अतिवृष्टीचे आणि महापुराचे वास्तव

विवेक मराठी    02-Aug-2021
Total Views |
flood_2  H x W:

@डॉ. श्रीकांत कार्लेकर 9764769791
अतिवृष्टी हे कोकण आणि घाट क्षेत्रातील पूर आणि दरडींच्या घटना घडण्यामागील मुख्य कारण असले, तरी अनेक तज्ज्ञांच्या मते इतका मोठा प्रलय हा इतर अनेक घटनांचा परिपाक आहे. अतिवृष्टी, अतिशय चुकीचे व्यवस्थापन, अनियोजित व अनिर्बंध शहरीकरण, गाफील प्रशासन अशा अनेक गोष्टी या आपत्तीनंतर प्रकाशात आल्या आहेत.
 
या वर्षी 5 जून 2021 रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यापासून अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील आठवड्यात मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार आणि भरपूर पावसाची नोंद झाली. कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना तर मान्सूनच्या पावसाने पार झोडपून काढले, तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतही अतिवृष्टीसदृश पावसाची नोंद झाली. दरम्यानच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे दिसून आले. अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात अतिवृष्टी झाल्याचे मत हवामानतज्ज्ञांनी दिले होते.

कोकण आणि घाट क्षेत्रातील पूर आणि दरडींच्या घटना घडण्यामागे 21 जुलैच्या रात्रीपासून सुरू झालेला पाऊस विक्रमी असल्याचे पर्जन्यमानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. मात्र अतिवृष्टी म्हणावा असा पाऊस घडण्यामागे वातावरणातील वार्‍यांची असामान्य स्थिती असल्याचे हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. बुधवारी रात्री साधारण दहापासून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि लगतच्या नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूरमधील घाट क्षेत्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पावसाचे प्रमाण वाढतच राहिल्यामुळे रात्रीपासूनच अनेक ठिकाणी जोराचे पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटना घड़ू लागल्या. घाट परिसरांत झालेल्या विक्रमी पावसामुळे घाटाच्या पश्चिम आणि पूर्व दोन्ही बाजूंना वाहणार्‍या नद्यांची पात्रे दुथडी भरून वाहू लागली व सकाळपर्यत पूरस्थिती निर्माण झाली. गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंत घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी 300 मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती.
 
 
हवामानतज्ज्ञांच्या मते बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असताना त्या क्षेत्राकडे अरबी समुद्राकडून वाहणारे मान्सूनचे वारे खेचले जाऊन पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा (Offshore trough) सक्रिय झाला. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ दक्षिणेकडून येणारे नैर्ऋत्य मोसमी वारे आणि उत्तर दिशेकडून जमिनीवरून येणारे वारे यांचा वातावरणात दीड ते चार कि.मी. उंचीवर संयोग झाला. यामुळे किनारपट्टी आणि घाट क्षेत्रात सातत्याने उंच ढगांची निर्मिती झाली.
 
 
गेल्या काही वर्षांतील दर वर्षीचा मान्सून हा आधीच्या मान्सूनपेक्षा काहीतरी वेगळा असल्याचे सर्वांनाच जाणवते आहे. त्यामध्ये अनेक छोटे-मोठे बदल झालेलेही दिसून येत आहेत. दर वर्षी जुलैमध्ये या वर्षीइतका जास्त पाऊस होत नाही. अरबी समुद्रावरून वाहणार्‍या वार्‍यांची मान्सून शाखा सक्रिय झाली की मध्य महाराष्ट्रासह कोकणात पाऊस पडतो, तर बंगालच्या उपसागरातील शाखा सक्रिय झाली की विदर्भात पाऊस पडतो.
 
 
सध्या राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. पण कोकण आणि मध्य व पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. हवामानात होणारे तीव्र बदल हेच अशी अतिवृष्टी होण्यामागे मुख्य कारण असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
 

flood_3  H x W: 
 
 
बुधवार 21 जुलैचा आणि गुरुवारचा 22 जुलैचा कमी वेळातील जास्त पाऊस अशी परिस्थिती महाराष्ट्रात 30पेक्षा जास्त ठिकाणी झाली आणि अवघ्या चोवीस तासांत ढगफुटीसारखा पावसाचा अभूतपूर्व वर्षाव झाला. पण भारतीय हवामान विभागाने ही ढगफुटी नसल्याचे म्हटले आहे. हा पाऊस म्हणजे अतिवृष्टी किंवा महावृष्टी असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.
 
 
जमिनीपासून दीड कि.मी. उंचीवर ताशी 60 कि.मी.पेक्षा जास्त वेगाने वाहणारे वारे, त्यांच्याबरोबर समुद्रावरून मोठ्या प्रमाणात आलेले बाष्प यांमुळे मोठ्या क्षेत्रावर अतिवृष्टी करणार्‍या ढगांची काही तास सातत्याने निर्मिती होत राहिली. मान्सूनशी संबंधित हवामानाबरोबरच वार्‍यांच्या या असामान्य स्थितीमुळे गुरुवारी कोकणात आणि घाटात बिकट स्थिती निर्माण झाली. पावसाचे आकडे पाहिल्यास 250-300 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला आहे अशी ठिकाणे घाटावरील आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी तर चोवीस तासांत 400 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला.
 
 
जागतिक हवामान संघटनेच्या (WMOच्या - World Meteorological Organizationच्या) व्याख्येनुसार कमी वेळात जास्त पाऊस म्हणजे ढगफुटी (Cloudburst). 15 मिनिटांत 25 मि.मी., 30 मिनिटांत 50 मि.मी., 45 मिनिटांत 75 मि.मी. किंवा एक तासाच्या कालावधीत 100 मि.मी. किंवा त्यापेक्षाही अधिक पाऊस म्हणजे ढगफुटी असे म्हटले जाते. ढगफुटींचा पाऊस कधीच 24 तास पडत नाही. मान्सूनपूर्व किंवा मान्सूननंतरच्या काळात अस्थिर वातावरणात क्युमुलोनिंबस या पर्जन्य ढगांमुळे मुख्यत्वे डोंगराळ भागांत ढगफुटी होते. मान्सून स्थिर झाला की वातावरण स्थिर होते, म्हणून मान्सूनमध्ये ढगफुटी होत नाही, हे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता असलेले संशोधन आहे. त्यामुळे अद्याप या वर्षीचा मान्सून स्थिर होणे बाकी आहे हे या घटनेतून दिसून येते, असाही दावा केला जात आहे.
 
 
याउलट अतिवृष्टी म्हणजे 24 तासांत 64 मि.मी.पेक्षा जास्त होणारा पाऊस. 65 मि.मी.पेक्षा जास्त म्हणजे अतिपाऊस (Heavy rains) आणि 65 ते 125 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस म्हणजे खूप जास्त पाऊस (Very heavy rain), तर 250 मि.मी.पेक्षाही जास्त म्हणजे अत्यंत जास्त पाऊस (Extremely heavy rain) असे भारतीय हवामान खाते मानते. मात्र, ही पद्धत संदिग्ध, अपुरी, सदोष व गोंधळात टाकणारी आहे, त्याऐवजी दर तासाला किती मिलिमीटर पाऊस झाला हे माहीत असणे महत्त्वाचे, असे अनेक अभ्यासकांना वाटते.
 
 
मान्सूनच्या आकृतिबंधातील (Patternमधील) बदल, समुद्राकडून जमिनीकडे येणारे बाष्पयुक्त व उलट दिशेने वाहणारे वारे, वातावरणातील अस्थिरता, निम्बोस्ट्रेटस (Nimbostratus) ढगांपेक्षा अधिक प्रमाणात क्युमुलोनिंबस (Cumulonimbas) या पर्जन्य ढगांची निर्मिती व सायंकाळी साडेचारनंतर वेगाने होणारी तापमानातील घसरण ह्या मुख्य शास्त्रीय कारणांमुळे सामान्यपणे अतिवृष्टी होते. याच कारणामुळे महाराष्ट्रात ढगफुटींसारख्या अतिवृष्टीचे प्रमाण अचानक वाढले असल्याचे दिसून येते.
 
 
मान्सून ही एक अवाढव्य पण शिस्तबद्ध अशी यंत्रणा आहे. पण यंत्रणा कितीही शिस्तबद्ध असली, तरीही त्यात अनिश्चिततेचे प्रमाणही तितकेच मोठे आहे. सध्याच्या काळात ही यंत्रणा अनेक कारणांनी बाधित होऊ लागल्याचे संकेत याआधीच मिळू लागले आहेत. उष्ण कटिबंध प्रदेशातील जमिनीच्या व पाण्याच्या तापमानात मानवी हस्तक्षेपामुळे सतत होणारे बदल यामुळे ही यंत्रणा प्रामुख्याने बाधित होऊ लागली आहे. सामान्यपणे जमीन समुद्रापेक्षा जास्त वेगाने तापते. त्यामुळे जमीन आणि पाणी यांच्या तापमानात जो फरक पडतो, तो मान्सून वार्‍यांच्या निर्मितीला पोषक ठरतो. मात्र वर्ष 1950नंतर समुद्रजल पूर्वीपेक्षा जास्त उष्ण होत गेले. ही प्रक्रिया एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत - म्हणजे वर्ष 2002पर्यंत प्रकर्षाने दिसून आली. जमीन आणि समुद्र या दोन्ही पर्यावरण संरचनांत होत असलेला मानवी हस्तक्षेप हेच याचे मुख्य कारण असल्याचेही लक्षात आले.
 

flood_4  H x W:
 
याच काळात भारतीय मान्सूनमध्ये पर्जन्यमानात दहा टक्क्यांनी घट झाली. जागतिक तापमानवाढीमुळे जमीन समुद्राच्या तुलनेत जास्त तापू लागल्यामुळे त्यानंतर पुन्हा एकदा तापमानातील हा फरक थोडा वाढू लागला. यामुळे पाऊसमान वाढेल किंवा मान्सून पूर्वपदावर येईल व वर्ष 2018चा भारतीय मान्सून सामान्य मान्सून असेल, असे भाकीत 2017 या वर्षी करण्यात आले होते. मात्र भारताच्या बहुतांश राज्यांत 2018मध्ये मान्सूनचा पाऊस बरसलाच नाही! देशात सर्वसाधारणपणे 887 मि.मी. इतक्या सरासरीने पर्जन्यवृष्टी होते. 2018मध्ये ती 804 मि.मी. होती. 2019मध्ये हे प्रमाण 976 मि.मी., तर 2020मध्ये 967 मि.मी. म्हणजे 109 टक्के इतके होते.
 
 
 
जमीन आणि समुद्राचे पाणी यांच्या तापमानातला फरक मान्सूनमधले पाऊसमान वाढेल की कमी होईल हे ठरवत असतो. असे असले, तरीही जागतिक तापमानवृद्धी, उत्तर व दक्षिण ध्रुव प्रदेशातील बर्फाचे वितळणे, हिमनगांचे उत्तरेकडून व दक्षिणेकडून 30 अंश उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्तांच्या दिशेने होत असलेले स्थानबदल व त्यामुळे जागतिक हवामानात होत असलेले बदल या व अशा अनेक गोष्टींचा मान्सूनवर निश्चितच परिणाम होऊ लागला आहे, यावर अनेक शास्त्रज्ञांत एकमत दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मान्सूनमधील पावसाचे प्रमाण, त्याची तीव्रता याबद्दलचे अंदाज अचूक राहण्याची शक्यताही थोडी कमी होते आहे. मान्सून पर्जन्याचे भाकीत करण्याच्या प्रक्रियेत एलनिनोवर आधारित केलेले अंदाज नेहमीच खरे ठरले आहेत, असेही दिसून येत नाही.
 
 
गेल्या काही वर्षांतल्या मान्सूनचे वैशिष्ट्य म्हणजे दैनंदिन पावसांत दिसून येणारी अस्थिरता आणि तफावत (Variability). अनेक ठिकाणी एकूण पावसाच्या 97 टक्के पाऊस केवळ 3 दिवसांपासून 27 दिवसांपर्यंत अनुभवाला येतोय. या वर्षी मुंबईत 26 जुलै 2021पर्यंत 2205 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. इथले वार्षिक सरासरी पाऊसमान 2320 मि.मी. आहे. डहाणू, अलिबाग आणि रत्नागिरी येथे हे प्रमाण या तारखेपर्यंत अनुक्रमे 1172, 1633 आणि 3087 मि.मी. इतके मोठे आहे. महाबळेश्वर येथे 26 जुलैपर्यंत 4072 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. विदर्भात आणि मराठवाड्यात मात्र अजूनही (26 जुलैपर्यंत) तिथल्या वार्षिक सरासरीच्या अनुक्रमे 49 व 42 टक्केच - म्हणजे 926 व 444 मि.मी. इतकाच पाऊस झाला आहे.
 
 
स्कायमेट या संस्थेच्या निरीक्षणानुसार मान्सूनमध्ये बंगालच्या उपसागरावर तयार होणारी तापमान-वारे-वायुभार यंत्रणा भारताच्या मध्यवर्ती भागाकडे सरकते आणि विदर्भापर्यंत तिचा परिणाम जाणवतो. विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्या भौगोलिक समीपतेमुळे (Proximityमुळे) विदर्भात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतो. मात्र अरबी समुद्रावरून येणारी मान्सूनची शाखा मराठवाड्याला येईपर्यंत खूपच दुर्बल होऊन जाते. मान्सून ट्रफ किंवा पश्चिमी अडथळे (Disturbances) या यंत्रणाही इथपर्यंत पोहोचू शकत नाहीत.
 
 
सामान्य परिस्थितीत भारतीय उपखंडावर जूनमध्येच चार लघुभार प्रदेश तयार होतात आणि नंतर ते अधिक तीव्र होत जातात. त्यामुळे जून-जुलैमध्येच चांगला पाऊस पडतो. मान्सूनमध्ये होणार्‍या कमी-जास्त पावसाची करणे वेगवेगळी असतात. खरे म्हणजे एका दशकातल्या निरीक्षणांवरून पावसाचे आकृतिबंध कळत नाहीत. शंभर वर्षांची आकडेवारी पाहिली, तर पर्जन्य प्रमाणांत वाढ झालेली दिसून येते. भारतातील पर्जन्यवृत्तीत गेल्या काही वर्षांपासूनच बदल जाणवू लागल्याचे हवामानशास्त्रज्ञांचे निरीक्षण सांगते. काही ठिकाणी जूनमध्ये पडणार्‍या पावसाच्या प्रमाणात थोडी वाढ झाली आहे, तर काही ठिकाणी घट झाली आहे. जुलैमध्ये पावसात सर्वसाधारणपणे बहुतांश ठिकाणी घट झालेलीही दिसते आहे. 2021 हे सध्याचे वर्ष मात्र याला अपवाद ठरू शकते.
 
 
 
अनेक हवामानतज्ज्ञांच्या मतानुसार अतिवृष्टीची ही सगळी घटना हवामान बदलाशी संबंधित अशा टोकाच्या (Extreme) हवामान घटकांशी निगडित आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही अतिवृष्टी हा गेली काही वर्षे भारतभर जाणवत असलेल्या पर्जन्यवृत्तीतील बदलाचा एक परिणाम आहे. 1950 ते 2020 या कालखंडातील हवामान बदलाचा अभ्यास असे सुचवितो की अतिवृष्टीच्या प्रमाणात या कालखंडात अनेक ठिकाणी खूप वाढ झाली आहे. साधारणपणे रोज 100 ते 150 मि.मी. इतका पाऊस नोंदविला जाण्याची वृत्तीही प्रकर्षाने लक्षात येते आहे. याउलट काही तज्ज्ञांच्या मते या घटनेचा हवामान बदलाशी काहीही संबंध नाही. पश्चिमी अडथळे (Western disturbance) आणि मान्सून प्रणाली यातील आंतरप्रक्रिया आणि भारतीय मान्सूनच्या नैर्ऋत्य मोसमी वारे आणि बंगालच्या उपसागरावरील वार्‍यांची शाखा या दोन्ही शाखा सक्रिय होतात, तेव्हा आणि समुद्रावर मोठा लघुभार प्रदेश तयार झाल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला, असा त्यांचा दावा आहे.
 


flood_1  H x W:
 
या अतिवृष्टीमुळे चिपळूण, महाड, कोल्हापूर इथे महापूर आले. दरडी कोसळल्या. अतिवृष्टी हे या पुरामागचे मुख्य कारण असले, तरी अनेक तज्ज्ञांच्या मते इतका मोठा प्रलय हा इतर अनेक घटनांचा परिपाक आहे. अतिवृष्टी, अतिशय चुकीचे व्यवस्थापन, अनियोजित व अनिर्बंध शहरीकरण, गाफील प्रशासन अशा अनेक गोष्टी या आपत्तीनंतर प्रकाशात आल्या आहेत.
 
 
भविष्यात, विशेषत: पावसाळ्यात येऊ शकणार्‍या अशा अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या निवारणासंबंधीची कोणतीही योजना आपल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे अजूनही तयार नसल्याची धक्कादायक बातमी नुकतीच वाचनात आली. वास्तविक पाहता पुढच्या चार ते पाच महिन्यांतील नैसर्गिक परिस्थितीचा अंदाज घेऊन, यामुळे येणार्‍या पुराचा पूर्वानुभव व उपलब्ध आकडेवारी पाहून पूर आपत्ती व्यवस्थापन व निवारण योजना पुरेशा आधी तयार करून ठेवण्याची नितांत गरज असते. अनेक देशांमध्ये काटेकोरपणे ही प्रथा पाळली जाते. भारतासारख्या मान्सून हवामानाच्या प्रदेशात तर अशा योजनांची नक्कीच निकड असते. आपत्तीत व्यवस्थापनाच्या नेमक्या योजना तयार नसतील, तर होणार्‍या जीवित-वित्तहानीचे प्रमाण आपल्या बेजबाबदारपणामुळे खूप मोठे बनू शकते.
 
 
निसर्ग नेहमीच सर्व गोष्टींची पूर्वसूचना खूप आधी देत असतो. भूकंपासारखी आपत्ती वगळता इतर आपत्तीमध्ये भविष्यात घडणार्‍या घटनांच्या पूर्वसूचना वेगवेगळ्या पद्धतींनी नेहमीच मिळत असतात. त्यावर सतत लक्ष ठेवून आपत्ती व्यवस्थापनाच्या योजना तयार करून ठेवणे नेहमीच फायद्याचे ठरते. आपल्याकडे सरकारी किवा खाजगी यंत्रणा अशा प्रकारच्या व्यवस्थापन योजनांकडे फारसे गांभीर्याने कधीही पाहत नाहीत.
 
 
अशी आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणांत ठेवण्यासाठी काही योजना व धोरणे निश्चित करण्याची वेळ आता नक्कीच आली आहे. सरकारी मदतीच्या थातूरमातूर घोषणा आणि तुटपुंजी मदत यांचा काहीही उपयोग होत नाही, हा आपला नेहमीचा अनुभव आहे. अतिवृष्टीच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच गावांमध्ये पर्जन्यमापक बसविणे, पूररेषांची निश्चिती करणे, त्यातील बांधकामे हटविणे, नवीन होऊ न देणे, पूर परिस्थितीचा आधीचा अनुभव लक्षात घेऊन व नवीन तंत्रज्ञान वापरून आपत्तिप्रवण प्रदेशांचे नकाशे तयार करणे, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी दर वर्षी केंद्र सरकारकडून मिळणार्‍या निधीचा वापर करून राज्यातील सर्व - म्हणजे 36 जिल्ह्यांतील सगळ्या तालुक्यांत डॉप्लर रडार तातडीने बसविणे व कार्यान्वित करणे, महापुराने होणारी जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी सर्व धरणांतील जलव्यवस्थापन करण्यासाठी हवामान माहिती व धरणकक्ष यांशी जोडलेली यंत्रणा उभारणे, प्रत्येक नागरिकाच्या मोबाइलवर अंदाज नव्हे, तर अक्षांश-रेखांश स्थान संदर्भानुसार अचूक माहिती व पूर्वसूचना मिळण्याची व्यवस्था करणे अशा अनेक गोष्टी करता येतील. पूरसमस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपनद्यांवर पाणीसंचय करणारी धरणे किंवा तलाव बांधणे, गाळ उपसून नदीपात्रे खोल करणे, येणार्‍या गाळाच्या नियंत्रणाच्या योजना आखणे, वितरिकांचे प्रारूप ठरविणे याबरोबरच पूरग्रस्तांसाठी विमा योजना, पूर उपशमन प्रशिक्षण यांचे नियोजन आधीपासूनच करावे लागते. प्रत्येक वेळी हे नैसर्गिक संकट आहे असे म्हणून हात झटकणे ही केवळ एक पळवाट आहे!