो.
एकदा का तुमच्यावर अपयशाचा शिक्का बसला की अवघं जग तुम्हाला नजरअंदाज करतं. अगदी मीराबाईची लढत सुरू असेपर्यंत तिच्याबाबत असंच सुरू होतं. आज तिच्या या यशाचं कौतुक करायलासुद्धा भारतीय पत्रकारांपैकी मी आणि माझ्या आग्रहामुळे माझ्यासोबत आलेला माझा सहकारी असे आम्ही दोघेच होतो. संपूर्ण भारतीय मीडिया शूटिंगमधील पदक मिळणार असं ठरवून तेथे होते. पण दुर्लक्षित मीराबाईने इतिहास घडवला आणि क्षणात ती भारताची ‘आयडॉल’ बनली.


olyampic_2  H x
 
चार वर्षांपूर्वी मी रिओ ऑलिम्पिकमध्ये चानूची मॅच पाहायला गेलो होतो. रिओ ऑलिम्पिकमध्ये क्लीन आणि जर्कमध्ये तिला एकही यशस्वी लिफ्ट करता आली नव्हती. ऑलिम्पिकला जाणार्‍या खेळाडूकडून इतकी मोठी चूक कशी होऊ शकते, यासाठी तिच्यावर अपमानास्पद टीकाही झाली होती. तिच्यासहितच वेटलिफ्टिंगचीही टिंगल उडवण्यात आली होती. वेटलिफ्टिंगला ‘भारत्तोलन’ असंही म्हणतात. ‘हे वेटलिफ्टर म्हणजे भारतीय ऑलिम्पिक पथकाला भार झालेत’ अशीही टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. मीराबाई या अपमानाने पेटून उठली. ऑलिम्पिकआधी झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत मीराबाईने याच क्लीन आणि जर्कमध्ये 119 किलोचं वजन उचलून नवा जागतिक विक्रम केला. आज तिने क्लीन आणि जर्कमध्ये 115 किलो आणि स्नॅचमध्ये 87 किलो असं एकूण 202 किलोचं वजन उचललं. अवघ्या 8 किलोच्या फरकाने चीनच्या होऊ झिहूईने (210) टोकियो ऑलिम्पिकचं सुवर्णपदक जिंकलं.
वेटलिफ्टिंगमध्ये 21 वर्षांपूर्वी कर्णम मल्लेश्वरीने भारताला कास्यपदक जिंकून दिलं होतं. वैयक्तिक खेळातील महिलांचं ते पहिलं पदक ठरलं होतं. मीराबाईने रौप्यपदक जिंकत त्याला आणखी उंची गाठून दिली. बॅडमिंटनपटू सिंधूनंतर ऑलिम्पिकचं रौप्यपदक जिंकणारी ती अवघी दुसरी खेळाडू ठरलीय.
मणिपूरच्या खेड्यात वाढलेली मीराबाई लहाणपणी आपल्या मोठ्या भावासोबत चुलीसाठी सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जायची, तेव्हाही ती भावापेक्षा जास्त वजन उचलून घेऊन यायची. पुरुषांपेक्षा आपण कमी नाही हे दाखवून द्यायची. मीराबाईला तेव्हापासूनच जिद्द होती. याच जिद्दीने तिने ऑलिम्पिकच्या रौप्यपदकाला गवसणी घातली. मीराबाईच्या या यशामुळे भारतीय महिलांच्या जागतिक दर्जावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतातील विविध क्षेत्रांतील स्वत:ला सिद्ध करू पाहणार्‍या असंख्य मीराबाईंना प्रेरणा मिळालीय, एवढं नक्की.

ऑलिम्पिक संयोजनात करता येण्यासारखं जपानने सगळं केलंय. पण उसना उत्साह कुठून आणणार? चेहर्‍यावरील प्रत्येक हास्यामागे एक खिन्नता चटकन नजरेत भरते. अणुबाँब हल्ला असो किंवा हे कोरोना काळातील ऑलिम्पिकचं संयोजन.. जपानच्याच वाट्याला हे दु:ख का? कदाचित येथील मातीचं फिनिक्स पक्ष्याशी नातं असावं. असंही फिनिक्स पक्षी ग्रीसचा की इजिप्तचा यावर पुराण काळापासून इतिहासतज्ज्ञांत मतभेद आहेत. पण जपानी माणूस राखेतून उभं राहतो हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिलंय. अशा या जपानची ही माती भाळी लावण्याची संधी या ऑलिम्पिकच्या निमित्ताने आम्हाला मिळालीय.


olyampic_3  H x

जागतिक दर्जाचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या देशोदेशींच्या मुलांचा किलबिलाट ही ऑलिम्पिकची खास ओळख. पण उद्याचं भविष्य असणार्‍या मुलांचा किलबिलाट मी अगदी एअरपोर्टपासून ते स्टेडियमपर्यंत मिस करतोय. जपानच्या नागासाकीवर अणुबाँबचा हल्ला झाल्यानंतर अमेरिकन सेनेचा कॅमेरामन जो ओडोनिलने काढलेला एक फोटो अणुबाँबच्या भयानकतेचा चेहरा बनला होता. ओडनिलने अणुहल्ल्यानंतर एक महिन्याने तो फोटो काढला होता. एक छोटा जपानी मुलगा आपल्या मृत छोट्या भावाचं प्रेत आपल्या पाठीवर लादून स्मशानभूमी नजीक त्याच्या अंत्यविधीसाठी उभा आहे. आजवर त्या मुलाचा शोध लागला नाही. गेल्या 76 वर्षांत हा फोटो काढणारा ओडोनिलही वारला, पण या मुलाची ओळख काही पटली नाही. असं म्हणतात की अणुबाँबच्या रेडिएशनमध्ये तो मुलगाही नंतर गतप्राण झाला. पण त्या मुलाने जपानला जगण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली आणि आजही देत आहे. कोरोनाच्या काळातही आपण जगभरात पाठीवर आप्तांची कलेवर वाहणारी माणसं पाहिलीत. या ऑलिम्पिकच्या निमित्ताने जपान जणू दु:खात बुडालेल्या अवघ्या जगाला सांगू पाहतंय की हिम्मत हरू नका. जपानी भाषेत सांगायचं झालं, तर ‘शिवासे वा मो सुदे नि देकियागाट्टे इरु मोनो जा नाई. जिबुन नो कोडो गा हिकित्सुकेरू मोनो दो’ म्हणजे आनंद रेडिमेड मिळत नाही, तो तुमच्या कृतीतून तुम्ही निर्माण करायचा असतो. कोरोनाच्या या निराशाजनक काळात जगाला आनंद देण्यासाठी जपान अहोरात्र झटतंय... त्यांच्या याच जिद्दीला सलाम!

संदीप चव्हाण
9930360431